जगातील लहान देश...

Vatican-City
Vatican-City

सीमा राष्ट्रांना परिभाषित करतात. एखाद्या देशाची राजकीय आणि शक्यतो नैसर्गिक मर्यादा त्याचं भौतिक क्षेत्र निश्र्चित करते आणि अशा प्रकारे त्याचा आकारही ठरवते. राजकीय सीमा म्हणजे कृत्रिम रेषा या एका राजकीय अस्तित्वासाठी आखल्या जातात, तर नैसर्गिक सीमा समुद्र, नद्या आणि पर्वतरांगा यांना प्रमाण मानतात. देश म्हणजे लोक, संस्कृती, भाषा, भूगोल इत्यादी गोष्टींनी ओळखले जाणारे प्रदेश. जगातले काही देश मोठे आहेत, तर काही लहान आहेत. काही देश इतके छोटे आहेत की इतर देशांची काही शहरं किंवा गावंही त्याहून मोठी आहेत. इतर काही देशांतील शहरांच्या उद्यानांपेक्षा लहान असेही काही देश आहेत ही अतिशय मजेशीर बाब! या छोट्या देशांचं स्वतःचं सरकार आहे, संस्कृती आहे. यातले काही तर जगातील श्रीमंत देश म्हणूनही गणले जातात.

आपल्याला काही दिवसांत जर एखाद्या देशाचा दौरा करायचा असेल आणि असं वाटलं की आपल्याला तो देश संपूर्ण, म्हणजेच कोपरा न् कोपरा, पाहायचाय तर जगातील सर्वात लहान देशांबाबत तसं करणं अगदी शक्य आहे! जगातील अशाच तीन लहान देशांबद्दल (क्षेत्रफळानुसार) आज आपण जाणून घेऊ या. हे तिन्ही देश ‘मान्यताप्राप्त देश’ आहेत.

नाऊरू (Nauru) 
हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा लहान देश. या देशाचं क्षेत्रफळ २१ चौरस किलोमीटर असून सध्याची लोकसंख्या बारा हजार ५८१ आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला हा देश आहे. दुर्गम पॅसिफिक बेटांच्या देशांच्या यादीत नाऊरूचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होणार नाही; किंबहुना नाऊरू हा जगातील सर्वात दुर्गम देशांपैकी एक मानला जातो. हे एकेकाळी ‘प्लेझंट आयलंड’ म्हणून ओळखलं जात असे. कमीत कमी तीन हजार वर्षांपूर्वी मायक्रोनेशियन्स आणि पॉलिनेशियन्स इथं स्थायिक झाले. सन १९४२ ला जपाननं इथं बॉम्बस्फोट घडवून आणला; पण त्यानं फार काही फरक पडला नाही. त्यानंतर १९६६ पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याद्वारे इथला राज्य कारभार होत असे. सन १९६८ मध्ये नाऊरूला स्वातंत्र्य मिळालं.

‘सर्वात जास्त वजनदार व्यक्तींचा देश’ (People with obese weight) अशीही या देशाची ओळख आहे. इंग्लंडच्या राणीनं १९८२ मध्ये या देशाला भेट दिली. ‘सर्वात लहान बेटराष्ट्र’ म्हणूनही नाऊरू परिचित आहे. फॉस्फेटच्या साठ्यामुळे एकेकाळी हा जगातील सर्वात श्रीमंत देश मानला जात असे. मात्र, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, आता हा देश सर्वात कमी जीडीपी असलेला देश आहे. १९०७ मध्ये इथं चार किलोमीटरचा नॅरो गेज रेल्वे ट्रॅक बांधला गेला. इथले बहुतांश लोक इंग्लिश बोलतात. या बेटावर पोलिस बंदोबस्त असला तरी तिथं लष्कर नाही. कारण, नाऊरूच्या सुरक्षिततेची जबाबदारी ऑस्ट्रेलियावर आहे. फुटबॉल व वेटलिफ्टिंग हे या देशाचे राष्ट्रीय खेळ आहेत. जगाच्या उर्वरित भागापासूनची विलगता आणि आकर्षणस्थळांचा अभाव यांमुळे नाऊरूला फारच कमी पर्यटक भेट देतात. 

