ऋतुराज आज वनी आला (मुकुंद वेताळ)

- मुकुंद वेताळ
रविवार, 12 मार्च 2017

वसंत हा ऋतुचक्रातला सर्वोत्तम मानलेला ऋतू. तो अवतरतो, तेव्हा फुलं, पानं, भ्रमर, कोकिळा सगळेच त्याचं गाणं गाऊ लागतात. जिकडं पाहावं तिकडं रंगांचा खेळच सुरू होतो. सगळीकडं नवचैतन्य जाणवतं. उदास, निरुत्साही मानवी मनांनाही बहर येतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाच्या निमित्तानं या वसंतवैभवाचं हे वर्णन.

वसंत हा ऋतुचक्रातला सर्वोत्तम मानलेला ऋतू. तो अवतरतो, तेव्हा फुलं, पानं, भ्रमर, कोकिळा सगळेच त्याचं गाणं गाऊ लागतात. जिकडं पाहावं तिकडं रंगांचा खेळच सुरू होतो. सगळीकडं नवचैतन्य जाणवतं. उदास, निरुत्साही मानवी मनांनाही बहर येतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाच्या निमित्तानं या वसंतवैभवाचं हे वर्णन.

वसंत हा वर्षातल्या ऋतुचक्रातला पहिला आणि सर्वोत्तम मानलेला ऋतू. चैत्र आणि वैशाखाच्या पुढंमागं दोन महिने वसंताचं ‘राज्य’ असतं. वसंत रानावनात अवतरतो, तेव्हा फुलं, नवपालवी, भ्रमर आणि कोकिळा हे त्याच्या आगमनाची वर्दी देतात. अशा वेळी आम्रवृक्षावर विस्तारलेल्या वल्लरी नर्तनानं मनाला मोहून टाकतात. मलयगिरीवरून येणारा वारा त्यांची पानं उडवत राहतो.

कालिदास हा तर वसंतवेडा कवी, ऋतुराज वसंताच्या आगमनामुळं वनश्रीच्या रंगरूपात होणारे बदल सूक्ष्मतेनं त्यानं टिपले आहेत.

कुमारसंभवात वसंताच्या उन्मादक सौंदर्याची किमया अत्यंत प्रभावी शैलीत वर्णिली आहे. असा साहित्यातला वसंत निसर्गात प्रत्यक्षात अजमावताना कोकीलकूजन तरी नक्कीच लक्ष वेधून घेते आणि कविवर्य माधवांच्या ओळी ओठावर येतात.

प्रातःकाली कुणी कोकिळा तरू शिखरी बैसानी,
उंच स्वराने सांगू लागली जगतालागोनी
वसंतराया येईल आता तुम्हा भेटाया,
राजदर्शना सज्ज रहावे आले सांगाया
रत्युत्सुक कोकिळा आपल्या कोमल स्वरानं ऋतुराज वसंताच्या आगमनाची सूचना आम्रतरूवरून देत आहे. या चराचराला वसंत आवडतो, कारण वसंत म्हणजे मधुमास, वसंत म्हणजे कुसुमाकर. ‘पुष्पधुळीमाजी लोळे वसंत’ असं मुक्तेश्‍वरांनी म्हटलं आहे, निव्वळ परागकणांवरती लोळणारा हा वसंत. सकल सजीवांच्या चित्तवृत्तींना उल्हसित करणारा; तसंच बेसुमार रंगछटांची बरसात करणारा हा मास आहे. रंग-रूप-रस-गंध यांच्या आविष्कारांचा वासंतिक महोत्सव दोन महिने तरी टिकून राहतो; पण ही जाणीव आधीपासूनच म्हणजे माघातच होऊ लागते.

कधी बहर, कधी शिशिर
परंतु, दोन्ही एक बहाणे
वसंत येण्याआधी पानझड व्हावी लागते आणि त्याचसाठी शिशिराचंही आगमन महत्त्वाचं. वर्षाकालची ती हिरवी-हिरवी दुलई मनःचक्षूंसमोरून जातच नसताना अलगुजपणे पिवळतीकडे कधी जाते हेच कळत नाही, ही तर खरी शिशिराची कमाल.

सुटले माघामधले वारे
गोठले हिमाद्रीत गंगाजल की सारे
माघातला गार वारा असा काही परिणाम साधतो, की जून पानं गळू लागताच पाहता-पाहता वृक्षराजींचा तो उभा पर्णसांभार अलगदपणे खाली येतो आणि तोच वारा, तीच सळसळ पुढं-पुढं सरकावत राहतो.

