नवे अनुबंध (प्राची जयवंत)

प्राची जयवंत
रविवार, 20 मे 2018

सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''

इमारतीच्या पार्किंगमध्ये अवंतीनं कार पार्क केली...आणि ती दमलेल्या अवस्थेतच घरात शिरली.

सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''

इमारतीच्या पार्किंगमध्ये अवंतीनं कार पार्क केली...आणि ती दमलेल्या अवस्थेतच घरात शिरली.

दिवसभराच्या मीटिंग्ज व काम यामुळं तिचं डोकं ठणकत होतं. तिनं कडक चहा करून घेतला व ती बाल्कनीत आली. चहा घेतल्यावर तिला ताजंतवानं वाटू लागलं.
हवेतला उकाडा अजून जाणवतच होता. कितीतरी दिवसांनी आज तिला घरच्या झोपाळ्यावर बसायला निवांत वेळ मिळाला होता.
तिनं घड्याळाकडं पाहिलं. स्वयंपाक करणाऱ्या ताईंना यायला अजून अवकाश होता. काय करावं बरं मोकळ्या वेळात...? फिरायला जावं की टीव्ही पाहावा की वाचन करावं...? या विचारात ती असतानाच तिला रेवाची अर्थात रेवतीची आठवण झाली. "अरे... खूप दिवसात माझं रेवतीशी बोलणंच झालेलं नाहीय.. कशी असेल ती?'
तिनं लगेच रेवतीला फोन लावला...
""हॅलो... रेवा, मी अवंती, तुझी लाडकी मैत्रीण अवी बोलतेय...कशी आहेस?''
""मी मस्त... मजेत...'' रेवा
""काय करतेयस तू?'' अवी
""अगं...अंगणातल्या झाडांना नुकतंच पाणी घालून घरात आले... तुला तर माहितेय ना... आपल्या नागपूरचा उन्हाळा किती प्रचंड असतो ते... झाडं, वेली सुकल्यासारख्या होऊन जातात... बरं, तू काय म्हणतेस. आज कशी काय माझी आठवण आली?... रेवा
""अगं, आज कंपनीतून थोडीशी लवकर आले...मुंबईत तर नुसता उकाडाच उकाडा...
आज काहीशी लवकर आल्यानं निवांत बसले होते. तेवढ्यात तुझी आठवण आली. म्हटलं फोन करावा...'' अवी
""बरं झालं गं... मलापण तुझी आठवण येतच होती. खूप दिवसांत बोलणं नव्हतं झालं आपलं...आपल्या कॉलेजच्या दिवसांत तर एकमेकींवाचून आपलं पानही हलत नसे...'' रेवा
""अगं, कॉलेजच काय, शाळेपासून म्हटलं तरी वावगं होणार नाही...'' अवी
""काय धम्माल करायचो गं आपण कॉलेजच्या दिवसांत...?'' अवी
""हो गं, ते सुंदर दिवस तर विसरूच शकत नाही मी...'' रेवा
""तुला आठवतं नं, महाबळेश्‍वरला ट्रिपला गेल्यावर झाडं बघत बघत आपण कशा जंगलात हरवलो होतो...'' अवी
""अरे हो...आणि संध्याकाळची वेळ झाल्यानं किती घाबरलो होतो दोघीही...'' रेवा
""बरं...ते असू दे. जिजू व आर्या कसे आहेत?'' अवी
""मस्तच गं...अगदी मजेत...पण तू काय ठरवलं आहेस लग्नाचं...?'' रेवा
""अरे यार... सांगितलं नं कित्येकदा...मला एवढ्यात लग्न नाही करायचं...सध्या तर मी एका मल्टिनॅशनल कंपनीत एमडी आहे. सहाआकडी पगार, स्वतःचा फ्लॅट, स्वतःची कार, घरी वरकामाला एक व स्वयंपाकाला एक अशा दोनजणी आहेत...'' अवी
""अगं हो, तसं असलं तरी विचार कर लग्नाचा,'' रेवा
""हो गं...ऽऽ'' अवी
""बरं, काकू काय म्हणतात?'' रेवा
""आई ठीकंय...जरा तब्येतीची कुरबूर असते. बाबा गेल्यापासून खचलीय जरा...दादा व वहिनी काळजी घेतात तिची...मीही अधूनमधून जात असते नागपूरला...''अवी
""बरं... बाय. छान वाटलं बोलून... तू कामात व्यग्र असतेस म्हणून मी फोन करत नाही... तुला वेळ मिळाला की अशीच फोन करत जा...आणि हं... नागपूरला आल्यावर घरी नक्की ये हं...'' रेवा
""हो... हो. नक्की येईन... बाय...'' अवी
***
अवंतीनं फोन ठेवला, तेवढ्यात स्वयंपाक करणाऱ्या ताई आल्या...कोणती भाजी करायची ते त्यांना सांगून अवंती हॉलमध्ये आली... तिला रेवतीसोबत घालवलेले सुंदर दिवस आठवू लागले. रेवती आहेच खूप प्रेमळ... मनमिळाऊ...तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
रेवती व अवंती दोघी बालपणापासूनच्या मैत्रिणी...दोघीही एकाच शाळेत शिकल्या...दोघींचीही घरं जवळ जवळ असल्यामुळं अभ्यास, खेळणं हे एकत्रच चालायचं...
बारावीनंतर रेवतीनं बीएस्सी केलं व तिचं लग्न झालं.

