संवाद आणि अविश्‍वासही...

अमेरिकेमधल्या प्रवासात मला त्यांच्या ‘हॅलो’ संस्कृतीचं खूपच कौतुक वाटलं. अनोळखी लोक एकमेकांना ‘हॅलो’ म्हणून ‘आपण कसे आहात?’ अशी विचारपूस करतात.
संवाद आणि अविश्‍वासही...
Summary

अमेरिकेमधल्या प्रवासात मला त्यांच्या ‘हॅलो’ संस्कृतीचं खूपच कौतुक वाटलं. अनोळखी लोक एकमेकांना ‘हॅलो’ म्हणून ‘आपण कसे आहात?’ अशी विचारपूस करतात.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

अमेरिकेमधल्या प्रवासात मला त्यांच्या ‘हॅलो’ संस्कृतीचं खूपच कौतुक वाटलं. अनोळखी लोक एकमेकांना ‘हॅलो’ म्हणून ‘आपण कसे आहात?’ अशी विचारपूस करतात. कोणा तरी अनोळखी माणसानं आपल्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता एखाद्याची दखल घेणं, हे मला फार भारी वाटलं. प्रत्येकजण आपली स्वतःची लढाई लढत असतो, त्यात सहजपणे ‘कसा आहेस?’ हे कुणीतरी विचारणं हे खूप महत्त्वाचं आहे. असो, येथील या ‘हॅलो’ संस्कृतीमुळे आपण कोणत्याही व्यक्तीशी सहज संवाद साधू शकतो. या सहजतेचा पुरेपूर फायदा मला अमेरिका यात्रेत झाला. अमेरिकेत शाकाहारी जेवण मिळणं खूप कठीण होतं. खूप वेळेस मला चीज पिझ्झा आणि बर्गर हेच खावं लागे. इथं मांसाहार जास्त चालतो. विशेष करून चिकन, बीफ आणि पोर्क मांस येथील लोक खातात. काही ठिकाणी मला मेक्सिकन पद्धतीचं शाकाहारी जेवण मिळालं.

सॅन फ्रान्सिस्कोमधून सायकलवरून नऊ दिवसांच्या प्रवासानंतर मी ‘ सांता बार्बरा’ या शहरात पोहोचलो. तो अमेरिकेच्या इतिहासातला एक काळा दिवस होता. ६४ वर्षांच्या एका माणसाने लॉस वेगास या शहरातील ‘ मंडेला बे’ या सुंदर इमारतीच्या ३२ व्या मजल्यावरून समोर चाललेल्या संगीत महोत्सवावर स्वयंचलित बंदुकीने एक हजारपेक्षा पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या, यामध्ये ६० लोक मरण पावले व ४११ जण घायाळ झाले होते. ही घटना म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील एखाद्या व्यक्तीने केलेला सर्वाधिक प्राणघातक सामूहिक गोळीबार आहे. या घटनेने मला सुन्न केलं. दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती होती; परंतु ही विचित्र अमानवीय घटना घडल्यामुळे मी ती साजरी नाही केली. २ ऑक्टोबर रोजी मी या घटनेच्या निषेधार्थ चिंतन करण्यासाठी बसलो. सांता बार्बरा इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या प्रवेशद्वारावरील एका बोर्डवर या घटनेचा निषेध आणि चिंतन करण्यासाठी मी ध्यान करत बसलो आहे असं लिहिलं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना या माझ्या सत्याग्रही निषेधात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं. पुढं मी लासवेगास इथं घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

अमेरिकेमध्ये शंभर नागरिकांमागे १२०.५ बंदुका अशा प्रमाणात हत्यारं लोकांकडे उपलब्ध आहेत. २०१८ च्या सर्व्हेनुसार अंदाजे ३९० दशलक्ष बंदुका नागरिकांकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांकडे हत्यारं उपलब्ध असलेला अमेरिका हा एकमेव देश जगामध्ये आहे. जगातील कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सहजासहजी बंदुकीसारखं हत्यार उपलब्ध होत नाही किंवा त्याच्या वापराचा अधिकृत परवाना सहजी मिळत नाही.

भारतामध्ये तर बंदुकीसारखं हत्यार खरेदी करण्यासाठी आणि बाळगण्यासाठी खूप कठोर नियम आहेत. तसं नियमन असणारी फक्त काही राज्यं अपवाद आहेत. अमेरिकेत मॉलमध्ये बंदुका विकल्या जातात, तसंच काही लोक त्या सतत सोबतही बाळगतात. अमेरिकेचा इतिहास हा हिंसक आणि अन्यायी राहिला आहे. आधी येथील मूळ अमेरिकन लोकांना मारण्यात व फसवण्यात आलं, नंतर आफ्रिकेतून लोकांना बंदी बनवून आणून त्यांना गुलाम केलं गेलं. या अशा इतिहासाला पाहून निर्माण झालेला समाज, येथील लोकांमध्ये दुसऱ्याविषयी असलेला कमी विश्वास व या अविश्वासातून जीवनाबद्दलची खूप मोठी भीती इथं आहे. काही कंपन्या या बंदूकविक्रीतून खूप पैसा कमावत असतात. काही लोक सहज उपलब्ध झालेल्या बंदुकीचा वापर आत्महत्येसाठीही करतात.

