कथा घडण्याची 'धग'धगीत गोष्ट (नितीन दीक्षित) 

Dhag Movie
Dhag Movie

'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडं येणाऱ्या एका प्रसंगात एका संवादावर गाडी अडली... 

''उद्या ह्ये काम सोडायचं आसंल, तर आता ह्ये काम करावंच लागल...'' 'धग' चित्रपटातल्या बारा वर्षाच्या कृष्णाच्या तोंडी असलेलं हे 'काय डायल्लॉगाय!' या कॅटेगरीत न बसणारं, अगदी साधं वाक्‍य; पण या एका ओळीच्या संवादानं मला दोन ते तीन दिवस तंगवलं होतं. 

मुंबईलगतच्या एका शहरातल्या स्मशानभूमीत, तिथली देखभाल करायला एक कुटुंब राहतं, त्या फॅमिलीवर काहीतरी करावं असं धगचा दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील एकदा मला म्हणाला. मात्र, काय करायचं, हे त्यानं माझ्यावर सोपवलं. काही दिवस विचार करण्यात गेले, त्यात एक गोष्ट जाणवली, की जर त्या शहरातल्या स्मशानात राहणाऱ्या कुटुंबावर चित्रपट करायचा, तर तो त्या वातावरणाचा त्या कुटुंबावर होणारा मानसिक परिणाम एवढ्यापुरताच मर्यादित राहणार, त्या कुटुंबाला भोगावे लागणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम फारसे दिसणारच नाहीत. एक तर शहरात अशा ठिकाणी काम करणारा हा सरकारी कर्मचारी असतो, त्यामुळे आर्थिक अडचणीचा प्रश्‍नच नाही, शिवाय एवढया मोठ्या शहरात ते काय काम करतात, कुठं राहतात या चौकशा करायला वेळ कोणापाशी आहे? मात्र, हेच कुटुंब एखाद्या खेड्यातल्या मसणवाटेत हे काम करत असेल तर? तर ही काही त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारलेली नोकरी नसणार, हे परंपरेनं त्यांच्यावर लादलेलं ओझं असणार. गावातला प्रत्येक माणूस यांना ओळखत असणार आणि सामाजिक उतरंडीत पदोपदी त्यांना त्यांची जागा दाखवत असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या कुटुंबाचं 'जगणं' हे कोणाच्या तरी 'मरणा'वर अवलंबून असणार. 

माझं ठरलं, ही कथा खेड्यातच घडवायची. दिग्दर्शक या गोष्टीला सुरवातीला तयार नव्हता; पण त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्यावर त्याला त्या पटल्या. हे सगळं ठीक होतं; पण गोष्ट मात्र अजूनही तयार नव्हती. ते कुटुंब अजूनही मला दिसत नव्हतं. एखादी गोष्ट सुचणं आणि ती कागदावर उतरवणं यामध्ये बरेच ताण-तणाव असतात, प्रक्रिया असतात. म्हणजेच डोकं आणि हात हे काही फुटांचंच असणारं अंतर पार करायला अनेकदा काही दिवस, किंवा काही महिने, वर्षंसुद्धा लागतात; पण दिग्दर्शक घाईत होता, हातचा आलेला निर्माता पळून जाईल की काय या भीतीनं तो मला सतत फोन करून विचारत होता ः ''झालं का? कुठपर्यंत आलंय?'' 

मग एके दिवशी अचानक त्या कु टुंबातली दोन पात्रं मला दिसली. नाईलाजानं का असेना; पण परंपरेची झूल ओढणारा श्रीपती, आणि वरचेवर होणाऱ्या अपमानानं व्यथित झालेला- आणि काहीही झालं, तरी आपण हे काम करायचं नाही असं ठरवलेला त्याचा मुलगा कृष्णा. या दोघांनी येतानाच कथेला लागणारी एक फार महत्त्वाची गोष्ट सोबत आणली होती, ती म्हणजे 'संघर्ष.' पात्रांचा पात्रांशी, पात्रांचा परिस्थितीशी किंवा पात्रांचा स्वत:शी संघर्ष हाच तर गाभा असतो कथेचा, आणि मला तो मिळाला होता. या गाभ्याभोवती एक-एक थर चढवत नवं जग आकार घेऊ लागलं. श्रीपतीचं घर, त्या घरासमोरची मसणवाट, अंगणात पडलेला लाकडांचा ढीग, ती लाकडं तोडणारा श्रीपती, परंपरेवर श्रद्धा असणारी; पण तरीही व्यवहारी अशी त्याची म्हातारी आई, प्रतिकूल परिस्थितीतही कांचन आणि कृष्णा या आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही असणारी त्याची पत्नी यशोदा, आणि त्याचा गावातला एकमेव मित्र मंगेश. अशी ही मुख्य पात्ररचना कथा फुलत असतानाच तयार होत गेली आणि या मुख्य पात्रांनी इतर पात्रांच्या सोबतीनं कथेला फुलवत नेलं. 