अवंती व तिचा दादा दोघंही अभ्यासात खूप हुशार...अवंती तर अभ्यासाबरोबरच खेळांतही पुढं असायची... गॅदरिंगच्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. वक्तृत्वस्पर्धेतही तिचा पहिला नंबर असायचा. वादविवादस्पर्धेत ती कोणत्याही विषयावर आपली मतं हिरीरीनं मांडायची... ती जेवढी हरहुन्नरी होती, धडाकेबाज होती तेवढीच संवेदनशील आणि हळवीही होती... त्यामुळं कुणालाही काही मदत लागल्यास ती मदत करायची...सहकार्य करायची.
एमएस्सी फर्स्ट क्‍लासमध्ये उत्तीर्ण झाल्यावर अवंतीनं नागपूर सोडलं व मुंबईला उच्च शिक्षणासाठी आली.
अवंतीनं पीएच.डी केलं व कॉम्प्युटरचे विविध कोर्स केले.
सुरवातीला एका कॉलेजात तिनं प्राध्यापक म्हणून काम केलं; पण तिथल्या राजकारणाचा कंटाळा येऊन तिनं ती नोकरी सोडली व एका मोठ्या कंपनीत कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून ती काम करू लागली. दुसरीकडं तिचं निरनिराळ्या स्पर्धापरीक्षा देणं व नोकरीसाठीच्या मुलाखतींना जाणं सुरूच होतं.
कालांतरानं तिला जशी हवी तशा नोकरी मिळाली व तिला साहजिकच खूप आनंद झाला.
अवंतीला कामाची खूप आवड होती.
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ती सतत कामात व्यग्र असायची. ऑफिसमधून घरी आल्यावर थोडा वेळ आई, दादा व वहिनीशी फोनवरून बोलायची व टीव्हीवर एखादी मालिका अथवा बातम्या पाहून झोपायची.
***

