किमया संगीत ऐकण्याची!

तिने त्याला शांत/मंद संगीत ऐकवायला सुरुवात केली. त्याच्यात दोन-तीन दिवसांतच बदल दिसू लागला. तो शांत झाला.
music Listen
music Listen sakal

डॉ. अविनाश सुपे

साधारण १९८४ ची गोष्ट असेल. आमच्या कक्षात एक रवीकुमार नावाचा महाविद्यालयीन तरुण दाखल झाला. रेल्वेतून प्रवास करताना धक्का लागून तो गाडीतून खाली पडला. रेल्वे पोलिस आणि लोकांनी मिळून त्याला उचलून स्टेशनवर आणि नंतर तिथून आमच्याकडे आणले. आला तेव्हा तो बेशुद्ध होता. मेंदूला मार लागला होता.

शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यात जे रक्त गोठले होते ते काढले. तो पुढे दोन आठवडे बेशुद्ध होता. तो फक्त हात-पाय हलवायचा. त्यानंतर हळूहळू शुद्धीवर येऊ लागला, तेव्हा फार आरडाओरड करायचा. बँडेज काढून टाकायचा. खूप आक्रमक व्हायचा. तीन-चार आठवडे झाले तरी त्याच्यात काही बदल दिसेना. त्याच्याजवळ त्याच्यापेक्षा एक-दोन वर्षांनी लहान अशी महाविद्यालयीन शिक्षण घेणारी बहीण असायची.

एकदा आम्ही राऊंड घेत असताना तिने येऊन आम्हाला विचारले की, डॉक्टर, त्याला संगीताची खूप आवड आहे. तो आधी खूप संगीत ऐकायचा. त्याला वॉकमन लावून संगीत ऐकवू का? त्या वेळी सोनीचे वॉकमन बाजारात आले होते. आम्ही हो म्हंटले; पण काळजी घे, हेसुद्धा सांगितले. कारण आम्हालाही हा प्रयोग नवीन होता.

तिने त्याला शांत/मंद संगीत ऐकवायला सुरुवात केली. त्याच्यात दोन-तीन दिवसांतच बदल दिसू लागला. तो शांत झाला. प्रतिसाद देऊ लागला. डोळे उघडले. पाणी मागितले. हातपाय सुसंबद्ध हलवू लागला. पुढच्या दोन-तीन आठवड्यांत त्याच्यात इतकी भराभर सुधारणा झाली की, आम्ही त्याला रुग्णालयातून घरी जायला परवानगी दिली. तो तपासायला यायचा. त्याने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू केली.

आम्हाला संगीताने त्याच्यावर केलेल्या परिणामाचे आश्चर्य वाटले. हळूहळू यावरील संशोधनातून जाणवले की, असे काही आजार असतात, त्यातून बाहेर येण्यासाठी संगीताचा मोठा वाटा आहे. माझा मित्र डॉ. रूपीन शाह याने यावर खूप संशोधन केले. रशियामध्ये १९६०च्या काळात यावर खूप संशोधन झाले होते.

आपल्याही देशात मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) येथे सत्तरीत अन्नामलयी विद्यापीठात एक प्रयोग रोपट्यांवर केला. दोन रोपांपैकी एकाला संगीत ऐकवले आणि दुसऱ्याला संगीताशिवाय ठेवले आणि त्यांच्यातील वाढीची नोंद केली. संशोधनात असे लक्षात आले, की रोपाची वाढ संगीतामुळे वेगाने होते.

पुढील काही वर्षांत आमच्या असे लक्षात आले की मेंदूवर जिथे आघात होतो, मग तो अर्धांगवायू असो किंवा पॅराप्लेजिया किंवा मार लागलेला असो किंवा अपघात असो, संगीताने रुग्णात सुधारणा वेगाने होते. शरीरातील एकूणच संवेदना सुधारतात; परंतु पायाच्या मानाने हाताची हालचाल (अप्पर एक्सट्रॅमिटी- वरचा भाग) व वेदना जास्त वेगाने भरून निघते. संगीतामुळे दुखापतीची वेदना कमी होते. मेंदूला मिळालेल्या सौम्य संगीताच्या लहरींमुळे संपूर्ण शरीराला शांत व वेदनारहित करण्याची किमया होते.

वैद्यकीय क्षेत्रात कॉकरेन नावाचे जागतिक डेटाबेस आहे. त्यांची कोक्रेन वेबसाईट असते. जगात जे संशोधन होत असते, त्याचे खरोखर स्वरूप काय आहे व जे ज्ञान आहे त्याचे विश्लेषण करून ते समाजाला सांगतात, की ते उपयुक्त आहे की नाही. या कॉक्रेन डेटाबेसमध्येसुद्धा जगातील संगीतावरचे शास्त्रीय प्रयोग मान्य केलेले आहेत.

आज अनेक रुग्ण जे आमच्याकडे दोन-तीन महिने राहत होते, त्यांना सौम्य, तालबद्ध संगीत ऐकविण्यास त्यांच्या नातेवाईकांना सांगायचो. संगीताचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे शस्त्रक्रियेच्या वेळी तालबद्ध मंद स्वरातील संगीत किंवा वाद्यवादन सर्व शास्त्रक्रियागृहातील वातावरण बदलते. तालामुळे सर्व हालचाली सूत्रबद्ध होतात व शस्त्रक्रिया जास्त कार्यक्षमतेने पार पडते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मंद संगीत लावण्यामागे हेच तत्त्व असते.

सध्याचे निष्कर्ष असे सूचित करतात की, सुमारे ६० बीट्स प्रतिमिनिट संगीत मेंदूला अल्फा ब्रेनवेव्हच्या बीटशी समक्रमित करू शकते. हलके आनंददायी संगीत कामाचा ताण कमी करते, सर्जनशीलता वाढवते, प्रतीक्षा वेळ अधिक आनंददायी बनवते किंवा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण यांच्यावर सकारात्मक प्रभाव पाडते. चांगल्या तालामुळे मेंदूची केंद्रे उद्दिपित होऊन प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते. यावर अधिक संशोधन सुरू आहे. गेले अनेक वर्षे मी अभ्यास किंवा वाचन करताना तसेच शत्रक्रियागृहात मंद संगीत ऐकतो.

शास्त्रीय संगीतातील कुठल्या रागामुळे कुठले आजार बरे होतात आणि आपल्याला त्याचा कसा फायदा होतो, आम्हाला कसा रुग्णाबाबत फायदा झाला, हे पुढच्या कुठल्या तरी वास्तव कथेच्या अनुषंगाने नक्की सांगेन.

हलके, आनंददायी संगीत कामाचा ताण कमी करते. सर्जनशीलता वाढवते, प्रतीक्षा वेळ अधिक आनंददायी बनवते किंवा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि रुग्ण यांच्यावर सकारात्मक प्रभाव पाडते. चांगल्या तालामुळे मेंदूची केंद्रे उद्दिपित होऊन प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते. मेंदूला मिळालेल्या सौम्य संगीताच्या लहरींमुळे संपूर्ण शरीराला वेदनारहित करण्याची किमया आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com