माझा गर्व, माझी मुलं!

असंख्य गाणी हिट झाली असली तरी मला चित्रपटासाठी कोणताही पुरस्कार मिळाला नाही.
माझा गर्व, माझी मुलं!
sakal

असंख्य गाणी हिट झाली असली तरी मला चित्रपटासाठी कोणताही पुरस्कार मिळाला नाही. मी शास्त्रीय संगीत शिकू शकलो नाही. ती खंत मनात असली तरीही माझा मुलगा आदर्शने दादासाहेब फाळके पुरस्कार व अन्य फिल्म फेअर व सर्वोच्च पुरस्कार पटकावून संगीत क्षेत्रातील आमच्या ‘शिंदे’शाहीला मानाचा मुकुट चढवला आहे. दोन वेळेस राष्ट्रीय विजेता ठरलेल्या व ज्याच्या ‘ए सनम’ अशा वेगळ्या ढंगाच्या गाण्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला, त्या आजच्या आघाडीच्या महागायकाचा अर्थात आदर्श शिंदेचा मी बाप आहे, हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतो. मी त्याला माझा अर्जुन मानतो.

माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही; मात्र मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदेने माझे उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले आहे. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या स्वप्नासाठी त्याने उत्तम गायक, संगीतकार आणि गीतकार, सामाजिक कार्य करण्याचा आणि आता ‘नंदू नटवरे’ या माझ्या दिग्दर्शित पहिल्या चित्रपटाचा हिरोही होण्याचा मानस पूर्ण करून दाखवला आहे. शिंदेशाही परिवारात डॉक्टर होण्याचा पहिला मान आजतागायत कोणीही मिळवला नव्हता, तो मान उत्कर्षने मिळवला. माझ्या शब्दाला आजही मान देणारा, अष्टपैलू कामगिरी करण्याचे धाडस दाखवणाऱ्या माझ्या ‘उत्कर्ष’चा मला सार्थ अभिमान आहे.

अवघ्या सहा तासांत ‘नाद करा पण आमचा कुठं’ हे गाणं उत्कर्षने लिहून, ‘धुरळा’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं. उत्कर्षने संगीतबद्ध केलं आणि मी आणि आदर्शने ते गाणं गायलं. या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावलं. एक वेगळ्या पद्धतीचा आणि जलदगतीने गाणं तयार करणारा गीतकार, संगीतकार, गायक म्हणून ठसा उमटवणारा माझा मुलगा डॉ. उत्कर्षचं कौतुक करायलाच हवं.

माझा गर्व, माझी मुलं!
मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

शांत, संयमी, शिक्षणाने इंजिनीयर, सर्वांना धरून चालणारा, घराचा कणा माझा मोठा मुलगा हर्षद खूप प्रेमळ स्वभावाचा आहे. सर्वांत लाडाचा. त्याने मला आल्हादसारखा नातूही दिला, ज्यात मी माझे वडील प्रल्हाद शिंदे यांना बघतो. ज्याने नेहमी परिवार एकसंध ठेवत नातीगोती जपली. जिकडे मी नाही पोहचू शकलो, ते सर्व समारंभ पार पाडणारा माझा भीम, माझा मोठा मुलगा हर्षद. स्वत:ला बाप म्हणवून घेताना मला नेहमीच गर्व वाटावा, अशीच माझी तीनही मुलं आहेत. त्यांना साध्या सुपारीचेही व्यसन नाही. आजही सारे एकत्र, एककुटुंब पद्धतीने राहातात, एका विचाराने वागतात.

जेव्हा मी गायला निघालो, तेव्हा मिलिंद माझा छोटा भाऊ मला बघत बघत तयार होत होता. आनंद-मिलिंदची जोडी महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. आम्ही घरात जेव्हा गाण्याच्या तालमी करायचो, तेव्हा आदर्श आणि उत्कर्ष येऊन बसायचे. आम्हाला बघत बघत त्या दोघांनी हार्मोनियम वाजवायला, गाणं गायला सुरुवात केली. आज या दोघांनीही इंडस्ट्रीमध्ये मानाचं स्थान व सर्वांचं प्रेम मिळवलं आहे. मला नेहमी गर्व असायचा, की मी प्रल्हाद शिंदेंसारख्या ज्येष्ठ महान गायकाचा मुलगा आहे; पण त्याहूनही अधिक अभिमान मला हर्षद, उत्कर्ष, आदर्श या तीन गुणी मुलांचा वडील असण्याचा आता वाटतो.

माझा गर्व, माझी मुलं!
Lal bahadur shastri jayanti: संवेदनशील साधेपणा...

त्यांनी कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व किंवा माझं नाव कमी होईल असं कृत्य कधीच केलं नाही. उलट माझ्या कैक चाहत्यांना माझा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदेने रात्री-अपरात्री उपचार दिले आहेत. स्वाईन फ्लूचा काळ असो किंवा आताचा कोरोना काळ, कधीच आमचा दवाखाना बंद नव्हता. कैकवेळेस वैद्यकीय मदत केली. कोल्हापूर, कराड, सातारचा पूर असो की कलाकारांसाठी पुढाऱ्यांना भेटून बंद पडलेल्या पेन्शनचा प्रश्‍न असो, तो जनसेवेसोबतच कलोपासकांसाठीही मदतीस धावला आहे.

आदर्शचं नाव आज मराठी ते हिंदी बॉलीवूडपर्यंत शिखरावर आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार’मधील ‘गोविंदा गोविंदा’ हे गाणं, ‘जोकर’मधील अक्षय कुमारसाठी गायलेलं गीत, आताच्या आघाडीच्या संगीतकार अमित त्रिवेदी यांच्यासाठी गणपती गीत किंवा ज्येष्ठ दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘मलाला’ चित्रपटातील गीत असो, वडील म्हणून मला त्याच्या संगीत कारकिर्दीचा सार्थ अभिमान वाटावा अशीच कामगिरी माझी तिन्ही मुलं करत आहेत.

माझ्या मुलांना संस्कार देणाऱ्या, माझा डोलारा सांभाळणाऱ्या माझ्या अर्धांगिनी विजया शिंदे हिचे विशेष कौतुक करावेसे वाटते. माझे वडील प्रल्हाद शिंदे हे जरी माझ्या आयुष्याच्या वृक्षाचे मूळ असतील, तर त्या वृक्षाला आलेली गोड फळे म्हणजे माझी तिन्ही मुलं आणि माझे नातवंड आहेत.

vijayaanandmusicpvtltd@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com