झळा गरिबीच्या-संघर्षाच्या...

उन्हाळा सुरू झालाय. झाडं नसल्यामुळं समृद्धी महामार्गानं प्रवास करीत असताना तर हा उन्हाळा अधिकच तीव्र जाणवत होता.
poor children Selling Guava
poor children Selling Guavasakal

उन्हाळा सुरू झालाय. झाडं नसल्यामुळं समृद्धी महामार्गानं प्रवास करीत असताना तर हा उन्हाळा अधिकच तीव्र जाणवत होता. मी समृद्धी महामार्गानं संभाजीनगरहून नागपूरला जात होतो. बुलढाणा सोडून आता मला बराच वेळ झाला होता. काहीतरी पोटात टाकायला पाहिजे, यासाठी माझं आजूबाजूला पाहणं सुरू होतं, पण काही खाण्याची सोय दिसत नव्हती. समृद्धी महामार्गानं त्या सगळ्या सोयी बंद केल्या आहेत. एका पेट्रोलपंपाकडे जाणारा मार्ग शोधला आणि मुख्य रस्त्याच्या खाली उतरलो. गाडीतून खाली उतरल्यावर मला एका हॉटेलची छोटी पाटी दिसली.

मी त्या दिशेनं जात असताना रस्त्याच्या कडेला मला एक दृश्य दिसलं. एक छोटासा मुलगा एका झाडाच्या सावलीखाली पेरू विकत बसला होता. त्या मुलानं माझ्याकडं पाहिलं, मला जोरात आवाज देत म्हणाला, ‘‘अहो काका, घ्या पेरू, ताजे आहेत. स्वस्त लावतो.’ त्याचं बोलणं काही केल्या थांबत नव्हतं. मी त्याच्याजवळ गेलो. सगळे पेरू सुकून गेले होते.

मी तिथं पाच-सात मिनिटं बसलो. कमालीचं ऊन लागत होतं, पण त्या उन्हात त्या पठ्ठ्याचा एकच उद्देश होता. ते पेरू विकून टाकायचे. पेरू कसे दिले इथपासून ते त्याचं घर, गाव, तो शिकतो का? असा आमचा संवाद सुरू झाला. त्या मुलामध्ये आत्मविश्वास आणि इमानदारपणा अगदी ठासून भरला होता.

त्याच्याशी बराच वेळ बोलल्यावर मी त्याला म्हणालो, ‘हे पेरू विकणं झाल्यावर तू कुठे जाणार आहेस?’ तो म्हणाला, ‘बाजूला माझ्या शेतात माझे आजोबा, छोटा भाऊ माझी वाट पाहत बसले आहेत. मी तिकडे जाणार आहे.’ तुझे विकणे कधी संपेल? तो म्हणाला, ‘माहीत नाही. गेल्या तीन दिवसांपासून मी पेरू विकण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणी घेतच नाही.’ हे सांगताना त्याचा चेहरा पडला होता.

तो ज्या तळमळीनं मला यश मिळत नाही हे सांगत होता ना, तेव्हा माझं मन आतमधून एकदम तुटून गेलं. मी त्या मुलाकडून ते सर्व पेरू विकत घेतले, माझ्या गाडीत ठेवले. कुठलाही भाव न करता मी सारे पेरू का घेतले, या विचारानं तो एकदम भांबावून गेला होता. मी त्याला म्हणालो, ‘चल जेवण करू.’ तो म्हणाला, ‘नाही, मी जातो. माझे आजोबा वाट पाहत असतील.’ मी म्हणालो, ‘अरे, मी पेरू घेतले नसते तर तू उशिरापर्यंत इथेच बसला असता ना..!’

मी आग्रह करीत होतो आणि तो ‘नाही’ म्हणत होता. शेवटी माझ्या आग्रहापुढं तो माझ्यासोबत आला. आम्ही ज्या छोट्याशा हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तिथे हॉटेलच्या मालकाजवळ जाऊन त्या हॉटेलमालकाच्या हातात मी दिलेले पैसे देत, त्यानं कदाचित मागची सारी उधारी चुकती केली. तो हॉटेलचा मालक त्याच्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाला, ‘अरे माधव, आज तुझे सर्व पेरू विकले?’ त्यानं माझ्याकडे बोट दाखवत, मी ते सर्व पेरू घेतले असे सांगितले.

