आह को चाहिए... (पराग पेठे)

पराग पेठे parag23464@gmail.com
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

अबुल फजल या विद्वानानं लिहिलेल्या ‘आईना-ए-अकबरी’ हा ग्रंथाचं फेरसंपादन बहादूरशहा जफर यांच्या दरबारातल्या एकानं केलं व त्याची प्रस्तावना गालिब यांना लिहायला सांगितली. त्यावर गालिब स्पष्टपणे म्हणाले होतेः ‘आता जुनं उगाळत बसू नका! जग किती प्रगत होतं चाललंय ते बघा...’

अबुल फजल या विद्वानानं लिहिलेल्या ‘आईना-ए-अकबरी’ हा ग्रंथाचं फेरसंपादन बहादूरशहा जफर यांच्या दरबारातल्या एकानं केलं व त्याची प्रस्तावना गालिब यांना लिहायला सांगितली. त्यावर गालिब स्पष्टपणे म्हणाले होतेः ‘आता जुनं उगाळत बसू नका! जग किती प्रगत होतं चाललंय ते बघा...’

ब्रिटिशांनी अल्पावधीतच केलेल्या सुधारणा आणि नवनवीन शोध यामुळं गालिब प्रभावित झालेले होते. जुन्याला नवा रंग देण्यापेक्षा नव्या गोष्टी जनमानसापर्यंत पोचाव्यात अशी त्यांची इच्छा होती. गालिब यांचा सूफी इतिहासाचा सखोल अभ्यास असल्यानं ‘सृष्टीचा निर्माता तो एकमेव परमेश्‍वर आहे,’ असं ते मानत. व्यक्तिगत आयुष्यात अनंत अडचणी, वेगवेगळी दुःखं वाट्याला आलेल्या या कवीकडं बघून मनात एक विचार येतो नेहमी...

सुखनवरी भी क्‍या कर लोगे अच्छी चोटें कहाँ से लाओगे गालिब की तरह? आणि वाटतं, कसं काय एवढं दुःख एखाद्यानं पेललं असावं? गालिब यांनीच म्हणून ठेवलंय ःजिंदगी अपनी जब इस शक्‍ल से गुजरी ‘गालिब’हम भी क्‍या याद करेंगे के खुदा रखते थे। जीवनाबद्दलचे हे असे विचार! एवढ्या संकटांना सामोरे गेल्यावर ‘देव आहे’ यावर कुणी कसा विश्‍वास ठेवावा? अतिशय परखडपणे टोकाचे विचार मांडणं - मग ते अध्यात्म असो, तत्त्वज्ञान असो, मृत्यू असो, प्रेयसी असो, अथवा मदिरापान असो - एकाच कवीच्या लेखणीतून हे सगळं अनुभवायचं तर एकच नाव डोळ्यांपुढं येतं व ते म्हणजे मिर्झा गालिब! खासकरून प्रेयसीच्या बाबतीतल्या त्यांच्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर त्यांच्या गझलांमध्ये जाणवतो. अशीच एक अतिशय सुंदर गझल...
***
आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक

अर्थ ः कुठल्याही गोष्टीची वाट बघण्याचीसुद्धा एक हद्द असते. तू तुझ्या मुखावर आलेल्या केसांच्या बटा वर घेईपर्यंत कुणी जिवंत तरी राहील का? गालावर बट किती सुरेखपणे रुळली आहे तुझ्या...आता तू ती गालावरची बट वर कधी घेणार? आणि कधी तुझं रूप दिसणार? तोपर्यंत आपले उसासेच टाकत राहायचे...कदाचित त्यातच सगळं आयुष्य सरून जाणार !

किंवा गालिब प्रेयसीला म्हणत आहेत ः ‘तुझ्यासाठी तळमळतोय मी. धड होकारही देत नाहीस अन्‌ नकारही! एवढा अंत बघू नकोस प्रियकराचा! तुझं नटणं, सौंदर्याची काळजी घेत घेत तुझं ते हळू हळू तयार होणं, नंतर केस विंचरणं ! हे सगळं होईपर्यंत मी जगेन तरी का ? मला नाही वाटत तसं...!
(*आह = निःश्‍वास, सुस्कारा/ *जुल्फ = केस/ *सर = या शब्दाचे बरेच अर्थ आहेत; पण इथं ‘वरती’, ‘वर’ हा अर्थ)

***
दाम-हर-मौज में हलका-ए-सदकामे नहंग
देखे क्‍या गुजरे है, कतरे पे गुहर होने तक।

अर्थ ः समुद्राच्या लाटेतल्या पाण्याच्या एका थेंबाला अनेक संकटांमधून पार पडावं लागतं. शेकडो मगरींच्या अक्राळविक्राळ जबड्यांपासून वाचून जसं त्या थेंबाला मोती होण्यासाठी झगडावं लागतं; तसंच काहीसं आपल्या प्रेमाचंही आहे. आपल्या प्रेमाच्या वाटेत अनंत अडचणी आहेत. बघू या...आपल्या प्रेमरूपी जलबिंदूचं मीलनरूपी मोत्यात कधी रूपांतर होतंय ते !
(*दाम-हर-मौज=लाटांचं जाळं/*हलक=समुदाय समूह/*सद्‌=शंभर-शे/*काम = इच्छा/ *निहंग=मगर, सुसर)