हलके हलके हलते गळते
तरूचे पान न्‌ पान बाई
पानझडीत या ऐकून घ्या गं,
शिशिर ऋतूचं गान बाई
ओक्‍याबोक्‍या वृक्षवल्लरींच्या पानं गळून गेलेल्या खुणांतून नकळत कोंब जागवलेले असतात. यथावकाश ती पर्णहीनता जाऊन तरू-तरूवर नवचैतन्य येतं आणि उपवनीचा आनंद दुणावतो. उदास, निरुत्साही मानवी मनं ते नवपालव पाहून सुखावतात. अर्थात माघातच ही किमया घडत असताना आपण ‘चैत्रपालवी फुटली’ असं म्हणून मोकळे होतो. इतके आपण वसंतोत्सुक नव्हे, ‘वसंतवेडे’ही असतो. अशातच सर्वांत आधी आंब्या फणसांची झाडं लक्ष वेधून घेतात...

वसंतमंडप वनराई
आंब्याची पुढती येई
डेरेदार आंब्यांची हिरवीकंच पानं शाखाग्राला अंजिरी होत लालचुटूक होतात. या हिरव्या पार्श्‍वभूमीवरचा तांबडा रंग परस्परविरोधी रंगसंगतीतला मेळ चटकन्‌ लक्ष वेधून घेतो. याच एकदम लालीलाल; तरीही पारदर्शक कोवळ्या झुमक्‍यांमधून गहिरे पोपटी धुमारे बाहेर डोकवू लागतात. वाऱ्यावरती सतत हेलकावे खात असतानाच त्यांना गोल-मटोल अशा असंख्य कळ्या फुटू लागतात आणि उमलतातही. आसमंतात त्यांचा उग्र; तरीही गोड हवाहवासा घमघमाट सुटतो. ही दरवळ किड्यामकोड्यांना खेचून घेते. चिलटापासून फुलपाखरापर्यंतचे अगणित जैवघटक आंब्याच्या मोहराभोवती रुंजी घालू लागतात. मधमाशांची पोळी बरोबर हीच वेळ साधून ठायीठायी फांद्यांना बिलगलेली असतात. हा सगळा गुंजारव जणू ‘वसंतगीत’च गात आहे, असं वाटतं.

‘आंबा-फणस’ अशा परस्परसंबंधित दुहेरी उल्लेखाशिवाय वसंताख्यान पूर्ण होऊच शकत नाही. मावळ भागात अध्यापनाचं काम करत असताना खिडकीतून माझं लक्ष फाल्गुनानंतरच फणसाकडं जायचं आणि ओठावरती त्या काव्यपंक्ती यायच्या,
कुटुंबवत्सल इथे फणस हा,
कटीखांद्यावर घेऊन बाळे
फणसाच्या खोडावरची ती सानुली बाळं दृष्टिक्षेपात येतच नसायची. त्यांची वाढही संथ गतीनंच असायची; पण आसपासच्या आंब्यांना फुलोरा आला रे आला; की पानापानांतली ती हालचाल आणि एकच कोलाहल पाहून जणू फणसालाही असूया निर्माण व्हायची, भराभर फळं थोराड व्हायची. आंब्यांच्या सुपारीएवढ्या कैऱ्यांना लघाळ कावळे चोची मारून बघायचे, मोहराच्या सुगंधाबरोबरच कैऱ्यांच्याही आंबट-गोडावरचं लक्ष ठोसर, ठसठशीत फणसाकडं न वळेल तर नवलच! यांच्या पक्व होईपर्यंतच्या समकालानंच ‘आंबा-फणस’ असा जोडशब्द तयार झाला असावा आणि तो तसा व्यक्त केल्याशिवाय वसंतवैभव व्यक्त होत नसावं. कुठं टवटवीत पाने, ठायीठायी भडक रंग उधळून सहस्राक्ष वेधून घेणारे फुलांचे ताटवे; रसरशीत, कच्ची, क्षुधा वाढवणारी फळं, पुष्पकुंजातून पिंगा घालणारे परधारी. मकरंदचूषक भ्रमर! निसर्गदत्त फुलांचं आणि भ्रमराचं- त्यातल्या त्यात कमळाचं आणि त्याचं नातं सर्वपरिचित. वसंत, कमळ आणि भ्रमर हे नातं तर अनोखंच!

