पेट थेरपी

dr. shyamal saradkar
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मानवी मेंदूत हळूहळू बदल होत गेले. उत्क्रांती झाली. माणूस प्रगत झाला. पण, प्रगतीसोबतच जीवनशैली एकलकोंडी, व्यक्तिकेंद्री झाली. आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत, ही भावना मेंदूत रुजत गेली. कालांतरानं समाजाचं बोट पकडून जे जगत राहिले, ते मानसिक अन्‌ सामाजिकदृष्ट्या "वेल ऍडजस्टेड' राहिले. पण, काही मग ताणामुळं, धकाधकीमुळं एकटे पडत गेले. आताचा काळ "ग्लोबल' आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, पीसी, नेटफ्लिक्‍स, अमेझॉन, प्राइमच्या स्क्रीनटाइमचा हा काळ.

मानवी मेंदूत हळूहळू बदल होत गेले. उत्क्रांती झाली. माणूस प्रगत झाला. पण, प्रगतीसोबतच जीवनशैली एकलकोंडी, व्यक्तिकेंद्री झाली. आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत, ही भावना मेंदूत रुजत गेली. कालांतरानं समाजाचं बोट पकडून जे जगत राहिले, ते मानसिक अन्‌ सामाजिकदृष्ट्या "वेल ऍडजस्टेड' राहिले. पण, काही मग ताणामुळं, धकाधकीमुळं एकटे पडत गेले. आताचा काळ "ग्लोबल' आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट, पीसी, नेटफ्लिक्‍स, अमेझॉन, प्राइमच्या स्क्रीनटाइमचा हा काळ.
झोप अन्‌ नैसर्गिक विधी सोडले तर बारा ते अठरा-अठरा तास आपण स्क्रीनटाइमवरच असतो. अतिपुढारलेल्यांच्या आणि मेट्रो शहरांमध्ये "माझा स्क्रीनटाइम तर इतका आहे' अशी फुशारकी सांगण्यात धन्यता मानण्याचे चलन आलेय. मनुष्य हा समाजशील प्राणी. झुंडीने राहणारा. जंगलात होता, तेव्हा इतर जीवांच्या, प्राण्यांच्या तुलनेत ताकद कमी पडायची, म्हणून मग भीतीला सामोरं जाण्यासाठी तो झुंडीनं राहायचा. आल्या संकटांशी चार हात करायचा. त्याला सुरक्षेची गरज होती. पोटापाण्याचा प्रश्‍न सुटला की, माणसाला सुरक्षेची आवश्‍यकता वाटते. अब्राहम मास्लोच्या सेल्फ रियलायजेशनच्या थेअरीनुसार या दोन गोष्टीच माणसाला प्राथमिकरीत्या गरजेच्या. त्यानंतर मग प्रेम अन्‌ मी कोण? या प्रश्‍नांचा शोध वगैरे. साधारण माणसाचे पहिले दोन टप्पे पार करता करता आयुष्य पणाला लागतं.
गर्दीत एकटे पडू, ही भीती काही जणांच्या मनात घर करते आहे. आयुष्यात अगदी जवळच्या माणसांकडून आलेले धक्कादायक किंवा नकोसे अनुभव घेरून टाकतात. मग विश्‍वास उडून जातो. नकारात्मकता जीवनाची लय बनते. एकाकी होतात काही माणसं. नैराश्‍य, चिंतेच्या आहारी जातात. माणसांशी मैत्री, जीव लावणे नकोच. त्यापेक्षा प्राणी पुरले. ते विरोध तर करणार नाहीत किंवा फसवणार तर नक्कीच नाहीत, हा विचार मनाच्या खोल तळाशी रुजत जातो. त्यामुळेच "अल्ट्राग्लोबल' जगात मोठमोठ्या शहरांत म्हणूनच "पेट थेरपी' हा विचार जोर धरायला लागला. प्राण्यांशी माणसाची आधीपासूनची नैसर्गिक मैत्री आहे. त्याला उपचारपद्धती म्हणून बघितलं अन्‌ पूरक उपचार म्हणून विचार केला तर आजारात औषधांसोबतच याचा छान उपयोग होतो, हे संशोधनातून लक्षात येत गेलं.
अनेक शारीरिक, मानसिक आजारांत ही पद्धत प्रभावी आहे. माणूस चंद्रावर किंवा मंगळावर पोहोचला तरी त्याची नैसर्गिक भूक मात्र प्रेमाचीच आहे. त्याच्या भोवतीच मग साऱ्या आयुष्याचा लेखाजोखा. प्राण्यांशी बोलता आलं, मनमुराद खेळता आलं की, ताण कमी होतो. "एंडॉर्फिन' प्रवाही होत शांत वाटतं. ब्लडप्रेशर कमी होतं. घबराट कमी होते. छान वाटतं. धक्‍क्‍यातून सावरण्यास काहीअंशी निश्‍चितच मदत होते. मानसिक आजारांमध्ये "पेट थेरपी' खासकरून महत्त्वाची. पाळीव प्राणी जेव्हा जीव लावतात, तेव्हा मग हळूहळू जीवनाप्रतीचा नकारात्मक विचार कमी होतो. सोबतीला सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टची मदत गरजेचीच. औषधं, सायकोथेरपी सेशन्स अन्‌ पेट थेरपी ही चिंताविकारात मदतीची असतात.