आम्ही जेवायला बसलो. तो इतक्या गतीनं जेवत होता, की असं वाटत होतं तो कितीतरी दिवसांचा उपाशी आहे. तो हात धुवायला गेला. तितक्यात तो हॉटेलचा मालक मला येऊन म्हणाला, ‘‘फार प्रामाणिक मुलगा आहे साहेब. लहानपणी बिचाऱ्याचे आई-वडील गेले. आता छोट्या भावाला घेऊन एका आंधळ्या आजोबाची तो काठी बनला आहे. तुम्ही पैसे द्याल म्हणून त्यानं अगोदरच मला सांगून तुमचे जेवणाचे पैसे घेऊ नका असे सांगून मला पैसे दिले होते.’’

त्या हॉटेल मालकाचे ऐकून माझ्या मनात त्या लहान मुलाविषयी अजून सहानुभूती वाढली. तो हात धुऊन आल्यावर मी त्याला म्हणालो, ‘का रे, तू माझे जेवणाचे पैसे अगोदरच दिले.’ त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही आमच्या गावात आले म्हणजे आमचे पाव्हणे झालात ना..!’ मी म्हणालो, ‘मी तुझ्या कुटुंबाविषयी विचारत होतो तेव्हा तू तुझ्या आई-बाबांबद्दल मला काहीच सांगितले नाहीस.’ तो म्हणाला, ‘रोज तीच ती कहाणी पुन्हा पुन्हा सांगून मला फार वाईट वाटते.’

मी बोलत होतो आणि तो माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होता. तो मुलगा या जगातल्या त्या तमाम मुलांचं प्रतिनिधित्व करणारा होता, ज्यांचं कुणीच नाही, ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचं एवढं ओझे आहे. त्यातून मार्ग काढणं सोपं नाही, ते देवालाही जमणार नाही.

माधव चामडे! हा अवघ्या अकरा वर्षांचा मुलगा. तो सात वर्षांचा असताना, गीता आणि सोपान हे त्याचे आई-वडील एका अपघातात गेले. आता माधव आणि त्याचा भाऊ श्याम हा त्याच्या आईचे वडील कामाजी खोडवे यांच्यासोबत शेतात झोपडी करून राहतात. त्यांना दीड एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये एक पेरूचे झाड आहे. त्याच पेरूच्या झाडाचे पेरू माधव विकत असतो. भावाची आणि अंध असणाऱ्या आजोबांची जबाबदारी आई-वडिलांच्या पश्चात माधववर येऊन पडली.

जमेल ते काम करायचे, पेरूच्या सिझनमध्ये पेरू विकायचे. शेतापासून जवळच वाडी नावाचं गाव आहे तिथल्या शाळेत कधी चक्कर मारायची, असा माधवचा दिनक्रम. आम्ही त्या छोट्याशा हॉटेलमधून बाहेर पडलो. मी माधवला म्हणालो, ‘मी तुला काही मदत करू शकतो का?’ माधव म्हणाला, ‘नाही, नाही, माझे आजोबा सांगतात, कुणाचीही फुकट मदत घेऊ नये, माणूस आळशी होतो.’’ मी म्हणालो, ‘‘एखाद्याच्या मदतीनं जर आपलं कल्याण होत असेल तर काय हरकत आहे?’ मी आग्रह केला तरीही त्याची नकारघंटा सुरूच होती.

मी म्हणालो, ‘तू जे राहतोस ते ठिकाण किती दूर आहे?’ माधवनं एका दूर दिसणाऱ्या झोपडीकडं बोट दाखवत ‘त्या तिथं’ असं सांगितले. मी म्हणालो, ‘‘त्या झोपडीत अजून कोण कोण आहे?’ तो म्हणाला, ‘भाऊ, आजोबा असे दोघे जण असतात.’’ मी येऊ का तुझ्या आजोबांना, भावाला भेटायला? तो एकदम आश्चर्यचकित होऊन मला म्हणाला, ‘‘तुम्ही आजोबांना भेटायला आल्यावर आजोबांचे चार वर्ष आयुष्य वाढेल, पण तुम्ही येऊ शकणार नाही. तिथे गाडी जाणार नाही. पायवाट आहे. ऊन खूप आहे.’’ मी म्हणालो, ‘चल रे, जाऊ बोलत बोलत.’ असे म्हणत आम्ही निघालो.