या आठवड्यात "लॉंग वीकेंड' आला होता...तर अचानक घरी जाऊन सगळ्यांना सरप्राईज द्यायचा विचार अवंतीनं केला. तिनं लगेच नेटवरून गुरुवारी रात्रीच्या नागपूरच्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं... कधी एकदा घरी जाऊन सगळ्यांना भेटतेय असं तिला झालं होतं.
गुरुवार उजेडताच तिनं बॅग भरली व बॅग घेऊनच ती ऑफिसला गेली. ऑफिसची सगळी कामं मार्गी लावून ती सायंकाळी कंपनीतून परस्परच विमानतळावर गेली.
वहिनीनं वाढदिवसाला भेट दिलेला गुलाबी चुडीदार अवंतीनं आज जाणीवपूर्वकच घातला होता. कपाळावर छोटीशी टिकली लावली होती व गुलाबी स्टोल चेहऱ्याला गुंडाळला होता.
विमानप्रवासाचे सगळे सोपस्कार पार पाडल्यावर ती नागपूरला जाणाऱ्या विमानाच्या प्रतीक्षेत सोफ्यावर येऊन बसली...तिनं व्हॉट्‌सऍप सुरू करताच असंख्य जोक्‍स, मेसेजेस, रेसिपीज्‌, व्हिडिओ येऊ लागले. ती ते बघण्यात गुंग झाली असतानाच, समोरच्या खुर्चीवर बसलेला देखणा तरुण आपल्याकडंच एकटक बघतोय असं तिला जाणवलं... तिनं त्याच्याकडं साहजिकच दुर्लक्ष केलं.
अवंतीनं पाहिलेला मघाचा तरुण विमानात तिच्या शेजारीच येऊन बसला होता.
एव्हाना रात्र झाली होती. उद्‌घोषणा झाली व विमानानं उड्डाण केलं.
अवंतीचं आसन खिडकीजवळचं असल्यानं ती बाहेरचं दृश्‍य पाहत होती...तिच्या शेजारीच बसलेल्या मघाच्या त्या तरुणानं लॅपटॉप उघडला व तो त्याचं काही काम करू लागला...

नागपूरला विमान उतरताच वरती ठेवलेलं आपापलं सामान घेऊन सगळे प्रवासी खाली उतरू लागले. एक बॅग व पर्स एवढंच सामान अवंतीकडं होतं... विमानतळावरून बाहेर पडताच टॅक्‍सी करून ती घरी आली. रात्रीचे साडेदहा झाले होते. फाटक उघडून ती आत आली व तिनं बेल वाजवली. दादानं दार उघडलं. वहिनी स्वयंपाकघरातलं आवरत होती. आई तिच्या खोलीत नुकतीच पहुडली होती, तर अन्वय सुटी लागलेली असल्यानं बेडरूममध्ये गेम खेळत बसला होता. बेलचा आवाज येताच तो बाहेर आला व "आत्या आली... आत्या आली...' म्हणत नाचू लागला... अवंतीनं त्याचे लाड केले. तेवढ्यात वहिनी व आईही बाहेर आली व अवंतीला पाहून त्यांनाही खूप आनंद झाला.
""अरे वा... मस्त... अचानक आलीस...'' असं म्हणत वहिनीनं अवंतीला जवळ घेतलं. अवंतीनं आईला नमस्कार केला. आईनं तिच्या गालांवरून हात फिरवून लाड केले.
""काय म्हणतेस अवी...?'' असं म्हणत दादानंही अवंतीच्या डोक्‍यावरून हात फिरवला... सगळ्यांच्या प्रेमानं अवंतीला गहिवरून आलं...

