वास्तव मांडणारा खरा हिरो!

ग्रामीण भागात राहून मराठीसह आता हिंदीतही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी विख्यात झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे
Nagraj Manjule
Nagraj Manjulesakal

ग्रामीण भागात राहून मराठीसह आता हिंदीतही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी विख्यात झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे. त्यांची प्रत्येक कलाकृती समाजमनाशी संवाद साधते. सामाजिक विषमतेवर भाष्य करते. जातिव्यवस्थेवर कोरडे ओढते. समाजाला आरसा दाखवते... तेही धारदार संवाद किंवा चकाचक इंग्रजाळलेली भाषा न वापरता. त्यांच्या सिनेमातील प्रत्येक पात्र टिपिकल ग्रामीण भाषेत बोलतं. कारण तेच बोल थेट हृदयाला भिडतात... मनाला पटतात आणि समाजप्रबोधन करतात. मंजुळेंच्या प्रत्येक सिनेमाचे हे वैशिष्ट्य आहे...

हाराष्ट्रातील छोट्या खेड्यातून आलेले नागराज मंजुळे आज एक आघाडीचे दिग्दर्शक आहेत. त्यांची प्रत्येक कलाकृती संवाद साधते. सामाजिक विषमतेवर भाष्य करते. मंजुळेंच्याच भाषेत सांगायचं तर, त्यांनी बाॅक्स आॅफिस डोळ्यासमोर ठेवून कधीच सिनेमे काढले नाहीत. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक सिनेमात जाणवतं ते समाजभान. ‘फँड्री’तील जब्या जेव्हा समाजव्यवस्थेतील विषमतेच्या दिशेने दगड भिरकावतो तेव्हाच मंजुळे यांच्यातलं वेगळेपण जाणवलं होतं. माणसाने माणसाशी माणसासम वागण्याचा साधा-सोपा मूलमंत्र जपणारे मंजुळे म्हणूनच वेगळे ठरतात.

‘सैराट’च्या निमित्ताने नागराज यांनी मराठी कलाकृतीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळवून दिलं. वंचितांचा आक्रोश, समाजातील वास्तव आणि जातीव्यवस्थेविरोधात भाष्य करत समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांचा प्रत्येक सिनेमा करतो. ‘पिस्तुल्या’पासून सुरू झालेला त्यांचा यशस्वी प्रवास आता ‘झुंड’पर्यंत येऊन पोहचला आहे. मात्र, तो कधीच सोपा नव्हता...

पुस्तकांनी बदललं आयुष्य

नागराज मंजुळे यांचा जन्‍म सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा तालुक्‍यातील जेऊर गावात झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. म्हणूनच नागराज यांच्या वडिलांनी काळजावर दगड ठेवत आपल्या मोठ्या भावाकडे त्याला सोपवलं. काकानेच त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासूच नागराज यांना चित्रपटाचं वेड. अभ्यासात त्यांचं मन रमायचं नाही. ऐन तारुण्यात मानसिक द्वंद्व सुरू झालं. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मदत घेतली ती पुस्तकांची. वाचनाचं जणू व्यसनच लागलं. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं वाचून काढली. तिथूनच त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलत गेलं.

‘पिस्तुल्या’ने दिली ओळख

महाराष्‍ट्र पोलिस सेवेमध्‍येही नागराज मंजुळे यांची निवड झाली होती; परंतु पुढे काही जमलं नाही. काही महिन्‍यांतच प्रशिक्षण सोडून ते घरी परतले. पैशाची अडचण आली तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरीही केली. परिस्थितीचा सामना करत त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे पुणे विद्यापीठातून मराठी विषयात एम. ए. आणि मग एम. फिल. पदवी मिळवली. चित्रपटनिर्मितीचा ध्यास मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यासाठी त्यांनी नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशन स्टडीजचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ‘पिस्तुल्या’ लघुपटाची निर्मिती केली. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. चित्रपटाच्या दुनियेत ‘पिस्तुल्या’ने त्यांना पहिली ओळख मिळवून दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली.

कविमनाचा माणूस म्हणूनही नागराज यांची ओळख आहे. त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला समीक्षकांची वाहवा मिळाली होती. सध्या त्यांची लेखणी कविता लिहिण्यात रमत नसली तरी चित्रकृतीतील आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक विषमतेचा कॅनव्हास वास्तव स्वरूपात आणताना ती भलतीच प्रखर होते. याची उदाहरणं म्हणजेच त्यांचे ‘फॅंड्री’, ‘सैराट’ आणि ‘झुंड’सारखे सिनेमे.

