जस्ट लूक लाईक अ ‘वॉव’

७० एमएम पडद्यावर नि आता मोबाईलच्या वीतभर तबकडीवर दिसणाऱ्या सर्व ‘कला’त्मक गोष्टी मला भावतात.
pop star jennifer lopez secret of beauty of women
pop star jennifer lopez secret of beauty of womenSakal

- सुशील आंबेरकर

तरुण दिसण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. नवीन वर्षाची नवलाई आता सुरू झालीय. गत वर्षअखेरीस पॉप स्टार जेनिफर लोपेझने महिलांच्या सौंदर्याचं एक उघड गुपित नव्याने सांगितलं. तसा संकल्प आपणही करू या.

मीपार फिल्मी आहे. ७० एमएम पडद्यावर नि आता मोबाईलच्या वीतभर तबकडीवर दिसणाऱ्या सर्व ‘कला’त्मक गोष्टी मला भावतात. नयनरम्य लोकेशन, लॅव्हिश राहणीमान, नायकाचा मर्दानी बाणा,

नायिकेची मनमोहक अदा, लव्ह स्टोरी, खानदान की इज्जत, फुटकळ विनोद, बाष्कळ डायलॉग, देमार हाणामारी, अचाट साहस, पुचाट ॲक्टिंग, मुंबईतील गल्लीबोळ, खपाटीला गेलेल्या पोटाची गरिबी, डोळ्यांतून वाहणाऱ्या इमोशन्स,

बंदुकीतून ठो ठो सुटणाऱ्या गोळ्यांचा धमाका, खच्च्च्च असा आवाज करत पोटात घुसणारा सुरा, रक्ताचा सडा, टॉक टॉक आवाज करणारे बूट, ग्लासात ओतल्या जाणाऱ्या मदिरेचा स्वच्छंदी खळखळाट, कपटी नि खूनशी खलनायक,

त्याचे कांड आणि ‘भगवान के लिए मुझे छोड दो’ असं नायिकेचं आर्जव... सगळं मला आवडतं म्हणजे आवडतं. पडद्यावरचं सारं एन्जॉय करतो मी, कारण ते ‘रिल’ आहे... ‘रियल’ नाही. पण एका मेनकेने माझी सिनेतपस्या भंग केली तेव्हा मला चित्रपट नव्या अर्थाने,

नव्या नजरेने, नव्या जाणिवेने, नव्या नजाकतीने आणि नव्या शहाऱ्याने सुखावू लागला. तेव्हा माझ्या वयाने जस्ट तारुण्याची लक्ष्मणरेषा पार केली होती नि पडद्यावर पाहिलं, नखरेल डिंपल कपाडियाला. ‘राम लखन’मध्ये...

भिरभिरणाऱ्या मनाचं लगेच फ्लॅशबॅकमध्ये लॅण्डिंग झालं. थेट ‘सागर’ आणि ‘जाँबाज’ सिनेमे आले डोळ्यासमोर. ‘जाने दो ना... पास आओं ना’ आणि ‘जाने जाना... ओ जाने जाना’ गाणं आठवलं नि आधी ऋषी कपूर, मग अनिल कपूर आणि त्यानंतर राजेश खन्नाचा हेवा वाटू लागला.

काश... असं खरंच मनोमन वाटून गेलं. नंतर ‘काश’ नावाचा सिनेमा पाहिला नि जॅकी श्रॉफच्या नशिबाचं अप्रूप वाटलं. त्यानंतर आलेला ‘इन्साफ’ पाहून तर विनोद खन्नाच्या नावाने बोटं मोडली... दिवसेंदिवस डिंपल नजरबंदी करत होती, हेच खरं.

काय गंमत आहे पाहा, डिंपलचा पहिला सिनेमा ‘बॉबी’ आला त्या वर्षी मी या जगात आलो नि आज तिचा सुरकुतलेला चेहरा नि पिकलेले केस पाहून मला माझ्या ऐन पन्नाशीत जगण्याची एक नवी उमेद मिळतेय.

परवाच तिच्या एका जाहीर कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहिला. आजही तिला पाहून मी पार ३० वर्षं भूतकाळात जातो नि एनर्जेटिक होतो. ‘सागर जैसी आँखो’वाल्या डिंपलची नशाच एकदम कातिलाना... बाईचं वय वाढतं तेव्हा ती अधिकच सुंदर आणि गहरी दिसू लागते, असा विश्वास डिंपलने दिला.