आता पुढची पायरी म्हणजे पटकथा; पण कथा आणि पटकथा याच्यामध्ये एक छोटासा सांधा असतो. कथा हा सर्जनाचा भाग असतो, त्यामुळे ती सुचताना कधी सलग एका रेषेत सुचत नसते, ती अशी तुकड्यातुकड्यात, कशीही आकार घेते, आणि पटकथा ही रचना (क्राफ्ट) असते. त्यामुळे पटकथेत जाण्याआधी कथेचे सगळे तुकडे एकत्र आणून त्यांची हवी तशी रचना करावी लागते. हा सांधा जमला, की पटकथेत जाणं सोपं होतं. पटकथा लिहिण्याची माझी पद्धत म्हणजे, मी आधी एका ओळीत किंवा कधीकधी काही शब्दांत एक एक दृश्‍य सुचेल तसं लिहीत जातो- अगदी शेवटच्या दृश्‍यापर्यंत. त्यानंतर मग प्रत्येक दृश्‍य तपशीलासह आणि संवादांसह लिहितो. 'धग'ची मध्यंतरापर्यंतची पटकथा दहा-बारा दिवसांतच तयार झाली. दरम्यान दिग्दर्शक बाकीची जुळवाजुळव करत होता. त्याला श्रीपतीच्या भूमिकेसाठी तगडा कलाकार हवा होता. 

उपेंद्र लिमये हा माझा मित्र, मी त्याच्याशी बोलायचं ठरवलं; पण मनात धाकधूक होती, 'धग'मधली त्याची भूमिका ही मध्यंतरातच संपणार होती. त्यात नुकताच त्याला 'जोगवा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अनेकांच्या डोक्‍यात हवा भरणारा हा पुरस्कार; पण अपेक्षेप्रमाणं उपेंद्र नेहमीसारखाच जमिनीवर होता. आम्ही भेटलो, त्याला कथा आवडली. तो म्हणाला ः ''मला स्क्रिप्ट पाठव, वाचून तुला कळवतो.'' मी त्याला मध्यंतरापर्यंतचं स्क्रिप्ट पाठवलं. त्यानं लगेचच त्याचा होकार कळवला. 

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम म्हणून ओळखलं जात असलं, तरी ते टीमवर्कच असतं. एक चित्रपट तयार होत असताना अनेक माणसांचा त्याला हातभार लागत असतो. यशोदाच्या भूमिकेसाठी उषा जाधवचं आणि मंगेशच्या भूमिकेसाठी नागेश भोसलेचं कास्टिंग शिवाजीनं केलं, सहायक दिग्दर्शक अभिजित झाडगावकरनं कृष्णाच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी हंसराज जगतापचं अत्यंत महत्त्वाचं कास्टिंग केलं. या चित्रपटाचा निर्माता विशाल गवारे, नितीन सुपेकर या दिग्दर्शकासोबत दुसराच चित्रपट करत होता; पण त्याचं स्क्रिप्ट तयार होत होतं, त्याला वेळ लागणार होता. नितीन आणि शिवाजी मित्र, शिवाजीकडे स्क्रिप्ट होतं; पण निर्माता नव्हता... आणि गळेकापू स्पर्धेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आमच्या क्षेत्रात अघटित घडलं, नितीन सुपेकरनं आपला निर्मात्याला आपल्या मित्राच्या प्रोजेक्‍टशी जोडून दिलं. पुढं नितीनचा तो चित्रपट झालाच नाही, आणि विशाल गवारेही अकाली हे जग सोडून गेला. 

'धग'ची पटकथा ही आत्तापर्यंतच्या माझ्या लेखनातली माझ्या जास्त जवळची. एक तर या लेखनात कुणाचाही हस्तक्षेप नव्हता, अगदी दिग्दर्शकाचाही. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत कसलीही बाधा आली नाही. या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट हाच शेवटचा ड्राफ्ट होता. सगळं स्क्रिप्ट एकहाती लिहून झालं; पण शेवटाकडे येणाऱ्या एका प्रसंगात एका संवादावर गाडी अडली. 'धग' हा कृष्णाच्या बंडखोरीचा बालिशपणापासून परिपक्‍वतेपर्यंतचा प्रवास आहे. बापाच्या मृत्यूनंतर अंगावर आलेल्या जबाबदारीपासून तो पळतो, त्यामुळे मंगेश मदतीला धावून येतो, त्याची आपल्या आईसोबतची वाढणारी सलगी, आणि आपल्या व्यवहारी आज्जीची त्याला असणारी मूक संमती यामुळे कृष्णा मुळापासून हादरून जातो आणि शेवटी तो हातात कुऱ्हाड घेऊन लाकडं तोडू लागतो; पण हा त्याचा पराभव नाहीये, हे वास्तवाचं भान आहे. आत्ता हे काम नाही केलं, तर कुटुंब रस्त्यावर येईल याची जाणीव आहे. त्यानं उचललेली कुऱ्हाड हे त्यानं कुटुंबाची जबाबदारी स्वीकारल्याचं प्रतीक आहे. हे सगळं एका बारा वर्षाच्या मुलाच्या तोंडी शोभेल अशा संवादातून व्यक्‍त करायचं होतं. अनेक पल्लेदार वाक्‍यं सुचत होती; पण पटत वा आवडत नव्हती. शेवटी विचार करणं बंद केलं, डोक्‍यातला गोंधळ थांबवला आणि मग पहाटेच्या शांततेत कृष्णा त्याच्या आईच्या कुशीत शिरून म्हणताना दिसला ः ''उद्या ह्ये काम सोडायचं आसंल, तर आता ह्ये काम करावंच लागल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com