मनसंवेदन

‘मन की बात’ या शब्दांमध्येच ‘मला माझ्या मनातलं तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्यासोबत वाटून घ्यायचंय, मन मोकळं करायचंय,’ असा आर्जव आहे
PM Narendra Modi's 100th episode of Mann Ki Baat
PM Narendra Modi's 100th episode of Mann Ki Baatsakal
Summary

‘मन की बात’ या शब्दांमध्येच ‘मला माझ्या मनातलं तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्यासोबत वाटून घ्यायचंय, मन मोकळं करायचंय,’ असा आर्जव आहे

- सोनाली लोहार

माझी काय मतं आहेत, मला काय वाटतंय, मला काय हवंय हे खरंतर मोकळेपणाने कुठेतरी सांगण्याची प्रत्येकालाच गरज असते. ते निर्भेळपणे सांगता येईल, अशी जागा ज्याला सापडली तो नशीबवान. पिवळं धम्मक ऊन पडलेलं असताना कधीतरी दूरवर एखादा काळ्याभोर ढगांचा पुंजका थरथरतो. भरून आलेल्या त्या ढगांनी तेव्हा कोसळणं आणि रिकामं होणं हे किती गरजेचं असतं ते एखाद्या भरून आलेल्या मनालाच समजू शकेल.

नुकताच पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग झाला. ‘मन की बात’ या शब्दांमध्येच ‘मला माझ्या मनातलं तुम्हाला काही सांगायचं आहे, तुमच्यासोबत वाटून घ्यायचंय, मन मोकळं करायचंय,’ असा आर्जव आहे. प्रश्न हा आहे, की खरंच मन मोकळं करणं इतकं सोपं असतं? खरोखरच आपण जे बोलतो तो नेहमीच आपल्या मनाचा आवाज असतो? ‘माझ्या जे पोटात असतं अगदी तेच ओठावर असतं’ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते कितपत खरं असतं?

माझ्या मते ९९% वेळा बोलताना आपण ज्याला इंग्रजीत ‘पॉलिटिकली करेक्ट’ म्हटलं जातं तसंच व्यक्त होत असतो, अत्यंत सांभाळून आणि मोजून-मापून. फारच कमी व्यक्ती अशा असतात ज्या प्रसंगाची,

परिस्थितीची अथवा समोरच्या व्यक्तीची आणि होणाऱ्या परिणामांची परवा न करता धाडधाड बोलून मोकळ्या होतात. अशा व्यक्तींना आपण काही अंशी घाबरतो आणि म्हणूनच अप्रियतेचा शिक्का लावून मोकळे होतो. खरंतर बहुतांशी वेळा ही मंडळी आपल्याला आरसाचं दाखवण्याचं काम करत असतात.

अगदी कालपरवापर्यंत मला वाटायचं की खऱ्या अर्थाने १०० टक्के ‘मन की बात’ करू शकतात ती म्हणजे लहान मुलं; परंतु सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात ‘लहान’ या शब्दाच्या व्याप्तीविषयीसुद्धा मनात प्रश्न उभे राहिलेत.

इथे तीन-चार वर्षांची मुलं वयस्करांना लाजवतील इतक्या सराईतपणे व्यक्त होतात, रिल्स बनवतात, नृत्य करतात. ‘त्या दोन फुटी शरीरातल्या चिमुकल्या मेंदूत ते शब्द आणि ते हावभाव आले तरी कुठून’ हा विचार न करता आपणही फार कौतुकाने ते बघतो.

आत्मविश्वासाची कमी नसते; पण हळूहळू या मुलांमधली निरागसता कधी संपत जाते ते त्यांच्या पालकांच्याही बहुधा लक्षात येत नाही. निरागसता संपली की सहजता संपते आणि सहजता संपली की हृदयाचा संवाद होणं कठीणच. आजची पिढी एखाद्या अदृश्य समूहासमोर ज्या प्रमाणात व्यक्त होते त्याच्या एक टक्काही स्वतःच्या पालकांसोबत होऊ शकत नाही, ही खूपच दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे.

‘माझी काय मतं आहेत, मला काय वाटतंय, मला काय हवंय’ हे खरंतर मोकळेपणाने कुठेतरी सांगण्याची प्रत्येकालाच गरज असते. ते निर्भेळपणे सांगता येईल, अशी जागा ज्याला सापडली तो नशीबवान, असे निवांत कोपरे हवेच आयुष्यात. पिवळं धम्मक ऊन पडलेलं असताना कधीतरी दूरवर एखादा काळ्याभोर ढगांचा पुंजका थरथरतो. भरून आलेल्या त्या ढगांनी तेव्हा कोसळणं आणि रिकामं होणं हे किती गरजेचं असतं ते एखाद्या भरून आलेल्या मनालाच समजू शकेल.

अर्थात या मनाच्या गोष्टी, ही घुसमट, हा कोलाहल नेहमी बोलूनच व्यक्त होईल, असेही नव्हे. तो कधी कवितेच्या दोन ओळीत उतरेल, कधी रंगमंचीय आविष्कारात, कधी व्हायोलिनच्या व्याकुळ स्वरात, कधी बेभान पदन्यासात, कधी मातीच्या गोळ्यावर अलवार फिरणाऱ्या बोटांत, कधी कॅनवासवरच्या अगम्य भासणाऱ्या असंख्य रंगात,

कधी फक्त नजरेतून, कधी स्पर्शातून, कधी देहबोलीतून, कधी आकांतातून आणि कधी स्तब्धतेतूनही! प्रत्येक वेळी ती भाषा आपल्याला समजेलच असं नव्हे, पण तरीही तिथे दोन क्षण थबकणं गरजेचं. हळूहळू त्या अमूर्तालाही आकार यायला लागतो. आकलनाचा अट्टहास न धरता त्या आकारात स्वतःला विरघळवत जाणं म्हणजे ‘मन की बात’ समजणं.

एका खूप मोठ्या आदरणीय आणि दिग्गज मित्रवर्यांचा असाच कधीतरी फोन येतो. म्हटलं तर तो द्विव्यक्तीय संवाद असतो आणि एका अर्थाने आत्मसंवादही. ते त्यांच्या अनेकविध विचारांची शृंखला सलगपणे आपल्यापर्यंत पोहोचवत राहतात. त्या शृंखलेतली प्रत्येक कडी नकळत तुम्हाला स्वतःत डोकवायला भाग पाडत जाते. यात मौखिक संवाद बहुतांशी एकतर्फीच असला, तरीही एक श्रोता म्हणून तुम्ही त्याचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा असता. कारण जेव्हा दोन्ही टोकाच्या कड्या जोडल्या जातात, तेव्हाच ते वर्तुळ पूर्ण होतं, तो संवाद संपूर्ण होतो.

म्हणूनच, राष्ट्र असो, समूह असो वा व्यक्तिगत आयुष्य, दुसऱ्या टोकाचं ‘असणं’ हे अतीमहत्त्वाचं. आणि ‘मन की बात’ खरोखरच उमजून घ्यायची असेल, तर त्या दुसऱ्या टोकाने अत्यंत सजग आणि संवेदनशील राहणं हेसुद्धा तितकचं गरजेचं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com