कुठून येते हि विकृती?

दोष आणि दुर्गुण एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. प्रश्न तो नाही. प्रश्न आपल्या मनाविरुद्ध झाले किंवा वापरून झाले की तोडफोड करून फेकून देण्याचा, नष्ट करून टाकण्याचा आहे.
Murderer Attack
Murderer Attacksakal

- प्रतिमा जोशी, pratimajk@gmail.com

दोष आणि दुर्गुण एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. प्रश्न तो नाही. प्रश्न आपल्या मनाविरुद्ध झाले किंवा वापरून झाले की तोडफोड करून फेकून देण्याचा, नष्ट करून टाकण्याचा आहे. स्त्री ही एक वापरण्याची वस्तू आहे, ही समजूत न सोडण्याचा आहे. त्याहून पुढे जाऊन खांडोळी करण्याच्या विकृतीचा आहे. कुठून येते ही विकृती?

पुण्याच्या हमरस्त्यावर जीव घेऊन पळत असलेल्या तरुणीच्या मागे तिची हत्या करण्याच्या उद्देशाने हातात कोयता घेऊन धावणाऱ्या पिसाट तरुणाला ऐनवेळेवर थांबवून तिचा जीव वाचविण्याची जोखीम पत्करणारा लेशपाल जवळगे हा तरुण. हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात देऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो त्याच्या खोलीवर परतला; अन्‌ दरवाजा-खिडक्या लावून पुढचे दीड तास गदगदून रडला...

काय सांगतात लेशपालचे अश्रू?

कशासाठी आले असतील ते बांध फोडून?

काही क्षणांचा जरी विलंब झाला असता, तरी आपल्या डोळ्यांसमोर त्या तरुणीची हत्या झाली असती, या वास्तवाने तो हादरला असणारच. तिच्या चेहऱ्यावरचे भीतीने गोठलेले भाव त्यालाही गोठवून गेले असतील. मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे क्रूर, निर्दयी भाव आणि त्याचा दात-ओठ खाणारा शिकारी आवेश त्याला घडणाऱ्या भयंकराची चाहूल देऊन गेले असतील.

एका निर्णायक क्षणी तो हल्लेखोरांच्या पाठी प्रतिक्षिप्त क्रियेने धावला असणार... जीवाच्या कराराने त्याने त्याच्या हातातील कोयता काढून घेतला असणार... त्याच्या मागोमाग आलेल्या इतर दोन-तीन तरुणांमुळे हल्लेखोराला पकडणे सोपे झाले असणार...

लेशपालचे अश्रू त्या जीवाच्या कराराने धावणाऱ्या तरुणींसाठी होते? की तिची खांडोळी करण्याच्या उद्देशाने तिच्या मागे धावणाऱ्या क्रूरकर्मा हल्लेखोराच्या क्रौर्याने व्यथित होऊन सांडले होते? की हे भयानक दृश्य पाहून एखाददुसरा अपवाद वगळता गोठून गेलेल्या गर्दीसाठी होते? की या साऱ्यासाठीच होते? त्या मुलीच्या जागी त्याला आपली बहीण/ आई/ मैत्रीण दिसली असेल?

महाराष्ट्रातले तरुण वेडेपिसे होऊन मुलीबाळींना जीवे मारण्यास हत्यारे घेऊन धावण्याइतके आणि त्यांचे तुकडे तुकडे करण्याइतके माथेफिरू झालेत या वास्तवाने तो अस्वस्थ झाला असेल? या वास्तवाने अस्वस्थ व्हावे अशा घटना गेल्या काही वर्षांत सतत घडताना दिसत आहेत.

अगदी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील लेकी-सुनांची/आयाबायांची प्रतिष्ठा संभाळणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजधानी रायगडाच्या पायथ्याशी दर्शनाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हत्या करून तुकडे केले होते. त्याच्या आधी काही दिवसांपूर्वीच सरस्वती वैद्यचा खून करून तिचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून कुत्र्यांना खायला घालून मनोज सानेने नष्ट केले होते.

त्याहीआधी काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे तुकडे-तुकडे करून आफताबने फ्रीजमध्ये ठेवून क्रमाक्रमाने त्यांची विल्हेवाट लावली होती. त्याही आधी कोणी तरी भररस्त्यावर आपल्या प्रेयसीला भोसकले होते, कोणी जाळले होते, कोणी ॲसिड फेकले होते, कोणी बलात्कार करून हातपाय मोडून टाकले होते, कोणी सामुदायिक उपभोग घेऊन ठार मारून टाकले होते... किती कितीतरी...

क्रूरपणाचे सर्व प्रकारचे नमुने दाखवत आजच्या महाराष्ट्रातील तरुण गिधाडांसारखे स्त्रिया-मुलींवर जणू झेपावत त्यांचे लचके तोडून टाकत आहेत. त्यांना नकार पचवता येत नाहीये, बाईच्या इच्छेचा मान ठेवता येत नाहीये, स्वामित्वभावना सोडता येत नाहीये, सुडाची आणि संपवून टाकण्याची आग शमवता येत नाहीये, त्यांची चीडचीड इतकी टोकाची आहे की बलात्काराने सूड संपत नाही तर ठार मारायला ते मागेपुढे पाहत नाहीत, नुसते ठार मारून त्यांचे समाधान होत नाही, तर तिच्या देहाचे तुकडे तुकडे करण्याचा थंड क्रूरपणा त्यांनी कमावला आहे. आणि आता तर भररस्त्यात माग काढत जीव घेण्याइतपत ही ‘मर्दुमकी’ पुढे गेलीय.