कमळ होते पंकात तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते
वसंतात कमळं फुलतात, कमळावर भ्रमर बेहद्द प्रेम करणारा. अतिशय रसिक, सौंदर्यलुब्ध. कमलपुष्पातल्या मकरंदाचा आस्वाद घेत असताना तो इतका बेभान होतो, की सूर्य केव्हा मावळला, संध्याकाळ केव्हा झाली, हेच त्याला कळत नाही. पण जेव्हा लक्षात येतं, तेव्हा एवढंच कळतं, की आपण कमळाच्या कोमल कैदेत बंदिस्त होऊन पडलो आहोत. महाकाय मत्त हत्तींना जेरीस आणणारा, हा भृंग. मनात आणलं, तर कमलदलं तोडून, मोडून त्याला त्यातून बाहेर पडता येणं शक्‍य होतं; पण कमळाबाबत असलेली कृतज्ञता मनी बाळगून तो तसाच निपचित पडून राहतो. विचार करतो-
रात्री दमिस्यती, भिविष्यती सुप्रभात,
भासवान उद्देशती, हसिष्यती पंकजश्री...?
ही रात्र केव्हा ना केव्हा तरी ओसरेल ना? पहाट होईल ना? सूर्य उगवेल आणि कमळं उमलू लागतील आणि त्याची सुटका होईल. हे एक रुपक असलं, तरी या ऋतुचक्रात अविरत घडत राहणारी ही क्रिया निसर्गातलं सहचरण सांगते. या वनस्पतींच्या जगतात मोठी उलाढाल होत असते, भ्रमरासारखे कित्येक दुवे त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच तर या सृष्टिशाश्‍वत प्रक्रियेत त्यांचं स्थान अनन्यसाधारण असंच आहे. या उत्पत्ती प्रक्रियेत प्रत्येक घटक वसंतागमनाचीच आतुरतेनं वाट पाहत असतात. बेसुमार फुलांचा बहर दिसतो; रंगांची मुक्त बरसात करण्यात तरुवल्लरी गुंतलेल्या दिसतात. आपण अनेक सणवार साजरे करतो. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या कुवतीनुसार सण साजरे करतो; पण त्यात सहभाग हमखास घेतोच; तद्‌वत इथला वृक्ष नटून-थटून उभा असतो. 

फुलांचा विषय निघताच माझ्या डोळ्यांपुढं येतात पळसाची ती नटलेली झाडं. ‘पळसाला पानं तीनच’ तशी आमच्या गावशिवारात पळसाची झाडं दोनच. एक उंच पठारावरचा इनामातला पळस आणि एक सखल भागातला पळसाच्या वावरातला. दोघांतलं अंतर मैलभराचंच; तरीही या दोघांतली  चैत्रात आधी कुणी बहरायचं ही अहमहमिका फक्त मलाच समजली. दर वर्षी वसंत आला रे आला की दोघांपैकी एकालाच आधी बहर यायचा. मी या दोघांना एकाच वेळी फुलताना कधीच पाहिलं नाही. मात्र, कधीमधी का होईना; पण ज्यावेळी दोघंही फुलतात त्या वेळी त्यांच्याकडं पाहतच राहावं असं वाटायचं. पळसांची फुलं पाहून वनवासात असताना प्रभू रामचंद्र सीतामाईला म्हणतात-

