भाषा संवाद : हस्ताक्षर; ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे’

Latest Marathi Article : विकास ही बदलत्या काळाची गरज आहे; पण हा ‘बदलता काळ’ हस्ताक्षरासारख्या चांगल्या सवयींवर घाव तर घालत नाहीये ना, हे कुठेतरी तपासले पाहिजे.
Marathi Writing
Marathi Writingesakal

लेखिक : तृप्ती चावरे- तिजारे

सवय, संस्कृती आणि शब्दसंग्रह हे तीन शब्द एकमेकांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणारे असतात. वाईट सवयी नकळतपणे जन्माला येतात, तशा चांगल्या सवयी या नकळतपणे विस्मृतीतही जातात. हस्ताक्षर ही अशीच एक चांगली; पण नव्या पिढीच्या विस्मृतीत जाऊ पाहणारी सवय.

आज आपण ज्याला ‘विकास’ म्हणतो, त्या विकासाच्या मार्गावर आपण ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या दोनच चाकांची गाडी वेगाने चालविण्यात मग्न झालो आहोत. इतके, की त्यात आपल्या हातातून काय निसटून जाते आहे, हे लक्षातही येत नाही. विकास ही बदलत्या काळाची गरज आहे; पण हा ‘बदलता काळ’ हस्ताक्षरासारख्या चांगल्या सवयींवर घाव तर घालत नाहीये ना, हे कुठेतरी तपासले पाहिजे. (saptarang latest article on language communication)

लहानपणी शाळेच्या भित्तिफलकावर ‘सुंदर अक्षर हाच खरा दागिना’ या सुविचाराने आपल्यापैकी अनेकांच्या हस्ताक्षराला, भाषेला, विचारांना आणि मनालाही वळण लावले. वडीलधाऱ्या मंडळींकडून हस्ताक्षर सुंदर असल्याची शाबासकी मिळाली, आत्मविश्वास वाढला. यातूनच अनेकांना ओळख मिळाली आणि अनेकांचे हस्ताक्षरच नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वही वर्गात, शाळेत, कुटुंबात, समाजात आणि चारचौघात शोभून दिसू लागले.

हस्ताक्षराचा हा महिमा पाहून मला प्रश्न पडतो, की आपल्यामुळे हस्ताक्षर की हस्ताक्षरामुळे आपण? पण, आज मला पडणारा हा सुंदर प्रश्न आणि त्याचे उत्तर नव्या पिढीच्या बाबतीत मात्र धूसर होताना दिसत आहे. कारण हस्ताक्षराच्या ज्या सवयीने माझ्या पिढीचे आयुष्य घडले, ती सवय नव्या पिढीच्या विस्मृतीत जाऊ पाहते आहे.

हस्ताक्षर हा संस्काररूपी अलंकार

कुठलीही संस्कृती ही टिकून का राहते? कारण संस्काररूपी अलंकार हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतो. हस्ताक्षर हा एक असाच अलंकार. पण, तो आता पुढच्या पिढीपर्यंत जाणार का? सुंदर अक्षर ही एक कला आहे. कला ही सरावाने आत्मसात करावी लागते.

सराव म्हणजेच सवय. हस्ताक्षराच्या बाबतीत ही सवय लहानपणीच आपल्या पिढीच्या अंगवळणी पडली. इयत्ता पहिलीपासून ‘शुद्धलेखनाची वही’ ही मुलांसाठी शालेय पुस्तकाइतकीच महत्त्वाची असायची. शिक्षणाची सुरवातच सुंदर हस्ताक्षराने असायची.

मुळाक्षरे आणि बाराखडी शिकताना प्रत्येक अक्षर सुबक व नेटके असावे, याकडे शिक्षकांचे आणि पालकांचेही लक्ष असायचे. दररोज पाच ओळी शुद्धलेखन, सुलेखन स्पर्धा, फळ्यावर खडूने सुविचार लिहिणे, असा बालपणी अक्षरांचा उत्सवच असे. हस्ताक्षर म्हणजे भगवती शारदेचा कृपाप्रसाद, म्हणून पाटीवर पेन्सिलचे वळण आकार घेऊ लागायचे. (latest marathi news)

Marathi Writing
कात्यायनीचा अनोळखी कायापालट...

हस्ताक्षरात मनाचे प्रतिबिंब

मुद्रण कला अस्तित्वात नव्हती, तेव्हा हस्तलिखिते लिहून काढण्याची पद्धत घरोघरी प्रचलित होती. आपली प्राचीन ग्रंथसंपदा सुंदर अक्षरात लिहून ठेवणाऱ्या पूर्वजांचे आपल्यावर किती उपकार आहेत! श्रीसूक्तात म्हटले आहे, की पूर्वजांची हस्तलिखिते हीच आपली नीती संपत्ती आहे. असे म्हणतात, की हस्तलिखितात, लिहिणाऱ्या व्यक्तीचे मन उतरत असते. इतकेच नव्हे, तर मानसशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींना हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभावही कळू शकतो.

