मुंबईतील माफियांचे गणपती

शहरातील एखाद्या समूहाचा, घराण्याचा किंवा माफियाचा त्या शहरावर कितपत प्रभाव आहे, हे त्या त्या लोकांशी संबंधित सामाजिक वा सांस्कृतिक प्रतीकांच्या लोकप्रियतेवरून आपल्या लक्षात येते.
mumbai mafiya ganesh festival 2023 ganesh chaturthi visarjan
mumbai mafiya ganesh festival 2023 ganesh chaturthi visarjansakal
Summary

शहरातील एखाद्या समूहाचा, घराण्याचा किंवा माफियाचा त्या शहरावर कितपत प्रभाव आहे, हे त्या त्या लोकांशी संबंधित सामाजिक वा सांस्कृतिक प्रतीकांच्या लोकप्रियतेवरून आपल्या लक्षात येते.

- वेल्ली थेवर

शहरातील एखाद्या समूहाचा, घराण्याचा किंवा माफियाचा त्या शहरावर कितपत प्रभाव आहे, हे त्या त्या लोकांशी संबंधित सामाजिक वा सांस्कृतिक प्रतीकांच्या लोकप्रियतेवरून आपल्या लक्षात येते. उदाहरणार्थ आखाडे ओस पडू लागले आणि दक्षिण मुंबईतील पठाणांपैकी माफियाशी संबंधित काही जण पुरस्कृत करत असलेल्या कुस्त्यांच्या सामन्यांमधील लोकांचा रस कमीकमी होऊ लागला, हीच पठाण माफियांचा शेवट जवळ आल्याची निशाणी होती.

मुंबईतील माटुंगा, सायन - कोळीवाडा, धारावी, चेंबूर, चुनाभट्टी आणि माहीम या भागात वरदराजन मुदलियार याची हुकमत चाले. त्या काळात त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्या काळात मुंबईतील असंख्य लोक माटुंगा स्टेशनबाहेरील त्याच्या गणपतीचे दर्शन कधीही चुकवत नसत. गणपतीसाठी उभारलेल्या मंडपातील रोषणाई अत्यंत आकर्षक असे.

दरवर्षी त्यांच्या गणपतीसाठी उभारलेल्या मंडपातील गर्दी वाढतच राहिली आणि वरदराजनचे मुंबईतील साम्राज्यही विस्तारत राहिले. गणपती मंडळासमोरचा वाढता जमाव आणि वरदराजनची वाढत जाणारी दहशत, याकडे मुंबई पोलिस हतबलतेने पाहतच राहिले.

या राजेंद्रला दाऊद इब्राहिमचा वरदहस्त लाभला. मग लवकरच तो छोटा राजन म्हणून ओळखला जाऊ लागला. जसजसे छोटा राजनची ताकद वाढू लागली, तसतसे सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपतीचा देखावा हा साऱ्या उत्तर पूर्व मुंबईच्या वार्षिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र बनले.

हा देखावा पाहण्याची संधी सहसा कुणी चुकवत नसे. या देखाव्यात अजिंठा वेरुळच्या गुंफा, म्हैसूरचा राजवाडा, हंपीचे मंदिर, शनिवार वाडा, कोलकत्यामधील दक्षिणेश्वर काली मंदिर, राजस्थानचे रणकपूर जैन मंदिर, लाल किल्ला अशा ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध अशा वास्तूंच्या भव्य प्रतिकृती उभारल्या जात.

या इमारतींच्या हुबेहूब उभारणीसाठी छोटा राजन ऐंशीच्या दशकात ५० ते ६५ लाख इतकी अवाढव्य रक्कम दरवर्षी खर्च करत असे. हे सेट उभारण्यासाठी त्या काळात बॉलिवूडच्या नामांकित कलादिग्दर्शकांना बोलावले जाई.

प्रत्येक छोटा छोटा तपशील ध्यानात घेऊन सेट बारकाईने जसाच्या तसा उभारला जाई. हे सेट्स अर्थातच अतिशय भव्य आणि प्रेक्षणीय होत. तपशिलात चूक शोधूनही सापडत नसे. साहजिकच छोटा राजनचा हा गणपती मंडप पाहायला वर्षानुवर्षे प्रेक्षकांचीही गर्दी उसळे. बॉलिवूडची मंडळी आपल्या गणपती मंडळाचा उत्सव पाहायला यावीत, असे छोटा राजनला वाटे.

मग तो त्यांना आमंत्रण देई आणि ते आले, की त्यांच्याशी अत्यंत अदबीने बोले. त्यामुळे या ताऱ्यांबरोबर लक्षवेधक फोटो काढण्याची संधी त्याला मिळे आणि सर्वत्र त्याच्या नावाचा डंका वाजे. हेच त्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असे. सगळ्याच माफिया डॉनप्रमाणे छोटा राजनही बॉलिवूडच्या प्रेमात पडलेला होता.

