आधुनिक तंत्रज्ञानाचा सशक्त आविष्कार!

वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान हातात हात घालून काम करत आहे. पूर्वीच्या काळी हाताची नाडी पाहून आणि पोट तपासून निदान केले जायचे.
Modern technology
Modern technologysakal

- डॉ. अविनाश सुपे

वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान हातात हात घालून काम करत आहे. पूर्वीच्या काळी हाताची नाडी पाहून आणि पोट तपासून निदान केले जायचे. आज वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांवरील उपचारांसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. रविवारी, ७ एप्रिल रोजी असलेल्या आरोग्य दिनानिमित्त वैद्यकशास्त्रातील प्रगतीचा आढावा.

मला कोणी विचारले, की पुढच्या काही वर्षांत आरोग्य सेवेत काय बदल होतील, ती कशी असेल आणि ती अधिक उत्तम करण्यासाठी काय करायला हवे, तर आपण काही गोष्टींचा विचार जरूर केला पाहिजे. एक म्हणजे, सध्या आरोग्य सेवेतील सुधारणेबाबत तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे. काळानुसार सतत नवीन तंत्रज्ञान येतच राहणार आहे. त्याला वैद्यकशास्त्राचाही अपवाद नाही.

मात्र त्याच्या सुयोग्य वापराबद्दलची जाणीव डॉक्टर आणि रुग्णासह एकूणच समाजाला असणे आवश्यक आहे; तरच आरोग्य आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा ताळमेळ राहू शकेल. दुसरे म्हणजे, बदललेला डॉक्टर - रुग्ण संवाद. पूर्वीच्या काळी देव मानणाऱ्या डॉक्टरच्या नीतिमत्तेवर रुग्ण प्रश्‍न विचारू लागला आहे. त्यामुळे वैद्यक व्यवसायाने याचे भान ठेवून रुग्णांचा विश्‍वास मिळवला पाहिजे.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सुडो सायन्स - म्हणजे चुकीचे ज्ञान किंवा विज्ञान... स्वतःच्या कंपनीच्या किंवा रुग्णालयाच्या फायद्यासाठी अफवा किंवा खोटी माहिती व्हॉट्सॲपद्वारे पसरवणे... त्यासाठी सर्वांनीच सजग राहावयास हवे. पण आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करू या...

वैद्यकशास्त्रात साधारण ४० वर्षांमध्ये जो बदल झाला त्यात अल्ट्रासाऊंड साधारण ऐंशीच्या दरम्यान आपल्याकडे आले. त्यानंतर चार ते पाच वर्षांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय आले. पुढे काही दिवसांमध्येच पेटस्कॅन आले. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे छोट्या छोट्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येऊ लागल्या. माझ्या विद्यार्थिदशेत म्हणजे १९७० च्या काळात डॉक्टर रुग्णाची नाडी तपासून आणि पोटाला हात लावून निदान करत असत.

फार फार तर क्ष-किरण वा रक्‍ततपासणीच्या आधारे निदान करून शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेत. निदान चुकीचे झाले, तर रुग्णाला त्रास होत असे. गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान आले असून त्यात सातत्याने बदल होत आहेत. साधारण १९८० मध्ये सोनोग्राफी, १९८४-८५ मध्ये सिटीस्कॅन, पुढे एण्डोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, मग एमआरआय आणि आता पेटस्कॅन आले आहे.

मेंदू किंवा पोटातल्या एखाद्या ट्यूमरचे किंवा गाठीचे खरे रंगरूप पूर्वी शस्त्रक्रिया करतानाच कळायचे. आता तंत्रज्ञानामुळे त्या गाठीचे स्वरूप आधीच समजते आणि संबंधित शस्त्रक्रिया अधिक व्यवस्थितरीत्या करता येते. एखादा कर्करोग किती पसरला आहे, एखादा आजार नेमका कुठे आहे ते कळते आणि त्यामुळे नेमकी व आवश्यक तेवढीच उपचार पद्धती अवलंबिता येते. शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे करता येते.

रोबोटिक ब्रेन सर्जरी आणि नेव्हिगेशन सर्जरीमुळे तर अत्यंत कठीण, जिकिरीच्या शस्त्रक्रिया कमीत कमी धोका पत्करून करता येतात. मेंदू, यकृत किंवा पाठीच्या कण्याचा तेवढाच अवयव पाहून शस्त्रक्रिया केली जाते. रोबोटिक व नेव्हिगेशनमुळे मोजून-मापून छेद देता येतो व नवीन सांधा किंवा हाड योग्य पद्धतीने बसविणे सोपे होते. रुग्णाचा आजार लवकर बरा होतो.

वैद्यकशास्त्रात नवनवीन तंत्रज्ञान सतत येत असते. त्यात गेल्या दशकात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मशीन लर्निंग आणि डिप लर्निंगची भर पडली आहे. त्याचा फायदा असा की, ट्युमर काढताना त्याच्याभोवती असलेले रक्‍तनलिकांचे जाळे वा मेंदूच्या शस्त्रक्रियेवेळी महत्त्वाच्या नसांची माहिती मिळवता येते. साहजिकच अशा जिकिरीच्या शस्त्रक्रियांमधील धोका कमी होतो. के.ई.एम. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये तर सी टी स्कॅन मशीन बसवलेली आहे.

