ध्वज पदकांचा उंच धरा रे...

आशियायी क्रीडा स्पर्धेत हिरमोड होण्याचे कारण म्हणजे, चीन, जपान आणि कोरियन खेळाडूंचे प्राबल्य.
odi asian games neeraj chopra pv sindhu Aditi-Prathmesh sports
odi asian games neeraj chopra pv sindhu Aditi-Prathmesh sportsSakal

एकीकडे देशात एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे वातावरण तयार झालेले असताना क्रिकेटेतर खेळांचा आणि क्रीडाक्षेत्राचा व्यापक विचार करता, अधिक प्रतिष्ठेच्या आशियायी क्रीडा स्पर्धेचा नारळ शनिवारीच वाढवला गेला (अर्थात फुटबॉल आणि व्हॉलिबॉलचे सामने आधीच सुरू झाले आहेत). हांग् चौऊ येथील ही स्पर्धा म्हणजे आशियायी ऑलिंपिकच!

या काळात गुणवत्ता, मेहनत, प्रतिष्ठा सर्वकाही पणास लागते ती देशासाठी. स्पर्धेच्या कालावधीत प्रत्येक दिवशी आज किती पदके मिळाली याच्याकडेही लक्ष असते आणि सरतेशेवटी सर्व देशांत आपल्याला कितवा क्रमांक मिळाला याचीही उत्सुकता असते.

तेव्हा निश्चितच एकीकडे आशावाद असतो तर दुसरीकडे तुलनात्मक आढावा घेत असता वास्तव हिरमोड करत असते. १९५१ मध्ये आपल्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीत आशियायी क्रीडा स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी सहभागी देश होते ११ आणि एकूण पदकांच्या शर्यतीत आपला क्रमांक होता दुसरा. आता २०२३ मध्ये सहभागी देशांची संख्या आहे ४१. यात गेल्या काही वर्षांच्या कामगिरीचा अंदाज घेता पहिल्या पाच ते सात या क्रमांकांत आपले स्थान राहीलही. परंतु, यामध्ये पदके किती मिळतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.

संस्कृती रुजणे महत्त्वाचे

गेल्या काही वर्षांपासून देशात खेळाकडे पाहण्याचा सामान्य जनतेचा आणि राज्यकर्त्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. खेळ आणि खेळाडूंसाठी सुविधा, पैसा आणि प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ऑलिंपिक असो वा इतर सर्व खेळांच्या जागतिक किंवा विश्व अजिंक्यपद स्पर्धा असो. यात सकारात्मक असे काहीतरी घडत असते.

पण खेळाचे हे असे क्षेत्र आहे जेथे रातोरात कोणी स्टार-सुपरस्टार होत नाही. त्यासाठी अखंड-अविरत मेहनत घ्यावी लागते. देशाचा विचार केला असता, संबंधित देशात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी लागते. शाळेत केवळ ‘पीटी’ची तासिका ठेऊन खेळाडू घडत नाहीत.

तर त्यासाठी विद्यापीठे तयार करावी लागतात. म्हटलं तर काय यामध्ये केवळ सुवर्ण मुलामा असलेले पदक असते. पण असे पदक मिळते तेव्हा तुम्ही आशियात किंवा जगात ‘नंबर वन’ होत असता आणि पर्यायाने तुमचा देशही एका उंचीवर जात असतो.

चीनने प्रस्थापित केला हक्क

हांग् चौऊ येथे सुरू झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे भवितव्य काय असेल याचा आढावा घेण्यापूर्वी आपण सध्या कोठे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. १९५१ पासून सुरू झालेल्या आशियायी क्रीडा कुंभमेळ्याची ही १९ वी स्पर्धा आहे.

