फोटोशूटची आपत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

photoshoot controvercy ranveer singh amid war ukraine president first ladys glamorous vogue photo shoot sparks furore

फोटोशूटची आपत्ती

मालिनी नायर

अलीकडची दोन छायाचित्रे वादात सापडली आहेत, एक म्हणजे अभिनेता रणवीर सिंहचे आणि दुसरे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडीचे युद्धाच्या पार्श्वभूमीवरचे छायाचित्र! युद्धाच्या कठीण काळात इतरांच्या वेदनेच्या आधारे प्रसिद्धी मिळवणे कधीही समर्थनीय ठरणार नाही.

गेल्या काही आठवड्यांमध्ये रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाच्या बातम्या कमी कमी होत गेल्या. कारण युरोप, पश्चिम आणि उर्वरित जगात इतर विषयांना प्राधान्य देण्यात येऊ लागले. युक्रेनचे प्रथम आणि सत्ताधीश जोडपे व्होल्डोमोर झेलेन्स्की आणि ओलेना झेलेन्स्का जे जगात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. त्यांनी माध्यमांच्या मथळ्यातील आपली जागा गमावली होती आणि अचानक एका फोटोशूटने सर्व काही बदलले. काही दिवसांपूर्वी बातमी आली की, झेलेन्स्की आणि त्यांची पत्नी फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्का यांनी टॉप फॅशन मॅगझिन ‘व्होग’च्या डिजिटल कव्हरसाठी फोटोशूट केले आहे. जे ‘व्होग’ मॅगझिन गेल्या अनेक दशकांपासून अभिजातपणासाठी, उंची फॅशनसाठी आणि ऐशाआरामाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या छायाचित्रासोबत एक लेख छापला होता. ज्यात ओलेना यांच्याविषयी, त्यांच्या आणि झेलेन्स्की यांच्या लग्नाविषयी आणि युक्रेन-रशिया युद्धातील त्यांच्या अनुभवाविषयी लिहिले होते.

या छायाचित्रांमध्ये ओलेना आणि झेलेन्स्की कीवमधील त्यांच्या राजवाड्यातील अंगणात हातात हात घालून बसलेले दिसतात. तसेच झेलेन्स्कींच्या बाहुपाशात ओलेना बसलेल्या दिसतात. आपल्या एकल फोटोत ओलेना बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेल्या ‘अँडोनोव्ह अॅन २२५ मृया’ या युद्ध विमानाच्या समोर पोझ देताना दिसत आहेत. हे जगातील सर्वात वजनदार विमानांपैकी होते. ओलोना यांनी त्यांच्या आभाळी कोटची कॉलर धरली आहे आणि त्यांच्या अवतीभवती महिला सैनिक उभे आहेत. ‘व्होग’ने त्यांच्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार अॅनी लिबोविट्झ यांना युक्रेनमध्ये फोटोशूटसाठी पाठवले होते. त्यामुळे ही छायाचित्रे नक्कीच उत्कृष्ट आली आहेत. ‘पोर्ट्रेट ऑफ ब्रेव्हरी : युक्रेनच्या फर्स्ट लेडी, ओलेना झेलेन्स्का’ या मथळ्याखाली ही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. झेलेन्स्का यात नक्कीच सुंदर दिसत आहेत. त्यांनी जो पेहराव केला आहे तो युक्रेनियन पेहराव आहे, पण यामुळे लोकांमधून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी असे मत दिले की, या फोटोशूटमुळे युद्धाचे गांभीर्य कमी केले. मग या संपूर्ण प्रकरणात आणि फॅशन मॅगझिनच्या या डिजिटल प्रकाशनामध्ये नेमकी चूक काय झाली?

या मॅगझिनने राजकीय नेत्यासोबत किंवा त्यांच्या पत्नीसोबत फोटोशूट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेच्या ‘व्होग’ मासिकाच्या मुखपृष्ठावर त्यांच्या देशातील जवळजवळ सर्व फर्स्ट लेडी आहेत. अगदी अलीकडे जिल बायडन आणि मिशेल ओबामा यांनीही फोटोशूट केले. मग याच प्रसंगात एवढा गदारोळ का?

