बटाट्यांचा देश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peru Country

पेरू या देशात सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी बटाट्याची लागवड अँडी पर्वतावर सुरू झाली. इथलं हे मूळ पीक आजही आहे.

बटाट्यांचा देश

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

इक्वेडोर आणि पेरू देशाला जोडणाऱ्या सीमारेषेवर मी पोहोचलो त्या वेळी अंधार होता आणि मी टॉर्चच्या प्रकाशात पुढे जात होतो. इक्वेडोर आणि पेरू यांच्या इमिग्रेशन कार्यालयात खूप व्हेनेझुएलियन नागरिक दिसत होते आणि ते दक्षिणेस चालले होते. मी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील माझ्या यात्रेच्या शेवटच्या देशात म्हणजे पेरूमध्ये रात्री १० वाजता प्रवेश केला. या देशातील प्रवेशासाठी मला व्हिसा घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण माझ्याकडे अमेरिकेचा दहा वर्षांसाठीचा व्हिसा होता, यामुळे माझा खूप वेळ वाचला. पेरू हे देशाचं नाव जेव्हा समोर यायचं, तेव्हा आपलं आवडतं फळ ‘पेरू’ माझ्या नजरेसमोर यायचं. प्रत्यक्षात आपल्या पेरू फळाचा आणि या पेरू देशाचा काहीएक संबंध नाही.

पेरू या देशात सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी बटाट्याची लागवड अँडी पर्वतावर सुरू झाली. इथलं हे मूळ पीक आजही आहे. हे बटाट्याचं पीक पुढे स्पॅनिश साम्राज्याने युरोपमध्ये आणलं आणि आता बटाटा व बटाट्याचे विविध प्रकार, खाण्याच्या विविध रेसिपीज जगभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या महाराष्ट्राची शान असलेला, आपला सर्वांचा लोकप्रिय पदार्थ म्हणजेच आपला वडापाव बटाट्यविना कसा असता याचा थोडा विचार करा.

पेरू देशाने बटाटा या पिकाच्या माध्यमातून जगभरात नकळत संबंध प्रस्थापित केला. पेरू या देशात चार हजारपेक्षा जास्त बटाट्याचे प्रकार पाहावयास मिळतात. त्यातील बरेच प्रकार मला माझ्या डोळ्यांनी पाहता आले. नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हा देश मला आजवरच्या प्रवासात सर्वांत जास्त भावला. पेरू हा देश संपत असताना, माझ्या यात्रेचं प्रेरणास्थान महात्मा गांधीजी यांची दीडशेवी जयंती आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेने दक्षिण आफ्रिका या देशाला शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे साउथ आफ्रिकेचे पहिले राष्ट्रप्रमुख आणि मानाचा शांती नोबेल पुरस्कारप्राप्त नेल्सन मंडेला यांची शंभरावी जयंती काही महिन्यांमध्ये येणार होती. माझा पुढचा प्रवास हा साउथ आफ्रिका या देशात असणार होता. या दोन महान व्यक्तींनी केलेलं शांतीसाठीचं काम हे जगासाठी दिशादर्शक आहे, म्हणून या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यासाठी दक्षिण आफ्रिका या देशात जाऊन पदयात्रा करायचं ठरवलं. यासाठी मी पुण्यातील माझे मित्र आणि सहकारी विश्वामित्र योगेश भाई, माझ्या गावचा म्हणजे राशीनचा माझा वर्गमित्र आणि या विश्वयात्रेचा महत्त्वाचा शिलेदार व सहकारी मित्र डॉ. ऋषिकेश आंधळकर आणि अतुल नंदा, जपानचे भन्ते कानशीण ईकेदा शोनीन यांना दक्षिण आफ्रिकेत पदयात्रा करण्याचं निमंत्रण दिलं आणि या यात्रेची तयारी पेरू या देशातूनच सुरू केली.

पेरू आणि आपला देश एकमेकांपासून सुमारे सतरा हजार किलोमीटर दूर आहेत. इथून भारतात जाणं खूप खर्चिक आणि वेळखाऊ होतं. देशाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे आणि त्याच्या किनारी ४० टक्के लोकवस्ती आहे. अशा भागातून मी प्रवास केला, जो की वाळवंटी भाग होता. इथली घरं ही मातीच्या विटांपासून बनवलेली आणि बिनाप्लास्टर किंवा रंगाची होती. अशी घरं यानंतर मी पाकिस्तानमध्ये खूप पाहिली. घरांची छपरंही मातीपासून बनवलेली आणि त्यांना उतार नव्हता. अशी रचना पाहून मी जरासा गोंधळलो, कारण मातीच्या घराची छपरं ही उतार असलेली पाहायची मला सवय होती; परंतु मला नंतर समजलं की, या भागात पाऊस पडत नाही आणि हे वाळवंट म्हणजे जगातील सर्वांत कोरडं वाळवंट आहे.