गेला बाजार हेमा मालिनी, रेखा, नीना गुप्ता, नितू सिंग, अर्चना पूरनसिंग, भाग्यश्री पटवर्धन, संगीता बिजलानी, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, काजोल, तब्बू, रविना टंडन, श्वेता तिवारी वगैरे वगैरे अधूनमधून ‘भडका’ उडवतात; पण डिंपलची सर सनी पाजीच जाणो...

इथे डिंपल पुन्हा नव्याने आठवण्याचं कारण म्हणजे ‘जेलो’. अर्थात अमेरिकन पॉप सिंगर कम मॉडेल कम डान्सर कम ॲक्ट्रेस कम आमच्या पिढीची क्रश, जेनिफर लोपेझ... अगदी अहाहा ब्युटी. काय साली दिसते, खूब गाते आणि दिलखेचक ठुमकते.

‘घायल’ सिनेमातील ‘सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा...’ गाणं पाहतो तेव्हा तीच येते नजरेसमोर. आता तुम्ही म्हणाल ‘जेलो’चा त्याच्याशी काय संबंध? लक्षात येत नाहीय तुमच्या. ‘जेलो’च्या ‘ऑन द फ्लोअर’ गाण्याचीच तर कॉपी आहे ते. ‘यू ट्युब’वर जेनिफर लोपेज नाव टाईप करा, पुढे ‘ऑन द फ्लोअर’ची जोड द्या नि जे ऐकायला येईल ते धुंद करून टाकेल तुम्हाला... मग आनंद घ्या, ‘जो भी होगा देखा जायेगा...’चा.

असो, मुद्द्यावर येऊ. गत वर्षाच्या अखेरीस ‘जेलो’ म्हणाली, की बाईचं वय वाढतं तशी ती अधिक सेक्सी (भारतीय प्रमाण भाषेत मादक) दिसत जाते. काय मराठी शब्दाची जादू आहे पाहा. मादक शब्दापुढे सेक्सी म्हणजे पानीकम चायच... पण ‘जेलो’ जे बोलली ते पटलं आपल्याला.

आज ती ५४ वर्षांची आहे; पण सतत प्रेझेंटेबल असते. मादकता आणि अश्लीलतेमध्ये एक हलकीशी किनार आहे, जी तिने नेहमीच पाळली. ग्लॅमरच्या नशेत कधीच ओलांडली नाही. पडद्यावरील आपला एकही सीन व्हल्गर होणार नाही याची काळजी तिने घेतली.

एवढंच कशाला ती आपल्या कित्येक लाईव्ह शोमध्ये अंग-प्रत्यांग दिसतील अशा अटायरमध्ये अवतरते; पण तिचं दिसणं नेहमी आरसपानी भासत आलं. कारण ती आहे प्रचंड कॉन्फिडंट... एक गंमत सांगतो, तुम्ही गुगल करू शकता.

तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ आहे १४ मिनिटांचा. एका नॅशनल सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीचा. द बेस्ट शकिरा आणि परफेक्ट जेनिफर लोपेझचा खतरनाक जलवा मनाच्या पटलावर आजही नाद करतोय.

नॉर्मली आपण एखाद्यावर मात केली की म्हणतो, की त्याला किंवा तिला कच्चा खाल्ला... पण मी म्हणेन, की ‘जेलो’ने शकिराला आपल्या परफॉर्मन्सने आधी चांगलं शिजवलं आणि नंतर चवीचवीने तिचा आस्वाद घेतला. विश्वास बसत नसेल तर सर्च करा ‘शकिरा ॲण्ड जेलोज सुपर शो’ आणि पाहा तो पॉवरपॅक्ड परफॉर्मन्स.

एक कबुलानामा इथे पेश करतो... ‘जेलो’चा ‘लव्ह डोन्ट कॉस्ट अ थिंग’ म्युझिक व्हिडीओ अगदी बोलका आहे. ती आपल्या गर्भश्रीमंत प्रियकराच्या बेशकिमती प्रासादात येते; पण तो कमअक्कल नि कमनशिबी तिला फोन करून सांगतो, की मी आज डेटला नाही येऊ शकत.

