19 वर्षापूर्वी 'सोनिया' संजीवनींने काँग्रेसला तारले !

Sonia Gandhi
Sonia Gandhi

कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष. तो बजाज स्कुटरसारखा कालबाह्य झाल्याचे विधान 2014 मध्ये करण्यात आले. मोदी लाटेत तर या पक्षाची पालापाचोळ्यासारखी अवस्था झाली. लोकसभेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारे संख्याबळही तो गाठू शकला नाही. गांधी-नेहरू घराण्याचे वर्चस्व असलेला पक्ष संपला अशीच आरोळी देशभर कॉंग्रेस विरोधक देत होते. अशीच आरोळी यापूर्वीही अनेकदा देण्यात आली पण, हा पक्ष आजही संपला नाही. फिनीक्‍स पक्षाप्रमाणे तो राखेतून उठून पुन्हा भरारी घेत आला. 

आज म्हणजे 2017 मध्येही कॉंग्रेस खंगली आहे. मात्र तिला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचे काम सोनिया गांधींचे पूत्र राहुल गांधी करीत आहेत. 19 वर्षापूर्वीही कॉंग्रेस संपली... संपली म्हणत असताना भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर सोनिया नावाचे वादळ आले आणि पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर राहिली. हा ही इतिहास आहे. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस अडचणीत येते तेंव्हा तारण्यासाठी गांधी फॅमिलीतील व्यक्ति धावून येते आणि पक्षाला संजीवणी देते असे म्हणावे लागेल. 

1991 मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया यांच्या नावाची घोषणा केली होती. ही घोषणा करताना त्यांना विचारलेही नव्हते. सोनिया गांधींनी त्यावेळी अध्यक्षपद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनची स्थापना करून सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्णयही घेतला होता. 

त्यानंतर म्हणजे 1996 मध्ये पी. नरसिंहराव यांचे सरकार गेले आणि पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाजप आणि जनता दलाने संयुक्त सरकार सत्तेवर आले होते. दिवसेंदिवस कॉंग्रेस अडचणीचा सामना करीत असताना पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्य बनण्यासाठी आग्रह धरला. 1997 मध्ये त्या सदस्य बनल्या.

त्यानंतर एप्रिल 1998 मध्ये जेंव्हा सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्षा बनल्या तेंव्हा कॉंग्रेस पक्ष खिळखिळा बनला होता. पक्षाची ताकद कमी झाली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 19 वर्षे त्या अध्यक्षपदावर राहिल्या आहेत. 

कॉंग्रेसवर घराणेशाहीचा आरोप तर नेहमीच होत आला. मात्र, येथे एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, की सीताराम केसरी अध्यक्ष असताना गांधी-नेहरू घराण्यातील एकही व्यक्ती "सीडब्ल्यूसी'वर साधा सदस्य म्हणून नव्हती . केसरी आणि नरसिंहरावांच्या काळात कॉंग्रेसची अवस्था देशभर काय होती हे सांगण्याची गरज नाही. जेंव्हा सोनिया कॉंग्रेसच्या अध्यक्षा बनल्या त्यानंतर पुढे काय झाले हे सर्वानाच माहीत आहे. ज्या ज्या वेळी कॉंग्रेस अडचणीत येते त्या त्या वेळी गांधी घराण्यातील व्यक्ती पुढे येते आणि कॉंग्रेसला तारते असे म्हणावे लागेल. 

राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केला आहे. उद्या ते अध्यक्ष बनतील. मात्र, 19 वर्षापूर्वी जशी कॉंग्रेसची अवस्था बिकट होती तशीच काहीशी परिस्थिती आजही आहे. कॉंग्रेस सर्वत्र सपाटून मार खात आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी तर कॉंग्रेसला मान वर काढू दिली नाही. 2019 च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशात सर्वच्या सर्व म्हणजे 80 जिंकण्याचा निर्धार केला आहे. काही दिवसात गुजरात आणि हिमाचल प्रदेशचाही निकाल लागेल. जर या दोन राज्यापैकी एका तरी राज्यात कॉंग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले तर राहुल यांचे नाणे चालू शकते या संदेश देशभर जावू शकतो. अन्यथा कॉंग्रेसला संजिवनी देण्यासाठी त्यांना मातोश्री सोनियाप्रमाणे कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. 

जी राज्ये कॉंग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते तेथे म्हणजे महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश , उत्तराखंड, गोवा, आसाम आदी राज्यात भाजपने करीत कॉंग्रेसला चारीमुंड्या चित केले आहे. 

जर कॉंग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर प्रत्येक राज्यात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग सारखा चेहरा पुढे आणावा लागेल. भ्रष्ट नेत्यांना बाजूला सारावे लागेल. भाजपशी टक्कर द्यायची असेल तर कार्यकर्त्यांना बळ देण्याचीही गरज आहे. सोशल इंजिनिअरिंगबरोबरच समविचारी प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन जावे लागेल तरच कॉग्रेसला सुगीचे दिवस येऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com