इथं तापमान खूप जास्त नसतं, कारण बाजूला असलेल्या प्रशांत महासागराचं थंड पाणी वातावरणातील गरमी थंड करतं. याच्या पश्चिम दिशेला वाळवंटाला लागून अँडी पर्वतांची रांग आहे आणि या अँडी पर्वतावर ३६ टक्के पेरू लोकवस्ती वास्तव्य करते. त्यालाच लागून अमेझॉनचं जंगल, जे जंगल पेरूचा ६० टक्के भाग व्यापतं, या भागात १२ टक्के लोकवस्ती वास्तव्य करते. यातील काही भागात अजून रोड नाहीत आणि खूप साऱ्या जमाती इथं आहेत. पेरू देशाचे तीन भाग पडतात - वाळवंट, अँडी पर्वतरांगा आणि अमेझॉन. मी सायकलने दक्षिणेकडे असलेल्या लिमा शहराकडे निघालो; पण मधे एक यात्रा अँडी पर्वतांवरही करून आलो. अँडी पर्वत या भागात केचवा आणि आयमारा हे दोन महत्त्वाचे मूळ निवासी राहतात आणि त्यांची भाषा केचवा आणि आयमार ही आहे.

पेरू देशाच्या प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक संस्कृतींचं निवासस्थान होतं. कॅरल-सुपे सभ्यता, नाझका संस्कृती, नेव्हियान संस्कृती, वारी आणि तिवानाकू साम्राज्यं, कुस्कोचं राज्य आणि इंका साम्राज्य. स्पॅनिश साम्राज्य १५२६ मध्ये पेरूमध्ये स्थापित झालं. येथील सर्वांत मोठं इंका साम्राज्य होतं. इंका साम्राज्य जिथं चाकाचा वापर न करता; पाळीव प्राणी, लोखंड किंवा स्टीलचं ज्ञान किंवा अगदी लेखनप्रणाली विकसित नसताना यांनी भरमसाट क्षेत्रावर आणि साधारण एक कोटी लोकांवर राज्य केलं. चाळीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते त्यांनी निर्माण केले. इंकानिर्मित माचू पिच्चू हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे, जिथं जगभरातील लोक भेट देतात. या अँडी पर्वतांवर अजूनही मला या इंका संस्कृतीची बीजं दिसली. डोंगर भाग असल्यामुळे इथं ट्रॅक्टर चालवणं कठीण आहे. मी एका शेतात गेलो होतो, सर्व कुटुंबीय गाढवाच्या मदतीने गव्हाची मळणी करत होते.

जेव्हा मी एका पर्वतावर ३ दिवस चालण्यासाठी गेलो, तिथं मानवी वस्ती नव्हती. २-३ घरं काही ठिकाणी दिसली. या ठिकाणी गवत खूप टोकदार असतं, जेणेकरून प्राण्यांनी ते खाऊ नये. एकसुद्धा झाड मला इथे आढळलं नाही. बाजूला थोड्या उंचीवर हिमनग दिसत होते. हिवाळा नसल्यामुळे इथं बर्फ नव्हता. तीन दिवसांत मला ४-५ मेंढपाळ दिसले आणि एक कुटुंब, ज्यात नवरा, बायको आणि दोन लहान मुलं. त्यांच्याकडे शेकडो मेंढ्या होत्या. त्या कुटुंबाचं अर्थकारण खूप सोपं होतं. ते महिन्यातून एकदा शहरात जाताना आपल्या दोन -तीन मेंढ्या घेऊन जात आणि त्या विकून तेल, मीठ आणि भात घेऊन येत. त्यांनी मला सांगितलं की, ‘ते एका मेंढीचं मांस १५ दिवस खात. काही बटाट्यांची लागवडसुद्धा आम्ही करतो. अशा कठीण ठिकाणी भाजीपाला लागवड शक्य नाही, त्यामुळे प्राण्यांचं मांस हा एकच पर्याय अन्न म्हणून त्यांच्यासाठी उपलब्ध आहे.’ त्या काळ्या रात्री मी जेव्हा आकाशाकडे पहिलं, तेव्हा मी स्तब्ध झालो. मी जीवनात पहिल्यांदा मिल्की वे, आकाशगंगा पहिली. मला वाटलं, जसं करोडो लिटर दूध हे शेतकऱ्यांनी ते रंगबिरंगी तारे झाकण्यासाठी आकाशात फेकलं आहे.

