अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे...

संत परंपरा विवेक जागृत करायला सांगते. अंतरीचा दिवा उजळायला शिकवते. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे’ असा उपदेश करते.
sants maharashtra
sants maharashtrasakal
Summary

संत परंपरा विवेक जागृत करायला सांगते. अंतरीचा दिवा उजळायला शिकवते. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे’ असा उपदेश करते.

- प्रतिमा जोशी, pratimajk@gmail.com

संत परंपरा विवेक जागृत करायला सांगते. अंतरीचा दिवा उजळायला शिकवते. ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे’ असा उपदेश करते. तिथे पाठ फिरवून माणसे घोकंपट्टी शिकवणाऱ्या, लाखोली लिहायला लावणाऱ्या, कर्मकांडे करायला प्रवृत्त करणाऱ्या, बाबांच्या कच्छपी लागतात... महाराष्ट्रातील माणसांनी याचा विचार करायची वेळ आली आहे.

दोरीच्या सापा भिवुनी भवा।

भेटी नाही जिवा-शिवा।

अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे॥

विवेकाची ठरेल ओल।

ऐसे की बोलावे बोल।

आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे

संत संगतीने उमज।

आणुनि मनी पुरते समज।

अनुभवावीण मान हालवू नको रे

सोहिरा म्हणे ज्ञानज्योती।

तेथ कैचि दिवस-राती।

तयावीण नेत्रपाती हालवू नको रे॥

हरिभजनाविण काळ घालवू नको रे॥

संत सोहिरोबा यांची ही रचना गेले काही दिवस मनात रुंजी घालत आहे. जिवा - शिवाच्या भेटीचे मर्म किती साध्या, पण प्रभावी शब्दांत त्यांनी उलगडून दाखवले आहे. माणसाच्या मनाचे खेळ अगम्य असतात. नाही नाही त्या कल्पना करून माणसे मनाने दुबळी, भित्री होत जगतात. दोरीच्या सापा भिवूनी भवा... विवेकबुद्धी गमावून बसतात. जगण्यातले तारतम्य नाहीसे होऊन जाते. सोहिरोबा सांगतात, विवेकाची ठरेल ओल, ऐसे की बोलावे बोल... काय चांगले, काय वाईट याची निवड असणे, त्याप्रमाणे वागणे, बोलणे म्हणजे विवेकबुद्धी शाबूत असणे. त्यासाठी, बरे-वाईट समजण्यासाठी निसर्गाने माणसाला अफाट क्षमता असलेला मेंदू बहाल केला आहे, तो वापरण्याचे कष्ट न घेता कोणाच्या तरी पायी किंवा हाती तो गहाण ठेवणे हे मनुष्यत्वापासून लांब जाणे असेच जणू सोहिरोबा सुचवत आहेत. कोणी काही सांगतो म्हणून नाही, तर आपल्या प्रत्यक्ष अनुभवावर आपण आपली विवेकबुद्धी कसोटीला लावावी आणि आपल्या अंतरीचा ज्ञानदिवा कायम तेवता ठेवावा, असा मोलाचा उपदेश करणारे संत सोहिरोबा अठराव्या शतकाच्या मध्यातले... १७५०च्या आगेमागे त्यांनी त्यांचे प्रचीतीचे बोल शब्दबद्ध करून ठेवले. तीनशे वर्षांनंतर आज २०२३ मध्येसुद्धा त्याचे संदर्भ तसेच असावे, याचा अर्थ आपण अजूनही संतसंग पुरेसा अवलंबू शकलेलो नाही.

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सचिन कांदोळकर यांनी संत सोहिरोबाविषयी एक आठवण लिहिली आहे, ती अशी : एकदा सोहिरोबा उज्जैनला गेले होते. तेथे जिवबादादा केरकर या गोमंतकीय सरदारांनी त्यांची महादजी शिंद्यांशी गाठ घालून दिली. शिंदेही त्यावेळी कविता करीत होते. त्यांनी आपल्या काव्याची वही सोहिरोबांकडे दिली. काही कवितांवर नजर फिरवल्यानंतर ते म्हणाले, ‘ज्या काव्यात प्रसाद नाही, साक्षात्कार नाही, ती कविता कसली?’ आपल्या काव्यावरील प्रतिकूल मतप्रदर्शनामुळे संतप्त झालेल्या शिंद्यांनी सोहिरोबांना खडसावले. त्यावेळी सोहिरोबांनी तिथल्या तिथेच त्यांना कवितेतून उत्तर दिले. त्यानंतर प्रभावित झालेल्या शिंद्यांनी देऊ केलेला पुरस्कारही त्यांनी नाकारला. सोहिरोबांच्या आयुष्यातील ही घटना आजही प्रेरणादायी ठरेल.

सोहिरोबाच कशाला, आपल्या या मराठी मायभूमीत संतांची मांदियाळीच आहे. ज्ञानेश्वर माउली म्हणतात, ‘चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका। संत तेथे विवेका असणे जी।। संत परंपरेचे हे वैशिष्ट्य मराठी जनांना ठावूक नाही, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल; पण ठावूक असणे आणि आकलन होणे यात पुष्कळदा महदअंतर राहते. विवेकाची ओवी बरेचदा अविवेकी धोकंपट्टीने निस्तेज होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात,

बहुत केलें पाठांतर। वर्म राहिलेंसे दूर॥

चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप॥

तुका म्हणे सिंदळीच्या। व्यर्थ श्रमविली वाचा॥

हरिपाठ, श्लोक, अभंग, ओव्या नुसत्या पोपटासारख्या पाठ केल्या आणि घडाघडा म्हणून दाखवल्या म्हणजे त्यांतील मर्म समजलेले असते असे बिलकुल नाही, हे महाराजांनी किती रोखठोक सांगितले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात त्याची प्रचीती आपल्याला पावलोपावली येतच असते. रोज कर्मकांडे उरकून देवापुढे दिवा लावणाऱ्या व्यक्तीच्या अंतरातील दिवा तेवत असेलच याची काही हमी नसते. कारण निव्वळ पोथ्या पठण करून त्यातील भावार्थ मनाच्या गाभ्याशी पोहोचेल कसा?