तुझ्यासाठी अजून एक सोन्याचं ब्रेसलेट मी आवर्जून गिफ्ट दिलंय, ते घे नि एन्जॉय कर... इथे ‘जेलो’ची सटकते नि ती फोन आपटून आपल्या लाखमोलाच्या ‘अॅस्टिन मार्टिन’ कारमध्ये बसते नि हायवे गाठते. ड्रायव्हिंग करत असतानाच ती आपल्या सर्व मौल्यवान वस्तूंचा त्याग करते.

त्यात असतात महागडे दागिने, पैशाने भरलेली पर्स आणि बॉयफ्रेंडने दिलेला टॉप... दगा देणाऱ्या बॉयफ्रेंडचं कसलंच जोखड तिला नको असतं, म्हणून मग ती एका समुद्रकिनारी जाते, टॉपलेस होते नि कचकड्याच्या नात्यातून मुक्त होते...

तुम्हाला खरं नाही वाटणार, असं ‘जेलो’ने रियल लाईफमध्येही केलंय... तेही तीन वेळा. तिची चार लग्नं झालीत. दोन मुलांची आई आहे ती; पण आपल्या ‘वेटिंग फॉर टुनाईट’ गाण्याप्रमाणे ती आपल्या हिमतीवर जगतेय. कारण तिचं स्वतःवर प्रचंड प्रेम आहे. आत्मविश्वास तिच्यात ठासून भरलाय.

म्हणूनच आज तब्बल २० वर्षांनी ती आपलं पहिलं प्रेम असलेल्या बेन ॲफ्लेकसोबत लग्न करून मोकळी झाली. याच बेनने तेव्हा तिच्यासोबत लग्नाला नकार दिला होता म्हणे... जास्त काही सांगत नाही, ‘जेलो’चा बरोबर वर्षभरापूर्वी रिलीज झालेला ‘शॉटगन वेडिंग’ सिनेमा पाहा.

अमेरिकन रोमँटिक अॅक्शन कॉमेडीपट आहे तो. आजची पन्नाशीतील पिढी नक्कीच पुन्हा तिच्या प्रेमात पडेल. जेव्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तेव्हा हताश होऊ नका. तुम्ही स्वतःवर प्रेम करा, जिद्द ठेवा, आपल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा आणि मग बघा, जग तुमच्या पायाशी लोटांगण घालेल... प्रेरणा देणारे अगणित आहेतच, बस त्यांना फॉलो करा.

सतत सुंदर दिसा, असं ती सातत्याने सांगत आलीय. मला वाटतं ते फार कठीण नाही... ‘जेव्हा आपली बायको पुन्हा नव्याने आवडायला लागते ना त्या दिवशी समजून जायचं की आपल्या म्हातारपणाला सुरुवात झालीय’ असं कोणी एक महागुरू सांगून गेलाय; पण ते ‘पटणेबल’ आहेच की...

आपली बायकोही आपल्याबरोबर म्हातारी होतेय, तिचंही वय वाढतंय नि तीही हाफ सेंच्युरी ठोकण्याच्या तयारीत आहे, मग तिलाच बनवूया की डिंपल... बाहेरच्या डिंपलपेक्षा घरची सिंपल बायको कधीही गोडच.

अनेक नवरेबाज आज तलवार म्यान करून बसलेत. त्या सर्वांची माफी मागून मी सांगतो, की त्यांना ‘जेलो’च्या बोलण्याने नक्कीच ऊर्जा मिळेल. मी जेव्हा तिच्या अगाध व्यक्तव्याचा खोलात जाऊन विचार केला तेव्हा मला तिचं म्हणणं त्रिवार पटलं.

आम्ही निश्चयाचे महामेरू. मग लगेच ‘पण’ केला, बायकोला फिट करायचं. संगतीला एक बकरा हवा म्हणून मी माझ्याच गळ्यात घंटा बांधली. बायकोला सोबत घेतलं नि तडक जीम गाठली. अंगातली रग जिरवायला गेलो तर जीमवाल्याने आमचीच किलोभर चरबी उतरवली...

