नाविक तळाला विरोध

जपानच्या प्रवासाने माझ्या विचारांना खूप चांगली गती दिली आणि नवीन शक्यता दाखवल्या. पुढं मी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाकडं निघालो.
नाविक तळाला विरोध
Summary

जपानच्या प्रवासाने माझ्या विचारांना खूप चांगली गती दिली आणि नवीन शक्यता दाखवल्या. पुढं मी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाकडं निघालो.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

जपानच्या प्रवासाने माझ्या विचारांना खूप चांगली गती दिली आणि नवीन शक्यता दाखवल्या. पुढं मी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाकडं निघालो. माझ्या पाच वर्षांच्या यात्रेतील सर्वांत महत्त्वाची घटना ही जेजू बेटावर घडली. जेजू बेट दक्षिण कोरियाच्या दक्षिणेस आहे. सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी जेजू बेटाची निर्मिती ज्वालामुखीच्या क्रियेतून झाली आहे. इथं सुंदर काळे दगड सर्वत्र पाहावयास मिळतात. त्यांचा वापर घरं आणि संरक्षक भिंती बांधण्यासाठी इथं केला जातो. या दगडांपासून बांधलेल्या घरांना पाहून मी मोहातच पडलो. या बेटाच्या मधोमध दक्षिण कोरियाचा सर्वांत मोठा डोंगर दिसतो आणि तो डोंगर म्हणजेच ज्वालामुखीचा केंद्रबिंदू आहे. ज्वालामुखी थांबल्यानंतर हजारो वर्षांनंतर इथं झाडं, पशू आणि पक्षी यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं. या काळ्या दगडांत जीवनाचं अस्तित्व निर्माण करणारी घटना किती सुंदर असेल, या विचारात मी रमलो. या नैसर्गिक गोष्टीला खूप मोठा लढा लढावा लागला असेल. येथील जैवविविधता खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.

सध्या आपली मानव जात फक्त ५ हजार वर्षांच्या इतिहासात किंवा काही ठिकाणी अगदी ३००-५०० वर्षांच्या इतिहासावरच ऊहापोह करण्यातच गुंग आहे. या जगाच्या उत्पत्तीपासूनच्या लाखो वर्षांच्या काळाला महत्त्व दिलं जात नाही. आपण आपल्या आजूबाजूला जात, धर्म, वर्ण आणि काही अस्मिता यांची डबकी बांधून त्याच डबक्यांत उड्या मारतो आहोत; परंतु जर बारीक विचार केला तर लक्षात येईल की, स्वतःचा शोध हा फक्त ५ हजार वर्षांच्या इतिहासात सापडणं अशक्य आहे.

विश्वाच्या उत्पत्तीपासूनचा विचार, त्या घटनाक्रमांचा शोध याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या विश्वाच्या सुरुवातीला आपण सर्व एक होतो आणि जर आपण तेथून सुरुवात केली, तर आपली ओळख ही खूप मोठी बनेल व विश्वच आपलं घर बनेल. असो, तर मी अशा एका बेटावर होतो, जिथं हिवाळा मध्यम पावसाने थंड असतो, तर उन्हाळा उष्ण आणि दमट आणि खूप जास्त पाऊसही असतो. जेजू बेट हे दक्षिण कोरियाचं हवाई बेट आहे, खूप लोक पर्यटनासाठी येतात, कारण इथं खूपच सुंदर समुद्रकिनारे, निसर्ग आणि अन्न मिळतं. येथील खडकाळ जमिनीमुळे इथं खूप थोड्या प्रमाणात शेती केली जाते. मासेमारी आणि समुद्री अन्न गोळा करणं हाच येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. मी तेथील एका बाजारात गेलो होतो, तेव्हा खूप सारे समुद्री मासे आणि सोबत काही समुद्री जीव, जे मी पहिल्यांदा पहिले. येथील महिला या खोल समुद्राच्या पाण्यात जाऊन अन्न गोळा करतात आणि आपलं कुटुंब सांभाळतात. त्याच इथं कुटुंबाच्या कर्ताधर्ता असतात, त्यामुळे जेजू बेटावर मातृसत्ताक कुटुंब रचना आहे.

खूप साऱ्या मिथक गोष्टी इथं पाहायला मिळतात. जसं की जेजू बेटाच्या ज्वालामुखीच्या डोंगरात देवता आणि त्याचे दूत राहतात असं काही लोक मानतात. वयस्कर माणसांचे दगडाचे पुतळे येथील लोकांच्या घरांसमोर पाहावयास मिळतात, यामागे हे पुतळे राक्षसांपासून आपल्या घराचं संरक्षण करतात, असा समज इथल्या लोकांमध्ये आहे. या अशा पुतळ्यांना ‘डोल हरेउबांग’ असं संबोधलं जातं.

माझं जेजू बेटावर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे, तिथं चाललेला अहिंसक सत्याग्रह. दक्षिण कोरियाच्या सैन्याने इथं एक मोठा नाविक तळ उभा केला आहे, यामुळे येथील समुद्री जीव आणि नैसर्गिक खूप मोठी हानी होते आहे. या तळाविरोधात येथील लोक सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. भारतीयांना जेजू बेटावर जाण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. इथं भारतीय ३० दिवस व्हिसाशिवाय जाऊन राहू शकतात; परंतु इथं येण्यापूर्वी आपल्याकडे परतीचं तिकीट असणं आवश्यक आहे. विनातिकीट आपल्याला इथं प्रवेश दिला जात नाही. इथं येण्यासाठी जरी व्हिसाची आवश्यकता नसली, तरी दक्षिण कोरियाच्या मूळ क्षेत्रात जाण्यासाठी मात्र आपल्याला व्हिसाची आवश्यकता आहे.

(क्रमश:)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com