व्यक्‍तिगत मुक्‍तीचा शोध...

यंदाच्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांसमोर माझे विचार मांडण्याची संधी मला मिळाली.
Anjali kajal
Anjali kajalsakal

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com

यंदाच्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांसमोर माझे विचार मांडण्याची संधी मला मिळाली. माझ्या भाषणापूर्वी एका अधिकाऱ्यानं प्रस्तावनापर भाषण केलं. आपल्या रोजच्या जीवनात आपण ‘जात’ कशी नाकारत राहिलं पाहिजे, तिचा उल्लेखही कसा टाळला पाहिजे याबद्दल ते बोलले.

जातीचा उल्लेख न करण्यानंच आपण प्रगतिपथावर जाऊ. आपण आपल्या आडनावातून आणि इतर व्यवहारातूनही जात हद्दपार केली पाहिजे अशा स्वरूपाचंच काहीसं ते बोलत होते. सर्वसाधारणरीत्या आधुनिकतेच्या नावाखाली नेहमी काढला जातो तोच सूर त्यांनी लावला होता.

वर्ग संपुष्टात आणण्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि जात ही बाब मागं टाकली पाहिजे यावर ते भर देत होते. आजकाल जातिनिर्मूलनाच्या चर्चांमध्ये लिंग, लैंगिकता इतकंच काय प्रत्यक्ष जात सुद्धा बाजूला सारली जाते आणि सगळा भर वर्ग या कल्पनेवर दिला जातो. असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या बौद्धिक दिवाळखोरीची मला कीव येते.

त्यांचे हे विचार ऐकताना १९१६ मध्ये लिहिलेल्या आंबेडकरांच्या Castes in India या मौलिक ग्रंथातील काही विधानं मला आठवली. जातिवर्चस्वाशी सामना करताना लिंगभेद आणि लैंगिकता विचारात घेण्याची आवश्यकता बाबासाहेबांनी अधोरेखित केली आहे. भारताच्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत केवळ वर्गहीन समाजरचनेलाच प्राधान्य देऊन चालणार नाही. भारतामध्ये जातीत वर्ग विणलेला आहे आणि वर्गात जात गुंफलेली आहे.

जातीचे हे भान आज विस्मरणात गेलं आहे. समस्यांच्या निराकरणासाठी उच्चभ्रू आधुनिकतेच्या डोलाऱ्यावर आधारलेले वेडपट मार्ग सुचवले जात आहेत. अशा वेळी अंजली काजल यांचा ‘ मा इज स्केअर्ड अँड अदर स्टोरीज’ हा ताजा कथासंग्रह उच्चभ्रू आधुनिकतेच्या या वैचारिक दिवाळखोरीवर आव्हानात्मक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक समयोचित हस्तक्षेप आहे. मूळ हिंदीतलं हे पुस्तक कविता भानोट यांनी इंग्लिशमध्ये अनुवादित केलं आहे.

काजल यांच्या या कथा स्त्रियांच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा शोध घेतात. पण या स्वातंत्र्यासाठी त्यांना पुरुषी हाताचा किंवा सवर्ण त्रात्याचा आधार नको आहे. यातील अनेक पात्रं स्थानीय संस्कृतीच्या नावाखाली आपलं व्यक्तित्व आणि स्वातंत्र्य बंदिस्त करणाऱ्या, पितृसत्ताक पोथ्या पुस्तकांनी लादलेल्या पारंपरिक साचेबद्धतेला आव्हान देतात आणि बंधनकारक ‘शास्त्रा’चे आदेश किंवा बंदी झुगारून देतात.

‘मा इज स्केअर्ड ’ या कथेतील जसबीर पुरुषी नजरांना सरळ सरळ आव्हान देत वारसाहक्कानं लाभलेल्या, वर्षानुवर्षे जोपासलेल्या आणि अंगी मुरलेल्या कट्टर पुरुषी मानसिकतेला सुरुंग लावते. ‘डिल्युज’ नावाच्या कथेत पम्मी आणि नयना या स्त्रिया आपल्या मुलींबद्दल बोलतात. आपल्याला साचेबद्ध स्त्रीत्वात जखडून ठेवणाऱ्या पितृसत्ताक समाजाला धैर्यानं तोंड देता येण्याचं साहस आणि शक्ती आपल्या मुलींच्या अंगी यावी असं त्यांना वाटतं.

त्या पद्धतीनं त्यांची जडणघडण करण्याची जागती आशा त्यांच्या संभाषणातून व्यक्त होते. रूढीवादी असलेल्या आपल्या सामाजिक नैतिकतेत लिंग आणि लिंगभाव यांच्या तारा प्रदीर्घ काळ दोन्ही बाजूंनी कशा घट्ट पिळलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं.

काजल इथेच थांबत नाहीत. आंबेडकरांच्याच मार्गावर जात स्त्रिया आणि त्यांच्या लैंगिकतेवरील ताबा हाच जातिव्यवस्थेचं सातत्य टिकविण्याचा मार्ग कसा आहे हे त्या दाखवून देतात. वस्तुत: त्यांच्या कथा स्त्रीवादी चळवळीतील भेदांकडं बोट दाखवतात. त्यातील भगिनीभावसुद्धा भंग पावलेला दिसतो. या भेदाचं मूळही जातिव्यवस्थेत आणि अनुषंगानं वर्गव्यवस्थेतही असतं.