आधी प्राणायाम, अनुलोम-विलोम वगैरे करायला लागेल, असं सांगून थेट योगासनांच्या क्लासला अ‍ॅडमिशन दिली आम्हाला. जीममध्ये वर्कआऊट करण्याएवढे तुम्ही फिट नाही, असा ‘अपमर्द’ करून आधी केसाने आमचा गळा कापला नि मग पैशाने खिसा...

गपगुमान घरी आलो, खर्चाची गोळाबेरीज केली नि आमचं ठरलं, एकानेच फिट व्हायचं. तो मान मी मोठ्या दिलाने बायकोला दिला... मी ‘रिटायर्ड हर्ट’ झालो. बक्कळ पैसा खर्च होणार आहे; पण परिणाम जाणवतील याची खात्री आहे आणि त्याचा आनंदही... जेनिफर लोपेझ आज अवघ्या ५४ वर्षांची आहे; पण फिटनेसच्या बाबतीत तिचा हात कोणीच धरू शकत नाही.

अगदी ती म्हणते त्या प्रमाणे प्रत्येकी स्त्री उतारवयात सुंदर दिसत नाही; पण स्वतःला प्रेझेंटेबल करण्याची ताकद तिच्यात नक्कीच असते. काहींचं दिसणं आणि सोबत असण्याची जाणीव होणं फार महत्त्वाचं. अजूनही अनेक असंख्य फिगरवाले नि जिगरवाले सेलिब्रेटी तुम्हाला जगण्याचा नवा आयाम देऊन जातील. फक्त त्यांना फॉलो करा.

निदान पन्नाशीतील आपल्या बायकोच्या मनाचा तरी कानोसा घ्या... तिलाही ब्युटी पार्लरमध्ये जायचं असेल, मॅनिक्युअर-पेडिक्युअर वगैरे करायचं असेल. तर करा पैसे थोडे ढिले... देवाला आपण मनोभावे मानतो, त्याची पूजा करतो. ते कधी आपल्याशी बोलत नाहीत; पण कुणाच्या तरी मुखातून ते आपलं मनोगत तुमच्यापर्यंत पोहचवत असतात. सो, गो गेट इट...

एक लेडी नि थोडीशी वेडी (मथितार्थ : बिनधास्त, दिलखुलास, खट्याळ वगैरे वगैरे...) इन्फ्ल्युएंजर सध्या जाम फॉर्मात आहे. जगण्याचा एक नवा फलसफा ती सातत्याने आपल्या ‘रिल्स’मधून सांगत आलीय.

तिला महिलांचं दिसणं, सेक्स अपील, फॅशन, ड्रेसिंग, लूक, स्कीन टोन, फिटनेस, डाएट, रिलॅक्सेशन, एन्जॉयमेंट नि सोशल लाईफचा प्रचंड सेन्स आहे. आपलं हसणं-रडणं, रुसणं-रागावणं, नसणं-असणं, दिसणं-फसणं, येणं-जाणं, खाणं-पिणं, गोड बोलणं-चिडणं,

लढणं-कोलमडणं, सावरणं, हटकणं नि भटकणं असं ती सगळं शेअर करतेय सर्वांशी... कारण ती ‘सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा...’वर विश्वास ठेवते, असं मला वाटतं. ‘जेलो’ही तेच करतेय. आपल्या कृतीतून पन्नाशीतल्या तमाम खूबसुरत महिलांना आणि ‘संतूर’ मॉमना सिंपल से डिंपल बनण्याचा गुरुमंत्र देतेय.

तिचं म्हणणं मनावर घ्या, कारण उतारवयातलं जीवन खूप सुंदर आहे आणि जगात अशक्य काहीच नाही... सर्वच मानवप्राण्यांना नवीन वर्षातील नव्या रूपासाठी शुभेच्छा! जस्ट लूक लाईक अ ‘वॉव’...

जेनिफर लोपेझ ‘ऑन द फ्लोअर’ गाण्यात म्हणते,

Dance the night away

Live your life and stay young on the floor

Dance the night away

Grab somebody, drink a little more

La la la la la la la la la la la la la la...

आपले दिवंगत गीतकार इंदिवर ‘घायल’ चित्रपटासाठी लिहितात,

सोचना क्या, जो भी होगा देखा जायेगा

कल के लिए आज को ना खोना

आज ये न कल आयेगा

ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com