वयाच्या अकराव्या वर्षी माधवला गरिबी आणि जबाबदारीनं सर्वकाही शिकवलं होतं. त्याला चांगलं-वाईट जग माहिती होतं, त्याला भुकेवर पैसा हेच माध्यम आहे आणि तो मिळवायचा कसा, हेही माहिती होतं. मदत घेऊन जगायची सवय लागली तर माणूस खूप लाचार होतो. हात-पाय असून अपंग होतो, हे जबरदस्त सूत्र माधवनं स्वीकारलं होतं. आम्ही माधवच्या त्या झोपडीत पोहोचलो. माधवचे आजोबा हातावर दोरी तयार करायचे काम करत होते.

एका रिकाम्या पोत्यावर माधवचा लहान भाऊ झोपला होता. आम्ही झोपडीमध्ये प्रवेश करताच माधवचे आजोबा माधवला म्हणाले, ‘अरे माधवा, आज एवढ्या लवकर आलास. काय झालं रे?’ माधव म्हणाला, ‘पेरू संपले, त्यामुळं आलो. ज्या काकांनी सर्व पेरू घेतले ते तुम्हाला भेटायला आले आहेत. ते मुंबईचे आहेत. आता नागपूरला चालले आहेत. तुम्हाला खास भेटायला आले आहेत.’

आजोबा पूर्णपणे आंधळे, त्यांनी हातातले काम बाजूला टाकत मला हात जोडले. मी त्यांचे हात हातामध्ये घेत म्हणालो, ‘तुमचा नातू इतका बोलका आहे, की तुम्हाला भेटून जायचा मोह टाळता आला नाही.’ आजोबा म्हणाले, ‘हो, मी कधी कधी त्याच्यासोबत पेरू विकायला जातो ना, तेव्हा अनेक माणसे मला म्हणतात, नेऊ का तुमच्या नातवाला शहरात शिकायला. तेव्हा मी त्यांना हात जोडून म्हणतो, अरे बाबा, या म्हाताऱ्याची काठी नेऊन का पाप घेताय?’ बिचाऱ्या लेकरावर सारं ओझं पडलं असं म्हणत आजोबा रडायला लागले.

मी आजोबांची समजूत काढत म्हणालो, ‘शेतामध्ये काय पीक घेता?’ आजोबा म्हणाले, ‘काय घ्यावं, काहीही घेतलं तरी बाजारात विकताना त्याला भावच नसतो. साऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्या, पण शेतमालाच्या किमती आहेत तशा आहेत. सोयाबीनचे भाव मागच्या पाच वर्षांत वाढलेच नाहीत.’ छोट्या शेतकऱ्यांच्या मोठ्या व्यथा आजोबा मला सांगत होते.

माधवचा भाऊही आमच्या आवाजानं उठला. आम्ही सारे जण बोलत बसलो. माधव माझ्याशी बोलत बोलत चुलीवर खिचडीला फोडणी देत होता. अवघ्या वीस मिनिटांत माधवची खिचडी तयार झाली. माधवनं आजोबा, भावाला जेवायला दिले. आजोबांच्या समोर वाढलेल्या खिचडीमधून प्रेमाचा सुगंध दरवळत होता. काय ते वातावरण, कसं ते कुटुंब, एकमेकांविषयी सर्वांना प्रचंड आस्था, आदर. कदाचित त्यांना सगळ्या गरजा भागवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. ते प्रचंड गरीब होते म्हणून ते प्रचंड आनंदी होते, असेच मला वाटत होते.

मी त्या सर्वांचा निरोप घेऊन निघालो. माधव मला गाडीपर्यंत सोडण्यासाठी येत होता. माझ्या मनात खूप विचार सुरू होते. आपल्या अवतीभवती असे अनेक माधव शाळा सोडून आयुष्याचे सोनेरी स्वप्न पाहायचं सोडून गरिबीतल्या भट्टीतून तयार होत असतात. त्यासाठी आपण काय करतो? हा प्रश्न होताच. तुमच्या अवतीभवती असे अनेक माधव असतील. ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे.

बरोबर ना... ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com