दृष्टिकोन : आदर्श लोकशाहीसाठी जपा बंधुभाव!

Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : आदर्श लोकशाही जिवंत ठेवणे, यासाठी प्रत्येक नागरिकाने मनस्वी प्रयत्न करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन होय.
Rajaram Pangavhane
Rajaram Pangavhaneesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

जोपर्यंत देशातील सर्व नागरिक व घटक एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागणार नाहीत, मानवता व सेवाभाव जोपासणार नाही. घटनेतील तत्त्वांचे आचरण आपल्या जीवनशैलीत आणणार नाही, तोपर्यंत आपण आदर्श लोकशाही असलेले राष्ट्र घडवू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असावा.

मी एकट्यानेच बंधुभाव जपला, तर काय होणार, ही वृत्ती प्रथम मनातून काढून टाकली पाहिजे. बदलाची सुरवात स्वतःपासूनच होते. त्यामुळे आपण आपल्यापासूनच सुरवात करावी. आदर्श लोकशाही जिवंत ठेवणे, यासाठी प्रत्येक नागरिकाने मनस्वी प्रयत्न करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन होय. (Nashik saptarang marathi article on Save brotherhood for ideal democracy news)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रविवारी (ता. १४ एप्रिल) जन्मदिवस आहे. असे थोर महामानव आपल्या देशात जन्माला आले हे खरंतर आपले भाग्यच. राज्यघटनेमध्ये वेगवेगळे प्रांत, त्याइतकी मोठी भौगोलिक परिस्थिती असलेल्या, सांस्कृतिक विषमता, रुढी परंपरा पावलापावलावर बदलणारी जीवनशैली असलेल्या देशाला एका घटनेमध्ये एकत्रित करणे ही कामगिरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लीलया पार पाडली.

भावना ‘बंधुत्वा’चीच श्रेष्ठ

बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेला जगात मान्य केले गेले व त्याचे कौतुक आजही होत आहे. उद्याही होत राहील, याबद्दल कुणाचेही दुमत नाही. आपल्या घटनेमधील बाबासाहेबांना एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर मुलाखतीत विचारले होते, की तुम्हाला या राज्यघटनेमधील सर्वांत भावलेला शब्द कोणता, त्या वेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘बंधुता’ हा शब्द त्यांना सर्वांत आवडला आहे, असे सांगितले. याचे कारण असे, की, बंधुता हा निर्देशित केल्याप्रमाणे लोकांमध्ये रुजवता येणार नाही. कारण ही मानसिक व भावनिक बाब आहे. जनमानसामध्ये जेव्हा बंधुत्वाची भावना निर्माण होईल, तेव्हाच हे राष्ट्र जगाच्या पाठीवर एक आदर्श राष्ट्र बनेल.

स्वातंत्र्य, समतेच्या पलीकडे

‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून सारा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. जगातील सर्वांत वेगळ्या प्रकारची राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेबांना देण्यात येते. आपल्या राज्यघटनेचे वेगळेपण तिच्या सामाजिक आशयात आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इत्यादी देशांच्या राज्यघटना राजकीय तत्त्वज्ञानावर आधारित आहेत.

तिथे ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ यांचा अर्थ ‘राजकीय स्वातंत्र्य’ आणि ‘राजकीय समता’ असा होतो. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ हे शब्द आहेत. ‘राजकीय समता’ आणि ‘स्वातंत्र्य’ प्रत्येकाला दिले आहे. पण बाबासाहेब इथेच थांबत नाहीत.  (latest marathi news)

Rajaram Pangavhane
‘धनेश’ संवर्धनाची झेप!

‘बंधुता’चे अनन्यसाधारण महत्त्व

डॉ. बाबासाहेब ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ या दोन मूल्यांवरच थांबत नाहीत. ते ‘बंधुता’ हे तिसरे तत्त्वही आपल्या घटनेच्या उद्देशिकेत समाविष्ट करतात. ‘बंधुता’ याचा अर्थ ‘बंधुभाव’ आणि ‘भगिनीभाव’ असा होतो. भारतातील नागरिकांनी परस्परांशी सख्ख्या भावाहून अधिक प्रेमभावनेने राहिले पाहिजे ही मानसिक अवस्था आहे. ती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. स्वातंत्र्य आणि समतेचे अधिकार संविधानाच्या कायद्याने देता येतात. ‘बंधुता’ अशी कायद्याने देता येत नाही, ती निर्माण करावी लागते.

‘बंधुता’ची ती खरी कसोटी

आपला देश कोरोनाच्या संकटातून जात असताना देशभर ‘लॉकडाउन’ होते. या काळात लोकांना घरीच राहायला सांगितले होते. अशावेळी ज्यांचे पोट हातावर आहे, रोज कष्ट केल्याशिवाय ज्यांना जेवण मिळणं कठीण आहे, अशांची परिस्थिती नाजूक झाली होती.