मुलींनी/स्त्रियांनी प्रेमाला किंवा लग्नाला नकार, विकृतीला विरोध, फसवणुकीचा प्रतिकार केला की थेट हत्या करण्याचे प्रकार वाढत आहेत. अधिकृत असा फारसा अभ्यास उपलब्ध नाही; परंतु अशी कृत्ये करणारे बव्हंशी तरुण हे सन्मान्य रोजगार नसलेले, कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन त्यांच्यासाठी काम करताकरता भाईगिरी करू लागलेले, सोशल मीडियाच्या, साइटच्या अतिवापरामुळे असंवेदनशील आणि विकृत बनलेले, सुखाच्या आणि उपभोगाच्या भलत्या समजुती असलेले असतात, असे दिसते.

अशी विकृती, अशी परिस्थिती एकाएकी निर्माण होत नाही. आपली कुटुंबव्यवस्था, समाजरचना हेही त्यांच्या दिशाहीन, उद्दाम वागण्याला, कल्पनांना जबाबदार आहे. ते लहानपणापासून जे ऐकत, बघत मोठे होतात, त्यानुसार त्यांची जगण्या-वागण्याची पद्धत ठरून जाते.

आयुष्याला दिशा नसलेली, हाताला योग्य काम नसलेली, व्यक्तीचा आदर करणे म्हणजे काय याची काडीमात्र शिकवण नसलेली, कोणत्याही मार्गाने पैसा कमवावा नि उडवावासुद्धा या चालू जमान्याच्या दस्तुराला जागणारी आणि मुली शिकून बरोबरीला येत असल्याच्या न्यूनगंडातून आलेली मुजोरी प्रदर्शित करणारी झुंड मनोवृत्ती भय वाटावे, अशा वेगाने फोफावत आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोकडे असलेल्या नोंदीत स्त्रियांवरील अत्याचाराची एकूण आकडेवारी असली, तरी या प्रकारच्या, ज्यांना ‘फेमिसाईड’ म्हटले जाते अशा प्रकरणांची स्वतंत्र वर्गवारी नोंद नाही. प्रत्यक्षात देशात, विशेषत: उत्तर भारतात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

त्यातल्या त्यात ज्या नोंदी आहेत, त्यानुसार २५ ते २९ वयोगटातील तरुण मुलींना हिंसेचा अधिक सामना करावा लागतो. यातील २५ टक्के स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. अशा प्रकरणात, विशेषत: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मुलींबद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल, सवयीबद्दल बरेचदा तक्रारी करण्याची समाजाची वृत्ती दिसते.

पण नोंद अशी दिसते की दर सातामागे एक म्हणजे केवळ १३ टक्के स्त्रिया मद्यपान करतात, मात्र आपला जोडीदार नियमित मद्यपान करत असल्याची तक्रार २५ टक्के स्त्रियांनी केली आहे.

दोष आणि दुर्गुण एक व्यक्ती म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात. प्रश्न तो नाही. प्रश्न आपल्या मनाविरुद्ध झाले किंवा वापरून झाले की तोडफोड करून फेकून देण्याचा, नष्ट करून टाकण्याचा आहे. स्त्री ही एक वापरण्याची वस्तू आहे ही समजूत न सोडण्याचा आहे. आणि त्याहून पुढे जाऊन खांडोळी करण्याच्या विकृतीचा आहे. कुठून येते ही विकृती?

कुटुंबातील मारधाड/ हिंसा यातून तर ती येतेच; पण हिंसा, कापाकापी, हत्या यांचे मतलबी उदात्तीकरण करण्याच्या सार्वजनिक प्रतीकांमधूनसुद्धा येते. ठासू, गारद करू, छाटून टाकू, नायनाट करू अशी भाषा वापरत सार्वजनिक मंचावर फेटे बांधून तलवारी उंचावत विजयाच्या गर्जना करणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सत्ताकारणी इथल्या दिशाहीन तरुणांना नेमका काय संदेश देत असतात? त्या दुबळ्यांच्या संरक्षणासाठी असतात की त्यांच्यावर वट दाखवण्यासाठी, त्यांना दाबण्यासाठी असतात?

हिंसा आपल्या देशात आणि जगभरातसुद्धा प्रत्येक काळात थैमान घालत आली आहे. विशेष करून राजेशाही, साम्राज्यशाही राजवटीचा पायाभूत आधारच तो होता. त्याचा प्रभाव लोकांवरही होताच; पण गेल्या दोन शतकांपासून बहुतांश जग हे लोकशाही आणि समानतेच्या तत्त्वावर चालण्याचा प्रयत्न करत आहे.

जे देश ही वाटचाल प्रामाणिकपणे आणि मनापासून करत आहेत, ते सर्व क्षेत्रात पुढे गेलेले दिसतात. जे ती वाट नाकारत आहेत त्या देशात युद्ध, हिंसा, स्त्रियांवरील अन्याय यांचा नंगानाच दिसतो... ते देश आज बरबादीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

लेकी-सुनांचा आदर करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या, मुलींना शिकवून शहाणे करणाऱ्या म. फुले आणि सावित्रीबाई यांच्या, स्त्रियांना संविधानिक अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात स्त्रिया, मुली असुरक्षित बनत जाणे वेदनादायी आहे.

लेशपालच्या अश्रूंमागे हीच वेदना असावी.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com