लढून पाहा...!

काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस झाला. बघता बघता वयाची ७९ वर्षं पूर्ण झाली! परंतु मी त्याचा फारसा कधी विचार केला नाही किंवा गरजही पडली नाही.
लढून पाहा...!

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

काही दिवसांपूर्वी माझा वाढदिवस झाला. बघता बघता वयाची ७९ वर्षं पूर्ण झाली! परंतु मी त्याचा फारसा कधी विचार केला नाही किंवा गरजही पडली नाही. लोकांनाच आमच्या वयाचं कौतुक किंवा काळजी! मी काय, शरद पवार काय, आमच्यात उत्साह आणि ऊर्जा कायम आहे. नवीन नवीन शिकायला आवडतं. आलेल्या आव्हानाला सामोरं सहजपणे जायचं हा स्वभाव.

यामुळे दिवसातील दहा-बारा तास काम केलं किंवा पडलं तरी शारीरिक अथवा मानसिक थकवा येत नाही. हे आणखी किती दिवस चालेल माहीत नाही. मग त्याचा विचार किंवा काळजी का करू? मध्यंतरी सौमित्र पोटे यांनी ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनेलवर माझी मुलाखत घेतली. बहुतेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात मला प्रश्न विचारला आहे की, ‘शरद पवारांकडून ५० कोटी रुपये मागून घेतले असते आणि व्यवसायवृद्धी केली असती तर काय बिघडलं असतं?’

माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या ७९ वर्षांचा इतिहास डोळ्यांपुढं येत होता. वरील प्रश्नाचं उत्तर मी जरूर दिलं आहे; परंतु मी आता तिऱ्हाईत म्हणून स्वतःला विचारत होतो...‘समाजाला हे साहजिकच वाटतं, तुझा काय अनुभव आहे? (तुला काय वाटतं?)’

याची गंमत म्हणून वाढदिवशी घडलेल्या दोन गोष्टींची माहिती सांगणं योग्य होईल. म्हटलं तर त्या गोष्टी सार्वजनिक करण्याच्या नाहीत; तरीही...त्या सकाळी ‘सिल्व्हर ओक’वरून फोन आला. मीच बोलतो आहे ना, याची खात्री करून घेऊन ‘साहेबांना बोलायचं आहे,’ म्हणून ऑपरेटरनं सांगितलं. सकाळी न्याहारी घेताना बरोबर सर्व वर्तमानपत्रं, माझा फोन, डायरी आणि पेन या गोष्टी जवळ असतात. कुणी वेळ मागितली तर मी डायरी पाहिल्याशिवाय उत्तर देत नाही. शरद पवार केव्हाही, ‘भेटायला ये’ किंवा ‘येतो’, असं सांगतात. अर्थात्, ते माझ्याही सोईचं आहे ना, याची खात्री करून घेतल्यावरच.

फोनवर सुप्रियाचा आवाज येत होता. ती शेजारीच आहे हे लक्षात आलं.

बंधूंनी हसत हसत विचारलं : ‘‘अरे, आज तुझा वाढदिवस आहे का?’’

मीपण चेष्टेच्या सुरात उत्तर दिलं : ‘‘गेली ७९ वर्षं कधी विचारलं नाही. मग आता हे समजून घेण्याची का आवश्यकता वाटावी?’’

अर्थात्, आम्ही दोघंही मनापासून हसत होतो. बंधू म्हणाले : ‘तुझा वाढदिवस दिवाळीत आहे एवढंच फक्त मला माहीत आहे.’’

मी उत्तरलो : ‘‘ते बरोबर आहे; परंतु तो तिथीनुसार!’’

संवाद संपला.

‘प्रतापकाकांचा आज वाढदिवस आहे.’ असं सुप्रियानं शरदरावांना सांगितलं असलं पाहिजे म्हणून त्यांनी फोन केला. खरं म्हटलं तर, आमच्याकडे वाढदिवस हा प्रकारच नव्हता. माझा जन्म दिवाळीतला असल्यानं नवीन कपडे मिळायचे. शरद पवार यांची जन्मतारीख वगळता आम्हा भावा-बहिणींना आमच्या जन्मतारखा आजही माहीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जन्माचं वर्ष मात्र माहीत आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे भानगड नसते. मीही आजतागायत शरदरावांना कोणत्याही १२ डिसेंबरला फोन केलेला नाही! तुम्हाला हे पटायला अवघड जाईल; परंतु ते खरं आहे. पुन्हा सौमित्र पोटे यांच्या प्रश्नाकडे येतो, ‘पैसे घेतले असतं तर काय बिघडलं असतं?’