चांगल्या हस्ताक्षरासाठी...

आज मात्र हस्ताक्षराचे भौतिक अस्तित्वच नामशेष होत चालले असल्याने शब्दसंग्रह, भाषेचे रसग्रहण आणि सौंदर्याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. माझ्या मते शिक्षण, मन आणि हस्ताक्षर या तिन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. पण, आज जर आपण मुलांना कधीतरी ‘अरे जरा हस्ताक्षर चांगले काढ’ असे म्हटले तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटते की हस्ताक्षर म्हणजे नेमके काय? अशावेळी आपणही खिन्न होतो.

पण, हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी करायचे काय? यासाठी, दासबोधासारखा सोपा मार्ग नाही. म्हणून त्याला शरण जावे. हस्ताक्षराच्या बाबतीत समर्थ रामदास पहिला उपदेश करताना म्हणतात,

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगे अखंडित वाचीत जावे ।’

दासबोधातील एकोणिसाव्या ओवीत लेखनक्रिया निरूपणात समर्थ रामदास स्वामींनी हस्ताक्षराचे खूप सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात,

ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसून करावें सुंदर । जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥

‘साधना म्हणून लेखनाचे ब्रह्मकर्म करतो, तो ब्राह्मण’ अशी सुरवात करीत रामदास स्वामी ‘चतुर जनांचे समाधान झाले पाहिजे’ ही हस्ताक्षराकडून असलेली अपेक्षा अगदी सुरवातीलाच सांगून टाकतात. (latest marathi news)

Marathi Writing
सुजाण नागरिक घडवणारं शिक्षण

समर्थ रामदासांची बोधवचने...

पुढे हस्ताक्षर गिरविण्याची पद्धत कशी असावी, हे सांगताना ते म्हणतात,

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें । कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥

अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट । आडव्या मात्रा त्याही नीट । आर्कुलीं वेलांट्या ॥

पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहत गेलें । येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥

अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोंसरपण । तैसेंचि वळण वांकण । सारिखेंचि ॥

वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना । खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाक्षर ॥

आजकाल ज्याला ‘कॅलिग्राफी’ म्हणतात, ती संत रामदासांच्या वरील बोधवचनांचा अभ्यास करूनच विकसित झाली असावी, याची मला खात्री वाटते.

मुलांचे अक्षर किमान वाचनीय असावे, यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे सांगताना संत रामदास पुढे म्हणतात,

ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन । जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी । चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥

हस्ताक्षर घडविण्यासंबंधी हे संपूर्ण दशक जरूर वाचून काढावे. हस्ताक्षर घडविण्याची आणखी एक शिकवण ज्ञानेश्वरीतही माऊलींनीही दिली आहे. ते म्हणतात,

‘हे बहु असो पंडितु। धरोनि बाळकाचा हातु। वोळी लिहाव्या व्यक्तु। आपणची।।’ (ज्ञानेश्वरी. १३-२०८)

अक्षर गिरवणे हा भावसंस्कारच

हस्ताक्षर हा अंतर्मनाचा आरसा आहे, हे लक्षात घेऊन‌ माझ्या लहानपणी माझे बाबा माझे हस्ताक्षर सुधारण्यासाठी ही शिकवण अक्षरशः स्वतः अभ्यास करीत पाळीत असत. पानाच्या सुरवातीला बाराखडीचे प्रत्येक पहिले सुवाच्च व सुडौल अक्षर ते मला स्वतःच्या हाताने काढून देत असत आणि त्याबरहुकूम ते गिरविण्याची व पानभर तसेच अक्षर काढण्याची सक्ती असे.

आता कळते, हस्ताक्षराबरोबरच मन आणि सौंदर्यालाही वळण लावण्याचा तो भावसंस्कार होता. पूर्वी घरचा अभ्यास (होमवर्क) देत असताना शिक्षक विद्यार्थ्यांना रोज पानभर स्वहस्ते लेखन करावयास भाग पाडत, करून घेत. आज ते कुठेच दिसत नाही. संगणकाच्या आगमनानंतर स्वहस्तलेखन बंद पडले.

असो... पण, चला बदला घडवू या...

ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना लिहायची सवयच राहिलेली नाही. परिणामी, बहुसंख्य मुलांची अक्षरे खुरटी, वेडीवाकडी, कुठेही धावणारी, न समजणारी आणि बेढब असतात. परिणामी, त्यांचे मन आणि भावनाही तशाच कोरड्या होत जातात.

मग यावर काहीच उपाय नाही का? अहो, आहे. ‘दिसा माजी काहीतरी ते लिहावे’ हा मंत्र. घरातील सर्वांनी मिळून समर्थ रामदास स्वामींचा हा अर्धा मंत्र जरी पाळला, तरी नक्की बदल घडून येईल. मग वाट कसली पाहताय? घ्या लेखणी हातात...

(क्रमशः)

Marathi Writing
अजिंठ्याचं सुवर्णयुग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.