राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती 

निरंजन आगाशे
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मध्यंतरी प्रकाश आमटे यांचा जपानमधील एक अनुभव 'व्हॉट्‌स ऍप'वर फिरत होता. ते तेथील रेल्वेगाडीने जात होते. त्यांच्या डब्यात बसलेल्या एका जपानी प्रवाशाकडे त्यांचे सारखे लक्ष जात होते, याचे कारण तो मनुष्य सुईत दोरा ओवून डब्यातील एक अगदी थोडीशी फाटलेली सीट शिवत होता. 

'तुम्ही रेल्वेचे कर्मचारी आहात का?' हा प्रश्‍न आमटे यांनी अगदी स्वाभाविकपणे विचारला. त्यावर तो जपानी प्रवासी म्हणाला, ''छे, छे, मी प्रवासीच आहे. पण ही रेल्वे म्हणजे आमच्या देशाची संपत्ती आहे. बाहेरच्यांसमोर तिचे हे असे विरूप दिसू नये, म्हणून मी ते फाटलेले सीट शिवून टाकले, एवढेच...'' 

मध्यंतरी प्रकाश आमटे यांचा जपानमधील एक अनुभव 'व्हॉट्‌स ऍप'वर फिरत होता. ते तेथील रेल्वेगाडीने जात होते. त्यांच्या डब्यात बसलेल्या एका जपानी प्रवाशाकडे त्यांचे सारखे लक्ष जात होते, याचे कारण तो मनुष्य सुईत दोरा ओवून डब्यातील एक अगदी थोडीशी फाटलेली सीट शिवत होता. 

'तुम्ही रेल्वेचे कर्मचारी आहात का?' हा प्रश्‍न आमटे यांनी अगदी स्वाभाविकपणे विचारला. त्यावर तो जपानी प्रवासी म्हणाला, ''छे, छे, मी प्रवासीच आहे. पण ही रेल्वे म्हणजे आमच्या देशाची संपत्ती आहे. बाहेरच्यांसमोर तिचे हे असे विरूप दिसू नये, म्हणून मी ते फाटलेले सीट शिवून टाकले, एवढेच...'' 

'व्हॉट्‌स-ऍप'वर जे वेगवेगळे किस्से अनुभव आणि कहाण्या फिरत असतात, त्यातलाच हा एक. पण अंतर्मुख करणारा. विचार करायला लावणारा. त्याची प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक निवाडा.

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे आणि ते सुरू असताना सर्वांनी उभे राहणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने गेल्याच आठवड्यात दिलेल्या एका निकालात म्हटले आहे. या निमित्ताने राष्ट्रवाद, राष्ट्रीयता, देशभक्ती यांची चर्चा सुरू झाली. 'न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे प्रतिकात्मकतेचे अवडंबर आहे, देशभक्तीची सक्ती कशी काय होऊ शकते', अशा प्रकारची टीका एकीकडे त्यावर झाली, तर दुसरीकडे 'हे आवश्‍यकच होते, न्यायालयाने हे केव्हाच करायला हवे होते', असाही सूर तेवढ्याच जोरात उमटला. 

मुळात राष्ट्र तयार होते, तेच भावनिक ऐकात्म्यामुळे. विशिष्ट भूमी आणि त्यावरचे लोक यांच्यात एकात्मतेचा एक बंध तयार होतो. तसा तो तयार होण्याला अर्थातच अनेक कारणे असतात. मग ती भाषा असेल, परंपरा असेल, संस्कृती असेल; इतकेच काय भविष्यकाळाविषयीच्या समान आकांक्षाही असतील. आपल्या 'रूट्‌स'विषयी असणारे आकर्षण अगदी स्वाभाविक असते. माणसाच्या आजवरच्या इतिहासात अगदी प्राचीन काळापासून ते कोणत्या ना कोणत्या रुपात व्यक्त झाले आहे.

लुईस स्निडर या राष्ट्रवादाच्या अभ्यासकाने म्हटले आहे, की देशभक्ती (Patriotism) ही भावना अगदी पूर्वीपासून आहे. आपण ज्या परिसरात राहतो, तो परिसर आणि तिथल्या लोकांविषयी वाटणारी आपुलकी यातून ती तयार होते; परंतु, ही भावना राष्ट्रीयतेशी जोडली गेली, तेव्हा आधुनिक राष्ट्रवाद जन्माला आला. आपल्या इतर सर्व निष्ठांपेक्षा राष्ट्राविषयीची निष्ठा प्रबळ असणे किंवा ठरणे म्हणजे हा आधुनिक राष्ट्रवाद. ही प्रक्रिया ज्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेली, त्या देशांनी प्रगती साधली, असेही आपल्याला दिसते आणि त्यामुळेच आपल्या देशालाही अशा प्रकारच्या प्रगतीचा लाभ व्हावा, अशी इच्छा तीव्रतेने वाटणाऱ्या व्यक्ती प्रयत्न करीत असतात. त्यामुळे चित्रपटगृहात राष्ट्रगीत सक्तीचे करावे, अशी मागणी करणारी याचिका ज्यांनी न्यायालयात दाखल केली, त्यांना देखील अशीच तळमळ असणार, असे म्हणायला हरकत नाही. पण हेतू प्रामाणिक असला तरी राष्ट्रगीताची सक्ती करण्याचा उपाय कितपत तर्कसंगत आहे, याची तपासणी करायला हवी. 

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ही प्रतीके आहेत. राष्ट्राप्रती सर्वोच्च निष्ठा बाळगणाऱ्या व्यक्तिसमुहाच्या कर्तृत्वामुळे, अंतर्गत ऐक्‍यामुळे, त्यांच्या कला, क्रीडा व शिक्षण आदी क्षेत्रांतील सांस्कृतिक संपन्नतेमुळे आणि त्यांनी पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे या प्रतीकांचे महत्त्व उंचावते. समूहाच्या अंगी रुजलेल्या, मुरलेल्या गुणवैशिष्ट्यांचे दर्शन कुठल्याही प्रसंगात सहजपणे घडते. जसे त्या गोष्टीतील जपानी माणसाच्या बाबतीत घडले. त्याला 'रेल्वे' ही आपली वाटली, त्या रेल्वेची साधनसामग्री नीट जपणे हे आपले कर्तव्य आहे, असे वाटले आणि आपल्या देशातच्या प्रतिमेशी या सगळ्याचा संबंध आहे, हेही चांगलेच कळले होते. आधुनिक काळातील राष्ट्रीय भावना किंवा देशभक्ती ती हीच. हा राष्ट्रवाद 'आपले' आणि 'परके' यात भेद करतो, हे खरेच; आणि विशाल मानवतेच्या दृष्टीने विचार करता या भावनेला संकुचित ठरविताही येईल. परंतु, जात, वंश, टोळी, घराणी, धर्म-संप्रदाय अत्यादींविषयी अभिनिवेश आणि निष्ठा बाळगणे आणि राष्ट्राविषयी निष्ठा बाळगणे यात निश्‍चितच गुणात्मक फरक आहे. हे स्थित्यंतर किती प्रमाणात झाले आहे, हे महत्त्वाचे. विकसनशील देशांच्या, नवस्वतंत्र देशांच्या दृष्टीने तर याचे महत्त्व विशेष आहे. म्हणजेच प्रयत्न व्हायला हवा तो या स्थित्यंतरासाठी. त्यासाठी भगीरथ प्रयत्नांची गरज आहे. ते जर केले तर अशा याचिका दाखल करण्याचीही वेळ येणार नाही आणि चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सक्ती करण्याचीही...

Web Title: Niranjang Agashe writes about Nationalism