चॅाकलेची आठवण

चॅाकलेची आठवण

कधी, कधी आनंदाचा ठेवा अलगद आपल्या हातात येतो. त्या दिवशीही असंच झालं. ऑनलाइन ‘हॅपिनेस’वर एक कोर्स करताना एक प्रोजेक्ट करायचा होता. ‘काहीतरी असं करायचं, की ज्यामुळे लोकांना तुम्ही आनंद द्याल.’ विचार केल्यावर काहीतरी सुचलं. 

सकाळ उजाडली. आठ वाजता कामवाल्या बाई आल्या. त्यांना चॉकलेट दिलं आणि म्हटलं,

‘‘बाई, सकाळी आपल्या घरातलं आटोपून आमच्याकडे पडेल ते काम करता, आज आधी हे चॉकलेट घ्या. अट अशी आहे, की हे लगेच खायचं आणि खाताना तुमच्या लहानपणीची एखादी चांगली आठवण आठवायची. मला सांगितली तरी चालेल; पण तुमची इच्छा नसेल तर मनात आठवायची.’’

आधी एक मिनिट त्या शांत बसल्या. त्यांना काय बोलावं हे कळेना. मी केलेली कृती अगदी अनपेक्षित होती. मी त्यांचे हात हातात घेऊन मी हे का करतेय हे त्यांना सांगितलं,

‘‘ताई, तुम्ही रोज सकाळी हा अभ्यास करता?’’ त्यांनी विचारलं.

‘‘हो गं, तू घर सांभाळतेस म्हणून मी हे करू शकते.’’

‘‘ताई मलाही शिकवाल आनंदी राहायला?’’

‘‘म्हणून तर तुला चॉकलेट देतेय. सांग बरं, कसं होतं तुझं लहानपण?’’

‘‘काम?’’ 

‘‘राहू दे एक दिवस.’’

मी आमच्या दोघींसाठी कॉफी केली आणि मग आम्ही दोघींनी अर्धा तास गप्पा मारल्या. ती तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती आणि आश्चर्य म्हणजे एकही आठवण दुःखाची नव्हती. 

नंतर नंबर होता एका अनोळखी व्यक्तीचा. मी सोसायटीच्या बाहेर आले आणि ती येताना दिसली. कृश, थकलेली, वय असेल ७५-८०, नीटनेटकी पण साधी साडी, कानात कुड्या, मला आवडले ते तिचे बोलके डोळे, मला कोणाची तरी आठवण करून देणारे. ती जवळ येताच मी हाक मारली,

‘‘मावशी, मला काहीतरी सांगायचंय.’’

प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत त्या म्हणाल्या,

‘‘तुम्ही कोण?’’

मग मी तिला माझी ओळख दिली, माझं घर लांबून दाखवलं आणि ‘हॅपिनेस’ कोर्सबद्दल सांगितलं. 

‘‘मावशी, मी तुम्हाला छोटंसं चॉकलेट देणार आहे आणि अट अशी, की ते लगेच खायचं आणि खाताना लहानपणीची आनंद देणारी एखादी आठवण करायची. मला सांगायची असेल तर सांगू शकता किंवा मनात तरी आठवायची.’’

‘‘आठवायला लागेल गं. आज माझं वय ७८. एकटी राहते. मुलगा असतो परदेशात. हे जाऊन झाली १२ वर्षे. दु:खी नाहीये मी; पण आनंदीही नाहीये. किती दिवसांत कोणाशी पोटभर जिवाभावाच्या गप्पाही मारल्या नाहीत. लहानपण तर विसरल्यासारखंच झालंय. मी कधीतरी लहान होते, हे लक्षातही नाही माझ्या... मैत्रिणी आहेत, त्या आधार देतात; पण आज तू मला जे करायला सांगत आहेस, ते वेगळंच आहे. मी खाते चॉकलेट; पण माझी एक अट आहे.’’

मला मजा वाटली, बोलण्यातला विषाद नाहीसा झाला होता. डोळ्यांतले भाव बदलले.

