‘अतिरेकीपणा’, दुर्दैवानं जो खपतो...!

‘गर्जे मराठी’च्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो. परतवाटेवर टोरांटो (कॅनडा) इथं जवळचे स्नेही आहेत. वयामुळे त्यांना भारतात येणं जमत नाही म्हणून त्यांच्या आग्रहावरून टोरांटोला जाणं झालं.
‘अतिरेकीपणा’, दुर्दैवानं जो खपतो...!

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

‘गर्जे मराठी’च्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो. परतवाटेवर टोरांटो (कॅनडा) इथं जवळचे स्नेही आहेत. वयामुळे त्यांना भारतात येणं जमत नाही म्हणून त्यांच्या आग्रहावरून टोरांटोला जाणं झालं. त्यांच्याबरोबर नायगरा धबधबा चार-पाच वेळा आम्ही उभयतांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या हवामानात पाहिल्याच्या स्मृती कायम मनात आहेत; शिवाय चाळीस वर्षांचा स्नेह.

त्यांच्या घरून विमानतळावर निघालो तेव्हा टॅक्सीड्रायव्हर नीटनेटक्या कपड्यात म्हणजे सुटाबुटात होता. गाडीपण छान होती. आपल्याकडील वाटला; त्यामुळे साहजिकच संवाद सुरू झाला. त्यातून लक्षात आलं की त्याचं मूळ गाव लाहोर. गेली वीस-पंचवीस वर्षं त्याचं टोरोंटोमध्ये वास्तव्य. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो म्हणाला : ‘आपल्या दोन देशांत ब्रिटिशांनी फूट पाडली आणि कायमचं धर्माधिष्ठित वैर निर्माण झालं.

मला धर्माचं कौतुक नाही. हा माझा व माझ्या कुटुंबाचा वैयक्तिक मामला आहे. याचं अतिरेकी स्वरूप कसं निर्माण केलं गेलं, हा मुद्दा आहे. आमचे कितीतरी प्रश्‍न आहेत. मिलिटरीच्या लोकांनी भारत या शत्रूचं भूत निर्माण केलं आहे. त्यातून सर्व राजकारण चालतं. पूर्वीच्या भ्रष्ट पंतप्रधानांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी देशाचा पैसा बाहेर नेला आहे.

‘तो परत आणून तुम्हा लोकांना वाटेन,’ अशी अनेक आश्‍वासनं आमच्या इम्रान खाननं दिली. धर्माची साथ होतीच. जनताही त्या आश्वासनांकडे आकर्षित झाली; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. सर्वच नेते, पक्ष कमी-अधिक प्रमाणात अशी अतिरेकी आश्‍वासनं मतदारांना देतात.’’

तो पुढं म्हणाला : ‘‘धर्माच्या नावावर फाळणी झाली हे वाईटच झालं; परंतु तशी जीना यांची इच्छा नव्हती. तुमच्या गांधींप्रमाणे तेही हिंसेच्या विरुद्ध होते. मात्र, अतिरेकी धार्मिक राजकीय लोकांनी हे घडवून आणलं.’’

गप्पांमध्ये मी पाकिस्तानी वर्तमानपत्रांतील प्रमुख वार्ताहरांचे माझे एक-दोन अनुभव सांगितले, तसंच मी ‘सकाळ’तर्फे बेनझीर भुट्टो यांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी आमचे वरिष्ठ पत्रकार विजय साळुंखे यांना निवडणुकीचा ‘आँखो देखा हाल’ - म्हणजे प्रत्यक्ष अनुभवांचं वार्तापत्र - देण्यासाठी पाकिस्तानला पाठवलं होतं, याचाही अनुभव सांगितला.

त्या वेळी पाकिस्तानात एवढं अतिरेकी वातावरण नव्हतं. साळुंखे यांना पाठवण्यामागं त्यांचा आमच्याबरोबरचा अनुभव आणि अभ्यासू वृत्ती ही कारणं होती. शिखीस्तान (खलिस्तान) या अतिरेकी कारवायांना काबूत आणण्याचे प्रयत्न तेव्हा सुरू होते. साळुंखे यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची विनंती मी मान्य केली.

‘तिथं तुमचं काय होऊ शकतं याची जाणीव आहे ना,’’ असं मी साळुंखे यांना विचारल्यावर ‘‘माझी सर्व तयारी आहे,’’ असं उत्तर त्यांनी दिलं होतं. या पार्श्वभूमीवर साळुंखे यांना पाकिस्तानात जाताना गरजेपेक्षा जास्त डॉलर्स देण्यात आले होते. निवडणुकीचा दौरा पूर्ण करून माघारी आल्यावर त्यांनी बहुतांश रक्कम परत केली. आश्चर्यचकित होऊन मी त्यांना विचारलं : ‘‘काय, उपाशी राहिलात की रस्त्यावर झोपलात?’’ त्यावर त्यांनी खुलासा केला : ‘‘कराची ते क्वेट्टापर्यंत मी सर्वत्र फिरलो. सर्वत्र पोलिसांची पाळत होतीच; परंतु बहुतांश ठिकाणी ‘आपण आमचे पाहुणे आहात; पैसे देण्याची गरज नाही,’ असं मनापासून सांगितलं गेलं. सर्वत्र प्रेमानं स्वागत झालं.