गेल्या १८ स्पर्धांत मिळून भारताला १५५ सुवर्ण, २०१ रौप्य आणि ३१६ कांस्य अशी एकूण ६७२ पदके मिळालेली आहेत. अव्वल स्थानावर असलेल्या चीनने १४७३ सुवर्ण, ९९४ रौप्य, ७२० कांस्य अशा एकूण ३१८७ पदकांवर आपला हक्क दाखवला आहे. चीन पहिल्या पाच स्पर्धांत सहभागी झाला नव्हता. मात्र, त्यानंतर मैदानात उतरूनही त्यांनी एवढी प्रगती केली हे विशेष!

‘तो’ सन्मान अत्युच्च

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या तीन पदकांच्या टक्केवारीचा विचार करता, भारताला रौप्य आणि कांस्य पदकांपेक्षा सुवर्णपदकांची टक्केवारी कमी आहे. तर चीनचे प्रमाण नेमके उलटे आहे. ज्यावेळी सुवर्णपदके अधिक मिळवली जातात तेव्हा तुमचा खेळाडू किंवा संघ चॅम्पियन होत असतो. म्हणूनच पदक तक्त्यात कितवा क्रमांक यापेक्षा चॅम्पियन किती यावर प्रतिष्ठा ठरत असते. तसेच दुसऱ्या अर्थाने सांगायचे तर सुवर्णपदक विजेत्यांचेच राष्ट्रगीत पदकग्रहण सोहळ्यात वाजते. तो सन्मान अत्युच्च असतो.

असो, आता हांग् चौऊ येथील स्पर्धेचा आढावा घेऊया...भारताचे ६३४ पेक्षा अधिक खेळाडू ३८ विविध खेळांत सहभागी झाले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात खेळाडूंचे हे पथक सर्वांत मोठे आहे. त्यामुळे या वेळी पदकांची अधिक अपेक्षा करायला हरकत नाही.

खेळाडूंनी तशी मेहनतही घेतली आहे. तसेच त्यांना सरावातही कोठे कमी पडू दिलेले नाही. पण अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांत आपला प्रतिस्पर्धी किती तयारीचा आहे हे सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. यातील एकूण पदकांची संख्या पाहता ती चढत्या क्रमाने आहे. पण सुवर्णपदकांची संख्या जेवढी वाढायला हवी तेवढी वाढत नाही. येथेच आपली पीछेहाट होते.

गतवेळच्या एकूण ७० पदकांमध्ये या वेळी वाढ अपेक्षित आहे; पण ती शंभरी गाठणार का? हा खरा शंभरनंबरी प्रश्न आहे. ऑलिंपिक तर दूर राहिलं आशियायी क्रीडा स्पर्धेतही अपेक्षित यश मिळत नाही. तथापि, हेच आपले खेळाडू राष्ट्रकुल किंवा दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांत पदकांची लयलूट करतात.

थोडी खुशी, थोडा गम

आशियायी क्रीडा स्पर्धेत हिरमोड होण्याचे कारण म्हणजे, चीन, जपान आणि कोरियन खेळाडूंचे प्राबल्य. हेच तिन्ही देश भूतलावरील सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धेत अर्थात ऑलिंपिकमध्येही आपली मक्तेदारी दाखवतात.

बरं केवळ ठरावीक खेळांत या तीन देशांचे खेळाडू बलाढ्य असतात असे नाही. अॅथलेटिक्सपासून कुस्तीपर्यंत आणि नेमबाजीपासून बॅडमिंटन, तिरंदाजीपर्यंत सर्व खेळांत या देशांचे कोणी ना कोणी निष्णात खेळाडू असतातच. आता हेच पाहा ना...भारतीय फुटबॉलमध्ये मोठी क्रांती होत आहे.

आशादायी म्हणावे असे हे चित्र आहे. पुढील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या देशांची संख्या ४८ पर्यंत असणार आहे. त्यात कदाचित आपला नंबर लागू शकतो अशी अंधूक आणि पुसट शक्यता आहे. पण या आशियायी क्रीडा स्पर्धेतील सलामीत चीनने भारताचा ५-१ असा दारुण पराभव केला आहे.

