अमेरिका खुल्या संस्कृतीचा उमदा देश

प्रत्येक जागेची एक ‘कथा’ असते किंवा एकाच जागेच्या अनेक कथा असतात. कथा म्हणजे ‘स्टोरी’ आणि स्टोरी म्हणजेच ‘कन्टेन्ट.’
America
AmericaSakal

प्रत्येक जागेची एक ‘कथा’ असते किंवा एकाच जागेच्या अनेक कथा असतात. कथा म्हणजे ‘स्टोरी’ आणि स्टोरी म्हणजेच ‘कन्टेन्ट.’ सध्याचं जग हे कन्टेन्टचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. ज्या व्यक्तींकडे कन्टेन्ट असतो त्या व्यक्तींचे विचार लोक वाचतात, त्यांना ऐकतात, फॉलो करतात; पण या विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडे हा कन्टेन्ट येतो कुठून? तर तो त्यांच्या क्षेत्रातील अभ्यासातून येतो; परंतु त्याला अधिकची जोड असते ती म्हणजे प्रवासाची. बघा ना, बहुसंख्य मोठ्या व्यक्ती या प्रवासी असतात. सतत नावीन्याचा शोध घेत त्या जगत असतात आणि त्या अनुभवांतून त्यांच्याकडून निर्माण होणारा कन्टेन्ट अनेकांना प्रेरणा देतो. तुम्हालाही कथा, स्टोरी किंवा कन्टेन्ट आवडतो? तर मग तुम्हीही छोटा-मोठा प्रवास करत राहा. जमेल तेव्हा खूप दूर जा...प्रवास करा...अगदी कुठंही...ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत असाल ती उत्तरं तुम्हाला नक्कीच सापडतील. तुमचा प्रवासच तुमच्यासाठी नवी दारं उघडेल. जगातील कोट्यवधी लोकांना नवी दारं खुली करून देणाऱ्या देशाचं कौतुक करावं तितकं थोडंच.

ज्या देशात लाखो कथा आहेत, जिथून नवनवीन कल्पना येत राहतात, अनेक गोष्टींची प्रेरणा ज्या देशातून मिळते आणि आपल्या ओळखीतील एक तरी व्यक्ती ज्या देशात जाऊन आली आहे अथवा वास्तव्य करत आहे असा देश म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States of America). क्षेत्रफळानुसार हा जगातील चौथा मोठा देश.

ता. चार जुलै १७७६ रोजी त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा केली गेली आणि तेव्हापासून चार जुलै हा अमेरिकेचा ‘राष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरा होतो. आजच तो दिवस आहे, त्याचंच निमित्त म्हणून महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या पर्यटनाबद्दल मला तुम्हाला सांगायचंय.

United Stories: Where People and Places Connect असं अमेरिका-पर्यटनाचं घोषवाक्य आहे. जगभरातील विविध देशांचे लोक अमेरिकेत राहत असल्यामुळे तिथं संस्कृती सतत बदलत असते; परंतु या विशाल राष्ट्रात प्रत्येक संस्कृतीचा एक कोपरा आहे असं म्हणायला हरकत नाही. जवळपास ३३ कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशाची प्रमुख भाषा इंग्लिश असून, संपूर्ण वर्षभर इथं पर्यटनाला वाव आहे.

अमेरिकेत एकूण ५० ‘स्टेट्स’ आहेत, तसेच पॅसिफिक (Pacific), पश्चिम (West), नैर्ऋत्य (Southwest), मध्यपश्चिमी (Midwest), आग्नेय (Southeast), ईशान्य (Northeast) व यूएसए प्रांत (USA Territories) असे त्यांचे सात भाग करता येतात; परंतु प्रवाशांसाठी साधं-सोपं म्हणजे पूर्व किनारा (East Coast) व पश्चिम किनारा (West Coast) अशा दोन भागांत पर्यटन करता येतं. असं केल्यास फिरायला सोपं जातं व जवळपास सर्व पर्यटनस्थळं बघता येतात. विशाल असणाऱ्या अमेरिकेला फिरायला जाण्यापूर्वी कुठं जायचंय, काय पाहायचंय, कसं करायचंय याबाबतची स्पष्टता कुठल्याही प्रवाशाला हवी, तरच नीट फिरता येईल. नाहीतर सगळंच पाहायचं म्हटलं तर कित्येक महिने-वर्षंसुद्धा अपुरी पडतील. नैसर्गिक चमत्कार, भन्नाट शहरं, ऐतिहासिक ठिकाणं आणि करमणूकस्थळं पाहण्यासाठी दरवर्षी अमेरिकेला कोट्यवधी पर्यटक भेट देत असतात. सन २०१९ मध्ये पर्यटनातून १.१ ट्रिलियन अमेरिकी डॉलर उभे राहिले, तसंच जवळपास ८० लाख लोकं हे पर्यटन-उद्योगावर अवलंबून आहेत. परदेशी लोक व स्थानिक नागरिक दिलखुलास पर्यटन करताना दिसतात.

