ग्रामीण व्यवस्थेचे बोलके चित्रण!

मानवी मूल्यांना स्पर्श करणारी योगीराज बागूल यांच्या ‘दगडी वाडा’ कादंबरीत प्रांजळपणाने रेखाटलेल्या मन्वंतराचा लेखाजोखा जाणवतो.
Dagdi Wada Book
Dagdi Wada Booksakal

मानवी मूल्यांना स्पर्श करणारी योगीराज बागूल यांच्या ‘दगडी वाडा’ कादंबरीत प्रांजळपणाने रेखाटलेल्या मन्वंतराचा लेखाजोखा जाणवतो. ओघवत्या बोलीभाषेत ग्रामीण व्यवस्थेचे चित्रण वाचायला मिळते.

कोणत्याही साहित्य प्रकारामध्ये, मग ती कादंबरी असो अथवा कथा; एक कठोर साधनाच असते. ही साधना करून इच्छित फळ हवे असेल, तर सूक्ष्म निरीक्षण, जिद्द आणि परिश्रमपूर्वक मेहनत ही चतुःसूत्री मनापासून राबवावी लागते. योगीराज बागूल हे मराठी साहित्यविश्वातील सुप्रसिद्ध नाव. त्यांचे आजवरचे लिखाण जनसामान्यांच्या पसंतीस उतरले आहे. ‘दगडी वाडा’ ही कादंबरीही लेखकाच्या कीर्तीला साजेशी झाली आहे.

‘दगडी वाडा’ कादंबरीचा विषय नक्कीच कपोलकल्पित नाही. त्यातील विषयाला वास्तवतेची झालर आहे. लेखकाने आजवर भोगलेले, जगलेले आणि पाहिलेले आयुष्य तिच्यात अंतर्भूत झाले आहे. सामूहिक अत्याचार आणि स्त्रीजीवनाची फरपट हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लिहिणे हे धाडसाचे काम आहे. गावगाड्यांत घडलेली घटना सूत्रबद्धपणे कादंबरीत टिपण्याचे आणि वाचनीय करण्याचे अवघड काम प्रतिभावंत लेखकच करू शकतो.

कथानकातील सूत्र बेमालूमपणे मांडणे आणि तसे करताना ‘नीतीचे ध्येय समाजाचे सुख असावे’ अशी विचारधारा पेरण्याचे कसब योगीराज बागूल यांच्यासारखे कसदार लेखकच करू शकतात, अशी माझी धारणा आहे. अंधाराच्या पलीकडे प्रकाशाची नवी पहाट असते. असा आशयघन दाखवणारी ही कादंबरी माणुसकीला समृद्ध करणारी आहे.

‘दगडी वाडा’ कादंबरी एकाच विषयावर रेंगाळत नाही. तिला आष्टांगिक प्रतिभा प्राप्त झाली आहे. कादंबरीत प्रेमाचा महिमा ओतप्रत भरलेला आहे. गावगाड्याचे यथार्थ जीवन उत्कटपणे मांडले आहे. ऊसतोड कामगारांचे कष्टप्रद जीवन रेखाटले आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची दुःखे टिपली आहेत.

तिच्यात अर्थकारण, राजकारण, न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा, सामाजिक अभिसरण, शासनव्यवस्था, तुरुंगातील जीवन, घरच्या जित्राबांचे वर्णन, बाईचे बाईपण, तिच्या गर्भारपणातल्या कळा, गावच्या जत्रा-यात्रा, संत तुकोबा, संत ज्ञानोबांच्या गाथा, कबिराचे दोहे असे अनेकविध विषय हाताळण्यात आले आहेत.

कादंबरीचा लेखकच गावागाड्याच्या मातीतून उगवलेला आहे. लहानाचा मोठा झाला आहे. खेड्यातली रग आणि धग अनुभवलेला आहे. ऊसतोड कामगाराचे आयुष्य जगलेला आहे. शेतीकामासाठीची वख्खर, पांभर, तिफण, मोघड, येठन, रुम्हणं, बेल्हं, दत्ताळ अशी सर्व अवजारे त्याने हाताळली आहेत. शेतकरी आणि शेतमजुरांचे दैन्य नि दुःख, त्यांची होरपळ आणि कष्ट त्यानेही अनुभवले आहेत. कष्टकरी बनून त्याने सृष्टी न्याहाळली आहे.

त्यामुळे निसर्गचित्राचे अलौकिक वर्णन कादंबरीत विलोभनीय वाटते. पावसाची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी, पिकाला पावसाची गरज असल्याने ‘एखादा चांदनभरी तरी पाणी झाला पाह्यजे’ अशी आस लावून बसतो किंवा पाऊस पडताच... ‘जमिनीचं गवारपण फुलत होतं.

तिच्या ओटीतली पिकं दिवसेंदिवस वाढत होती...’ आणि शेवटी ‘वसुंधरेची कूस भरवून वरुण परतीच्या प्रवासाला निघाला...’ अशा शब्दांची पखरण लेखकाची शेतीप्रती एकनिष्ठा दर्शविते. अवघ्या बळीराजाची कैफियत लेखकाने एका वाक्यात समर्थपणे मांडली आहे. तो म्हणतो, ‘अनंत अडचणींनी बळीराजाची अशीच पिळवणूक होत राहणार... त्यात त्याचा असाच बळी जात राहणार... यालाच शेतीप्रधान देश म्हणायचं का?’