मिथुन चक्रवर्ती हा त्याचा लाडका अभिनेता होता. त्याला त्याने टिळकनगरात यायला लावले. अभिनेता रणधीर कपूरसुद्धा तिथल्या मंडळात येऊन गेला. तो तिथे नमस्कार करत असल्याचा एक फोटो उपलब्ध आहे. माध्यमांनी आणि चित्रपट क्षेत्रातील झळाळत्या लोकांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे आपल्या मंडळाची आणि पर्यायाने आपल्या टोळीची शान वाढते, दबदबा वाढतो, ही गोष्ट छोटा राजनच्या लक्षात आली होती.

एका प्रसिद्ध निर्मात्याने सांगितलेली आठवण माझ्या लक्षात आहे. तो म्हणाला होता, " त्याची माणसे येऊन बोलली होती माझ्याशी. त्यांनी मला छोटा राजनशीही बोलायला लावलं होतं. अत्यंत नम्रपणे आणि सौजन्याने बोलला होता तो माझ्याशी. मी माझ्या चित्रपटात काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यांना घेऊन चेंबूरमधील त्याच्या मंडपाला भेट द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. काही कारणाने मला काही ते जमलं नाही."

तथापि, दरवर्षी अनेक चित्रपट तारे आणि तारका छोटा राजनच्या मंडपात हजेरी लावत असत, ही गोष्ट अगदी खरी आहे. ते श्रद्धेने येत, दबावापोटी येत की पैशाचा मोह त्यांना तेथे खेचून आणत असे हे मात्र केवळ तो गजाननच जाणे.

छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यात पुढं फूट पडली. त्याचे उट्टे फेडण्यासाठी दाऊद इब्राहिमने ओमप्रकाश कुकरेजा या बिल्डरची हत्या केली. या साऱ्या घडामोडींमुळे सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपती मंडपाचा देखावा संकटात आला. तरीही छोटा राजनने त्यानंतरही अनेक वर्षे आपला हा वार्षिक उत्सव टिकवून ठेवला होता. मात्र त्याचा आवाका आणि दिमाख हळूहळू मावळू लागला.

असे असले तरी अगदी काही काळापूर्वी म्हणजे २०१६ मध्ये कुंग फु पांडा ३ हा चित्रपट आला, तेव्हा या मंडपात कुंग फू पांडा आणि त्याच्या टीमची ऐट मिरवणाऱ्या सेटची रचना करण्यासाठी प्रसूनजित चंद्रा या बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलादिग्दर्शकाला आणले गेले होते. या वेळी छोटा राजन तिहार तुरुंगात सुटकेची वाट पाहत खितपत पडला होता. तरीही त्याच्या लोकांनी हे घडवून आणले.

हा गणपती उत्सव छोटा राजनच्या शक्तिप्रदर्शनाच्या शेवटच्या पताकांपैकी एक ठरत आहे. डळमळीत झालेले त्याचे माफिया साम्राज्य नव्याने पंख फडफडवून पुन्हा शहरात झेपावू इच्छित असताना हा उत्सव त्याच्या दृष्टीने आज एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.

एखाद्या प्रबळ माफिया टोळीची शक्तिस्थळं कमकुवत व्हायला लागतात, तेव्हा तिच्या शेवटाच्या खुणा जाणवू लागतात. वाय. सी. पवार हा आयपीएस अधिकारी वरदराजन मुदलियारच्या मागे लागला, तेव्हा त्याच्या माटुंगा गणपती मंडळालाच त्याने आपले पहिले लक्ष्य केले. माटुंगा स्टेशनसमोरील वरदराजनच्या गणपती मंडळाचा उत्सव छाती दडपून जावी इतका भव्य आणि आकर्षक असे.

माझ्या लहानपणी मी तिथली रोषणाई पाहिलीय. पाहून डोळे दिपून जात. ऐंशीच्या दशकात वरदराजनच्या गणपती मंडपाला तोड म्हणून नव्हती. त्याच्या डामडौलाशी स्पर्धा करेल असा दुसरा कुठलाच गणपती मंडप अख्ख्या मुंबई शहरात नव्हता. दरवर्षी रोषणाई आणि मूर्ती यावरच त्याचा सारा भर असे. काही वेळा वरदराजन गोल गोल फिरणाऱ्या मूर्ती बनवून घेत असे. त्या पाहत राहणे म्हणजे डोळ्यांना नुसती मेजवानी असे.

या माफिया टोळ्यांच्या प्रमुखांनी गणपती मंडळ उभारायला सुरवात केली, त्या काळात नेटफ्लिक्स नव्हते तसेच आजच्यासारख्या उपग्रहावरून प्रक्षेपित होणारी असंख्य टीव्ही चॅनेल्सही नव्हती. केवळ दूरदर्शनच काय ते सगळीकडं उपलब्ध असे. त्यामुळे गणेशोत्सवाचे दहा दिवस शहरातील ठिकठिकाणच्या गणपती मंडळांचे देखावे पाहायला लोक जत्थ्याने घराबाहेर पडत.