अमेरिकेत पाहाण्यासारखी व अनुभवण्यासारखी हजारो ठिकाणं व गोष्टी आहेत. देशभर पसरलेली अद्भुत ठिकाणं प्रवाशांच्या-पर्यटकांच्या जणू प्रतीक्षेत असतात! ज्याच्याकडे अमर्याद वेळ आणि संसाधनं आहेत त्याच्यासाठी हा देश पर्वणीच. लास वेगासचं (Las Vegas) अफलातून नाईट लाईफ, तसंच त्याच्यापासून जवळ ग्रॅंड कॅन्यन (Grand Canyon) हे एक निसर्गाचा चमत्कार म्हणावा असं ठिकाण आहे. कॅनडा-अमेरिका सीमावर असलेला नायगारा (Niagara Falls) हा जगप्रसिद्ध धबधबा पाहता येतो.

स्वातंत्र्याचं प्रतीक असलेला न्यूयॉर्कमधला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी,’ सन १७९२ रोजी बांधण्यात आलेलं वॉशिंग्टन येथील राष्ट्रपतींचे घर ‘द व्हाइट हाऊस,’ ओरलॅंडो येथील भव्य ‘वॉल्ट डिस्ने’ मनोरंजन-पार्क ही काही प्रमुख आकर्षणांपैकी आहेत. याशिवाय योसेमाइट राष्ट्रीय पार्क, गोल्डन गेट ब्रिज व अर्थव्यवहारांची न्यूयॉर्क येथील मुख्य जागा टाईम्स स्क्वेअर याही जागा बघण्यासारख्या आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, सिॲटल इत्यादी प्रमुख शहरं असून तिथं मोठ्या प्रमाणात आयटी सेक्टर आहे, तसंच पूर्व किनारपट्टीवरील फ्लोरिडा स्टेटमधील मियामी (Miami) या ठिकाणी जगभरातील तरुणवर्ग ‘पार्टी लाईफ’साठी प्रचंड गर्दी करतो. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते. रस्ते, फ्लाइट-कनेक्टिव्हिटी व रेल्वेसेवा सर्वत्र बऱ्यापैकी पसरलेली असल्यामुळे प्रवासासाठी ते सुखकर होतं.

खरं तर अमेरिकेतील प्रत्येक स्टेटविषयी स्वतंत्रपणे लिहिता येऊ शकतं; परंतु १५ दिवसांत बऱ्यापैकी फिरायचं असल्यास कॅलिफोर्निया ते न्यूयॉर्क असा सरासरी पाच हजार किलोमीटरचा Coast to Coast रेल्वे प्रवास करता येऊ शकतो आणि त्यात अनेक थांबे घेत पर्यटन करता येतं, तसंच व्यवस्थित नियोजन करून ‘रोड ट्रिप’ही करता येतात. पॅसिफिक भागात असलेल्या अलास्का (Alaska) इथं अनेकांना जायचं असतं. साहसी वृत्तीचे लोक या भागात विविध मोहिमा करतात. असंख्य संग्रहालये, नेत्रदीपक ठिकाणं, पशू-प्राणी यांची पार्क्स, कंट्री लाईफ अनुभवता येईल अशी लांबच्या लांब किनारपट्टी, साहसी खेळ, जगभरातील बहुतेक सर्व पाककृती, संस्कृती-परंपरा व विविध फेस्टिवल्स असे भरपूर पर्याय अमेरिकेत प्रवाशांना उपलब्ध असतात. आपल्याकडे मात्र फिरण्याची, नवं पाहण्याची व अनुभवण्याची क्षमता पाहिजे. मग नक्कीच अमेरिकेत ‘जिंदगी वसूल’ करता येईल. अर्थात्, एकाच भेटीत सगळं होईलच असं नाही.

तर मित्रांनो, अमेरिकेत किंवा इतर कुठंही प्रवास केलात तर तुमच्या स्वत:च्या कथा तयार होतील. थोडक्यात काय तर, बोलायला-लिहायला कन्टेन्ट असेल आणि मग मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना तुमच्याकडे शेकडो किस्से असतील. ती खरी आयुष्याची मजा, बरोबर ना? एखाद्या संध्याकाळी निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांना प्रवासवर्णनं सांगत निवांत बसायचं...हे म्हणजेच Leisure Time किंवा Quality Time. आणि मग याच स्टोरीज् भविष्यात पुढच्या पिढीला सांगायच्या. कथांमधून प्रेरणा द्यायची, स्वत: प्रवास करायचा आणि इतरांनाही प्रवास करायला प्रवृत्त करायचं.

प्रवासातील कथांमधून स्वत:लाही नवं काही तरी नक्की सापडेल... कुणी सांगावं!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com