मी असा विचार केला की - मी, मोठे बंधू माधवराव हे व्यावसायिक; पैसे मिळवणारे. शरद पवारांनी स्वतःच्या निवडणुकीसाठी गेल्या ५५ वर्षांत एक रुपया तरी आम्हाला मागितला का? ते आपल्या हिमतीवर लढले. लोकापवाद, समज काही का असेना, आमच्यामध्ये कधी त्यांच्या राजकीय विचारांवर, ॲक्शनवर चर्चा झाल्या का? तर नाही. आम्हा बंधूंना (मी आणि माधवराव) त्यांनी कधी व्यावसायिक सल्ला दिला का? तर नाही. कोणता व्यवसाय आणि कसा करायचा हा आमचा प्रश्न होता आणि आजही आहे.

अडीअडचणीला धावून आले असते का, तर होय; परंतु सुदैवानं तशी वेळ आम्ही दोघांनी कधी येऊ दिली नाही. याउलट, शरदरावांनी राजकारण कसं करावं, काय धोरणं आखावीत याबद्दल आम्ही सल्ला दिला का, तर नाही. आम्ही त्यांच्या क्षेत्रात आणि त्यांनी आमच्या क्षेत्रात कधी ढवळाढवळ केली नाही.

शरदरावांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापर्यंत किंवा केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान होण्याची संधी गेली वगैरेबाबत आम्ही भावनाशील होतो का, तर ‘होय’ हेच उत्तर आहे. आमच्या चर्चा या, नवनवीन काय चाललं आहे, राज्यपातळीवर अथवा देशपातळीवर शरदराव काय विचार करत आहेत, यावर होतात. एखाद्या उद्योजकाचं, शेतकऱ्याचं अथवा कारखानदाराच्या यशाचं त्यांना फार कौतुक असतं.

त्याला आणखी कशी मदत करता येईल याचा, म्हटला तर ध्यास, ते घेतात. याची परिणती म्हणजे, त्यांची उद्योगधंद्यांशी भागीदारी आहे, असा समज करून देण्यात विरोधकांना कोलीत मिळतं. तुमच्या शक्तीचा शक्तिपात कसा करायचा हे राजकारणात सर्रास चालतं. शरद पवार त्याला उत्तर देत बसत नाहीत. त्यामुळे, ही बाब ते नाकारत नाहीत, म्हणजे तीत तथ्य आहे, असाही समज वाढवण्यात विरोधकांना यश येतं.

संध्याकाळी माझे काही मित्र सहकुटुंब घरी आले. त्यातील आम्हां तिघांचा ओळीनं वाढदिवस - म्हणजे ता. १४, १५, १६ - मग कुणा तरी एकाकडे सर्वांचा वाढदिवस साजरा होतो. हे गेली अनेक वर्षं चाललं आहे.

सुप्रिया रात्री उशिरा फुलं घेऊन मला भेटायला आली. साहजिकच गप्पांचा अड्डा (फक्त घरातल्या लोकांचा) सुरू झाला.

माझे जावई तमीळ असल्यानं आणि आदल्या दिवशी सुप्रिया चेन्नई इथं असल्यानं राजकारणावर गाडी घसरली. पवारांच्या सध्याच्या राजकीय निर्णयांवरून चर्चा सुरू झाली. शरदरावांच्या वयापर्यंत त्याची परिणती झाली. जावई आपली मतं तावातावानं मांडत होते. सुप्रियानं माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं : ‘‘तुम्ही याबाबत कधी फारसं बोलत नाही. एक व्यक्ती या नात्यानं तुम्हाला काय वाटतं?’

मी म्हटलं - ‘‘मी राजकारणाच्या भानगडीत पडत नाही; परंतु माझ्या ध्यानात आलं की, शरदरावांनी माझ्या गेल्या ५५ वर्षांच्या सामाजिक आयुष्यात फक्त दोनदा वैयक्तिक मत विचारलं : ‘दिल्लीच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांचा माझ्यावर दबाव आहे. तुला काय वाटतं?’ मी दोन्ही वेळा उत्तर दिलं : ‘अजिबात स्वतःची डिग्निटी घालवून घेऊ नका. तुमची जी राजकीय भूमिका आहे तिच्याशी तडजोड करू नका. काहीही परिणाम झाले तरी.’