""तीन दिवस जोडून सुटी आल्यानं येण्याचा बेत केला; पण म्हटलं सरप्राईज द्यावं म्हणून मुद्दामच नाही कळवलं,'' अवंतीनं हसत हसत खुलासा केला.
""बरं... बरं, आता जेवून घे व आराम कर,'' वहिनी म्हणाली. थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा करून अवंती तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. थकलेली-दमलेली असल्यानं तिला लगेच झोप लागली.
सकाळी सकाळी तिला कोकिळस्वरांनी जाग आली...तिच्या खोलीच्या समोरच्या बाल्कनीत कोकिळकूजन सुरू होतं. अंगणातलं आंब्याचं झाड कैऱ्यांनी लगडलं होतं. शेजारचा मोगराही पांढऱ्याशुभ्र फुलांनी डवरला होता....त्याचा सुगंध दरवळत होता...कुंपणावर मधुमालती मन मोहून घेत होती. तिचा मंद मोहकसा सुगंध अवंतीला प्रसन्न करून गेला...ती शेजारच्या जिन्यानं अंगणात आली... वहिनीनं काल दारासमोर काढलेली साधी व नाजूकशी रांगोळी तिला मनातून खूप सात्त्विक आनंद देऊन गेली...शेजारच्या अंगणात गुलाब, शेवंतीही होती. कोपऱ्यातला गुलाबी चाफा सर्वांगानं बहरला होता... त्याचाही मंद हलका सुवास जाणवत होता...मदनबाणाचा वेल गच्चीपर्यंत चढवलेला होता...त्यावरही नाजूक फुलं उमलली होती...ती समोरच्या झोपाळ्यावर बसून हलकेच झोके घेऊ लागली. अजून घरातले सगळे जण उठायचे होते. घरातल्या एसीपेक्षा तिला अंगणातल्या शीतल, सुगंधी हवेत जास्त प्रसन्न वाटू लागलं.
थोड्या वेळात घरात वर्दळ जाणवताच अवंती घरात आली व तिनं अन्वयला त्याच्यासाठी आणलेली खेळणी, खाऊ व कपडे दिले.
अवंती सकाळचं आवरून आईशी गप्पा करायला तिच्याजवळ बसली. वहिनीनं अवंतीच्या खास आवडीचा नागपुरी पद्धतीचा स्वयंपाक केला...आमरस व पुऱ्याही केल्या... हसत-खेळत सगळ्यांचं जेवण झालं.
अवंतीला आईसाठी व वहिनीसाठी नागपुरी पद्धतीच्या कॉटनच्या साड्या घ्यायच्या असल्यानं ती वहिनीसोबत मार्केटमध्ये गेली... तिनं साड्या व दादासाठी एक शर्ट घेतला. दुसऱ्या दिवशी रेवतीकडं जायचा तिचा बेत होता.
***