ही वेळ राज्यघटनेतील ‘बंधुता’ हे तत्त्व जगण्याची आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या देशबांधवांना प्रत्येकाने कर्तव्य भावनेने मदत करण्याची आहे. जे गरीब आहेत, बेघर आहेत, ज्यांना कोणताही निश्चित व्यवसाय नाही, घरकाम करून ज्या महिला संसार चालवितात, त्यांना मदतीची सर्वाधिक गरज होती.

बाबासाहेबांना अपेक्षित बंधुभाव

आनंदाची गोष्ट अशी, की या संकटसमयी रतन टाटांपासून ते ‘बाटा’च्या दुकानात काम करणाऱ्या सामान्य माणसानेही बंधुत्वाची भावना दाखविली. ज्यांच्याजवळ भरपूर धन आहे, त्यांनी मोठ्या देणग्या दिल्या आणि ज्यांच्याकडे धनाची कमतरता होती, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची सेवा देऊ केली.

स्वयंसेवक, विविध धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते, विविध सेवासंस्था या वेळी धैर्याने पुढे येऊन काम करीत होत्या. पोलिस, परिचारिका, डॉक्टर, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत होते. डॉ. आंबेडकरांनी ज्या बंधुभावनेची अपेक्षा केली, तिचे दर्शन या नाजूक संकटकाळात पदोपदी घडले.  (latest marathi news)

Rajaram Pangavhane
इन्फ्ल्युएन्सर्सची व्हायरल साथ

परस्परांच्या स्नेहाचे घट्ट बंध

कोरोनाकाळात दूरचित्रवाणीवर ‘रामायण’ मालिका दाखविण्यात येत होती. बंधुप्रेम काय असते, हे आपण या मालिकेत पाहिले. राम-लक्ष्मण-भरत- शत्रुघ्न यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि ते प्रसंग पाहताना प्रत्येकाचे डोळे भरून येत असत. बंधुतेचे मूल्य असे अतिप्राचीन आहे. त्याचा अंगीकार सर्व भारतीयांनी करणे म्हणजेच आपले राष्ट्रीयत्व बळकट करणे होय.

जेव्हा एका भूमीत राहणारे लोक परस्परांच्या स्नेहाने बांधलेले असतात, तेव्हा असा मानवी समूह त्या भूमीचे राष्ट्र होतो. असा मानवी समूह भारतात उभा राहावा, भारत एक राष्ट्र बनावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती. जोपर्यंत आपण भारतीय भावनिकदृष्ट्या एकमेकांत बांधले जात नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण ‘राष्ट्र’ होऊ शकत नाही.

घटनात्मक नीतीने जगावे

जॉर्ज वॉशिंग्टन यांना ‘अमेरिकेचे राष्ट्रपिता’ म्हणतात. घटनात्मक नीतीचे पालन करण्याचा मापदंड त्यांनी घालून दिला. ते म्हणत असत, की घटना माझी मार्गदर्शक आहे. मी तिचा अवमान कधीही करणार नाही. ही घटनात्मक नीती या काळात जगण्याचा सर्वांनी प्रयत्न केलाच पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे कल्याण आहे.

आपल्या भारतीयांचा स्वभाव राज्यांच्या कायद्याच्या आधीन राहण्याचा नाही. दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिल्याने विदेशी सत्तांविरुद्ध संघर्ष करणे, त्यांचे कायदे मोडणे हा आपला स्वभाव झाला. अशा वेळी राज्याच्या कायद्याला प्राधान्य दिले पाहिजे. धर्माचे जे नीतीविषयक कायदे आहेत, परस्परांवर प्रेम करण्याचे जे कायदे आहेत, या सर्वांमध्ये कर्तव्याची भावना असते.

राज, प्रजाधर्माचे पालन

घटनेत नमूद आणखी दोन महत्त्वाचे शब्द म्हणजे ‘राजधर्म’ आणि ‘प्रजाधर्म’. हे आणखी दोन धर्म आहेत. या दोन्ही धर्मांचे पालन करणे म्हणजेच संविधानिक नीतीचे पालन करणे होय. संकट जसे अनेक प्रश्न निर्माण करते, तशी ती आपली कसोटीही पाहत असते. संकटसमयी आपल्या उणिवांचा शोध घ्यायचा असतो आणि सबळ बनण्याचा प्रयत्न करायचा असतो.

काळ हीच अपेक्षा आपल्याकडून करीत आहे. म्हणूनच जोपर्यंत देशातील सर्व नागरिक व घटक एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागणार नाहीत, मानवता व सेवाभाव जोपासणार नाहीत. घटनेतील तत्त्वांचे आचरण आपल्या जीवनशैलीत आणणार नाही, तोपर्यंत आपण आदर्श लोकशाही असलेले राष्ट्र घडू शकत नाही.

त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. मी एकट्यानेच बंधुभाव जपला तर काय होणार, ही वृत्ती प्रथम मनातून काढून टाकली पाहिजे. बदलाची सुरवात स्वतःपासूनच होते. त्यामुळे आपण आपल्यापासून सुरवात करावी. आदर्श लोकशाही जिवंत ठेवणे, यासाठी प्रत्येक नागरिकाने मनस्वी प्रयत्न करणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन होय. 

Rajaram Pangavhane
कहाणी ‘उस्ताद’ची!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com