राजवंश भारती : सातवाहन‌ वंश

Marathi Article : गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!
Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.
Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

एक जनमान्य समज विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला. याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.

म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद! (saptarang marathi article on Satavahana dynasty news)

महाभारत काळ किंवा त्याही आधीपासून ज्या केंद्रीय मुख्य सत्ता भारतात होत्या, त्या बहुतांश उत्तरेकडे किंवा वायव्य आणि ईशान्य भारतात होत्या, असं दिसतं. यापैकी बराच मोठा कालखंड तर मगध सत्तेचा होता, म्हणजे ‘पाटलीपुत्र’ ही राजधानी. दक्षिणेत असलेली राज्ये ही बहुधा मांडलिक किंवा अंकित राज्ये होती.

शुंग वंशाचे पतन होईपर्यंत हीच परिस्थिती होती. शेवटचा शुंग राजा देवभूती याची हत्या करून वासुदेव काण्व राजा झाला. पण, काण्व वंशाचे केवळ चार राजे झाले. एकूण फक्त ४५ वर्षे त्यांची सत्ता होती. अशी धारणा आहे, की चौथा काण्व राजा सुशर्मा याला ‘सिमुक सातवाहन’ याने मारले (की केवळ पदच्युत केले?) आणि सत्ता ताब्यात घेतली.

या सत्तांतराविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नसली, तरी सातवाहन वंश हा काण्वांनंतर लगेच सत्तेवर आला, हे नक्की. युरोपिअन इतिहासकार मानतात, की सातवाहनांची सत्ता इ. स. पूर्व सुमारे पहिले शतक (अखेर) ते इ. स. तिसरे शतक, अशी अंदाजे २९० वर्षे होती.

मात्र, भारतीय पुराणांमधील नोंदी वेगळे सांगतात. वायू पुराण, मत्स्य पुराण आणि विष्णू पुराण आदी प्राचीन ग्रंथांमध्ये सातवाहन वंशाचा उल्लेख ‘आन्ध्र’ अथवा ‘आन्ध्रभृत्य’ असा येतो. पुराणांतील उल्लेखानुसार सुमारे ४६० वर्षे या वंशाची सत्ता होती आणि या वंशाचे एकूण ३० राजे होऊन गेले. त्यांची यादी वरील पुराणांमध्ये दिलेली आहे.   (latest marathi news)

Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.
राजवंश भारती : महाजनपदे

सातवाहनांचा संस्थापक ‘सिमुक’ होता, यावर मात्र एकमत आहे. हा ‘श्रीमुख’चा अपभ्रंश वाटतो. याच नावाचा उल्लेख कधी शिशुक, तर कधी सिंधुक असाही येतो. ‘सातवाहन’ हे वंशनाम कशावरून रूढ झाले, यावरही मतांतरे आहेत. या नावाचा त्यांचा एक पूर्वज होता, हे एक मत आहे; तर या वंशातील राजे सूर्यवंशाशी नाते सांगत असल्याने सात (घोड्यांचे) वाहन- रथ असलेला आराध्य देव सूर्य; म्हणून सातवाहन हे नाव त्यांनी घेतले, हेही मत आहे.

यालाच जवळ जाणारे ‘सातकर्णी’ हे नाव एका राजाने घेतले आणि पुढे तेच नाव ‘बिरूद’ म्हणून इतर वंशजांनीही लावले. आंध्र या पर्यायी नावाबद्दल असं म्हणतात, की हे नाव नंतर रूढ झाले, कारण महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात त्यांची सत्ता पसरली. याउलट, सध्याच्या तेलंगणातील धरणीकोटा अथवा अमरावती ही सातवाहनांची आधी राजधानी होती, असेही मत आहे. नंतर ती प्रतिष्ठान (आताचे पैठण) येथे आणली. मात्र, सातवाहन वंश कीर्ती शिखरावर असताना त्यांची राजधानी प्रतिष्ठानलाच होती. सातवाहनचे आणखी एक पर्यायनाम ‘शालिवाहन’ असेही आहे.

आंध्र वंशाची एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या रूपाने अनेक शतकांमध्ये पहिल्यांदाच भारताचे सत्ताकेंद्र दक्षिणेत आले. दुसरी-आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवाहनांनी ‘महाराष्ट्र’ आकाराला आणला. ते महाराष्ट्राचे पहिले राजघराणे आहे.