रेवतीलाही काहीच कल्पना न देता अवंती तिच्याकडं गेली.
रेवतीचा बंगला प्रशस्त होता. तिनं बेल वाजवताच एक तरुण दारात आला.
""कोण पाहिजे?''
"अरे...! हा तर तोच विमानतळावर दिसलेला तरुण व आपला सहप्रवासी...पण हा इथं काय करतोय...? आपला पत्ता तर चुकला नाही ना?' असा विचार करत अवंतीनं नेमप्लेट वाचली...
तेवढ्यात ""अरे सारंग... कोण आलंय रे?'' असं विचारत रेवतीच बाहेर आली.
क्षणभर गोंधळलेली अवंती जरा सावरली व तिने रेवतीला मिठी मारली. ""अगं, किती दिवसांनी भेटतोय आपण अवी...'' रेवा
""हो गं, रेवा, खरंच...''अवी
""परवाच बोलणं झालं आपलं तर त्या वेळी का नाही काही सांगितलंस?'' रेवा
""अगं...सरप्राईज देण्यात मजा वाटते नं मला... म्हणूनच नाही कळवलं...'' अवी
अवंती आत सोफ्यावर येऊन बसली... दार उघडणारा तरुण आत गेला होता... "तो कोण, हे विचारावं का रेवतीला?' असा विचार अवंती करतच होती, तेवढ्यात रेवतीनं ""सारंग, ये रे... तुला माझ्या सख्ख्या मैत्रिणीची ओळख करून देते...'' असं म्हणून आत डोकावत सारंगला बोलावलं.
आपल्या हृदयाची धडधड अवंतीला स्पष्टपणे जाणवत होती; पण वरकरणी तसं न दर्शवता ती घरातल्या शोभेच्या वस्तू पाहू लागली.
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''
""अगं, बास, बास...किती स्तुती करशील माझी...?'' अवी
""आणि अवी...'' आता अवंती ऐकायला उत्सुक होती; पण वरती पाहायचं तिला धाडस होत नव्हतं...
""हा माझा सख्खा दीर...सारंग... आपल्यापेक्षा फक्त एका वर्षानं मोठा आहे...''
""हॅलो'' म्हणत सारंगनं हात पुढं केला. अवंतीनं शेकहॅंड केला..
""आर्या कुठं आहे?'' मनातली चलबिचल लपवत अवंतीनं प्रश्‍न केला.
""समोरच्या मैत्रिणीकडं गेलीय खेळायला ती आणि सागर आज सकाळी त्याच्या मित्राच्या लग्नाला गेलाय...रात्री येईल...'' रेवा
""बरं... असू दे... हा तुमच्याकरता खाऊ व हा आर्यासाठी ड्रेस व खाऊ'' असं म्हणत बॅगमधून आणलेल्या वस्तू अवंतीनं रेवतीला दिल्या.
एव्हाना रेवतीचा स्वयंपाक आवरला होता. दोन्ही मैत्रिणींच्या खूप दिवसांच्या गप्पा साठल्या होत्या...दोघीही भरभरून व्यक्त होत होत्या... आर्या खेळून आल्यावर सगळ्यांचं जेवण झालं. मग पुन्हा दोघींच्या मनसोक्त गप्पा व हसणं, खिदळणं सुरू झालं. जुन्या आठवणींत दोघीही मनसोक्त रमल्या होत्या.
""चल गं, रेवा...संध्याकाळ झाली...दिवस कसा सरला कळलंच नाही.. छान गेला तुझ्याकडचा वेळ. आता उद्या रात्रीच्या विमानानं परत जाईन...''अवी
रेवतीला आपल्या लाडक्‍या मैत्रिणीला निरोप देताना भरून आलं... ""खूप छान वाटलं गं आलीस तर...'' रेवा
""बरं...आता तुम्ही सगळे या हं मुंबईला...'' अवी
""हो... नक्की...'' रेवा
अवंतीनं रिक्षा केली...आपलं मन काहीसं उदास व बेचैन आहे, असं तिला जाणवलं...
का आपल्याला आज असं वेगळंच जाणवतंय? तिला उत्तर सापडत नव्हतं.
रेवतीला सारंगबद्दल विचारावंसं अवंतीला वाटत होतं; पण ती एवढी डॅशिंग असूनही आज शब्दांनी का असा बंद पुकारला होता?
"किती मन मोकळं करत असते मी प्रत्येक विषयावर...पण आज मला हे काय झालंय...?' अवंतीच्या मनाची नुसती घालमेल सुरू होती...तेवढ्यात घर आलं... अवंती घरात आली.
ती घरात आल्यावर पुन्हा कालच्यासारखाच गलका सुरू झाला...
""काय गं... कसा गेला दिवस?'' दादानं विचारलं.
""एकदम मजेत...खूप गप्पा केल्या आम्ही...'' अवी
सायंकाळी अंगणात सगळे जण जमले. बोलताना अवंती शांत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. ""अवी... तू आज जरा गप्प का? बरं वाटत नसेल तर वर जाऊन आराम कर...'' वहिनी
""बरं...आलेच थोड्या वेळात...'' अवी
अवंतीनं खोलीत येऊन गार पाण्यानं चेहरा धुतला...रेवतीचे शब्द तिच्या कानात एकसारखे घुमू लागले ः "हा सारंग...माझा धाकटा दीर...आपल्यापेक्षा फक्त एक वर्षानं मोठा आहे...अमेरिकेत असतो. एक महिन्यासाठी भारतात आलाय... जमलं तर लग्न करूनच जाणार आहे...'