वेगळेपण हेच आहे की, आतापर्यंत कोणत्याही फर्स्ट लेडीने युद्धाच्या दरम्यान फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केलेले नाही. खरे सांगायचे तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेता आणि त्याच्या पत्नीची अशा प्रकारची जवळीक ही सुसंगत वाटत नाही. तीही नैसर्गिक नसून एखाद्या मॉडेलने पोझ द्यावी तशी. ही पोझ एकप्रकारे घरातून परागंदा झालेल्या आणि प्राणास मुकलेल्या युक्रेनियन नागरिकांची थट्टाच आहे. देशाच्या नेत्याने त्याच्या दिवसातील प्रत्येक क्षण लोकांच्या भल्यासाठीच खर्च करावा, अशी अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. नेता देशात शांतता आणि समृद्धी आणेल, या आशेवर जनता त्याच्यावर विसंबून असते. म्हणून जेव्हा पाच महिने तुंबळ युद्ध सुरू असते; तेव्हा नेता आणि त्याची जोडीदार फॅशन मॅगझिनसाठी पोझ देतात, ही गोष्ट विश्वासघात करण्यासारखीच असते आणि हेच बहुसंख्य लोकांना रुचले नाही. त्यामुळे अनेकांना असे वाटत आहे की, युक्रेनचे हे सत्ताधीश जोडपे केवळ प्रसिद्धीलोलुप आहे आणि युद्ध हा त्यांच्यासाठी जाहिरातीसाठी वापरण्याची बाब आहे. पुष्कळ लोकांना असे वाटते की, या जोडप्याला पुन्हा प्रकाशझोतात आणण्यासाठी घातलेला हा घाट आहे.

ओलेना यांनी मात्र आपल्या फोटोशूटचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, या मॅगझिनसाठी फोटोशूट करून त्याच्या लक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी म्हणून मी याकडे पाहते. जेणेकरून युक्रेनमधील परिस्थितीविषयी त्यांना सांगता येईल. खरेतर याबाबत ओलेना वैयक्तिक जबाबदार नाहीत. मॅगझिनचे संपादक, झेलेन्स्की आणि त्यांची जनसंपर्क टीम यांना या चुकीसाठी जबाबदार धरायला हवे. छायाचित्रांमधील झेलेन्स्की आणि ओलेना यांचे चेहरे उदास आहेत, हे ठीक. त्यांनी उंची कपडे परिधान केलेले नाहीत, हेही बरोबर आहे, पण छायाचित्रांच्या पार्श्वभूमीवर युद्धात उद्‌ध्वस्त झालेली सामुग्री वापरणे कितपत योग्य आहे? जर जगाकडून आर्थिक मदत आणि शस्त्रास्त्रांची मदत मागणे हा यामागील उद्देश असेल तर छायाचित्रकाराला युद्धाचे क्षण टिपण्याची परवानगी देणे योग्य ठरले नसते का? उदाहरणार्थ सैनिकांचे फोटो किंवा नेते लष्करांसोबत बैठक घेत असतानाचे फोटो, हे अधिक वास्तव आणि सुसंगत दिसले असते. एखाद्या युद्धावर आधारित सिनेमाच्या पोस्टरसारखे दिसण्यापेक्षा हे लोकांच्या अपेक्षेला खरे उतरणारे दिसले असते.

माहिती जनतेपर्यंत कशी पोहोचते हेच रशिया-युक्रेन युद्धामधले प्रमुख शस्त्र आहे. दोन्ही बाजूंनी पाठिंबा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम चालवली जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या पाच महिन्यांत सोशल मीडियावर लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. कारण ते ट्विटर आणि इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रियपणे सेल्फी आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

झेलेन्स्की यांचे अनेक समर्थक असे म्हणत आहेत की, झेलेन्स्की आणि ओलेना या दोघांनाही मीडियामध्ये राहण्याची सवय आहे आणि २००३ मध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीचे चॅनेलही सुरू केले आहे. त्यामुळे फोटो काढून घेणे वगैरे गोष्टी त्यांच्यासाठी नैसर्गिक आहेत. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नये. काही लोक असे म्हणत आहेत की, युद्धाचा अर्थ असा नाही की लोकांनी इतर कुठल्या गोष्टी करूच नयेत. युक्रेनमध्ये अजूनही लोक वाढदिवस आणि इतर छोट्या-छोट्या गोष्टी साजऱ्या करत आहेत. त्यामुळे फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडीवर टीका केली जाऊ नये. पण ही खूपच आत्मकेंद्री कृती वाटत आहे हीच यातील अडचण आहे. एकतर मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही वेळ चुकीची आहे आणि फोटोशूटसाठी ज्या पोझेस दिल्या आहेत त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उथळ दिसत आहेत. एकीकडे हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत. लाखोंनी आपले घर आणि रोजीरोटी दोन्ही गमावले आहे, तर दुसरीकडे आपल्या देशाचे नेते या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी प्रत्येक क्षण देण्याऐवजी फोटोसाठी पोझ देत आहेत. या फोटोशूटमुळे युक्रेन अधिक वाचकांपर्यंत पोहोचत असेलही, पण याने काय साध्य झाले?

