सोनेरी स्वप्नं : सोन्याच्या पार्किंगची जेजुरी

‘काय ? पार्किंगचे शंभर रुपये? अहो, तेवढ्या पैशात पोटभर जेवण होईल की आमचं..’
Jejuri
JejuriSakal
Summary

‘काय ? पार्किंगचे शंभर रुपये? अहो, तेवढ्या पैशात पोटभर जेवण होईल की आमचं..’

‘काय ? पार्किंगचे शंभर रुपये? अहो, तेवढ्या पैशात पोटभर जेवण होईल की आमचं..’

असं म्हणत हवालदील चेहऱ्यानं जोडीदार त्या पार्किंगवाल्याकडं बघत होता.

महाशिवरात्रीला जेजुरीतल्या दोन गुप्तमंदिराचं दर्शन घेता येतं म्हणून मी आणि माझा मित्र मोठ्या भक्तीभावानं जेजुरीला पोहचलो. रस्त्यावर गाडी लावून उगीच ट्रॅफिक जाम नको व्हायला, म्हणून आम्ही एका खासगी पार्किंगमध्ये गाडी नेली. पण, पावतीचा आकडा ऐकून माझ्या डोक्यातली भक्ती थरथरच कापू लागली. जोडीदार म्हणाला, ‘अहो. दादा गरीब घरातले खंडोबाभक्तहे आम्ही. फोरव्हीलर आणली म्हणून आम्हाला श्रीमंत नका समजू. वीस तीस रुपये ठिकाय. एकदम शंभर रुपये?’

तसा आम्हाला वरुन खालून न्याहाळत पार्किंगवाला म्हणाला, ‘कुठून आलाय तुम्ही?’

पावतीचे पैशे कमी होणार या आशेने जोडीदार म्हणाला, ‘पुण्यातून आलोय. दोघांनी पाचशे पाचशेचं पेट्रोल टाकलय गाडीत. इथं जेवायला पैशे जात्यान म्हणून घरुनच जेवणाचा डबाबी आणलाय. इथले बारभाई आमच्या ओळखीचे आहेत.’

तसा पार्किंगवाला कोरड्या चेहऱ्यानं म्हणाला, ‘मग बारभाईंच्या दारात लावा गाडी. अन् त्यांच्याकडंच जेवण करा. इथं शंभर रुपयेच द्यावा लागत्यान.’

‘आवं पण शंभर रुपये द्यायला आमची गाडी काय सोन्याचीहे का? हे घ्या वीस रुपये,’ जोडीदाराच्या या वाक्यावर पार्किंगवाला वैतागला अन् म्हणाला, ‘ये बाबा, तुझी गाडी नसेल सोन्याची. पण, आमची जेजुरी सोन्याचीहे. जमत असेल तर शंभर रुपये दे, नायतर गाडी काढ बाहेर.’

गाडी बाहेर काढून उपयोग नव्हता. बाहेर अफाट गर्दी होती. अशा गर्दीत बारभाईंच्या दारासमोर गाडी लावून त्यांची नाराजी ओढवण्यातही अर्थ नव्हता. फाडली शंभर रुपयांची पावती अन् निघालो मंदिरात.

आसमंतात उधळला जाणारा भंडारा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा भक्तीभाव पाहून मन प्रसन्न होत होतं. पण, राहून राहून पार्किंगवाल्याला शंभर रुपये दिल्याचं वाईटही वाटत होतं. जोडीदाराची परिस्थिती खरोखरच गरीब होती. अशावेळी त्यानं पार्किंगला शंभर रुपये दिले, याची काळजाला सल लागत होती. परत कधी जेजुरीला आलो तर याच्याकडून पेट्रोलला पैशेच नाही घ्यायचे, असा मैत्रीपूर्ण प्रेमानं भारलेला विचार डोक्यात येत असतानाच मित्रानं खंडोबासमोर पाचशेच्या दोन नोटा ठेवल्या. ते पाहून त्याची काळजी आणि त्याच्यावरच्या प्रेमाचा जेजुरीच्या गडावरुनच मी कडेलोट करून टाकला. मगाशी शंभर रुपये देताना रडकुंडीला आलेला त्याचा चेहरा आणि आता भक्तीरसात चिंब भिजलेला चेहरा पाहताना मोठं नवल वाटत होतं.

पार्किंगवाल्यासमोर हा गरीब आणि देवासमोर श्रीमंत झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com