‘ठीक आहे,’ असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. चर्चा इथंच संपली होती.’

शरदरावांच्या वयाचा उल्लेख झाला तेव्हा माझ्या मनात विचार आला की, हे गृहस्थ वयाच्या सदतिसाव्या वर्षी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या वेळी वय का नाही आडवं आलं? नरसिंह राव तर तब्येत खालावल्यामुळे आणि वयामुळे हैदराबादला जायला निघाले होते. त्यांनी पाच वर्षं मजेत कारभार केला. उद्योजकांवरील नियंत्रणं काढून टाकण्याच्या निर्णयाशी भक्कम राहिले. भारताची आर्थिक परिस्थिती पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुधारण्याचं ते पहिलं पाऊल ठरलं. मग आताच शरदरावांच्या वयाचा का प्रश्न येतो?

तो माणूस लढवय्या आहे. एका दिवशी ४४ पैकी ४० सहकारी सोडून गेले किंवा सोनिया गांधींनी हकालपट्टी केली...यांचं कुठं अडलं?

माझ्यासारख्या लहान उद्योजकाकडे पैसे नव्हते, फुकटचं नको होतं; माझं कुठं अडलं? आपला इतिहास काय सांगतो? छत्रपती

शिवाजीमहाराज असोत, तानाजी मालुसरे असोत किंवा पहिले बाजीराव असोत...लढलेच ना ते! त्यांनी अपयशाची भीती बाळगली असती अथवा जहागिरी मिळवली असती तर हा आमचा इतिहास घडला असता का? आपण मराठी माणसं अपयशाला किंवा संकटाला घाबरलो नाही. लढलो, प्राणांची बाजी लावली; परंतु ताठ मानेनं उभे राहिलो.

तुम्ही तुमच्या तत्त्वावर लढा ना! शरण का जाता तात्पुरत्या फायद्यासाठी? अर्थात्, प्रत्येकानं आपल्याला योग्य वाटतं ते करावं.

शरद पवारांनी १९५९ मध्ये आपल्या वडीलबंधूंविरुद्ध प्रचार केला तेव्हा आमचं पूर्ण घर काँग्रेसविरुद्ध होतं आणि शरदराव जेमतेम १९ वर्षांचे होते. मग त्या वेळी वय का आडवं नाही आलं? आमचं कुटुंब एका तत्त्वानं, तर शरद पवार वेगळ्या तत्त्वानं चालले. सुप्रियाला मी एवढंच सांगितलं : ‘‘तुझ्या तत्त्वाला जे पटतं त्याला तू सामोरी जा. परिणाम काळ ठरवेल.’’

पुन्हा माझ्या वाढदिवसाकडे येऊ या. मी स्वतःच्या आयुष्याचा त्या पहाटे शांत झोप झाल्यावर आढावा घेत होतो. ‘माझी वाटचाल’ किंवा ‘अनुभवें आले’ या सदरांतून बराच ऊहापोह झालेला आहे. ज्या उच्च स्तरांवरील सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर मला अनेक दशकं काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या तुलनेत आपलं काम खूपच दुय्यम स्तरावरील आहे याची जाणीव आपल्याला विनम्र करते.

सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत मी विचार करतो की, ‘सुख म्हणजे काय, मी सुखी आहे का?’ उत्तर आलं : ‘होय.’ हे पैशानं मिळू शकतं का? ‘सुखी माणसाचा सदरा’ यापेक्षा वेगळा असतो का? सामाजिक कार्ये करताना आपण समाजावर उपकार करत आहोत का? समाज आपल्याला कामाच्या निमित्तानं समाधान देण्याची संधी देत आहे, असं पाहायचं. या दृष्टिकोनामुळे आपल्यातला अहंकार संपतो. मन निरपेक्ष होतं. दुसऱ्यांच्या कल्याणातच आपल्याला आनंद मिळतो.

विचार करा...व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड घालता येते; कोणत्याही कर्तव्याच्या आड न येता. त्या रात्रीही मी शांतपणे झोपलो. नेहमीप्रमाणेच! अपयशाच्या भीतीनं शरण जाऊ नका, कोणत्याही क्षेत्रात. हे क्षात्रतेज आपल्या सर्वांमध्ये आहे. यात जातपात येत नाही. कसं यश मिळत नाही? नक्की मिळेल. लढू या आपण. पाहा लढून!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com