त्यांना आधीच अब्जावधींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे आणि जगभरातील अनेक नेते आधीच त्यांच्या पाठिशी उभे आहेत. या देशातील राजकीय नेत्यांचा आधीच युक्रेनला पाठिंबा असल्याने तेथील जनतेला एकत्र आणण्यात काहीच अर्थ नाही. मग झेलेन्स्कींना परत एकदा बातम्यांमध्ये आणण्यासाठी तर हे सर्व केले नसेल ना? शक्य आहे! युक्रेनचा कमी होत जाणारा पाठिंबा परत मिळवण्यासाठी ओलेना यांनी नुकतीच अमेरिकेला घाईघाईने भेट दिली होती.

गेल्या काही आठवड्यांपासून युक्रेन आणि रशियाच्या बातम्या जागतिक प्रसारमाध्यमांमधून मागे फेकल्या गेल्या होत्या. सध्या रशियन रुबल निर्बंधांना तोंड देत आहे आणि अमेरिकेलाही समजू लागले आहे की, हा गुंता सोडवायचा असेल तर पुतीन यांच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अशा बातम्या येत आहेत. जर पुतीन आणि पश्चिमेचा संवाद सुरू झाला तर ते युक्रेनमध्ये रशिया समर्थक नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी जोर लावतील. याचा अर्थ देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी झेलेन्स्कींची हकालपट्टी केली जाऊ शकते. युरोपियन युनियनमधील अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे असे सुचवले आहे की ते पुतीन यांना बाजूला काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे या परिस्थितीवर चर्चेतून मार्ग काढणे हाच उत्तम उपाय आहे. या स्थितीत रशियाविरुद्ध कठोर भूमिका न घेतल्याने जर्मनीवर टीका होत आहे आणि खरे सांगायचे तर युरोपियन नेत्यांना दोष देणे बरोबर नाही. झेलेन्स्की यांना प्रकाशझोतात ठेवण्यावरून युरोप आणि ब्रिटनच्या अंतर्गत बराच राजकीय गोंधळ सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच निवडणुकांमधून असे दिसून आले आहे की, मॅक्रॉन यांनी विजय मिळवूनही त्यांच्या लोकांचा विश्वास गमावला आहे. त्याचप्रमाणे मारिओ द्राघीने इटलीमध्ये राजीनामा दिला आणि त्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. जर्मनी एक गंभीर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे, तर यूकेने नुकतेच बोरिस जॉन्सनचे पतन पाहिले आहे आणि पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करावी हे ठरवण्यात ते व्यग्र आहेत. आणि हे पुरेसे नाही म्हणून की काय वाढती महागाई, ऊर्जा टंचाई, अन्न संकट यांनी युरोपला गुडघे टेकायला लावले आहे. त्यामुळे युक्रेन-रशिया युद्धाऐवजी या बातम्यांना प्राधान्य दिले जात आहे. लोकांना युद्ध वार्तांचा कंटाळा आला आहे. त्यामुळे झेलेन्स्कींकडे दुर्लक्ष होत आहे.

या फोटोच्या प्रसाराने झेलेन्स्की पुन्हा प्रकाशझोतात आले आणि म्हणतात ना कोणतीही प्रसिद्धी ही वाईट प्रसिद्धी नसते. या शूटच्या नैतिकतेबद्दलच्या वादाने जगभरातील नजरा झेलेन्स्कींकडे वळल्या आणि ते पुन्हा बातमीचा विषय झाले.

Web Title: Photoshoot Controvercy Ranveer Singh Amid War Ukraine President First Ladys Glamorous Vogue Photo Shoot Sparks Furore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..