वादळी पर्वाची अखेर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

एम. जी. रामचंद्रन या आपल्या सहअभिनेत्याचे बोट धरून राजकारणात उतरलेल्या जयललिता यांनी अनेक वर्ष तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 

तब्बल सहा वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला. "अम्मां'च्या जाण्याने तमिळनाडूच्या राजकारणातील एका वादळी पर्वाची अखेर झाली आहे. 

एम. जी. रामचंद्रन या आपल्या सहअभिनेत्याचे बोट धरून राजकारणात उतरलेल्या जयललिता यांनी अनेक वर्ष तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 

तब्बल सहा वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला. "अम्मां'च्या जाण्याने तमिळनाडूच्या राजकारणातील एका वादळी पर्वाची अखेर झाली आहे. 

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी कर्नाटकातील मेलुकोटे येथे झाला. तमीळ चित्रपटात काम केलेल्या जयललिता यांनी "एपिस्टेल' या इंग्रजी चित्रपटातही 1961 मध्ये काम केले होते. 1980 मध्ये आलेला "नदियाई थेडी वंधा कडल' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. 1981 मध्ये अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) पक्षात दाखल झालेल्या जयललिता 1988 मध्ये राज्यसभा सदस्य झाल्या. 24 जून 1991 रोजी तमिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यांचा कार्यकाळ 12 मे 1996 रोजी पूर्ण झाला. ही कारकीर्द अनेक अर्थांनी गाजली. 2001 मध्ये त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 

वादग्रस्त भूमिका 
जयललिता तिसऱ्यांदा एक जानेवारी 2013 रोजी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. महिलांवर अत्याचार, त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना कडक शासन करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना दया दाखवण्यासाठीच्या हालचाली केल्याबद्दल त्या वादग्रस्त ठरल्या. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना तमिळनाडूत आपण सर्वसमावेशक विकास केल्याचा दावा त्यांनी केला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही त्यांनी अनेकदा टीका केली. भाषणाला अपुरा वेळ दिल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. श्रीलंकेतील खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळण्यासही जयललितांनी विरोध केला होता. त्यांच्या भूमिकेपुढे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही नमते घेतले होते. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही जयललितांची विरोधाची धार कायम होती. हिंदी भाषा दक्षिणेवर लादली जाते, शिक्षक दिन गुरुतत्त्व दिन म्हणून साजरा करून सांस्कृतिक अतिक्रमणाचा डाव रचला जातो, असे आरोप त्यांनी मोदी सरकारवर केले होते. 

चारवेळा मुख्यमंत्री 
जयललिता यांनी चार वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषविले. त्यात त्यांनी दोनदा कालावधी पूर्ण केला असला, तरी तिसऱ्या वेळी पद धोक्‍यात आले होते. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही होऊन शिक्षा झालेल्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या. न्यायालयाने निर्दोष ठरविल्यानंतर त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. 

पंधराव्या वर्षी चित्रपटात 
वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरपलेल्या जयललिता आणि त्यांची आई संध्या यांनी दक्षिणेतील चित्रपटांत काम करणे सुरू केले. पंधराव्या वर्षी जयललिता रजतपटावर आल्या, तेथेच त्यांची एम. जी. रामचंद्रन या आघाडीच्या अभिनेत्याची ओळख झाली आणि तेच त्यांचे राजकीय गुरू होते. दोघांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट गाजले. 1982 मध्ये त्या अण्णा द्रमुकमध्ये दाखल झाल्या आणि 1991 मध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. 1996 मध्ये त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सत्तेवर द्रमुकचे नेते आणि त्यांचे कट्टर विरोधक करुणानिधी आले. जयललिता यांनी स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचे प्रकरण उघडकीस आले, तेथून अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. 

वादग्रस्त प्रकरणे 
- डिसेंबर 1996 मध्ये जयललिता यांना दूरचित्रवाणी संच खरेदी प्रकरण भोवले. तब्बल 45 हजार संचांची बाजारमूल्यापेक्षा 14 हजार रुपये जादा देऊन खरेदी करून 8.53 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप जयललिता आणि त्यांची मैत्रीण शशिकला यांच्यावर केला होता, त्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले. 
- "तान्सी' प्रकरणही जयललितांना भोवले होते. सरकारी जमीन मातीमोल भावाने खरेदी केल्याचा आरोप ज्या कंपनीवर करण्यात आला होता, त्यात त्या भागीदार होत्या. त्याबाबत त्यांना स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. 
- 1993-94 या कालावधीचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर न केल्याने जयललिता आणि शशिकला यांच्यावर खटला दाखल केलेला होता. "शशी एंटरप्रायजेस'मध्ये जयललिता आणि शशिकला भागीदार होत्या, त्याचे 1991-92 आणि 1992-93 या वर्षांचे विवरणपत्र सादर न केल्यानेही कारवाई सुरू होती. त्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. 

गाजलेला राजेशाही सोहळा 
- केवळ एक रुपया पगार घेण्याच्या त्यांच्या कृतीने जयललिता लोकप्रिय झाल्या; पण 1995 मध्ये त्यांचा मानलेला मुलगा आणि त्यांची मैत्रीण शशिकला यांचा पुतण्या सुधाकरन यांचा चेन्नईत झालेला विवाहसोहळा सर्वांचे डोळे विस्फारणारा राजेशाही थाटाचा आणि चित्रपटातील दृश्‍याला शोभेल असा होता. 1996 मध्ये सत्तेवर आलेल्या करुणानिधींनी त्यांच्याविरुद्ध ज्ञात स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत कायद्याचा बडगा उगारला. या प्रकरणी दोषी ठरलेल्या जयललितांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. 

अबब किती ही संपत्ती
- ही कारवाई होण्याआधी जयललितांच्या हैदराबाद आणि चेन्नईतील मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. यात सक्त वसुली संचालनालय, भ्रष्टाचारविरोधी पथक, प्राप्तिकर खाते यांचा समावेश होता. छाप्यात 66 कोटींची अतिरिक्त संपत्ती सापडली. यामध्ये 58 कोटींच्या स्थावर मालमत्ता, 400 बांगड्या जोडांसह 30 किलो सोने, 500 किलो चांदी, 10 हजार साड्या, चपलांचे 750 जोड आणि शंभरावर घड्याळे यांचा समावेश होता. त्यामुळेच केवळ एक रुपया वेतन घेणारी व्यक्ती पाच वर्षांत एवढी मालमत्ता कशी गोळा करू शकते, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. 

दर्दी वाचक 
- जयललिता यांना आदराने अम्मा किंवा अम्मू म्हणत. वाचनाचा छंद असलेल्या जयललितांचे ग्रंथालय सुसज्ज असून, चार्ल्स डिकन्स, जेन ऑस्टिन, ऑस्कर वाईल्ड, जॉर्ज बर्नार्ड शॉ, सिडने शेल्डन, पर्ल्स बक, जेम्स हॅडली चेस यांचे लेखन त्यांना आवडत असे. 

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Web Title: overview of Political and social career of Jaylalitha