दुष्काळमुक्तीची संधी (पोपटराव पवार)

पोपटराव पवार
रविवार, 29 एप्रिल 2018

"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही साथ मिळाली, तर ती दुष्काळमुक्तीच्या दृष्टीनं एक मोठी संधी ठरू शकेल.

"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही साथ मिळाली, तर ती दुष्काळमुक्तीच्या दृष्टीनं एक मोठी संधी ठरू शकेल.

सरत्या वर्षात चांगला पाऊस होऊनही विविध भागांत एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची परिस्थिती पाहायला मिळते. मे महिन्यात तर पाणीटंचाईची तीव्रता आणखी जाणवेल. मात्र, हळूहळू हे चित्र पालटू शकतं."जलयुक्त शिवार' योजना, अभिनेते आमिर खान यांच्या "पाणी फाउंडेशन' या संस्थेनं सुरू केलेला "सत्यमेव जयते वॉटर कप', नाम फाउंडेशन आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंड आदींच्या माध्यमातून जलसंधारणाची खूप कामं झालेली आहेत. त्यातूनच पाणीदार गावं आपल्याला पाहायला मिळाली आहेत. अर्थात एवढंच नव्हे, तर ज्या ठिकाणी पिकांवर आधारित पाण्याचं नियोजन करण्यात गावकरी यशस्वी ठरले, ती गावंही आज पाणीदार आहेत.

जलसंधारणाची चळवळ राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लोकसहभागाची चळवळ होत आहे, असं दिसत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासारखं वातावरण दिसत आहे. आमिर खान यांच्या "पाणी फाउंडेशन'च्या माध्यमातून सहा हजार गावांपर्यंत आणि 75 तालुक्‍यांपर्यंत याचा विस्तार प्रचंड प्रमाणात होताना दिसत आहे. श्रमदान, लोकसहभाग, पाण्याचा ताळेबंद आणि सेंद्रीय कर्ब या चार मुद्द्यांवर एक लाख लोकांनी रात्री बारा वाजता राज्यामध्ये श्रमदान केलं आणि या योजनेचा प्रारंभ केला. प्रामाणिकपणे कुणी पुढाकार घेतला, तर जनता स्वतंत्र आंदोलनातून दुष्काळमुक्तीचं आंदोलन हाती घेऊ शकते, हे या एका उदाहरणातून पुनःपुन्हा सिद्ध होत आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचं वलय, प्रामाणिक हेतू आणि त्याला सत्यजित भटकळ यांच्यासारखा झोकून देऊन काम करणारा उत्तम व्यवस्थापक आणि सोबत तळागाळात काम करणारे त्यांचे सहकारी आणि टीम यांच्यामुळं "वॉटर कप' ही संकल्पना मूळ धरते आहे. फक्त हीच संस्था नाही, तर शांतिलाल मुथ्था यांची भारतीय जैन संघटना, इतर स्वयंसेवी संस्था किंवा इतरही वेगवेगळ्या कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं करत आहेत. या सगळ्यांच्याच प्रयत्नांमुळं आता या चळवळीला जनआंदोलनाचं स्वरूप आलेलं आहे.

"जलयुक्त शिवार'ला पाठबळ
राज्यात सरकारनं "जलयुक्त शिवार'च्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला पाठबळ दिलं आहे. आता याचं श्रेय कुणाला मिळतं वगैरे चर्चांपेक्षा गावं पाणीदार होतात, हे महत्त्वाचं आहे. याचा विचार आता प्रत्येकानं करण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरात "जलयुक्त शिवार'च्या कामांवर फारशी टीका झालेली नाही. कारण या कामांची गुणवत्ता, मापदंड आणि सत्तर टक्के शिवाराची कामं व तीस टक्के ओघळ नियंत्रण या सूत्राची जलसंधारण विभागानं केलेली काटेकोर अंमलबजावणी यांमुळं "जलयुक्त शिवार' मोहीम एका गुणवत्तादायी उंचीवर पोचली आहे. सरकारी आणि संस्थात्मक पातळीवर सुरू असलेल्या या वेगवेगळ्या मोहिमींचं स्वरूप आणि त्यांच्यातला जनतेचा सहभाग असाच राहिला, तर महाराष्ट्रातला दुष्काळ इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.