***
आशिकी सब्रतलब और तमन्ना बेताब
दिल का क्‍या रंग करूं खूने-जिगर होने तक।

अर्थ ः प्रेयसी म्हणतेय, धीर धर जरा! आणि मला तर प्रेमातली आतुरता बेचैन करतेय...तिच्या भेटीसाठी जीव आतुर झालाय माझा. या आमच्या ओढाताणीत हृदय बिचारं रक्तबंबाळ होणार हे नक्की. स्त्रीची धीराची भूमिका आणि पुरुषाचा उतावीळपणा किती सोप्या शब्दांत मांडलाय...
(*आशिकी =प्रेम/* सब्रतलब = धीर धरणारं/*तमन्ना= इच्छा/*बेताब =अस्वस्थ, बेचैन/*रंग=दशा, अवस्था/* खून-ए-जिगर= काळीज रक्तबंबाळ होणं)

***
हमने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जाएंगे हम, तुम को खबर होने तक।

अर्थ ः तू माझी उपेक्षा करणार नाहीस, माझ्याकडं दुर्लक्ष करणार नाहीस, असं जरी असलं तरी, मी तुझ्यावर किती प्रेम करतोय हे तुला कळण्यात, तू त्याच्यावर विचार करून निर्णय घेण्यात इतका वेळ जाईल, की तोपर्यंत मी नक्कीच मातीमोल (मृत्यू पावलेला) झालेला असेन! आणि उपेक्षा जरी केली नसलीस माझी, तरी प्रेम करशील माझ्यावर याची काय खात्री?
(*तगाफुल = उपेक्षा, दुर्लक्ष/* खाक होना=मातीत विलीन होणं, मृत्यू पावणं या अर्थानं)

***
परतव-ए-खूर से है शबनम को फना की तालीम
मैं भी हूँ, एक इनायत की नजर होने तक ।

अर्थ ः तू एकदा फक्त माझ्याकडं प्रेमानं बघ! बस्स...तेवढंच पुरेसं आहे मला. मरून जाईन मी अत्यानंदानं. प्रकाशाच्या एका किरणानं आपलं बाष्प होणार आहे, हे जसं दवबिंदूला माहीत असतं, तसंच. माझं अस्तित्व तेवढंच...तुझ्या एका प्रेमळ नजरेपुरतं!
(* परतव-ए-खूर=सूर्यप्रकाश, किरण/ * शबनम = दव/ फना = विनाश, मृत्यू)

***
यक-नजर बेश नहीं, फुर्सते-हस्ती गाफिल
गर्मी-ए-बज्म है इक रक्‍से-शरर होने तक ।

अर्थ ः किती क्षणभंगुर आहे हे जीवन. जसा आकाशातला एखादा तारा तुटून जमिनीवर पडेपर्यंत निमिषार्ध चमकतो अगदी तसं! एक क्षण लखलखाट. मानवी जीवनाचंही तसंच. मैफलीतला क्षणभराचा लखलखाट. नंतर क्षणभरात अंधार !
थोर पुरुषांनी अध्यात्मात तरी याहून काय वेगळं सांगितलंय? अत्यंत क्षणभंगुर आहे मानवी जीवन...तो तुटलेला तारा जमिनीवर निखळेपर्यंतच्या लखलखाटाएवढंच !
(*बेश= अधिक, जास्त/*फुर्सत-ए-हस्ती =अस्तित्वाचा काळ, कालावधी/*गाफिल= बेसावध/*गर्मी-ए-बज्म= मैफलीतली चहलपहल/*रक्‍स = नृत्य/*शरर =ठिणगी)

***
गम-ए-हस्ती का ‘असद’ किस से हो जुज मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है सहर होने तक।

अर्थ ः सांसारिक दुःखांतून मृत्यूशिवाय दुसरं कुणीही सोडवू शकत नसतं. मरण येईपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीनं येईल त्या संकटाला तोंड देत जगत राहतो. जशी एखादी ज्योत पहाट होईपर्यंत जळत राहते; मग तो एखाद्या गरिबाच्या झोपडीतला दिवा असो, एखाद्या मैफलीमधली शम्मा असो किंवा मंदिरात तेवणारा नंदादीप! पहाट होईपर्यंत (ज्योतीचा मृत्यूच जणू) जळावंच लागतं अशा विविध स्वरूपात !
(* गम-ए-हस्ती=जीवनातलं दुःख, त्रास/*जुज = शिवाय/*मर्ग=मृत्यू /*सहर=पहाट)

Web Title: parag pethe's article in saptarang

फोटो गॅलरी