वरदराजन मुदलियारचा हाजी मस्तानबरोबर दोस्ताना होता. दोघेही मूळचे तामिळनाडूतील आणि दोघेही माफिया डॉन. मानसन्मान मिळवण्यासाठी मस्तानने बॉलिवूडची वाट पकडली. पण वरदराजनला मात्र दहा दिवसांच्या गणपती उत्सवाशी आपले नाव जोडले गेले की बाहुबली या आपल्या प्रतिमेला अधिक झळाळी येईल असे वाटले.

वरदराजन मुदलियार हा मोठा धूर्त डॉन होता. तामिळनाडूतील तुतिकोरीन या गावातून रिकाम्या खिशाने तो मुंबईत आला होता. त्याच सुमारास मोरारजी देसाईंनी मुंबईत दारूबंदी लागू केली. वरदराजनने त्यातील संधी ओळखली. त्याने बेकायदा दारू बनवायला सुरवात केली. अशा दारूविक्रीचा त्याचा धंदा इतरांपेक्षा अगदीच वेगळा होता.

त्याने आपल्या विक्रीसाठी महिला आणि तृतीयपंथीय लोकांचा वापर करायला सुरवात केली. त्याचा निम्मा धंदा बायकाच चालवत. दारूने भरलेले फुगे या महिला आपल्या पोटावर बांधत आणि पोटात बाळ असल्याचा आव आणून बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या थेट समोरून त्या टेचात पुढे जात.

आपल्या साड्या त्या नेटक्या नेसत असल्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय येणे कठीण जाई. वरदराजनच्या टोळीतील इतर काही माणसे टॅक्सीतून या दारूची वाहतूक करत. त्यांच्या टॅक्सीच्या टायरमधील रबरी ट्यूब्ज दारूने भरलेल्या असत. विशिष्ट पूर्वनियोजित स्थळी हे टायर्स दारू भरून ठेवलेले असत. टॅक्सी आणि ट्रक ड्रायव्हर तेथून ते अन्यत्र वाहतुकीसाठी घेऊन जात.

या प्रकाराकडे डोळेझाक करावी म्हणून काही पोलिसांना वरदराजन मासिक हफ्ता देत असल्याचेही बोलले जाई. पोलिसांशी केलेले आपले संभाषण वरदराजन टेप करून ठेवी. अशी सगळी खबरदारी घेणाऱ्या वरदराजनला वाय. सी. पवार नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या मनोनिग्रहाच्या सामर्थ्याचा मात्र अंदाज आला नाही. वरदराजनचे सारे साम्राज्य या अधिकाऱ्याने एकहाती उद्ध्वस्त केले.

वाय. सी. पवार हे असामान्य धडाडीचे पोलिस अधिकारी होते. वरदराजनला नेस्तनाबूत करायचे, तर आपल्यालाही त्याच्या इतकेच खतरनाक आणि आक्रमक व्हावं लागेल ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली. ते त्या विभागातील पोलिस उपायुक्त होते. कशाचीच पर्वा न करता हात धुवून ते वरदराजनच्या पाठीशी लागले.

त्याच्या जागा खाली करण्याचे आदेश बजावण्यात आले. वरदराजनच्या टोळीतील काही गुंडांना अटक करण्यात आली तर काहींना नष्ट केले गेले. पण या धंद्याशी आपला संबंध असल्याची काडीची निशाणी कुठेही शिल्लक राहू नये याची पूर्ण खबरदारी घेण्याची हुशारी वरदराजनच्या अंगी होती. त्यामुळे दारूचा धंदा किंवा तस्करी याच्याशी वरदराजनचा प्रत्यक्ष व्यक्तिगत संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळवण्यात मात्र पोलिस अपयशीच ठरले.

तथापि वाय. सी. पवार इतक्या कठोरपणे पिच्छा पुरवत होते, की अखेरीस वरदराजनला मुंबई सोडावी लागली. तो चेन्नईला गेला. आपले शेवटचे दिवस त्यानं चेन्नईतच काढले. शेवटी तिथेच त्याचे निधन झाले. मग मात्र त्याचा जवळचा मित्र असलेल्या हाजी मस्तानने एक खास विमान पाठवून त्याचा मृतदेह मुंबईत आणला.

काळ पुढे जात राहिला तसतसा वरदराजनच्या गणपती मंडपाचा आकार दिवसेंदिवस आक्रसत गेला. आजही या दिवसात तो मंडप त्या जागी असतो. जुन्या भव्य मंडपाची धूसर, आखूड छाया असल्यासारखा. मुंबई शहरावर जवळजवळ साडेतीन दशके राज्य केलेल्या माफिया साम्राज्याच्या संपलेल्या वैभवाचा एक मूक साक्षीदार जणू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com