सामाजिक समता रुजावी...

महाराष्ट्राची भूमी ही संतांची पावन भूमी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाड्‌मयीन परंपरेत संतांचं कार्य आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे.
Nashik Kalaram Mandir narendra modi
Nashik Kalaram Mandir narendra modiSakal

राज्यातील जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथलं संत सखाराम महाराज यांचं समाधिस्थान असलेलं तीर्थक्षेत्र अनेक अर्थांनं विशेष आहे. पंढरपूरचा पांडुरंग वैशाखी यात्रेच्या वेळेस पंढरपूरला नसतो, तर अमळनेरात असतो, अशी समजूत आहे. यामुळंच अमळनेरचा उल्लेख ‘प्रति पंढरपूर’ असा केला जातो.

पूर्वीच्या खानदेशातील म्हणजे सध्याच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात संत सखाराम महाराज वाडी संस्थान आध्यात्मिक, धार्मिक तसेच देशहिताच्या दृष्टीनं योग्य ती पावलं उचलत आपलं सामाजिक समता रुजवण्याचं काम अखंडपणानं करत आहे. इ. स. १७८० मध्ये संत सखाराम यांनी पहिले गादीपुरुष म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यांच्यापासून सुरू झालेली परमार्थाची ही गंगा त्यांच्यानंतर प्रवाही ठेवली आहे. संत सखाराम महाराज यांच्या कार्याचा तसेच त्यांचा गादीचा हा प्रवास आजही निरंतर सुरू आहे.

महाराष्ट्राची भूमी ही संतांची पावन भूमी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाड्‌मयीन परंपरेत संतांचं कार्य आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक अस्मितेचे व सांस्कृतिक ऐक्याचे संतच खरे शिल्पकार आहेत. तेराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि महाराष्ट्रात धार्मिक व सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली.

संत नामदेवांनी आपल्या भावोत्कटतेनं, श्रद्धाबळानं आणि समर्पणशील वृत्तीनं भागवत धर्माची पताका फडकवत सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित आणलं. जातीभेदापलीकडं जाऊन समतावादी विचारानं एकत्रित आलेल्या वारकऱ्यांमध्ये भक्तीमधून स्नेहभाव रुजवला आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रांगणात चंद्रभागेच्या वाळवंटात अठरापगड जातीच्या वारकऱ्यांची मांदियाळी जमवून आध्यात्मिक लोकशाहीची प्रतिष्ठापना केली.

संतांनी संपूर्ण समाज भक्तीच्या एका सूत्रात बांधला. भक्तीच्या क्षेत्रात कुणी श्रेष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही. लहान-थोर, स्त्री-पुरुष, उच्च-नीच सर्वांनाच भक्तीचा अधिकार आहे. देव भावाचा भुकेला असतो. त्याला जाती- कुळाशी काही देणे-घेणं नसतं, ही विचारधारा मांडून आध्यात्मिक लोकशाहीचं, समतेचं, बंधुत्वाचं मर्म सांगितलं.

हे सर्व संत समाजातल्या विविध वर्गातले म्हणजे अलुतेदार-बलुतेदार होते. फार काही शिकलेले नव्हते. त्यांनी जमेल तसं आपले भाव विशद केले. प्रपंचात आलेल्या अनुभवाची शिदोरी मांडली. व्यक्तिगत सुख:दुःखं, समाजात होणारी उपेक्षा, मुक्तीची आस, समतेचा ध्यास याचं प्रतिबिंब त्यांच्या निरुपणातून, कार्यातून वेळोवेळी दिसून आलंय. त्यांची भाषा साधी आणि हृदयाचा ठाव घेणारी आहे. सर्व संतांनी भक्तिभावामध्ये आपापलं योगदान दिलेलं आहे.

अमळनेरकर संस्थानामुळं रामानुजाचार्य यांची भक्तिधारा वारकरी संप्रदायात मिळालेली आहे.

