सोनेरी स्वप्नं : सोशल संन्यासाचा धनी

घरासमोर चिनी गुलाबाची सोळा रोपं आहेत. काल त्या झाडांना चाळीस फुलं आली होती.
Dream
DreamSakal
Summary

घरासमोर चिनी गुलाबाची सोळा रोपं आहेत. काल त्या झाडांना चाळीस फुलं आली होती.

घरासमोर चिनी गुलाबाची सोळा रोपं आहेत. काल त्या झाडांना चाळीस फुलं आली होती. आज बावन्न फुलं आलीत. घराच्या उजव्या बाजूला काळी माती आहे आणि डाव्या बाजूला लाल. काल दुपारी घराजवळ येणारे पक्षी मोजले. तब्बल तेवीस प्रकारचे पक्षी घराभोवती येऊन बसतात, घरासमोरच्या पपईच्या झाडाला अठरा पपया लगडल्यात.

परवा संध्याकाळी टेरेसवर गेलो होतो. शांतपणे अवतीभोवती न्याहाळलं. खरं सांगू, इथं भरपूर ऑक्सिजन आहे आणि हे मला त्या दिवशी जाणवलं. टेरेसवरून लांबलांबपर्यंतचे एकूण पासष्ट बंगले दिसतात. कधी नव्हे ते त्या रात्री शांत झोप लागली. मध्यरात्री जाग आली. मोबाईल शेजारीच होता, पण त्याला हात न लावता खिडकीजवळ जाऊन थांबलो. रातकिड्यांच्या किर्रर्र आवाजात आणि बेडकांच्या डराव डराव आवाजात रात्र रमली होती. सकाळी जाग आली. मोबाईल निर्जीव झाल्यासारखा पडला होता. मोबाईलमध्ये वेळ बघितली आणि झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात केली. घर झाडताना बघितलं, आईच्या बेडरूमच्या खिडकीबाहेर चिमणीने घरटं केलंय आणि त्यात तीन अंडी आहेत. घराच्या मागच्या बाजूने गणेशवेल वाढलाय. लालचुटूक फुलांनी वेल बहरलाय. घरासमोर पाणी मारताना दिसलं, महिनाभरापूर्वी आंबा खाऊन फेकेलेल्या कोयीला कोंब फुटला होता आणि तुळशीच्या डेरेदार रोपाखाली चिमुकल्या तुळशी उमलल्या होत्या. पहाटेच्या वेळी आभाळातले रंग कमालीचे सुंदर दिसतात. फोटो काढावा वाटला. पण, मोबाईल घरात होता. खिशात नव्हता. आभाळातले रंग डोळ्यांत साठवले आणि घरात निघालो. घर एकदम मंदिरासारखं शांत वाटलं. घरात सगळीकडे बघितलं. अनेक कोपरे नवीन वाटत होते.

घराच्या भिंतीही अनोळखी भासत होत्या. प्रत्येक भिंतीजवळ जाऊन भिंतींना हळुवार स्पर्श केला. बापाच्या गालाला हात लावल्यासारखं फिल झालं. तिथूनच नजर टेबलावरच्या मोबाईलवर गेली. मोबाईल निर्जीव झाल्यासारखा पडला होता. भिंत सजीव वाटत होती. प्रत्येक भिंत प्रेमाने हसतीये असं वाटू लागलं. दारं-खिडक्याही आनंदाने माझ्याकडं बघताहेत असं वाटत होतं. लहानपणी मला असंच वाटायचं. घर जिवंत आहे असं वाटायचं. घर माझी काळजी घेतंय असं वाटायचं. एक वर्ष झालं या नव्या घरात राहायला आलो. पण, तसं काही वाटत नव्हतं. पण, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतंय. घरासमोरची रोपं, झाडं, पक्षी, माती, भिंती, दारं-खिडक्या सगळे जिवंत आणि बालपणीच्या सवंगड्यांसारखे वाटताहेत. कारण फक्त मी मोबाईल लांब ठेवला; अन् तोही सहजासहजी लांब जात नव्हता. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, मेसेंजर... सर्व काही डिलीट करून सोशल संन्यास घेतला. आता सगळं काही सजीव वाटतंय. अगदी लहानपण जगल्यासारखं वाटतयं. तुम्हालाही वाटेल. काही दिवस सोशल संन्यासाचे धनी होऊन तर बघा. जगात तुमच्यासारखा सुखी कोणी नसेल....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com