मंजुळे आपल्या कलाकृतीच्या पलीकडे जातही पोटतिडकीने बोलतात. माझ्यातल्या जाणिवाचं सादरीकरण म्हणजे माझा सिनेमा, असं साधंसोपं गणित ते मांडतात. मी कुठलीच जात मानत नाही. मी जातीविषयी बोलतो, कारण आपण त्याचीच फळं भोगत आहोत, असं स्पष्ट मत ते मांडतात तेव्हा त्यांनाही टीकेचा सामना करावा लागला आहे. समाजमाध्यमातून झालेली टीका फारच बोचरी असते; पण नागराज त्यांना फार महत्त्व देत नाहीत. मला माझ्या चुका नक्कीच दाखवा; पण माझ्याशी प्रत्यक्ष बोलून, असा मनाचा मोठेपणाही ते दाखवतात.

हिंदी सिनेसृष्टीलाही भुरळ

नागराज मंजुळे यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘फँड्री’ने झाली. जातिव्यवस्था, दारिद्र्य आणि निरागस प्रेमातली व्याकुळता त्यांनी त्यात प्रभावीपणे मांडली. समाजातील उच्च आणि कनिष्ठ स्तरातील संघर्ष त्यात दिसला. जब्या आणि शालू यांच्यातील अव्यक्त प्रेमकथेची जातीच्या दुष्टचक्रात राख होते, असं दाहक वास्तव त्यांनी अस्सल बोलीभाषेतून दाखवून दिलं. आजही काही जणांना पचायला जड जाणारं कथानक मंजुळे यांनी मोठ्या हिमतीने ७० एमएम पडद्यावर आणलं होतं. त्याचं कौतुक झालं. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आॅनर किलिंगचं थरारर अन् भेसूर चित्र मांडणारा ‘सैराट’ आला आणि सुन्न करून गेला. सर्वच पातळीवर ‘सैराट’ने इतिहास रचला. शंभर कोटी क्लबमध्ये प्रवेश केलेला तो पहिलाच मराठी चित्रपट ठरला.

नागराज यांना २०१० मध्ये ‘पिस्तुल्या’साठी ५८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०१३ मध्ये ‘फँड्री’ चित्रपटावरही राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली. इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारही मिळाला. ‘झुंड’मुळे आता हिंदी सिनेसृष्टीलाही नागराज यांच्या चित्रपटांची भुरळ पडली आहे.

सामान्यांना बनवलं स्टार

सर्वसामान्य मुलांकडून अलौकिक काम करून घेण्यात नागराज मंजुळे यांचा हात कोणी धरू शकणार नाही. एखाद्या कसलेल्या कलाकारासारखा अभिनय ते त्यांच्याकडून करून घेतात. मग तो पिस्तुल्या असो, जब्या असो, आर्ची-परशा किंवा प्रिन्स असो की आताच्या ‘झुंड’मधील बाबू अन् डाॅन असो... ‘झुंड’मध्ये तर अभिनयातला ‘अ’ही माहीत नसलेली नागपूरच्या झोपडपट्टीतील मुलं नागराज यांनी थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभी केली आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या गुण-दोषांना स्वीकारून अगदी नैसर्गिक काम करून घेतलं आहे. म्हणूनच आपल्या टर्मवर सिनेमे बनवणारे नागराजच सिनेमाचे खरे ‘हिरो’ ठरतात.

कनेक्टेड राहणं गरजेचं!

‘बॉलीवूड चित्रपटांमध्ये मला माझ्या आजूबाजूच्या दिसणाऱ्या माणसांच्या नावांसारखी नावं कधीच आढळली नाही. मी त्या चित्रपटांशी कधीच कनेक्ट होऊ शकलो नाही. मलाही लहान असताना आपण खूप चांगला अभिनेता असल्याचं वाटायचं; पण संधी कधी मिळेल माहीत नव्हतं. माझ्या सिनेमातील मुलांमध्ये मी मलाच शोधतो. सगळ्यांना संधी मिळायला हवी, असं मला वाटतं. कोणातलं टॅलेंट शोधायचं असेल तर त्याला संधी देणं हेच खरं आरक्षण,’ असं नागराज मंजुळे सांगतात तेव्हा माणसाने कितीही उंच भरारी घेतली तरी पाय जमिनीवर ठेवून एकमेकांशी कसं कनेक्टेड राहायला हवं याचं महत्त्व जाणवतं.

- नागराज मंजुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com