वर्षभरातील साधारणतः ३५ दिवस महाराजांचा अमळनेर येथे मुक्काम असतो. चार महिने पंढरपुरात मुक्काम असतो व अन्य सात महिने महाराष्ट्रभर खेडोपाडी भक्तियात्रा सुरू असते. त्या भेटींची, गावांची नावे व तिथी, वेळा कायमस्वरूपी ठरलेल्या असतात. वर्षभराचा एवढा निश्चित व कोणत्या कारणाने न बदलणारा प्रवास क्वचितच अन्य कोणी करीत असेल.

ही गावोगावची संपर्क-यात्रा म्हणजेच अमळनेरकर संस्थानाचं धर्मजागरण कार्य होय आणि हे कार्य गेल्या अडीचशे वर्षांपासून अविरतपणे विस्तारत आहे. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार तसेच वारकरी संप्रदायाची ही पताका अखंडपणे फडकत राहण्याचे काम या फिरस्तीच्या माध्यमातून केले जाते.

समाजाच्या सर्व स्तरात समता रुजावी, विषमता संपावी यासाठी संस्थान काम करत आहे. संस्थानच्या उपक्रमाचा हेतू तोच आहे. भक्तिभाव म्हणजे कर्मकांड नाही तर मानवतेची पूजा करणं हाच खरा संस्थानचा हेतू आहे. समाजाच्या प्रत्येक घटकात म्हणजे मानवप्राण्यात पांडुरंगाचा अंश आहे. हा अंश प्रकट व्हावा म्हणजे मनामनात पांडुरंग प्रकट व्हावा, या हेतूनं संस्थानचं काम चालतं.

खानदेशाचं भूषण समजल्या जाणाऱ्या श्री सखाराम महाराज यात्रोत्सवात राज्यभरातून भाविक येत असतात. या यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ अक्षयतृतीयेला होते. या यात्रेतील रथोत्सव व पालखी मिरवणुकीसाठी देशभरातील भाविक येत असतात. धार्मिक तसेच सामाजिक सलोखा व एकात्मता जपणारा हा महोत्सव असून, या यात्रेतून आजही सामाजिक समतेचा संदेश दिला जात आहे.

राष्ट्रोद्धार किंवा राष्ट्रासाठी सर्व संतांचं कार्य अतिशय मोलाचं आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव यांनी आपल्या कीर्तनातून, अभंगांतून प्रबोधन करून समाज जागृतीचे कार्य केले आहे. सर्व संतांनी धर्मजागृतीपर अभंग तर केलेच; पण शांतिब्रह्म एकनाथांनी सकल समाजाला कळेल अशा भारुडातून समाजजागृती केले.

संत कीर्तनातून समाजात क्रांतिकारी बदल होत राहिले आणि सुराज्यसृष्टी निर्माण होण्यास संत समाज सदोदित अग्रणी राहिलाय, हे आपणास मान्य करावं लागतं. संत सखाराम महाराजांनीही पुण्यात पेशव्यांना आपल्या भजनातून जाणीव करून देऊन राष्ट्रकार्य करण्यास प्रेरित केलं होतं.

देशात आजवर अनेक संतांनी संस्कृती, धर्म जपण्याचं काम केलंय. देशातील वारकरी संप्रदायाची परंपरा पुढं चालवण्याचं काम अमळनेर येथील संत सखाराम महाराज मंदिर संस्थाननं केलंय. याचाच परिपाक की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आले असताना त्यांनी संस्थानला आवर्जून भेट दिली.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वाड्‌मयीन परंपरेत संतांचं कार्य अनमोल आहे. सामाजिक अस्मितेचे ते खरे शिल्पकार असल्यानं सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणून पंढरीच्या प्रांगणात आध्यात्मिक लोकशाहीची बीजं रोवली. रूढीग्रस्त अज्ञानी आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. अभंग, कीर्तन, भारुड, प्रवचन आदी माध्यमातून प्रबोधन व उपदेश केला.

स्त्रियांना आणि शूद्रातीशूद्रांना परमार्थाची दारं खुली करून दिली. मात्र आज क्षणिक स्वार्थासाठी भिंती निर्माण केल्या जात आहोत. याला छेद देणं महत्त्वाचं आहे. संतांची शिकवण पुन्हा एकदा आपल्याला देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजविण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

(लेखक सध्या संत सखाराम महाराज ‘अमळनेरकर संस्थान’च्या गादीवर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com