‘आदीप्तानिव वैदेहिसर्वतः पुष्पितान्नगान्‌।
स्वैःपुष्पैः किंशुकान्पश्‍यमालिनः शिशिरात्यये।।’
‘‘सीते! बघ, वसंत ऋतूत पळस जणू फुलांच्या माळा ल्यायला आहे. फुललेला पळस पाहून वाटतं, की जणू तो आगीनं जळत आहे.’’ एरवी फुलं नसताना पळसाकडं कुणी ढुंकूनही पाहणार नाहीत- कारण आंब्यासारखा डेरेदार आकार त्याला नाहीच. कशाही आणि कुणीकडंही त्याच्या फांद्या वाढलेल्या; पण वसंतातलं त्याचं रूप अलौकिक! इतर झाडा-झुडपांच्या कळ्याही किती नाजूक आणि आकर्षक. याच्या टेंगूळवजा काळपट कळ्या निष्पर्णतेतही बिलकुल दिसत नाहीत. त्याचं देखणेपण निव्वळ  बहरातच. उलट्या-सुलट्या कोयरींच्या आकारांची फुलं, पाखरांची तर पर्वणीच. त्याच्याएवढा मधुसंचय इतर कुठल्याच फुलांत नसावा. म्हणूनच तर खाली तळाला पडलेला भगवा सडा, शेळ्या-मेंढ्या खायला गर्दी करतात. वर पोपट, हळद्या, कोतवाल, साळुंकी, मैना, बुलबुल, सूर्यपक्षी मध प्राशन करायला ठाणच मांडून बसतात. काही त्या फुलांतील कीटक खायला येतात. मधमाश्‍यांचा तो गुंजारवही निनादत राहतो. पशु-पक्ष्यांच्या आवाजानं एरवी मूक जीवन कंठणारं पळसाचं झाड वसंतात गाणारं झाड होतं. त्याच्याकडे पाहून जणू रानावनात वणवा पेटलाय, असा आभास होतो. हा काळही वणवे लागण्याचाच असतो. अंगाखांद्यावर तीक्ष्ण काट्यांची साल पांघरून आणि जीवघेण्या खोल दरीतून वर घाटमाथ्यावर आलेल्या सावरी रस्त्यांच्या वरून अधांतरी फांद्या लोंबकळलेले फुलांचे घडच्या घड घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्यांचे जणू सहर्ष स्वागतच करण्यासाठी उभ्या आहेत, असं वाटतं. पुण्याच्या कात्रज घाटातलं हे मनोहारी दृश्‍य मी अनेक वर्षं पाहत आहे. यंदा नुसताच बहर नाही तर कहर आहे, असंच म्हणावं लागेल. असंख्य फुलं पाहून त्यांची निष्पर्णता जाणवत नाही. फुलांच्या रंगात लाल रंगाच्या किती तरी छटा. उमलत्या फुलांतून श्रीकेशराग्राभोवताली पाचाच्या संख्येनं पाच-पाच तंतू टोकाला लाल गोंडा घेऊन पन्नास पुंकेसराग्र थेट फुलाबाहेर डोकावताना दिसतात. बुलबुलासारखे अंगठ्याएवढे पक्षी खोलवर पुष्पकोशातच पार बुडून मधुघट शोधताहेत. मागं राहिलेली शेपटी वळवळतच राहते आणि तो फुलाचाच एक भाग ठरून जातो, असं अनेकदा दिसतं आणि सावरीची फुलंच हालचाल करत आहेत, असं वाटतं. फुलाफुलांतला हा आतबाहेरचा खेळ पाहतच राहावासा वाटतो.

शेजारीच ‘शेजारधर्म’ पाळतानाही ईर्षेनं उभ्या असलेल्या पांगाऱ्याच्या झाडांकडं लक्ष जातं. पांढुरकी फाटकी साल पाहून मनात ‘बीभत्स’ भाव प्रकट होईल; पण भगवा पुष्पबहार बघून ‘वा ऽऽऽ !’ असं नक्कीच म्हणाल. हाताची बोटं पिंजारून नाचवावीत तशी फुलं. आम्हालाही वसंतात फुलायचंय अशी इच्छा व्यक्त करताहेत, असं वाटावं. काटेसावरीवरचेच सगळे पक्षिगण इकडं येतात- अगदी हक्क असल्यासारखे. सावरीच्या आसपास पांगारा हे समीकरण मला मात्र उलगडलेलं नाही.

माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे मी माझ्या गावातल्या मागच्या डोंगररस्त्यानं चालायला गेलो. चांदणीरात्र. चंद्र मावळतीला उतरलेला. त्या बिंबाकडंच पाहत-पाहत मी चालत होतो. दुतर्फा शेतातली पिकं, कुठं पडरान, गायरान, माळरान, शेंबाड्यांतून मी जात होतो. वाऱ्यावरती मंद सुगंध येत होता. कुठली झाडं फुललीत, हे मात्र कळत नव्हतं. तरी माझ्या अधाशी मनाची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. योगायोगानंच या वर्षी वसंतातच जोंधळेही उभे होते. कुठं फुलोऱ्यात, कुठं हुरड्यात. काही काढायला आलेले. त्यांचा वास जुन्या आठवणी जागवत होता. पण स्वच्छ चांदण्यातला एक विशिष्ट मंद गंध कुठून येतोय, हे शोधण्यासाठी माझं मन अधीर झालं होते. उजाडल्याशिवाय तरी ते शक्‍य नव्हतं. मी तसाच चालत राहिलो. वसंतातली ती पहाट आजमावत राहिलो. हळूहळू उजाडत गेलं आणि तो बहर पाहून गीतरामायणातल्या ओळी आठवल्या-
किती फुलांचे रंग गणावे
कुणा सुगंधा काय म्हणावे
मूक रम्यता सहज दुणावे
येताच कूजने कर्णपुटी
माझाच माझ्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना तो फुलोरा पाहून. मुरमाटी, पुळकाटी, तरटी, नेप्ती काट्याकुट्यांना अंगाखांद्यावर घेऊन, वसंतबहार घेऊन उभी होती. एरवी त्यांच्या आसपासही कुणी फिरकणार नाही, नव्हे ढुंकूनही पाहणार नाही. बाभूळ कुळातल्या या वनस्पती. पुळकाटी पेरापेरांच्या अंतरावर ढब्बू काट्यांबरोबर पांढऱ्या फुलांना दाखवत होती. मुरमाटीची पिवळी धमक गोंडवळी फुलं जमिनीवर भांडार उधळून आसमंतात जमेल तेवढ्या सुगंधाची बरसात करत होती. मला विशेष कौतुक वाटलं त्या तरटीचं. ही तर पर्णहीन वनस्पती, फांद्या हीच तिची पानं. कंटक पंजरीच्या डौलदार जंजाळात अबोली रंगांची फुलं तुम्ही काढूच शकणार नाहीत. साधं आत बोटंही घालू शकणार नाहीत. दीड-दोन इंचात विशिष्ट कोनाकोनातून वळालेल्या काट्यांच्या कोफ्यांवर तीक्ष्ण बारीक काटे असतात, त्यामुळं फळा-फुलांचं पुरतं संरक्षण होतं. काहींना हिरवी-कच्ची, गोल गरगरीत, काही लाल-गुलाबी-चेरीच वाटावी अशी सुंदर फळं. इथल्या काट्याकुटांतही वसंत स्थिरावलेला पाहून मला समर्थांच्या ओळी आठवल्या-
प्रसंग निघाला स्वभावे। बागेमध्ये काय लावावे ।
म्हणून घेतली नावे काही एक ।।१।।
काटी रामकाटी फुले काटी । नेपती सहमुळी कारमाटी ।
सवी चिलारी सागरगोटी । हिवर खैर खरमाटी ।।२।।
पांढरफळी करवंदी तरटी ।
अशी तीनशे झाडांची नावं समर्थांनी त्यांच्या बाग प्रकरणात सांगितली आहेत. त्यांच्या लेखी सर्वच झाडांना महत्त्व आहे. त्यांचं स्थान बागेत आहे. ऋतुराज वसंत तर सर्वांनाच सहभागी करून घेतो.
ही फुलं-फळं बघता-बघता, खाली जमिनीवरची खसफस लक्ष वेधून घेत होती. गार वाऱ्याची सादळ उभ्या वाळून कोळ गवताला झोपवून गेली; पण गवतात लपून-छपून राहिलेलं विश्‍व बाहेर आलं. तित्तरांची रांग एकामागून एक सापासारखी नागमोडी वळणं घेत पळत होती आणि चुस्त किडेमकोड्यांना खाऊन मस्तावलेल्या माद्या नरांना साद घालत होत्या. ‘लिळ्‌ळ्‌ळ्‌ टी...टी... लिळ्‌ळ्‌ळ्‌ टी...टी...’ असाच काहीसा आवाज काढून ही जमिनीवरची पाखरं माळरानं दणाणून सोडत होती. रानारानांत सांडलेलं बीज टिपत चाललेल्या ‘लावा’ थोड्याही चाहुलीनं भर्रर्रर्रर्रर्र करत उडून, पांगून-पांगून जवळच्याच अंतरावर बसत होत्या. माद्या नराला ‘व्ह्युच्यू ऽऽऽ व्ह्युच्यू ऽऽऽ’ करत बोलावत होत्या. चपळाईनं नर आपापल्या माद्यांचा सहवास पटकावत होते आणि इथंच कामेच्छातृप्ती होते आणि नैसर्गिक अभिवृद्धी बेसुमार साधली जाते. ही किमया फक्त वसंतातच साधली जाते. याला माणूसही अपवाद नसावा. रानावनांतला असा बहर पाहत हिंडताना भावनांचं उद्दीपन झाल्याशिवाय राहत नाही. जसं शिकारीला गेलेला दुष्यंत पार वेडा झाला. तिच्या मागोमाग कण्वमुनींच्या आश्रमात जाऊन पोचला. हा कण्वमुनींच्या आश्रमातला वसंत बहार काय सांगतो?
आकाशात फुले, धरेवर फुले, वाऱ्यावरीही फुले,
माझ्या गेहि फुले, मनांतही फुले, भूगर्भि सारी फुले !!
माझे चित्त भुले, सुगंध सुटले! हे विश्‍व आनंदले !
कोणी आकळिले? कुणास कळले उद्यान विस्तारले!

Web Title: mukund vetal artical saptarang