अवंतीच्या डोळ्यांसमोरून सारंगचा हसतमुख चेहरा हलत नव्हता.
ती खुर्चीवर स्तब्धपणे बसून राहिली...तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला... रेवतीचा फोन होता.
""हॅलो, हं बोल गं रेवा... मी पोचले नीट घरी...'' अवी
""अगं, तू मुंबईत राहणारी मुलगी...तू नीट पोचली असतीसच; पण मी आत्ता वेगळ्याच कारणासाठी तुला फोन केलाय...'' रेवा
""कशासाठी गं?'' अवी
""अगं, तू घरी गेलीस आणि सारंगनं इकडं मला सांगितलं, की तू त्याला विमानतळावर भेटली होतीस म्हणून...व तुम्ही एकाच केबिनमधून प्रवास केल्याचंही सांगितलं मला त्यानं... त्याच्या मनात तू भरलीस...त्याला आवडलीस तू. तर आता तू हे आई, दादा, वहिनी यांना सगळं सविस्तर सांग. उद्या सकाळी आम्ही तुमच्याकडं तुला रीतसर मागणी घालायला येतोय...!'' रेवा
""अरे...! हे...हं...बरं...बरं...'' असं काहीसं असंबद्ध बोलत अवंतीनं फोन ठेवला.
नाजूक वेलीवर अलवारपणे पाखरू येऊन बसावं...चांदणं बरसताना त्याचं स्वच्छ प्रतिबिंब तळ्यात उमटावं असं काहीसं अवंतीचं होऊन गेलं.
अवंती जिना उतरून खाली आली. तिनं आपल्या मैत्रिणीसमान असलेल्या वहिनीला लाजत मनातलं गूज सांगितलं व खाली मान घालून उभी राहिली.
""क्काय सांगतेस काय? अगं, आम्ही या दिवसाची तर किती आतुरतेनं वाट पाहतोय...'' वहिनी.
वहिनीनं बाहेर येऊन आनंदानं आईला व दादाला घडला प्रकार सांगितला व उद्या सकाळी 10 वाजता मुलाकडचे येणार आहेत, असंही सांगितलं...
घरातला आनंद द्विगुणित झाला.
दुसऱ्या दिवशी रेवती, सागर, आर्या व सारंग अवंतीकडं आले.
दादानं सगळ्यांचं स्वागत केलं...
सागर आणि दादा बोलू लागले...
सागर म्हणाला ः ""खरंतर काल अवंती आली होती आमच्याकडं; पण मी लग्नाला गेलेलो असल्यानं तिची भेट होऊ शकली नाही. अवंती घरी गेल्यावर सारंगनं रेवतीला विमानतळावरचा घडला प्रकार सांगितला...म्हणून आम्ही सारंगसाठी अवंतीला मागणी घालायला आलो आहोत...अर्थात याबाबत अवंतीचं मत सर्वाधिक महत्त्वाचं. तिला हे स्थळ मान्य नसेल तर आम्ही "योग नव्हता' असं समजू व आपले जुने संबंध पहिल्यासारखेच अबाधित राहतील...मी थोरला असल्यानं आई-बाबांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलीय...म्हणून काल गावी फोन करून आईला व बाबांना याबाबत मी स्पष्ट कल्पना दिली आहे...''
आता सगळ्यांच्या नजरा अवंतीकडं वळल्या...
ती लाजून खाली मान घालून बसली होती; पण तिनं वहिनीला तिचा निर्णय व होकार आदल्या दिवशीच सांगितला होता...त्यानुसार, "अवंतीला हे स्थळ पसंत आहे,' असं वहिनीनं तिच्या वतीनं सगळ्यांना सांगितलं.
घरात आनंदीआनंद झाला. सारंगबद्दलची सविस्तर माहिती सागरनं दिली व चहा-नाश्‍ता झाल्यावर लग्नाबाबतची सर्व ठरवाठरवी कधी करायची यावर चर्चा झाली. सायंकाळच्या विमानानं अवंती मुंबईला गेली. अवंतीला खूप चांगलं स्थळ मिळाल्याचा आई, दादा व वहिनीला आनंद झाला.
गुरुजींना घरी बोलावून लवकरचा मुहूर्त ठरवण्यात आला व एका शुभघटिकेस अवंती आणि सारंग विवाहबद्ध झाले.
वरात घरी आल्यावर रेवतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. "आज माझी जिवाभावाची सखी माझी धाकटी जाऊ म्हणून माझ्या घरात येतेय यासारखं दुसरं भाग्य कोणतं?' रेवती मनात म्हणत होती...
माप ओलांडून अवंतीनं घरात प्रवेश केला, तसं रेवतीनं तिला जवळ घेतलं व तिला म्हणाली ः ""आपण बालपणापासूनच्या मैत्रिणी नं...तर देवालाही आपल्याला एकत्रच ठेवायचं होतं म्हणूनच हा योग आला...असा योग फार कमी जणांना लाभतो...''
अवंतीलाही तिचं म्हणणं पटलं...ती मनापासून हसली...दोघी बालमैत्रिणी नव्या नात्यानं पुन्हा एकत्र बांधल्या गेल्या. हे नवे अनमोल अनुबंध दोघींनाही हवेहवेसे होते...अगदी कायमचे!

Web Title: prachi jaywant wirte article in saptarang