काँग्रेसला खणखणीत नाणं हवं पण फडणविसांसारखं

प्रकाश पाटील 
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

सोनिया गांधी या आज थकल्या आहेत. राहुल गांधींच्या रूपाने नवे नेतृत्व पुढे आले असले तरी म्हणावा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. ते मोदींविरोधात दोन हात करतात हे ही काही कमी नाही. तरीही ते मातोश्रीप्रमाणे अद्याप करिष्मा दाखवू शकले नाहीत. मोदी हे भाजपचे टॉनिक तर सोनिया गांधी या कॉंग्रेसचा ऑक्‍सिजन आहे हे मान्य करावे.

कालच्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल. पण, या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव जोडल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाही. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या कॉंग्रेसचा सोनिया गांधी या ही प्राण आहेत हे मान्य. तरीही महाराष्ट्रात कॉंग्रेसला फडणवीस यांच्यासारखं एक खणखणीत नाणं हवं. 

महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळविले. याचे श्रेय निश्‍चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. या निवडणुकीचे दुसरे आणि आश्‍चर्यकारक वैशिष्ट असे की कॉंग्रेसला कोणताही स्ट्रॉंग नेता नसतानाही हा पक्ष दुसऱ्या स्थानावर कसा काय आला याचे पत्रपंडितानाही आश्‍चर्य वाटले असेल. खरंच क्रमवारी लावायची असेल तर ती अशी लावायला हवी की प्रथम भाजप, दुसरी शिवसेना, तिसरा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेवटी कॉंग्रेस.

देशात नरेंद्र मोदींचा इतका झंझावात आहे, की कॉंग्रेसने सर्वत्र सपाटून मार खाला. तिला पुन्हा उभारी घ्यायला किमान पंधरा-वीस वर्षे लागतील असे मोदीभक्त मिडियावाले म्हणत आहेत. हे बरोबरही आहे. त्याचे कारणही असे आहे, की कॉंग्रेसचे देशातच नव्हे तर राज्यातील नेतृत्वही अगदी खंगले आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असल्याने कोण आंदोलन करणार, प्रवाहाविरोधात कोण पोहणार? पोलिसांच्या लाठ्याकाठ्या कोण खाणार? असे अनेक प्रश्‍न आहेत. गेल्या साठ वर्षापासून काही वर्षे सोडली तर हा पक्ष नेहमीच सत्तेत आहे. जुने म्हातारे कोतारे नेते तरुणांना संधीही देत नाही. दिली तर आपल्याच घरातील नेत्यांना तिकिटे देतात. पण, गांधी-नेहरू घराण्यावर कोणी काहीही म्हटले तरी आजही विश्वास आहे हे या ना त्या कारणाने सिद्ध झाले आहे.

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या खालोखाल कॉंग्रेसने विजय मिळविला. जर कॉंग्रेसचे नेते एकमेकाच्या पायात पाय घालण्याचे जोपर्यंत थांबवीत नाहीत तोपर्यंत कॉंग्रेसला पराभवाचे धनी हे व्हावेच लागेल. एकेकाळी कॉग्रेंस संपली असे बोलले जात असताना भारताच्या राजकीय क्षितिजावर सोनियांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास आले. पुढे काय झाले हे देशाला माहीत आहे. ज्या प्रमाणे मृत कॉंग्रेसला ऑक्‍सिजन देऊन सोनियांनी प्राण आणला. त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात खमके, नव्या दमाचे नेतृत्व उभे राहिले तर तेही विजयश्री खेचून आणू शकतात. व्हेंटीलेटरवर असलेल्या कॉंग्रेसला ऑक्‍सिजन देणारा महाराष्ट्रातही एखादा नेता केव्हा उदयास येईल याची मात्र प्रतीक्षा करावी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली त्याप्रमाणे कॉंग्रेसमधील एका तरी नेत्याचे नाव डोळ्यासमोर येते का? सर्वांना बरोबर घेऊन, केवळ नात्यागोत्याचा विचार न करणारा, स्वच्छ प्रतिमा असलेलं खणखणीत नाणं पक्षाला हवे आहे. कॉंग्रेसवर आजही तळागाळातील माणसांचा विश्वास आहे.हे नाकारून चालणार नाही. 

आज राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा उदोउदो होत असला तरी देशभरातील गावखेड्यातही मोदी इफेक्‍ट होतोच. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला बहुसंख्य नागरिकांचा पाठिंबा मिळतो हे वास्तव आहे. भले त्यांचे विरोधक काहीही म्हणोत. मोदी हे नाव इतके चर्चेत असते की त्यांनी छबी दिसताच भाजप कार्यकर्त्याला टॉनिक मिळते. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असो की स्थानिकस्वराज्य संस्था. कालच्या निवडणुकीचे श्रेय फडणवीस यांना द्यावेच लागेल. पण, या यशामागे मोदी हे नाव जोडल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होऊच शकत नाहीत. मोदी हे दोन शब्द जर वगळले तर भाजपचे काय ? या प्रश्‍नाचं उत्तर सोपे आहे आणि ते कोणीही देऊ शकते. 

सोनिया गांधी या आज थकल्या आहेत. राहुल गांधींच्या रूपाने नवे नेतृत्व पुढे आले असले तरी म्हणावा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. ते मोदींविरोधात दोन हात करतात हे ही काही कमी नाही. तरीही ते मातोश्रीप्रमाणे अद्याप करिष्मा दाखवू शकले नाहीत. मोदी हे भाजपचे टॉनिक तर सोनिया गांधी या कॉंग्रेसचा ऑक्‍सिजन आहे हे मान्य करावे.

Web Title: Prakash Patil write about Municipal council election result in maharashtra