मोनॅको (Monaco)  
युरोपातील हा देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश. या देशाचं क्षेत्रफळ दोन चौरस किलोमीटर असून लोकसंख्या ३८ हजार ३०० आहे. संयुक्त राष्ट्र संघाची या देशाला मान्यता असून, लोकांची भाषा फ्रेंच आहे व इथलं चलन आहे युरो. अतिशय आकर्षक बंदरे, माँटे कार्लो कॅसिनो आणि भव्य प्रिक्स सर्किट या बाबींसाठी हा देश प्रसिद्ध आहे. 

मोनॅकोची अर्थव्यवस्था पूर्णतः कॅसिनोवर आणि पर्यटनावर अवलंबून आहे. जुगार, लक्झरी वस्तू आणि सेवा-उद्योगासंदर्भातही या देशाची ओळख आहे. इथला सर्वात लोकप्रिय वार्षिक उपक्रम म्हणजे ‘फॉर्म्युला वन ग्रॅंड प्रिक्स’ ही शर्यत. इथले अंदाजे ३० टक्के रहिवासी लक्षाधीश असून या लहान देशात अफाट संपत्ती आहे. याव्यतिरिक्त, मोनॅकोचा जीडीपी जगातल्या इतर देशांच्या जीडीपीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. साहजिकच इथं दारिद्र्य नाही आणि बेरोजगारीचा दरही शून्य टक्के आहे.

व्हॅटिकन सिटी (Vatican City) 
आकार आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतींत सर्वात लहान देश म्हणजे व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटीला ‘होली सी’ (Holy See) असंही संबोधलं जातं. त्याचं एकूण क्षेत्रफळ ०.४४ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या आहे केवळ ८३९. भारतातील काही खेड्यांच्या लोकसंख्येपेक्षाही ही लोकसंख्या कमी आहे. विशेष म्हणजे, ‘युनेस्को’नं जागतिक वारसा म्हणून नियुक्त केलेला हा जगातील एकमेव देश आहे! व्हॅटिकन सिटीचे सर्वात प्रसिद्ध नागरिक म्हणजे पोप. सेंट पीटर स्क्वेअर, सिस्टिन चॅपल आणि व्हॅटिकन संग्रहालय ही इथली सुप्रसिद्ध पर्यटनस्थळं. सेंट पीटर्स, बॅसिलिका हे कॅथॉलिक चर्चचं महत्त्वाचं तीर्थस्थान मानलं जातं. 

बॅसिलिकाचा सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे त्याचे घुमट. सन १६१४ मध्ये या घुमटांचं बांधकाम पूर्ण झालं. इतर बरीच कॅथेड्रल्स आणि इमारतींच्या रचना हे घुमट डोळ्यांपुढे ठेवून केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, वॉशिंग्टनमधील कॅपिटल आणि लंडनमधील सेंट पॉल कॅथेड्रल. म्हटलं तर, एका दिवसात सगळा देश फिरून होतो! या १०९ एकरांच्या देशात लॅटिन ही प्रथमभाषा असून इंग्लिशही बोलली जाते. 

या तीन देशांशिवायही तुवालू, रिपब्लिक ऑफ सॅन मारिनो, लिंचेस्टाईन, मार्शल आयलॅंड्स, सेंट किट्स आणि नेव्हिस, मालदीव्ज्, माल्टा असेही आणखी बरेच लहान देश आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्यं वेगवेगळी. आपण अशा ‘ऑफबीट डेस्टिनेशन’लाही आवर्जून भेटी द्यायला हव्यात; जेणेकरून तिथली संस्कृती, भाषा व लोकांचं राहणीमान अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि कुठल्या तरी भन्नाट ठिकाणी जाऊन आल्याचा आनंद व समाधानही लाभेल...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com