दुसरा तंत्रज्ञानातील महत्त्वाचा बदल म्हणजे, एण्डोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी नेव्हिगेशनसारखी नवनवी उपकरणे आपल्याकडे आली. एण्डोस्कोपी, लॅप्रोस्कोपी नेव्हिगेशन, रोबोटिक्स आणि तोंडातून किंवा गुद‍द्वारातून दुर्बिणीतून बघून अंतर्गत आजाराची पूर्ण कल्पना आपल्याला येते. रक्‍तस्राव थांबवू शकतो. बायोप्सीचा निर्णय घेऊ शकतो. इथे मग शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत नाही, आजारही बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो आणि रुग्णांनाही कमी त्रास होतो.

१९९० मध्ये मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मोठे छेद घ्यावे लागत असत. आता लॅप्रोस्कोपीमुळे शरीरात एक किंवा दोन सेंटिमीटर भोक करून मोठमोठ्या शस्त्रक्रिया सोप्या पद्धतीने करता येतात. यकृत, अन्ननलिका, प्रोस्टेट इत्यादींसारखे मोठे अवयव काढण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. आरोग्य सेवेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत यंत्रणांमुळे रुग्णांनाही अनेकविध फायदा होतो.

जास्त वेदनेपासून व रक्‍तस्रावापासून त्यांनी मुक्‍ती मिळते. उपचारांनंतरचा त्यांचा रुग्णालयातील मुक्कामही कमी होतो. रुग्ण लवकर बरा होऊन आपल्या कामावर रुजू होऊ शकतो. नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णावरील खर्चाचा भार काही प्रमाणात वाढेल; पण आरोग्याच्या दृष्टीने त्याला अधिक सुरक्षाही मिळते. चुका कमी होतात आणि हळूहळू काही वर्षांनी खर्चही कमी होत जाईल.

तंत्रज्ञान एक साधन

आहे आणि त्याचा वापर जनहितासाठी होणे आवश्यक आहे. असे करताना आपण माणुसकी गमावत नाही ना, याबाबत जागरूक असायला हवे. हल्लीच अपस्माराच्या रुग्णावर एक चित्रपट आला होता. अपस्माराच्या स्त्री रुग्णाला लग्नानंतर वाईट वागणूक मिळते. आज नवीन तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करून अपस्माराच्या रुग्णांना, मेंदूवर योग्य जागी शस्त्रक्रिया करून त्यांना दिलासा मिळू शकतो. नेमके निदान आणि उपचार म्हणजे तंत्रज्ञानाची मोठी जमेची बाजू आहे आणि आज त्याचाच फायदा अनेक रुग्णांना होत आहे.

अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाचे धोके आणि तोटेही आहेत. ते वापरण्यासाठी सक्षम असणे आवश्यक असते. खासगी रुग्णालये असे तंत्रज्ञान तर वापरतातच. गरीब रुग्णांच्या हितासाठी महापालिका रुग्णालयेसुद्धा ३ जी टेस्ला आणि ड्युएल एनर्जी सिटीस्कॅन अशी स्टेट ऑफ आर्ट मशीन्स घेत आहेत आणि हे चांगले आहे... पण, अशा तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आवश्यक ते मनुष्यबळ लागते; अन्यथा ती धूळ खात पडून राहतात. त्यामुळे आधी योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करून मगच नवीन मशीनरी घ्यावी, असे सांगावेसे वाटते.

बऱ्याच वेळा तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर केला जातो. त्याऐवजी अनेकदा रुग्णाशी बोलून, त्याला तपासून रोगाचे निदान करता येऊ शकते. अलीकडे गरजेपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात तपासण्या केल्या जातात. त्यातून ठोस निदान होत असेल तर ठीक; पण अनेकदा गोंधळ वाढू शकतो. साध्या गोष्टींचा बाऊ केला जातो. मला वाटते, की अशा गोष्टींविषयी सुजाणपणे विचार करता आला पाहिजे.

म्हणजे बऱ्याचदा ज्ञान मिळते, माहिती मिळते... त्या माहितीचे ज्ञान व्हायला हवे आणि ज्ञानाची अक्कल व्हायला पाहिजे. त्यासाठी आजच्या तरुण डॉक्टरांची मानसिकता तयार आहे, असे वाटत नाही. नवीन पिढीतील डॉक्टर तपासण्यांवर अधिक अवलंबून असतात; पण त्यांनी केवळ तपासण्यांमध्येच गुंतून जाऊ नये.

सारासार विचार करून डॉक्टरांनी रुग्णाला आवश्यक आहे तितक्‍याच चाचण्या करून घेऊन उपचार करायला हवेत. आधुनिक तंत्राचा वापर करून रुग्णाला फायदा तर व्हावाच; पण जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने मी डॉक्टर-रुग्ण यांच्यातील हरवलेले संवाद पुन्हा पूर्ववत व्हावे, अशी इच्छा व्यक्‍त करतो. हे नाते मित्रत्वाचे असायला हवे!

avisupe@gmail.com

(लेखक के. ई. एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com