डीप सीसीटी (खोल, सलग समतल चर), कंपार्टमेंट बंडिंग (शिवाराची बंदिस्ती) यांमुळं मृद्‌संधारणाची एक मोठी चळवळ राज्यामध्ये सुरू झाली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. कारण ओढ्यातल्या जलसंधारणापेक्षा शिवारातलं मृद्‌संधारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. जलसंधारणाच्या चळवळ एकीकडं सुरू असताना मृद्‌संधारणाकडं झालेलं दुर्लक्ष हे अतिशय धोकादायक होतं. परंतु या अभियानानंतर आता मृद्‌संधारणाचीही मोठी चळवळ राज्यामध्ये पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. आता गावोगावी नवं, तरुण जलनेतृत्व तयार होताना दिसत आहे. आमिर खान यांच्यासोबत सहभागी असणाऱ्या मराठी आणि हिंदी कलाकारांनी या चळवळीला सातासमुद्रापार नेलं. यामुळं परदेशात वसलेल्या मराठी माणसांच्याही अंतर्मनाचा वेध घेतला आणि त्यांचीही साथ आर्थिक मदतीच्या माध्यमातून मिळू लागली.
सीमेवर असलेल्या जवानांपासून मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही आपल्या गावाकडं ओढा निर्माण झाल्याचंही सध्या दिसत आहे. या मायेच्या ओलाव्यातून कोरड्या नदी-नाल्यांना पाण्याचा ओलावा देण्यात ते आनंदानं सहभागी होत आहेत, पाठबळ देत आहेत, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. पक्षीय राजकारण करण्यापेक्षा गावासाठी आलेली संधी म्हणून प्रत्येक गावकऱ्यानं याकडं पाहण्याची गरज आहे. शिवजयंती उत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव यांच्यासारख्या उत्सवांबरोबर महाराष्ट्र सरकारची रोजगार हमी योजना, फलोद्यान योजना; तसंच तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं ग्रामस्वच्छता अभियान या सगळ्या चळवळी म्हणजे नेत्यांच्या, राज्यकर्त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची उदाहरणं आहेत.

वसंतदादा पाटील यांनी जलसंधारण योजना पुढं नेली. यातूनच रोजगार हमीतून फलोद्यान ही योजना शरद पवार यांनी संपूर्ण देशाला दिली. आर. आर. पाटील यांच्या ग्रामस्वच्छता अभियानानं स्वच्छतेची चळवळ दिली आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आलेली "जलयुक्त शिवार' योजना, आमिर खान यांच्या संस्थेनं सुरू केलेला "वॉटर कप' यांनी जलसंधारणाची चळवळ दिली. म्हणूनच कुठल्याही एका प्रयोगाला राजकीय पाठबळ मिळालं, तर ग्रामीण जीवनाला सकारात्मक परिवर्तन यायला वेळ लागणार नाही.

हिवरे बाजार इथंही ऐंशी टक्के कामं शिवाराच्या उपचाराची झाली. वीस टक्के कामं ही ओघळ नियंत्रणाची झाली. त्यामुळं त्याचा फायदा संपूर्ण शिवाराला झाला. राज्यामध्ये 81 टक्के शिवाराचे उपचार व 19 टक्के उपचार ओढ्यात करण्यात आले. त्यातून तयार होणाऱ्या यशोगाथा "आदर्श गाव योजने'तून पुढं येत आहेत. पाण्याचा ताळेबंद "आदर्श गावा'त मांडला जातो. "आदर्श गाव'च्या सप्तसूत्रीच्या अंमलबजावणीमुळं 25 गावांतली एक उत्तम यशोगाथा राज्यात तयार होत आहे.

Web Title: popatrao pawar write water article in saptarang