मुस्लिम मुला-मुलींनी यशाचं शिखर गाठावं

प्रकाश पाटील 
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुस्लिम समाजातील मुला-मुलींनीही मागे न राहता सर्वच समाजाच्या हातात घालून पुढे पुढे चालायला हवे. हे माझं गाव आहे. महाराष्ट्र माझा आहे. देश माझा आहे आणि मी देशाचा आहे हीच राष्ट्रभक्तीची भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. मुस्लिम समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाचे म्हणूनच स्वागत करायला हवे.

आता तर काळ बदलला, पिढी बदलली, सर्वत्र बदलाचेच वातावरण असल्याने आपल्या मुला-मुलींनीही चांगले शिक्षण घेतले असले तर त्यांनाही नोकरी मिळावी. व्यवसाय करता यावा. सर्वांच्या बरोबरीने आपल्या मुलांनीही उंच भरारी घ्यावी. त्याच्या पंखातही बळ यावं. जगाची जाण त्यांना यावी. यशाचं क्षितिज गाठाव असे मुस्लिम समाजातील पालकांना वाटत असेल तर ते योग्यच आहे.

मराठा (मूक) मोर्चानंतर महाराष्ट्रात संविधान बचाव मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि त्यापाठोपाठ मंगळवारी मुस्लिमांचाही बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. मुस्लिमांनी आपल्या न्याय हक्कासाठी मायबाप सरकारचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला ते बरेच झाले. हिंदूधर्मातील सर्वच जातीजमातींचे जे प्रश्‍न आहेत तसेच मुस्लिमांचेही आहेत हे नाकारून चालणार नाही. गावगाड्यात मुस्लिम समाज पिढ्यान्‌पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत आला. खेड्यापाड्यातला मुस्लिम पोशाखाने कधी वेगळा वाटला नाही. त्याला नेहमीच गावगाड्यात सन्मानाची वागणूक मिळाली. शेतकरी आणि कष्टकऱ्यांमध्ये मुस्लिमांचाही सहभाग होता आणि तो आजही आहे.

पारंपारिक व्यवसाय करणारा हा समाज जागतिकीकरणाच्या जगातही मागे पडला. गोरगरीब मुस्लिमांची मुले-मुली शिकली सवरली. मात्र इतरांच्या तुलनेत हा टक्का खूपच कमी. आजही या समाजाची जी होरपळ होत आहे. त्याच्या हाताला काम नाही, नोकरी नाही, आरक्षण नाही. मग करायचे काय ? एकतर मोलमजुरी, रिक्षा चालक, गॅरेजमध्ये काम किंवा भंगार विकण्याशिवाय दुसरा पर्यायही राहिला नाही. गरिबीचे चटके सहन करीत या समाजातील अनेक मुले उच्चशिक्षित झाली. कोणी नोकरी, व्यवसायात तर कोणी राजकारणात गेली यापलीकडे तसे चित्र खूप समाधानकारक दिसत नाही. 

भाजपचे ज्येष्ठ नेते पाशाभाई पटेल नेहमीच आपल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या कथा आणि व्यथा मांडताना असे म्हणतात, की मुस्लिम समाजातील मुलांनी हातातील पाना, स्क्रुड्राईव्हर आणि हाताडो टाकून शिक्षणाचे महत्त्व जाणावे. उत्तम शिक्षण घेऊन मोठे स्वप्न पाहावे. जोपर्यंत हातात पाना आहे तोपर्यंत प्रगती होणे शक्‍य नाही. या समाजातील मुलं-मुली शिक्षणापासून तसे पाहिले तर खूप अंतरावर आहेत. याची काही कारणे असली तरी उशिरा का होईना तो जागृत झाला आहे. आपल्या हक्कासाठी तोही रस्त्यावर उतरला. याचे स्वागत व्हायला हवे आणि मायबाप सरकारनेही सहानुभूतिपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यायला हवा. 

