esakal | मौन चाफा : तगरीचे दिवस...
sakal

बोलून बातमी शोधा

मौन चाफा : तगरीचे दिवस...

मौन चाफा : तगरीचे दिवस...

sakal_logo
By
श्याम पेठकर

काटेरी झाडांना येणारी फुलं इतकी देखणी आणि नाजूक कशी असतात, हा प्रश्न मला अनेकदा पडतो. काट्याकोरंटीच्या पिवळ्या फुलांना कुठला गंध नसतो. ती कमालीची नाजूकही असतात. अगदी हातात घेतली तरीही सुकून जातात. याच फुलांवरून एखाद्या कुशल दागिने घडविणाऱ्याला कर्णफुलांची कल्पना सुचली असेल.

प्रत्येक ऋतू एका फुलाचा असतो. हरेकच ऋतूची ओळख म्हणून ते फूल असते. आता परतीचा पाऊस काढत्या पायांनी येतो आहे. तो निघून गेला की आश्विनात थंडी मुजोर उन्हांना वेसण घालेल. आश्विनाच्या या दिवसात पिवळ्या रंगांच्या विविध छटांची उधळणच झालेली असते. एरवी गायी-बकऱ्यांसारखी जनावरंही ज्याला तोंड नाही लावत त्या घंट्याच्या झाडांना अशीच मोठ्या कर्णफुलांसारखी पिवळी फुलं लागतात, मात्र त्यांचा रंग लिंबू पिवळा असतो. नेमके या काळातच पिवळ्या फुलांचे झुपके एका झाडाला लागतात.

हेही वाचा: शाळेत जाताना ‘सावधान’!

या काळात नेमकी एरवी दुर्लक्षित अन् निरुपयोगी, विषारी म्हणाव्या अशाच झाडांना फुलं लागतात. रानझेंडू अर्थात झेनियाला टपोर सोनेरी रंगाची मस्त फुलं लागलेली असतात. झेनिया दोन-तीन रंगात असला तरीही आपल्याला जवळचा असलेला झेंडू झेनिया म्हणजे त्याला पाच-सहा पाकळ्या असलेली पिवळी धम्मक फुले लागतात. झेंडूही याच काळात फुलांवर आलेला असतो अन् नवरात्रोत्सवात झेंडूची धूम असते. झेंडूलाही तसा थोडा उग्र दर्प असतो; पण वास, सुगंध म्हणावे असे काहीही नसते.

तिकडे भंडारा जिल्ह्यांत लाखनीकडे गेलो होतो एकदा कथाकथनाच्या कार्यक्रमाला. कोजागिरीचा कार्यक्रम होता. त्या दिवसात तांदळाची पिकं तारुण्यात आलेली असतात अन् सुवासिक धानाचाच नव्हे तर अगदी साध्या धानाचाही खूप मस्त सुगंध रानात पसरलेला असतो. हवाच सुगंधी झालेली अन् गारही... रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूंनी पिवळा झेनिया अन् झेंडूची झाडे फुलली होती. नुसता पिवळ्या रंगाचा पट्टाच! हे असे कसे झाले? नंतर कळले की डॉ. राजहंस आहेत लाखनीचे. तेही विकास-प्रकाश आमटे यांच्याच बॅचचे. ते मग लाखनीला गेले अन् त्या काळात तसे आडवळणाला असलेल्या लाखनीत त्यांनी दवाखाना घातला.

हेही वाचा: माझा गर्व, माझी मुलं!

त्यांची पत्नी आमची ताई (मा. गो. वैद्य यांची कन्या) हे दोघेही एमबीबीएस. त्यांचा पहिला असा दावखाना त्या भागात. राजहंस डॉक्टर पावसाळ्याच्या आधी झेंडूची वाळलेली फुलं गोळा करायचे आणि उन्हाळ्यात कारने येता- जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ती फुलं फेकत जायचे. पावसाळ्यात आपोआप त्याची रोपं यायची अन् आश्विनात रस्त्याच्या दुतर्फा नुसती पिवळी फुलंच फुललेली असायची...