त्यांच्याच काळात संस्कृतपासून वेगळी अशी ‘प्राकृत’ भाषा उदयाला आली; जिचा एक आविष्कार ‘महाराष्ट्री’ भाषा हा आहे, तीच पुढे प्रगल्भ होऊन ‘मराठी’ भाषा झाली. त्यामुळे ‘महाराष्ट्रा’चा असा स्वतंत्र राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास सातवाहनांपासून सुरू होतो.

जुन्नरजवळ नाणेघाट आहे. या नाणेघाटातून एके काळी व्यापारी वर्दळ चालायची. याच घाटमाथ्यावर एक भला मोठा दगडी रांजण आहे. तो सातवाहन काळात, जकात गोळा करण्यासाठी ठेवला होता, असे म्हणतात. ही जकात ‘कार्षापण’ या नाण्यांच्या चलनात असे.

इथेच जवळ दगडी शिळेवरती राणी नागनिकेच्या दानधर्माबद्दल मोठा शिलालेख आहे.
पहिला सातवाहन राजा सिमुक याच्यापासूनच त्यांचे एक मुख्य ध्येय होते; ते म्हणजे शकांचा नि:पात! शक अथवा सीथिअन्स ही प्राचीन इराणी वंशाची एक आक्रमक जमात होती. त्यांनी ग्रीकांच्या पाठोपाठ भारतावर अनेक हल्ले केले.

तोवर दुबळी झालेली मगध राजसत्ता शकांपुढे हतबल होती. सातवाहन राजांनी शकांना आपला शत्रू क्रमांक एक मानले आणि त्यांच्या अनेक पिढ्या शकांशी लढल्या. शकांच्या टोळीप्रमुखाला राजा अथवा महाराज हे संबोधन नसून, ‘क्षत्रप’ हे नाव होते. असे अनेक क्षत्रप तेव्हा भारतात ठिकठिकाणी आक्रमणे करीत होते. काही प्रदेश त्यांच्या ताब्यात गेलाही होता; पण त्यांना प्रतिकारही तेवढाच जबरदस्त होत होता.   (latest marathi news)

Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.
राजवंश भारती : मौर्य राजवंश

गौतमीपुत्र सातकर्णी

सातवाहन वंशाच्या ३० राजांची यादी उपलब्ध असली, तरी त्यांच्यापैकी सर्वांत कर्तृत्ववान आणि श्रेष्ठ राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. सातकर्णी हे तर आधीपासूनच उपनाम म्हणून वापरलेले आहे. आणि हा वंश मातृसत्ताक असावा, असे दिसते. राजाच्या आईचे नाव ‘गौतमी बलश्री’. त्यामुळे तो स्वत: ‘गौतमीपुत्र!’ आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो.

‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला आणि याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.

म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!

सिमुकाचा मुलगा सिरी सातकर्णी याची पत्नी नागनिका हिचा उल्लेख आपण नागवंश पाहतानाच केला आहे. ती स्वत: राज्यकर्ती होती. तिच्या नावाची नाणी आहेत. या राजांपैकी सात-आठव्या राजाचे नाव ‘हाल सातवाहन’. याची ओळख रणांगणामुळे नाही, तर एका ग्रंथामुळे आहे. ‘गाथा सप्तशती’ किंवा तत्कालीन भाषेत ‘गाहा सत्तसई’ हा प्राकृत मराठीतील ग्रंथ त्याने संपादित केला आहे. याशिवाय, कवी गुणाढ्याने रचलेला ‘कथासरित्सागर’ किंवा ‘बृहद्कथा’ हा ‘पैशाची’ भाषेतील ग्रंथही सातवाहन काळातलाच आहे.

गौतमीपुत्राएवढा नसला, तरी बराच कर्तबगार असलेला अखेरचा राजा होता यज्ञश्री सातकर्णी. त्याच्यानंतर सातवाहन वंशाला उतरती कळा लागली. अखेरचा राजा पुलुमवी- चौथा, मृत्यू पावला, तेव्हा सातवाहन राज्याची शकले झाली आणि दबलेल्या शक क्षत्रपांनी ठिकठिकाणी पुन्हा उठाव करून जुने प्रदेश बळकावले.

Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.
राजवंश भारती : शुंग राजवंश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com