इतर कुठल्याही जातीधर्माकडे जितक्‍या संशयाने पाहिले जात नाही. आज तितके मुस्लिमांकडे पाहिले जाते. यापेक्षा दुर्दैव ते काय? मराठी मुलखातील मुस्लिम माणूस नेहमी ज्ञानोबा. तुकोबांच्या जयघोषात रंगला. त्याने कधीही हिंदू धर्माचाच काय इतर कुठल्याही जातीचा तिरस्कार केला नाही. गावगाड्याचे सण आणि उत्सव लक्षात घेतले तर असे दिसेल की मुस्लिमांच्या दर्ग्यात या समाजापेक्षा इतर जातीच्याच लोकांची गर्दी दिसत असे. गावचा पीर निघाला की त्यामध्ये सर्वजण एक दिलाने सहभागी होत असतं. इतकेच नव्हे तर आर्थिकभारही उचलत. गावच्या पिराचा किंवा ताबुताचा मानही गावच्या पाटलालाच असे. गावगाड्यात किती जिव्हाळा होता. गावातील प्रत्येक मुस्लिमांच्या हद्दयात देशभक्ती कोरली गेली होती. त्याला देशाचा अभिमानच नव्हे तर गर्व होता. पण, गेल्या काही वर्षात या समाजाकडे संशयाने पाहिले जावू लागले. त्याच्या देशभक्तीवर शंका उपस्थित केल्या जावू लागल्या. काही तरुण दिशाहीन झाले. ते दहशतवादाकडे वळले. हे खरं असले तरी सर्वांबाबत तसा विचार करणे चुकीचे ठरेल. दिशाहीन तरुणांना दिशा दाखविण्याचे काम या समाजातील काही ज्येष्ठ मंडळी तसेच काही सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी करताहेत. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. 

मध्यतंरीच्या काळात माझ्या अगदी गावाशेजारी असलेल्या कुमठे गावात कारण नसताना काही मुलांनी मशिदीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. धाब्याच्या मातीची ही मशिदी थोडी ढासळली.पण ढिगाऱ्याखाली माझ्या जवळच्या नातेवाइकाचा मुलगा सापडला आणि मरता मरता वाचला. त्याला बरे करण्यासाठी बिचाऱ्या त्याच्या वडिलांना सात ते आठ लाख रुपये खर्च करावे लागले. तरीही त्या मुलाला अपंगत्व आले. त्याच्या भोळ्याभाबड्या आईला वाटले, की मुसलमानांचा देव रागवला म्हणूनच त्याने आपल्या पोराला अशी शिक्षा दिली. काही दिवसांनी त्या माऊलींने गावातील मुस्लिमांची माफी मागून पूजा केली आणि पोराला बरं कर म्हणून हात जोडले. हेच संस्कार गावगाड्याचे होते.

परप्रांतातून आलेल्या मुस्लिमांचा विषय क्षणभर आपण बाजूला ठेवूया! जर मराठी मुस्लिमांकडे पाहिले. त्यांच्यावर झालेले संस्कार पाहिले, तर तो मुस्लिम असल्याचे कधी जाणवणार नाही. आतातर काळ बदलला, पिढी बदलली, सर्वच बदलाचेच वातावरण असल्याने आपल्या मुला-मुलींनीही चांगले शिक्षण घेतले असले तर त्यांनाही नोकरी मिळावी. त्याला व्यवसाय करता आला पाहिजे. सर्वांच्या बरोबरीने आपल्या मुलांनीही उंचभरारी घ्यावी. त्यांच्या पंखातही बळ यावं.जगाची जाण त्यांना यावी. यशाचं क्षितिज गाठावे असे मुस्लिम समाजातील पालकांना वाटत असेल तर ते योग्यच आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येक खेड्यापाड्यात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे त्यालाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच त्यांना पाठिंबा द्यायला हवा. कालच्या नव्हे तर यापूर्वीच्या इतर समाजाच्या मोर्चातही मुस्लिम समाजाने सहभागी होऊन मोर्चेकरांची सेवा केली. जे एकीचे दर्शन घडविले ते कदापी विसरता येणार नाही.

मुस्लिम समाजातील मुला-मुलींनीही मागे न राहता सर्वच समाजाच्या हातात घालून पुढे पुढे चालायला हवे. हे माझं गाव आहे. महाराष्ट्र माझा आहे. देश माझा आहे आणि मी देशाचा आहे हीच राष्ट्रभक्तीची भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. मुस्लिम समाजाने आरक्षणासह इतर मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चाचे म्हणूनच स्वागत करायला हवे.

Web Title: Prakash Patil write about muslim youths education