विविधतेनं नटलेला थायलंड

पर्यटन म्हटलं की भारतीयांना पहिल्यापासून युरोपबद्दल जसं आकर्षण असतं, तसंच ते पश्चिमेकडील संयुक्त अरब अमिराती व आग्नेय आशियातील थायलंड-मलेशिया-सिंगापूर आदी देशांचंही असतं.
Thailand
ThailandSakal

‘प्रवासात सर्वात चांगलं असं काय शिकायला मिळत,’ असं जर मला कुणी विचारलं तर मी हमखास म्हणेन, ‘जगात खूप चांगले लोक आहेत, हेच मला कुठलाही प्रवास नेहमी शिकवतो.’

प्रेमळ, दयाळू, काळजी वाहणारे व उदारमतवादी लोक मला अनेकदा भेटतात आणि त्यांच्याशी माझी सहजपणे मैत्रीही होते. जगभर मित्र पसरलेले असतील तर हे मोठं जगही छोटं वाटू लागतं. चांगले लोक भेटल्यानं अधिक सकारात्मकता येते. प्रवासातील एखादा साधा अनौपचारिक संवादही आपलं जगणं बदलू शकतो. बघता बघता निम्म वर्ष सरलं. गेल्या दोन आठवड्यांत लोक महाराष्ट्रात का होईना; स्वत:ची व इतरांची काळजी घेऊन एक-दोन दिवसांचे प्रवास करत आहेत हे पाहून फार आनंद होतोय. येत्या काळात निश्चितच लोक भारतभर व जगातही भ्रमंती करतील असं दिसतंय. यातूनच पुन्हा स्थानिक लोकांना रोजगार मिळू लागेल आणि आपल्यापैकी काहींमध्ये आलेली मरगळही झटकता येईल. त्यामुळे प्रवासासाठी सगळ्यांना खूप शुभेच्छा!

पर्यटन म्हटलं की भारतीयांना पहिल्यापासून युरोपबद्दल जसं आकर्षण असतं, तसंच ते पश्चिमेकडील संयुक्त अरब अमिराती व आग्नेय आशियातील थायलंड-मलेशिया-सिंगापूर आदी देशांचंही असतं. आग्नेय आशियात जाणं मला खूप आवडतं. आपल्याला असलेले काही न्यूनगंड तिथं गेल्यानंतर दूर होतात. उदाहरणार्थ : भाषेचा न्यूनगंड! आग्नेय आशियात मोडकंतोडकं इंग्लिश बोललं जातं, त्यामुळे आपणही तसंच बोललो तरी त्यांना आणि आपल्याला ते सहज समजतं.

याच आग्नेय आशियातल्या थायलंड या देशाबद्दल आज मी तुम्हाला काही सांगणार आहे.

सरासरी १९ लाख भारतीय नागरिक थायलंडला दरवर्षी फिरायला जातात. तिथली प्रमुख भाषा ‘थाय’ असून लोकसंख्या सात कोटी आहे. बॅंकॉक ही थायलंडची राजधानी आहे. मी या देशात कितीही वेळा जाऊ शकतो. कारण, मला हा देश भारी वाटतो! मी थायलंडला शेवटचं नोव्हेंबर २०१९ मध्ये गेलो होतो. खरं तर व्हिएतनाम, कंबोडिया व थायलंड अशी मी तीस दिवसांची ट्रिप केली होती. माझा तीन देशातील तीस दिवसांचा संपूर्ण खर्च हा फक्त एक लाख ६१ हजार इतका आला होता. खरं तर तो मला अजूनही जास्तच वाटतो; परंतु माझ्या एक-दोन फ्लाईट्समुळे खर्च अचानक वाढला व खाण्यावरही जरा अधिकचा खर्च झाला. तरीही महिनाभर तीन देशांत फिरणं म्हणजे पक्कं ‘बजेट ट्रॅव्हलिंग’ झालं होतं. ‘डू इट युवरसेल्फ’ हा सिद्धान्त वापरून असं करणं सहज शक्य आहे असा आत्मविश्वास मनाशी बाळगून तुम्हीही येत्या काळात थायलंडला जाऊ शकता...!

एखाद्या प्रवाशाला फिरण्यासाठी जे जे हवं असतं ते ते थायलंडमध्ये आहे. उदाहरणार्थ : परिपूर्ण समुद्रकिनारे, हिरवं घनदाट जंगल, प्राचीन अवशेष, अतिसुंदर बेटं, सोनेरी मंदिरं, मोहक कोरल रीफ्स, मिळून-मिसळून वागणारे स्थानिक नागरिक, वेगवेगळ्या घडामोडी सतत घडत असणारी शहरं, वेगळ्याच चवीचं ‘हट के’ अन्न, मस्त हवामान आणि असंख्य पंचतारांकित हॉटेलं...हे सारं एकाच देशात अनुभवायचं असेल तर थायलंड हेच उत्तर आहे.