दलित किंवा अनुसूचित जमातींबद्दल अभिजनांच्या मनात किती दूषित आणि ठोकळेबाज पूर्वग्रह असतो याची मुबलक उदाहरणं त्यांच्या ‘हिस्टरी’ या कथेत आढळतात. पाथवेज या कथेत लेखिकेनं जातीवर आधारित पितृसत्तेचा सूक्ष्म थर उलगडून दाखवला आहे. त्याला मानसशास्त्रीय परिमाणंही असल्याचं दिसतं.

पितृसत्ताक पद्धती केवळ आदिवासी किंवा दलित महिलांचेच नव्हे, किंबहुना केवळ महिलांचेच नव्हे तर आदिवासी आणि दलित पुरुषांचेही शोषण करते. पण त्यांच्या कथांचं खरं वेगळेपण त्यातील दलित व्यक्तिचित्रणात आहे. ही सारी स्वातंत्र्योत्तर काळातील माणसं आहेत.

त्यांच्याकडं वारसाहक्कानं आलेलं सामाजिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक भांडवल नाही. त्यांनी वारसा मिळवलाय तो खास त्यांचा बोधिसत्त्व असलेल्या डॉ. आंबेडकरांकडून. आत्मसन्मान जपणाऱ्या अस्तित्ववादाचा वारसा. पाथवेज कथेतील संजयच्या व्यक्तिरेखेत या वारशाचंच प्रेरक दर्शन होतं.

‘टु बी रेकग्नाइजड’ या कथेत किरण नावाच्या एका दलित स्त्रीचं अत्यंत हृद्य चित्रण लेखिकेनं केलं आहे. सत्ता, पितृसत्ता, जात या विषयावरील चर्चा तिला समजते. नामदेव ढसाळ यांच्या भाषेत सांगायचं, तर ‘अभिजनांची सनातनी धर्मनिष्ठा’ही तिच्या लक्षात येते. स्वतःवर आणि आपल्या समाजावर केल्या गेलेल्या ऐतिहासिक अन्यायांचं पुरतं भान तिला आहे.

त्यातून आपलीच नव्हे तर आपल्या साऱ्या समुदायाची सुटका करण्यासाठी आणि अंतत: सर्वत्र प्रबुद्ध मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे याचीही तिला जाण आहे. या कथेचा शेवट एका कवितेनं होतो. आवर्जून वाचावी अशीच ही कविता आहे. ही कथा संपवून पुढच्या कथांकडं वळल्यानंतरही ती कविता वाचकाच्या मनात रेंगाळत राहते.

पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्थात्मक विषमतांमुळं लिंगसापेक्ष आणि तरीही श्रेणीबद्ध अशा स्वरूपाच्या उच्चनीचतेला महामारीच्या काळात कसं खतपाणी मिळत गेलं, यावर ‘सॅनिटायझर’ ही शेवटची कथा भेदक भाष्य करते. यातील सिद्धार्थ आणि शेखर या दोन्ही पात्रांचं चित्रण मोठ्या बारकाईनं निरखायला हवं.

लिंग, जात, धर्म, वर्ग अशा ओळखींचा परिपाक म्हणून आपण सारेच कूपमंडूकतेचे प्रतिनिधी बनून अनेक अनाठायी पूर्वग्रह मनात बाळगतो. हे सारे पूर्वग्रह सिद्धार्थ आणि शेखर यांच्या वर्तनातून कसे व्यक्त होतात आणि ते दडवण्याचाही प्रयत्न कसा केला जातो, हे अगदी खोलात जाऊन समजून घेण्याजोगं आहे.

पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या माझ्या त्या भाषणांनंतर पुण्याहून दिल्लीला जाताना, नुकताच आलेला हा छोटा लघुकथासंग्रह मी विमानतळावर विकत घेतला. सगळ्या कथा वाचून झाल्यानंतर मी माझ्या किरकोळ प्रापंचिक कामात, अन्य वाचनलेखनात गुंतून गेलो खरा पण अंजली काजलची पात्रं काही मला शांत बसू देईनात. माझ्या स्वत:च्या मनातील पूर्वग्रह, पक्षपाती भूमिका यांना ती पात्रे आव्हान देऊ लागली.

ज्या समाजाचा मी घटक आहे त्या समाजाबद्दल प्रश्न उपस्थित करायला त्यांनी मला भाग पाडलं. पण या कथांतील सर्वांत कळीची गोष्ट कोणती असेल, तर ती ही की यातील सर्वच पात्रं आपापल्या व्यक्तिगत मुक्तीच्या शोधात आहेत. हरतीलही कदाचित ही सारी माणसं, पण मानवतावादी तत्त्वातील अंगभूत चांगुलपणावरचा आपला विश्वास ती कधीच ढळू देणार नाहीत, आपली आशा कधी भंगू देणार नाहीत.

(लेखक हे आयआयटी दिल्ली इथं मानद व्याख्याते असून सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. )

(अनुवाद: अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com