कोरेगाव-भीमात विषाची पेरणी नको, सामाजिक सलोखा हवा!

Koregaon Bhima
Koregaon Bhima

कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे ? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापी साध्य होऊ द्यायचा नसेल तर 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा. 

1 जानेवारी 2019 रोजी नवी पहाट होईल. हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे. या वर्षात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यापाठोपाठ राज्यात विधानसभेचे मैदानही गाजेल. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये एकाही राज्यात भाजपला यश मिळाले नाही. ही निवडणूक लोकसभेची सेमी फायनल होती. काँग्रेसमुक्त भारत करण्याची वल्गणा करणाऱ्या मोदी-शहा जोडगोळीचा प्रयोग गेल्या चार वर्षांत काही यशस्वी झालेला दिसून येत नाही. 

जानेवारीत तर शिवसेना भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकीत केंद्रात भाजप येईल की काँग्रेस येईल हे सांगता येत नाही हे खरे असले तरी देशाची आगामी निवडणूक शांततेत आणि कोणतेही विघ्न न येता उत्साहाच्या वातावरणात पार पडावी असे बहुसंख्य नागरिकांना वाटते. देशाप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळजवळ निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती करण्यावरून टोकाचे मतभेद आहेत. गेल्या चार वर्षानंतर कधी नव्हे ते शिवसेनेला अच्छे दिन आले आहेत. शिवसेनेची बारगेनिंग पॉवर वाढली आहे. 

शिवसेनेसमोर आजतरी भाजपने मान झुकविल्याचे चित्र दिसून येत आहे. याला कारणही तीन राज्यातील भाजपचा पराभव आहे. जर या राज्यात भाजप जिंकला असता तर शिवसेनेला फरपटत भाजपच्या मागे जावे लागले असते. हे सर्व सांगण्याचे कारण असे की आगामी निवडणुकीचा विचार केला तर राज्यात शांतता कशी प्रस्थापित करता येईल. कायदा सुव्यवस्था कशी राहिल याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे. 

फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात लाखोचे मराठे मोर्चे निघाले. या मोर्चाने इतिहास घडविला. शांततेत मोर्चे निघाले याचे श्रेय हे मोर्चे काढणाऱ्या संयोजकांना द्यावे लागेल. राज्यात एकही दंगल झाली नव्हती. मात्र गेल्या वर्षी कोरेगाव-भीमाने त्याला गालबोट लावले. ज्या समाजकंठकांनी तेथे जे काही घडवून आणले ते अद्याप मोकाट आहेत. खरे तर त्यांच्या मुसक्‍या आवळण्याची गरज होती पण, तसे काही झाले नाही. 

कोरेगाव-भीमाची लढाई ही पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव-भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इ.स. 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशवाईत झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता तर पेशवाईच्या साम्राज्याच्या बाजूने 2800 सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत 'बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी'चे महार सैनिक होते. काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशवाईंच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्‍यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्‍यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या पेशव्यांच्या साम्राज्याचा अस्त झाला. 

कोरेगाव-भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर हुतात्मा व जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे. One of the Triumphs of the British Army of the Earth. 

सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध तसेच इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन हुतात्मा सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते. 

1 जानेवारीला दरवर्षी दलित बांधव भीमा कोरगावला मोठ्या संख्येने जमतात. वर्षानुवर्षे हा अभिवादनाचा कार्यक्रम अगदी शांततेत पार पडत आला आहे. त्याला कधीही जातीचा रंग देण्यात आला नव्हता. पण, इतक्‍या वर्षात जे घडले नाही ते गेल्याच वर्षी म्हणजेच भाजप राजवटीत का घडले याचा विचारही होणे गरजेचे आहे. या मागे कोणत्या शक्ती आहेत की ज्या जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा विरूद्ध दलित बांधवात कोणाला संघर्ष पेटवायचा आहे याची उत्तरे खरे तर शोधण्याची गरज आहे. 

जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणे लावून कोण पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे याचा विचार खरे दोन्ही समाजाने करायला हवा. डोकी कोणाची फुटतात आणि गंमत कोण पाहतो याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. हे आवाहन करण्यामागचे कारण असे आहे की वर्षभरावर निवडणुका आल्या आहेत. निवडणुकीवर डोळा ठेवून काही मंडळी जातीचे विष पेरण्याचे काम करीत आहेत. पण, दोन्ही समाजाने थंड डोक्‍याने विचार करून शांतता कशी प्रस्थापित होईल हे पाहिले पाहिजे. कोरेगाव-भीमा बलिदानाच्या दिवसाला गालबोट न लागता पार पडला पाहिजे. मराठा समाजाने त्यासाठी पुढाकार घेण्याचीही गरज आहे. 

गावगाड्याचा विचार केल्यास मराठा समाज हा नेहमीच सर्व जाती समुहांबरोबर घेऊन चालत आला आहे. भारिप बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर 1 जानेवारीला कोरेगाव-भीमाला शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामध्ये चूक असे काही नाही. आंबेडकरच नव्हे तर सर्वच आंबेडकरी चळवळीतील नेत्या, कार्यकर्त्यांबरोबर संघटनांनीही मतभेद विसरून कोरेगाव-भीमाचा अभिवादन कार्यक्रम यशस्वी केला पाहिजे. 

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा शाहु, फुले, आंबेडकर असतील. ही सर्व मंडळी बहुजन समाजाची दैवत आहेत. या थोर समाजसुधारकांचा विचार आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांच्या आदर्शावरच वाटचाल सुरू राहायला हवी. भले कोणी कितीही जातीचे विष कालविण्याचा प्रयत्न करू द्या. वडू येथील संभाजी महाराजांची समाधी हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणा आहे. संभाजी महाराजांनी देशासाठी दिलेले बलिदान नेहमीच प्रेरणा देते. ते अन्याय, शोषणाविरोधात प्राणपणाने लढत आले. 

कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापि साध्य होऊ द्यायचा नसेल 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. कोरेगावा-भीमात विषाची पेरणी नको, सामाजिक सलोखा हवा! जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com