त्या देशात जरी कायमच राजकीय अस्थिरता असली तरी जगभरातील प्रवासी नेहमी तिथं जात राहतात. पावसाळा सोडला तर ऑक्टोबर ते एप्रिल हे महिने तिथे प्रवास करण्यासाठी उत्तम मानले जातात. पर्यटनाच्या हिशेबानं उत्तर थायलंड व दक्षिण थायलंड असे दोन भाग या देशाचे करता येऊ शकतील. मी दक्षिण थायलंडमध्ये जास्तीत जास्त प्रवास केलाय. पुढच्या वेळी उत्तर थायलंडमध्ये फिरण्याचा मानस आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक बुद्धमंदिरं तिथं आहेत. हिंदू धर्माचाही थोडाफार प्रभाव तिथं दिसून येतो. उत्तर थायलंडमधील सुखोथाई (Sukhothai) व आयुठाया (Ayutthaya) या थायलंडच्या जुन्या राजधान्या होत्या. तिथं प्राचीन मंदिरं पाहता येतात, तसंच च्यांग माई (Chaing Mai) व च्यांग राई (Chaing Rai) ही दोन्ही ठिकाणं निसर्गरम्य आहेत. खाओ खो (Khao Kho), फू ची फाल फॉरेस्ट पार्क (Phu Chi Fa Forest Park), माई पिंग (Mae Ping) व डोई फू खा (Doi Phu Kha) नॅशनल पार्क हीसुद्धा पाहण्याजोगी ठिकाणं आहेत. मात्र, दक्षिण थायलंडमधील फुकेत (Phuket), क्राबी (Krabi) फी फी बेट (Phi Phi Island), जेम्स बाँड बेट (James Bond Island), पटाया (Pattaya), कोसामुई बेट (Koh Samui Island) व बॅंकॉक शहर ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय ठिकाणं आहेत.

शॉपिंगसाठी शेकडो मॉल, तर खवय्यांसाठी बॅंकॉक शहरात हजारो कॅफे-हॉटेलं आहेत. महिलांसाठी ‘थाई सिल्क’ हे विशेष आकर्षण ठरू शकतं. पटायाजवळील ५०० एकरांवर वसलेलं नांग नूच गार्डन्स (Nong Nooch Gardens) अतिशय सुंदर आहे. जगभरातली विविध झाडं-फुलं बघण्यात निसर्गाच्या सान्निध्यात संपूर्ण दिवस कसा गेला ते कळत नाही. वॉटरस्पोर्टस् साठी तर थायलंड मस्तच.

बुद्धांचे हजारो पुतळे देशभरात दिसतात; पण प्रत्येकाची कलाकुसर अगदी निरखून पाहावी अशी. नाईटलाईफ व पार्टीसाठी बॅंकॉक शहर व दक्षिणेतली असंख्य बेटं प्रसिद्ध आहेत. स्थानिक नागरिक त्यांची परंपरा जपताना दिसतात; तसंच त्यांना त्यांच्या परंपरेचा अभिमानही आहे. पर्यटन जोरात असल्यामुळे विकासकामांविषयीच्या आर्थिक बाबतीत ते पूरकच ठरतं. शहरात उंच इमारती, तर ग्रामीण भागात मोठे रस्ते दिसतात. या सर्व गोष्टींमुळे पर्यटक पूर्ण देशात सहजपणे फिरू शकतात. तर मित्रांनो, विविधतेनं नटलेला थायलंड देश प्रत्येकानं बघितलाच पाहिजे.

सरासरी ४० हजार रुपयांच्या आसपास थायलंडची सात दिवसांची सफर होऊ शकते. अर्थात्, प्रवासाच्या पद्धती व सुखसोई या व्यक्तिसापेक्ष असल्यानं त्या बदलत राहतात. प्रवासात चांगले लोक तर भेटतीलच; पण त्याबरोबरच छान आठवणीदेखील आयुष्यभरासाठी मिळतील. आणि हो, जर जास्त दिवस असतील तर थायलंडबरोबरच

मलेशिया-सिंगापूर अथवा कंबोडिया-व्हिएतनाम या देशांचीही त्याला जोडूनच ट्रिप केल्यास विमानखर्च वाचू शकतो व बजेट ट्रिप होण्यास मदत होऊ शकते. तर मित्र हो...कुठलाही प्रवास आखताना त्यावर रिसर्च करा, माहिती गोळा करा, प्लॅन आखा, अनुभवी प्रवाशांना-पर्यटकांना शंका विचारा आणि मगच प्रवासाला निघा...!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com