अमेरिकेतील सायकल यात्रेत मला रात्री झोपण्यासाठी लागणारी जागा मिळवण्यासाठी खूप त्रास झाला. इथं मोकळी आणि बिनाकुंपणाची जमीन दिसणं कठीण आहे. येथील ग्रामीण भागातील प्रवासात मी स्थानिक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करे, तेव्हा जणू काही मी अपराधी आहे, अशा नजरेने ते माझ्याकडे पाहून मला प्रतिसाद देत नसत. मी अमेरिकेत आधी पाच घरी जाऊन टेन्टसाठी जागा देण्याची विनंती करे आणि कोणीतरी मला यासाठी मदत करे; पण इथं ग्रामीण भागात लोक त्यांच्या प्रवेशद्वाराच्या फाटकापासून १००-२०० मीटर दूर राहत, त्या फाटकावरील घंटी मी वाजवीत असे आणि बोलण्याचा प्रयत्न करे; पण लोक माझ्याशी बोलत नसत. इथं खूप साऱ्या अशा जागा होत्या, जिथं ‘खासगी मालमत्ता, इथं येणं वर्ज्य आहे’ असं लिहिलेले फलक होते.

अशा ठिकाणी जाणं म्हणजे मुठीत जीव घेऊन जाण्यासारखं आहे, कारण अमेरिकेतील नियमानुसार खासगी जमिनीचा मालक त्याच्या जमिनीवर अनोळखी वा संशयास्पद कोणी आलं, तर आपल्या रक्षणासाठी त्याला जिवे मारू शकतो; आणि ही गोष्ट कायदेशीर आहे. या नियमाबद्दल मी जाणून होतो आणि त्यामुळे मी कधी कोणाच्या खासगी मालमत्तेवर विनापरवानगी पाय ठेवला नाही. माझा जास्तीत जास्त वेळ मी रस्त्यावर व्यतीत केला. या राहण्याच्या अडचणीवर मला लवकरात लवकर तोडगा काढणं क्रमप्राप्त होतं, कारण लवकरच पुढे थंडीही सुरू होणार होती. लॉस वेगासमध्ये मी आजारी पडलो. मला एक आठवडा एकाच ठिकाणी राहावं लागलं. माझे मित्र भावेन शाह, ज्यांची भेट सॅन फ्रान्सिस्को इथं झाली होती, त्यांनी माझी राहण्याची सोय एका होस्टेलमध्ये केली आणि पुढे न्यूयॉर्कमध्ये मी बसने प्रवास केला. या प्रवासासाठी मला तीन दिवस लागले. पश्चिम ते पूर्व, प्रशांत महासागर ते अटलांटिक महासागर असा चार हजार किलोमीटरचा प्रवास खूप रोमांचकारी होता. यात खूप सारी ओसाड गावं आणि हजारो एकरची सलग शेती मी पाहिली.

मी न्यूयॉर्क इथं पोहोचलो. इथून मी दक्षिणेस असलेल्या मेक्सिकोकडे सायकलने प्रवास करणार होतो. न्यूयॉर्कमध्ये ‘शांती फंड’ ही संस्था गांधीविचारांचा प्रसार करण्यासाठी काम करते. अरविंद व्होरा आणि बकुळ नूतन यांनी माझं शहरात स्वागत केलं. संयुक्त राष्ट्र संस्थेला मी भेट दिली. तसंच, शहरात तीन ठिकाणी माझं व्याख्यान झालं. बकुळभाई यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांनी पुढं मला खूप मार्गदर्शन केलं. गांधीविचारांवर काम करणारे माझे जर्मन मार्गदर्शक पीटर रुहे यांच्याशी दुसऱ्यांदा माझी भेट इथं झाली. त्यांनी पुढील यात्रेसाठी मला आर्थिक मदत केली, ज्याचा वापर मी अन्नासाठी आणि इतर खर्चासाठी करू लागलो. न्यूयॉर्कमध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, त्यात ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’चं स्मारक, ज्याच्यावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं होतं. पुढच्या भागात अमेरिकेमधले आणखी काही अऩुभव सांगेन.

(सदराचे लेखक महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक असून जगभर भ्रमंती करणारे आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com