कुणासाठी महत्त्वाची...

जीर्ण आजारी, बिछान्यावर असलेले, कॅन्सरच्या किमोथेरपी रुग्णांसाठी हा एक दिलासा असतो. मन हलकं वाटतं. पपी डॉग अवतीभवती असले की, रुग्णाला छान वाटतं. मांजर इकडून-तिकडून उड्या मारत फिरली की, बालपणीची चंचलता अनुभवता येते अन्‌ मग जुन्या आठवणीत रममाण होता येतं, असे काही रुग्ण सांगतात. आजाराची तीव्रता काहीअंशी विसरायला मदत होते. लकव्यासारखे मेंदूचे आजार, मानसिक आजार, नैराश्‍य, पीटीएसडी, चिंताविकार यांसारख्या व्याधींमध्ये पेट थेरपीकडे आधुनिक पद्धत म्हणून बघता येईल.

प्राणी, कुत्रा वा मांजर अवतीभवती असले की, त्यांना खेळत असताना, बागडत असताना बघून आपणही असे छान आयुष्याला सहजसोप्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकतो, हा आशावाद नैराश्‍यग्रस्त रुग्णांच्या मनात निर्माण होतो. सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. काही जणांना घरीच प्राणी पाळण्याचा सल्ला दिला जातो. म्हातारपणात एकाकी आयुष्याला साथ म्हणूनही वृद्ध दाम्पत्यासाठी फार दिलासादायी. म्हातारपणी मनाच्या खिडक्‍या पुन्हा बालपणात उघडतात.
किशोरावस्थेत काही जणांना राग, चिडचिड, टोकाचं नैराश्‍य घेरून टाकतं. अस्वस्थ करतं. अशा स्थितीत अवतीभवती "पेट' हिंदळत असेल तर "मूड' काहीअंशी जागेवर येतो. "टेडी बिअर'सुद्धा असाच आवडीचा प्रकार.

हॅरीस मतचाचणीत तर 90 टक्के लोकांना "पेट' म्हणजे आपल्या घरातला सदस्य वाटतो. ते त्यांच्याशी बोलतात. प्रेम करतात आणि रागावतातही. दुसरीकडे "पेट'सुद्धा त्याला प्रतिसाद देतात. सायकियाट्रिस्ट एरॉन केचर आणि एलन बेक यांच्या शोधनिबंधानुसार मानसिक रुग्णांमध्ये बेचैनीमुळं वाढलेली हृदयगती कमी होणे, वाढलेले श्‍वसनाचे प्रमाण कमी होणे, मांसपेशींचा ताण कमी होणे असे आणि बरेच फायदे असल्याचे दिसून आले आहे.
सेरोटोनिन, डोपामीन, ऑक्‍सिटोसिन, एंडॉर्फिन रिलिज होतात. मुलांमधली हायपर ऍक्‍टिव्हिटी, जिद्दीपणा, चिडचिड कमी व्हायलाही मदत होते.
शेवटी प्रेमाचीच भूक असते माणसाला अन्‌ ती सार्वत्रिक आहे. विझू आलेला दिवा मग छान तेवतो... मंद मंद शीतल. एकाकी जगणं मग उजळून टाकतो. दिवाळं निघालेल्या आयुष्याची छानशी दिवाळीच. औषधं मग तितकी कडू लागत नाहीत. काही अवतीभवती गोड प्राण्यांचा गराडा असला की,
विळख्यातलं एकाकी जगणं काहीअंशी का होईना मुक्त व्हायला मदत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pet therapy