देव शोधत जगभर फिरतो माणूस. नवस बोलतो, व्रतवैकल्ये करतो, कर्मकांडे करतो, जपतप करतो, अनुष्ठान घालतो, नारायण नागबली देतो, सोन्याचांदीचे हातपाय वाहतो, पूजा घालतो... तीर्थयात्रा करतो... काय काय करतो! तुकाराम महाराज म्हणतात,

तिर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनीं

मिळालिया संतसंग। समर्पितां भलें अंग

तिर्थी भाव फळे। येथें आनाड तें वळे

तुका म्हणे पाप। गेलें गेल्या कळे ताप...

सत्प्रवृत्त, सज्जन माणसात देव शोधा, तीर्थक्षेत्री तो कसा सापडणार, असा प्रश्न ते विचारतात. प्रत्यक्षात माणसे देवधर्म, कुळाचार, कर्मकांडे यांवर वेळ आणि पैसा दोन्ही बदाबदा ओतत राहतात; पण चांगल्या कामासाठी, सत्प्रवृत्त व्यक्तीच्या कार्यासाठी कधी उभे राहत तर नाहीतच; उलट भल्या माणसांना छळण्यात, त्यांची नालस्ती करण्यात, प्रसंगी त्यांना संपविण्यात पुढाकार घेतात. अशा दांभिक प्रवृत्तीला देव कसा सापडावा?

भोगें घडे त्याग। त्यागें अंगा येती भोग

ऐसें उफराटें वर्म। धर्मा अंगीं च अधर्म

देव अंतरे तें पाप। खोटे उगवा संकल्प

तुका म्हणे भीड खोटी। लाभ विचारावा पोटीं

असे तुकाराम महाराज उगीच बोलत नाहीत. त्यांना स्वतःला अशा छळाला, नालस्तीला सामोरे जावे लागले आहे. त्यांनाच कशाला, ज्ञानेश्वर माउली, संत जनाबाई, संत एकनाथ, संत चोखोबा... किती नावे घ्यावी! या सगळ्यांना तत्कालीन समाजाने भरपूर छळले आहे. जनाबाईंवर तर चोरीचा आळ घेतला गेला... त्या म्हणतात,

अहो मांडियला खेळ। बुद्धि रंग बुद्धिबळ

कैंचा शह आला। प्याद्याखालीं फरजी मेला

शहबाजु झाली। जनी म्हणे मात केली...

विवेकाचा मार्ग दाखवणाऱ्या संत परंपरेला मोठ्या निंदेला आणि त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. त्यांना त्रास देत असतानाच समाजाने त्याच वेळी तत्कालीन धर्माच्या अधिकाऱ्यांना / ठेकेदारांना साथ दिलेली दिसते. ज्या सर्वसामान्य माणसाच्या अंतरात विवेकाचा दिवा लावण्यासाठी संत मंडळींनी प्राण झिजवले, त्या सामान्य माणसांनी त्या वेळी त्यांना भक्कम साथ दिली असती, तर ‘धर्मा अंगीच अधर्म’ असे उद्वेगाने बोलण्याची वेळ तुकाराम महाराजांवर आली नसती. पुढे तीन-चारशे वर्षांनी याच सामान्य माणसांनी संत परंपरेला मान द्यायला सुरुवात केली; पण येथेही संतांना त्यांनी देव्हाऱ्यात बसविले की काय असे वाटावे, असे आपणा सामान्यांचे वर्तन राहिले आहे. देव्हाऱ्यात बसविले म्हणजे ते काय सांगतात त्याकडे दुर्लक्ष करून पाठांतराच्या झांजा बडविणे इतके सोपे काम शिल्लक राहते.

या पाठांतर संस्कृतीने कदाचित वैभवशाली संत परंपरा फक्त वाहवा करण्यापुरती मखरात बसवून लोकांना बुवा / बाबा / बापू / महाराज यांच्या कच्छपी लावून दिले असावे.

संत परंपरा विवेक जागृत करायला सांगते. अंतरीचा दिवा उजळायला शिकवते. भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे असा उपदेश करते. तिथे पाठ फिरवून माणसे घोकंपट्टी शिकवणाऱ्या, लाखोली लिहायला लावणाऱ्या, कर्मकांडे करायला प्रवृत्त करणाऱ्या, बाबांच्या कच्छपी लागतात. आपला मेंदू स्वतः चालविण्याचे कष्ट न घेता अगदी मूल होण्यापासून त्याच्या लग्नापर्यंत, दुखण्या-खुपण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींत कथित गुरूंच्या आदेशाशिवाय आयुष्यात एक पाऊलसुद्धा टाकत नाहीत, तेव्हा विवेकी संतपरंपरा अव्हेरतात, असेच म्हणायला हवे.

तुका म्हणे कैसे आंधळे हे जन॥

गेले विसरोनी खऱ्या देवा

महाराष्ट्रातील माणसांनी याचा विचार करायची वेळ आली आहे.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com