सांघिक असो वा वैयक्तिक थोड्याफार फरकाने असे प्रत्येक खेळात घडत असते. आणखी एक उदाहरण बोलके आहे. आशियायी क्रीडा स्पर्धा म्हटली की कबड्डीची दोन (पुरुष, महिला) सुवर्णपदके निश्चितच समजली जायची. एवढी आपली मक्तेदारी. पण गतवेळच्या स्पर्धेत इराणने आपल्याला शह दिला होता. यामध्ये आपण कमी पडलो की इराणने प्रगती केली, हे विश्लेषण या ठिकाणी महत्त्वाचे ठरते.

नीरज, सिंधुला आव्हान मोठे

अॅथलेटिक्ससह कुस्ती आणि नेमबाजी हे आपल्याला मिळणाऱ्या पदाकांमधील मोठे हिश्शेदार! पण नीरज चोप्राचा अपवाद वगळता इतर कोणी सुवर्णपदक जिंकून देईल, याची खात्री आताच देता येत नाही. नीरज ऑलिंपिक चॅम्पियन असला, तरी पाकचा अर्शद नदीम फार मागे नसेल. हाच अर्शद नीरजला मोठ्या भावाप्रमाणे आदर देतो; पण आशियायी स्पर्धेत तो धक्काही देऊ शकतो.

फुलराणी पी. व्ही. सिंधूला ऑलिंपिकमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरिनचे आव्हान सुवर्णपदकासाठी मोडता आले नव्हते. येथे कॅरोलिना नाही पण चीन, तैपेई, इंडोनेशिया, कोरिया यांचे काही खेळाडू सिंधूवर गेल्या अनेक स्पर्धांत भारी ठरले आहेत. अपयशाच्या खाईत हेलखावे खाणाऱ्या सिंधूने पदक मिळवले तर तो बोनसच ठरेल.

आदिती-प्रथमेशकडून अपेक्षा

तिरंदाजीत गेल्या काही महिन्यांत आदिती स्वामी, प्रथमेश जावकर यांनी कमाल केलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या यशाची अपेक्षा आहे. परंतु, मातब्बर कोरियन, आणि चीन-जपान यांचे तेवढेच मोठे आव्हान असेल. नेमबाजीत अचूक लक्ष्यभेद झाला तर मनू भाकर, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे, अंजुम मौदगिल यांच्याकडून निश्चितच सुवर्णपदकांची लूट केली जाऊ शकेल.

कुस्तीत सर्वांची प्रतिष्ठा

ऑलिंपिक असो वा आशियायी स्पर्धा भारताला हमखास यश मिळवून देणारा खेळ म्हणजे कुस्ती. मात्र, गेल्या काही महिन्यांत प्रशासन आणि कुस्ती खेळाडू यांच्यातील डाव-प्रतिडाव भारतीय कुस्तीचीच मोठी हानी करणारे ठरले आहेत.

आंदोलने, न्यायालयीन लढाया आणि कुस्ती संघटनेवरील बंदी यानंतर प्रथमच बजरंगसारखे मोठे कुस्तीगीर आशियाच्या आखाड्यात उतरतील. त्यावेळी सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राजधानीत काही दिवसांपूर्वी ‘जी-२०’ चे भव्यदिव्य आयोजन झाले. याची सर्व जगाने वाहवा केली. जगाच्या नकाशावर भारत ठळकपणे झळकला. आता आशियायी क्रीडा स्पर्धेच्या नकाशावर पदकांचा ध्वज उंच धरला जावा हीच अपेक्षा.

गेल्या काही वर्षांतील भारताची प्रगती...

वर्ष -क्रमांक -सुवर्ण -रौप्य कांस्य -एकूण

२००२- ७ वा -११ -१२ -१३ -३६

२००६ -८ वा -१० -१७ -२६ - ५३

२०१० -६ वा -१४ -१७- ३४ - ६५

२०१४- ८ वा -११ -१० ३६- ५७

२०१८ - ८ वा -१६ - २३ -३१- ७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com