‘‘अट?’’

‘‘हो अट, तू म्हणालीस ना, लहानपणीची एखादी आठवण सांगायची?’’

मी मान डोलावली.

‘‘मी एक नाही, तर मला हव्या तेवढ्या आठवणी सांगणार.’’

‘‘आनंदाच्या?’’

‘‘अर्थात, लहानपणीच्या आठवणी आनंददायीच असतात.’’

‘‘खरं आहे.’’

‘‘अजून एक अट, मला तू मिठी मारशील?’’

‘‘मावशीss’’

‘‘मला खूप दिवसांत कोणी जवळ नाही घेतलं गं.’’

मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि मला माझ्या आईच्या कुड्या आठवल्या, ती अगदी या मावशींसारख्या कुड्या घालत असे. 

माझी आई, दोन वर्षांपूर्वी गेली तरीही असतेच माझ्याजवळ सतत. कुठल्या न कुठल्या रूपात भेटते. आज मावशीच्या रूपात. मावशींना मिठी मारल्यावर माझ्या मनात थुईथुई कारंजं नाचलं. कसलं? आनंदाचं? नाही-नाही, त्यापेक्षाही अजून काहीतरी वेगळंच मिळाल्याचं समाधान? नाही, त्यापेक्षाही अजून काहीतरी. शांती, परमानंद, हो, आणि एका प्रश्नाचं उत्तरही मिळालं. 

मावशींनी मला खूप आठवणी सांगितल्या.

‘‘मुली, आज तू मला मार्ग दाखवला आहेस. यापुढे मी रोज आनंदाच्या घटना आठवणार. तुला माहितेय, माझ्या मुलांच्या, यांच्या, आई-बाबांच्या आठवणींचा ठेवा माझ्याकडे आहे. यापुढे त्याची चव घेत जगणार.’’

‘‘मावशी, तुम्हाला माहीत नाही आज तुम्ही मला काय दिलं आहे ते.’’ माझ्या मनातली खळबळ नाहीशी झाली. आजच्या घटनेशी त्याचा खरंतर काही संबंध नव्हता; पण आज आई भेटल्यासारखं वाटलं म्हणून असेल कदाचित.

आई तुझ्या जाण्याची मी इच्छा केली होती. शेवटी मिळालेलं परावलंबी आयुष्य तुला नको होतं आणि तुला नको होतं म्हणून मलाही नको होतं. सतत आनंदी, हसतमुख, काहीतरी सतत काम करत राहणाऱ्या तुला, आता कुशीवर वळतानाही कोणाची तरी मदत लागत होती. म्हणून मी इच्छा केली तुझ्या जाण्याची आणि तू निघूनच गेलीस. तू गेलीस आणि वाटलं, अजून थोडा वेळ तरी असायला हवी होतीस. असताना गृहीत धरलं तुला आणि आता खंत वाटतेय, अजून एक तरी मिठी मारायला हवी होती, तृप्त करणारी!

‘‘मावशी अजून एक मिठी माझ्यासाठी.’’

आणि...

अतीव समाधानाने मी तृप्त झाले.

गीतेत शिकवण आहे, कर्म करताना फळाची आशा करू नका. कारण फळाच्या आशेने जे कर्म आपण करत असतो, त्यात मन रमत नाही. लक्ष सारखं असतं फळ मिळेल की नाही आणि कधी मिळेल. मानसशास्त्राची विद्यार्थी असल्यामुळे याचा अर्थ असा लावला की ध्येय ठरवायचं, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्ग निवडायचा आणि मग ध्येयाकडे संपूर्ण दु:र्लक्ष करून मार्गावर लक्ष केंद्रित करायचं. त्या कृतीतला पूर्ण आनंद घ्यायचा. आनंद हे ध्येय नाही होऊ शकत, तो एक मार्ग आहे, ज्याच्यावरून आपल्याला सतत चालायचं आहे. 

प्रतिभा देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com