मग मला समजेना की, हा आपला शत्रुदेश कसा? बेनझीर भुट्टोंच्या व्यक्तिगत भेटीत मी या भावनेचा उल्लेख केला. त्यांनी फक्त स्मित केलं होतं आणि म्हणाल्या होत्या :‘तुम्हाला राजकारण आणि धर्म कळत नाही.’ ’’

अमेरिकेतील एका वृत्तपत्रात, ‘अतिरेकीपणा’- जो दुर्दैवानं समाजाच्या भावनेला हात घातल्यावर बहुतांश यशस्वी होतो, अशा अर्थी विवेचनपूर्ण लेख वाचला होता. ते विचार माझ्या मनात घोळत होतेच.

इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये धर्माच्या नावावर प्रचंड अत्याचार झाले. बैरूत हे ‘पूर्वेकडील पॅरिस’ अशी ख्याती असलेलं शहर ख्रिश्‍चन आणि मुसलमान यांच्या अंतर्गत यादवीमध्ये जवळपास बेचिराख झालं होतं. ‘वॅन’च्या निमित्तानं तिथं मला जाण्याची दोन-तीन वेळा संधी मिळाली.

तिथंही सामान्य माणूस हा धर्माचा कोणताही शिक्का न दाखवता आदरातिथ्य करतो; परंतु हाच माणूस अतिरेक्यांच्या प्रचाराला सहज कसा बळी पडतो, असा मला प्रश्न पडतो. तुर्किएचं (तुर्कस्तान) उदाहरण तर फारच चांगलं आहे. तिथं केमाल पाशा - ज्यांना प्रेमानं ‘अतातुर्क’, म्हणजे ‘देशाचे पितामह’ अशी पदवी दिली गेली (जशी गांधीजींना ‘महात्मा’ किंवा टिळकांना ‘लोकमान्य’) - त्यांनी तुर्किएचा कायापालट केला.

धर्माचं अधिष्ठान मोडून काढलं. सर्वांना शालेय शिक्षण आठवीपर्यंत अनिवार्य केलं, म्हणजे मुला-मुलींना. मुलींना न शिकवल्यास पालकांना कारावासाची शिक्षा होत असे. अनेक मशिदी बंद केल्या. धार्मिक शिक्षण बंद केलं. महिलांनी बुरखा घालण्यावरील सक्ती उठवली. अरबी भाषा शिकवण्यास बंदी घातली. सामाजिक जाणिवेचा पाया घातला. साहजिकच तुर्किएची सर्वार्थानं उन्नती झाली.

आम्ही तिथं असताना इझ्‌मीर या गावी गेलो होतो. जगातील सर्वोत्कृष्ट कार्पेट्स‌ तिथं बनतात. आणखी बरंच काही...‘जवळच एका डोंगरावर येशू ख्रिस्त यांच्या मातेचं निधन झालं,’ असं सांगण्यात आलं. अर्थातच ख्रिश्‍चन लोकांचं ते पवित्र स्थान आहे. तिथं जाण्यासाठी उत्तम रस्ता आणि इतर सोई आहेत. महत्त्वाचं म्हणजे, हे सर्व तिथल्या मुस्लिम समाजानं वर्गणीद्वारे पूर्णत्वास नेलं. कुठं बैरूत आणि कुठं इझ्‌मीर!

परंतु ह्याच तुर्किएमध्ये सध्या देशाचे प्रमुख असलेले इर्दोगान यांनी अतिरेकी धार्मिक मुसलमान-तत्त्वाकडे जायला सुरुवात केली आहे. त्यातील - वर्तमानपत्रांतील लेखानुसार, दुर्दैवानं अतिरेकीपणा चटकन् मूळ धरतो. जगभर कुठंही. हिटलरनं तरी काय केलं? तो उत्कृष्ट वक्ता होता. समाजाच्या भावनांना हात घालण्यात तो सर्वोत्तम होता. देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेकीपणा करून साठ लाख ज्यू लोकांचं हत्याकांड सामान्य जर्मन जनतेकडून करून घेतलंच ना? शिवाय, गोबेल्ससारखा प्रचारक बरोबरीला होताच.

आता निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी धार्मिक अतिरेकीपणाला बळी पडू नये. आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटेल त्याला जरूर मत द्यावं. देशहितासाठी, समाजहितासाठी. जरूर विचार करा...अतिरेकी जातीय, धार्मिक, प्रांतीय प्रचाराला बळी पडू नका.

धार्मिक स्वरूपाच्या दंगली कोण घडवतं, त्या केव्हा आणि का होत आहेत - झाल्या तर - याचा शोध घ्या. मगच आपलं मत बनवा. भारताच्या एकात्मतेसाठी हे आवश्‍यक आहे. आपण सर्वजण ‘ऐकावं जनाचं, करावं मनाचं’ या पद्धतीनंच आचरण करू या. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी! पटतंय ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com