कादंबरीतून गावच्या जत्रेचे वर्णन अफलातून आले आहे. त्यातल्या त्यात राजकीय आखाड्याबरोबरच कुस्त्यांचे डावपेच अगदी थक्क करणारे आहेत. बांगडी, निकाल, सवारी, कैची, खोबडी, डुब, ढाक, धोबीपछाड, लांग इत्यादी पैलवानांच्या महत्त्वाच्या डावांचे प्रकार कादंबरीला अधिक कसदार आणि समृद्ध करतात. लेखक लोककला आणि लोकसाहित्यातही रमणारा आहे. यापूर्वी त्याने ‘तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा’ हे विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या तमाशासम्राज्ञीचे समर्थपणे रेखाटलेले चरित्र आणि याचा पुढचा शिरपेच म्हणजे ‘दगडी वाडा’ होय!

कादंबरीच्या एकूण प्रवासात कुठेही अगतिकता दिसत नाही. विषय गुंतागुंतीचा वाटत नाही. कथानक दोन प्रेमीयुगलांच्या भोवताली गुंफलेले असल्याने त्यातली उत्कंठा प्रकरणानुरूप वाढतच जाते. कादंबरीतील नायक रावश्या आणि त्याची प्रेयसी उज्ज्वला या दोन पात्रांभोवतालीच सारा प्रवास आणि प्रवाह आहे. गावच्या जत्रेत पहिल्यांदा भेटलेली उज्ज्वला रावश्याच्या पहिल्याच नजरेत भरते. मनात ठसते. तिच्या सौंदर्याने मोहरून गेलेला रावश्या तिचे नाव हातावर गोंदून घेतो.

पुढे दोघांच्याही जीवनात नाट्यमय घडामोडी घडतात. काही वर्षांनंतर एका भकास नि भयाण वळणावर पुन्हा दोघांची झालेली भेट उभयंतांचे पूर्वायुष्य उजळून टाकणारी ठरते. प्रेमी जीव एकमेकांना वरू इच्छितात; मात्र जात आड येते. अशा वेळी रावश्याचा मित्र दीपकने दोघांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन केलेली शिष्टाई फलदायी ठरते. उज्ज्वलासारख्या तरुण विधवेचे आयुष्य पुन्हा एकदा सहजीवनाचा आनंद घेते, हा एक मोठा संदेश आहे.

या प्रवासात लेखकाने केलेला उपदेश रुढी-परंपरेला हादरवून टाकणारा आहे. रावश्याचा मित्र दीपक म्हणतो, ‘शहरातली माणसं जातपात मानत न्हाईत. भेदाभेद पाळत न्हाईत. तेबी माण्सं अन् आपूनबी! त्यांचे ईच्यार लई पुढे गेल्येत. आपून विहिरीत्ल्या बेडकासारखे जाती अन् पोटजातीच्या डबक्यातच अडकून पडलोय.’ दीपक पुढे म्हणतो, ‘ह्यान्ला उडू द्या की आकाशभर... द्या फेकून जातीपातीच्या कुबड्या. जग बदलतंय, आपूनबी बदलायला नको?’

आणखी एके ठिकाणी दीपक म्हणतो, ‘जातीच्या बंधनानं आजवर या देशात किती युगलांचा बळी घेत्ला असंन? इथे जात आडवी येते. धर्म आडवा येतो. ग्रह आडवे येत्यात, कुंडली आडवी येते अन् मायबापबी आडवे येत्यात...!’

कादंबरीचा सामाजिक संदेश सुखावह आहे. लेखक कविमनाचा असल्यामुळे कादंबरीत समयोचित ठिकाणी ज्येष्ठ हिंदी-मराठी कवींच्या काव्य आणि शेरांचा मतला किंवा स्वरचित काव्यपंक्ती पेरून भाव-भावनांना चेतवल्याचा प्रत्यय येतो. जसे की -

मंजिल दूर और सफर बहुत है; छोटीसी जिंदगी की फिक्र बहुत है।

मार डालती यह दुनिया कबकी मुझे; मगर माँ के दुआओं का असर बहुत है।

अशा अष्टपैलू संचिताने भरलेली आणि भारलेली ‘दगडी वाडा’ ही कादंबरी मानवी मूल्यांना स्पर्श करणारी तर आहेच; परंतु त्यातील लेखनवैशिष्ट्यामुळे आणि अनुभवसमृद्ध अभिव्यक्तीमुळे अतिशय दर्जेदार झाली आहे. कादंबरीच्या लेखकाने ‘पार्श्वभूमीत’ म्हटल्याप्रमाणे, ‘वाचकांना वाटले पाहिजे की, हे तर माझेच आयुष्य चितारले आहे.

वाचकाला हे लिखाण त्याचे किंवा आपल्याच कोणाचे तरी वाटावे आणि लेखक निमित्तमात्र ठरावा! साहित्यकृती माहितीपर अशी असावी की, वाचकाचे ज्ञान समृद्ध होऊन त्यात उदंड भर पडावी. लेखकाच्या यशाचे हेच गमक आहे. वाचकांमध्ये अशा रगदार साहित्याचा कस्तुरीप्रमाणे नकळत सुगंध दरवळतो नि बोलबाला होतो.’

‘दगडी वाडा’ ही नव्याने स्थापन झालेल्या ‘पेरणी प्रकाशन आणि वितरण’ या प्रकाशन संस्थेची पहिली साहित्यकृती असली तरी सर्व बाजूंनी दर्जेदार झाली आहे. सतीश भावसार यांनी कांदबरीचे मुखपृष्ठ तर अप्रतिम साकारले आहे. जवळपास शतकभरानंतर ‘दगडी वाडा’सारखी सशक्त, सकस आणि सर्वांगीण समृद्ध अशी ग्रामीण मराठी कादंबरी मराठी साहित्यप्रेमींच्या अंगणात आली आहे.

कादंबरी : दगडी वाडा

लेखक : योगीराज बागूल

प्रकाशक : पेरणी प्रकाशन

पृष्ठसंख्या : ३१८

मूल्य : ४०० रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com