हे दृश्य माझ्यासाठी अद्‍भुत होतं, हा अनुभव खूप प्रसन्न करणारा होता. हे नयनरम्य दृश्य पाहून माझी झोपच उडाली. मला वाटलं की, आज रात्रभर एकटक आकाशात पाहत राहावं. ही आकाशगंगा दिवस-रात्र अशीच चमकते; पण आपण योग्य वेळी आणि योग्य जागी नसल्यामुळे आपल्याला ती दिसत नाही. योग्य जागेवरून ती खूप स्पष्ट दिसते आणि आपल्याला जीवनाच्या अर्थावर खूप सारे प्रश्न करायला भाग पाडते. दुसऱ्या दिवशी मी पुढे जात असताना माझ्यासाठी एक क्षण असा आला की, त्या क्षणाला मला शब्दांत मांडणं कठीण आहे, त्या क्षणात असीमित स्वातंत्र्य होतं, एक वेगळी ऊर्जा जाणवत होती आणि याच सोबत मी अनुभवलेल्या सत्यामुळे मानव समाजापासून तुटेल अशी भीती वाटली आणि या माझ्या नव्या सत्याला बाजूला ठेवलं; परंतु त्या क्षणाने मला एक नक्की जाणीव करून दिली की, या मानवी मेंदूची शक्ती अपार म्हणा किंवा अपरंपार आहे.

सायकल यात्रा लिमा शहराकडे वळवली आणि वाटेत लोकांकडे माझ्या जगण्याच्या अतिशय कमी गरजांच्या पूर्ततेसाठी विनंती करून राहिलो. पेरू देशामधील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. लिमामध्ये जेव्हा मी पोहोचलो, तेव्हा ती माझी तेथील शेवटचीच सायकल यात्रा होती. मी लिमामध्ये असलेल्या हिंदू मंदिरांत राहिलो आणि तेथील भारतीय लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि भरभरून मदत केली. इथं खूप भारतीय लोक आपला व्यवसाय करतात. त्यांत सोन्याच्या खाणी, भारतीय औषधविक्री आणि इतर महत्त्वाच्या व्यवसायांचा समावेश आहे. जय पटेल आणि अजय मावनुरी हे माझे खूप चांगले मित्र या शहरात झाले. जय पटेल इथं दोन भारतीय उपाहारगृह चालवतात. त्यांनी एका पेरूव्हियन महिलेशी लग्न केलं आहे. भारतीय दूतावासाने मला या सर्व स्थानिक लोकांना जोडण्यासाठी खूप मदत केली आणि त्यामुळे मी महात्मा गांधीजींचे विचार तेथील खूप साऱ्या शाळा-कॉलेजमध्ये पोहोचवू शकलो.

दक्षिण आफ्रिकेच्या पदयात्रेची मोठी पूर्वतयारी झाली, पण मोठा प्रश्न होता की दक्षिण आफ्रिकेला जायला विमान प्रवास करावा लागणार होता आणि विमान प्रवासासाठी ८०-९० हजार रुपये लागणार होते आणि मी फकीर प्रवासी, माझ्याकडे काहीही पैसे नव्हते. मी भारतातून सहा लोकांना आमंत्रण दिलं. मी या सगळ्यांपासून इकडे हजारो कोस दूर होतो; पण माझ्या मनात विश्वास आणि मानवकल्याणाचा भाव होता. मी माझ्या दक्षिण आफ्रिका प्रवासासाठीच्या पैशांची तजवीज कशी करावी याचा विचार करत होतो. त्यात एके दिवशी माझे मित्र रोहितदादा यांनी मला घरी जेवणासाठी बोलावलं. तिथं आमच्या जेवणाच्या मैफलीत आनंद दादा, साजिंदरदादा, प्रकाशदादा हेही सामील झाले होते. मी माझे विचार आणि यात्रेविषयी कथन केलं आणि शेवटी त्यांनी मला विचारलं की, ‘आम्ही तुला काय मदत करू शकतो?’ मी त्यांना दक्षिण आफ्रिकेसाठी विमान तिकिटासंदर्भात सांगितलं आणि त्यांनी मला तिकीट काढून दिलं. ही पाच वर्षांची यात्रा ही एक नवं मानवविश्व दाखवणारी आणि मानवतावाद दाखवणारी होती. जसं पावसाचं पाणी सहजतेने आपली वाट काढीत जातं, तशी ही सुलभ यात्रा होती. दक्षिण आफ्रिकेचा व्हिसा मिळवायला मला वेळ लागला आणि शेवटी मी विमानाने आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका या देशाकडे प्रस्थान केलं.

(सदराचे लेखक सायकलने जगभर भ्रमंती करतात व महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)