दुख त्या चार दिसाचं...

दुख त्या चार दिसाचं...

गोष्टी गावाकडच्या...वड्या वगळीतल्या...माळा मुरडाणातल्या. गोष्टी... गावकुसातल्या...अर्थात हे सारं येईल त्याच भागातल्या भाषेत, तिथल्या मातीशी नातं सांगणाऱ्या शब्दांमध्ये दर आठवड्याला...

सकाळच्या पारी पाण्याची खेप आणली आन आंगावरन पाणी गेल्यागत झालं...तिथंच गप्पकन खाली बसली. सासूच्या समदं ध्यानात आलं...लगीच एक गोधडी आन पाण्याची कळशी दिऊन आत गीली...मी गोठयात जाणार तेवढ्यात पोरग पळत आलं आन बिलगलं...सासूनं कोपराला धरून मागं सारलं त्याला...आन म्हणली "तिला शिवू नगोस तिला कावळा शिवलाय.!"

पोरानं रडून धिंगाणा घातला पण मी मागं वळून बघितलं नाय...तस हे नेहमीचंच...पाळी आली कि आमच्या घरात गोठयाच्या बाजूला बारीक छपार हुत तिथं रहायला लागायचं...पिढीजातच ह्ये चालत आल्यालं...चार दिवस त्या खोलीत सासू फक्त जेवण वाढायला यती...त्येबी दारातून ताट फुढं ढकलून मागारी...

रातभर गुरांच्या हागल्या मुतल्याच्या वासानं जीव गुदमरला...त्यात रगात काय थांबना...कवाची कापड पडल्याली वापरली...पण काय फरक नाय...मग राख लावली, माती लावली तरी थांबंना...पोटात राहून राहून दुखायला लागलं...आता जीव जाईल का मग, आसं झालं...डोळ्यात पाणी तरारलं...आयची लय आठवण आली...

आय रात्रभर माझ्याबरुबरं जागायची, मला जवळ घ्याची...हित तशी सोय नाय...नवरा मसं शिकलेला हाय, पण ह्या दिवसात त्यो आसपास बी फिरकत नाय...तुला काय हुतंय ?, नाय त्ये राहीलच..पण साधं खाल्लंस का उपाशी हायस ? हे सुद्धा इचारत नाय..

माझ्याच मनात एक दोनदा पोराचा आन त्येंज्या बापाचं इचार आला. जेवलीत का न्हाय...मी नसल्यावर कसं हुयूल त्येचं कायबी लागलं कि मला हाक असती...

अक्खी रात कुशी आन कापड बदलत काढली...सकाळी रुक्मीला त्यास्नी बोलवायला धाडलं...भीत भीत आलं...म्हणलं, लगीन करताना भ्या नाय वाटलं...तेवढं बाजारला जाऊन त्ये इस्पर घिऊन या...तर ''डोळ'' लाल झालं...आल्या पावली मागारी गेलं...मी आराडले. मला नाय सहन हुतं... पण न्हाय आयकल...बाजारात जायाचं म्हंजी कारण पायजे, पुन्हा दुकानात त्ये मागायची लाज...घरी आणल्यावर कुणी बघलं त्येंजी लाज... ...पाळी म्हंजी चार दिवस उपास एवढंच कळत....त्याच पाळीमुळं पोरं हुत्यात हे कळायला डोस्क हाय व्हय...

देवाला तर दिसायचं सुदा नाय..त्यो बाटतो...कोपतो म्हण... त्याचं भ्या नायच...भ्या मला माणसांचंच वाटत... सासू मला सांगती मी सुद्धा ह्या खोलीत पडून असायची...आग मग तू सहन केलंस आता तरी बदल ह्ये...घर तुझ्या ताब्यात हाय...तुझ्या सुनेला तरी घिव दिकी मोकळा श्वास...बाईला बाई च दुक्खन कळत म्हणत्यात...पण न्हाय... खरतर बाईचं बाईच्या दुःखाला कारणीभूत हाय...आपण जे केलं तेच हींन केलं म्हंजी तिला आपली किंमत कळलं ह्यो कुठला न्याय...

दर महिन्याला आसल चार दिवस येत्यात..अंगावर काटा  यतू...त्या रात्री सुदा पोटातली कळ दाबून तशीच पडून हुते...गुरांच्या हंबरण्याच्या आवाजात माझा आवाज विरघळत हुता...रगात काय थांबत नव्हतं...इचारानी सुद्धा जोर धरला...कवा संपायच ह्ये...सुधारणेच्या नावावर घरात टीव्ही, फ्रीज, टच करायचा मोबाईल आला...सासूला आत्या, नायतर सासूबाई म्हणायचं फॅड गेलं आन ''आई'' म्हणायला लागलो पण ती टीचभर सुद्धा आमची आई झाली नाय...नवरा शिकल्याला केला पण छातीच्या वर त्येंजी नजर गीली नाय...घरातल्या ३२ ईंचं स्मार्ट टीव्हीवर महिला सक्षमीकरण आन हक्क यावर चाल्याली चर्चा...काय त्या बायांची भाषणं...आयकत वायचं डोळा लागला...तेवढीच झोप...एवढ्यात नवरा कधी नव्हे तो खोलीत आला. मला हाताला धरून घरात नेलं... 

समद्यांच्या देखत नवर्यानं मला विस्परच पाकीट काढून दिल...सासू गप्प उभी हुती...मी त्ये पाकीट घेणार तेवढ्यात...कसतरीच झालं...भळाभळ रक्त सांडू लागलं...

समदी गोधडी रक्तानं  माखली आन मला जाग आली...फक्त मलाच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com