या काळात कन्हेरही चांगली फुललेली असते. हेही तसे विषारी म्हणावे असेच झाड. घंट्याच्या झाडासारखीच याचीही पाने निमुळती. हा काळच मूळात सणांचा. पाना-फुलांचा. पूजा नेमकी पाना-फुलांची केली जाते की आपण प्रतीक म्हणून स्वीकारलेल्या दगडांच्या मूर्तीची? कळायला मार्ग नाही. हा सगळा पूजांचा अन् म्हणून फुलांचा मौसम असतो. हार तयार केले जातात. हारांचा हा सोस तगराच्या फुलांमुळेच परवडतो. ही फुलं फक्त शुभ्र असतात. मोगऱ्याच्या जाती असतात तशा तगरीच्या नसतात. फक्त शुभ्र फुलंच. वास नाही की गंध नाही. इतके सगळे व्यापारीकरण झाले, अगदी शेणही शहरात विकताना अनुभवावे लागले. मात्र, तगराची फुलं अद्याप विकली जात नाहीत. हेही झाड जनावरेही खात नाहीत की त्यांना कीडही लागत नाही.

महालक्ष्मीच्या दिवसात फुलांचे भाव खूप वाढलेले असतात. अशावेळी मग आम्ही लहानपणी परिसरातील तगरीची फुलंच भल्या पहाटे उठून तोडून आणायचो. यवतमाळला आमच्या घराजवळ एका श्रीमंत मावाड्याची बाग होती. त्या बागेत त्याचा बंगला होता. तो राहायचा शहरात, मात्र त्याची म्हातारी आईच तिथे राहायची. ती बाग राखायची. तिने तगरीचे कुंपणच केले होते. एकतर त्याला कीड लागत नाही अन् जनावरेही तोंड लावत नाहीत. या दिवसात तगर बहरलेला असतो. आम्ही तिकडे फुलं तोडायला जायचो.

ती म्हातारी फुलं तोडू द्यायची अन् मग तिचा माणूस फुलं मोजून द्यायचा. आजपासून तीस वर्षांपूर्वी एक किलो तगरीची फुलं ती चाराण्याला द्यायची. नाहीतरी रात्र उलटली की ती फुलं गळूनच पडतात. त्यापेक्षा विकलेली बरी... तेवढीच ही फुलं विकली गेली, असे दिसले. बरे तगराची फुलं मग तिकडे पौषापर्यंत चालतात. होळीच्या आधी पळस फुलतो अन् तगराचा पान्हा आटत जातो. गौरीला घरात आलेली ‘ती’ मग दसऱ्याला दुर्गा बनून सीमोलंघन करते अन् दुष्टांचा, दारिद्र्याचा नाश करून दिवाळीत लक्ष्मीपूजनाला परत येते... त्याहीवेळी या लक्ष्मीच्या पूजनाला झेंडू सोबत तगराची फुले असतात.

नेमका याच काळात प्राजक्तही बहरला असतो. हेही झाड तसलेच. जाड पानांचे, जनावरेही तोंड लावत नाहीत. कुंपण करायला चांगले. मात्र प्राजक्ताची फुले शेणोडी असतात. सुगंध छान असतो मंद मंद, मात्र फारच क्षणभंगूर आयुष्य या फुलांचे. इतकी हलकी फुले त्या थोराड झाला का जड होतात कोण जाणे... झाड फुलं गाळून संन्यस्त वृत्तीने उभं असतं. सकाळची उन्हं थोडी वयात येण्याच्या काळात ही फुलं कोमेजूनही गेलेली असतात... प्राजक्ताला कुणी सांगायला हवं की आपल्याच फुलांना असे पोरके करू नये... वाटेवर उधळून देण्यासाठी नसतात फुलं!

pethkar.shyamrao@gmail.com

loading image
go to top