घोटभर शेक्सपीअर!

माणसाच्या मनातली विकारविलसितं भळभळून बाहेर येत वाहताहेत, तोवर शेक्सपीअरला मरण नाही...
Praveen Tokekar writes Marathi literature Shakespeare is always seen in plays
Praveen Tokekar writes Marathi literature Shakespeare is always seen in playssakal
Summary

शेक्सपिअर जितका इंग्रज आहे, तितकाच तो ‘आपला’ आहे. शेक्सपीअर सर्वांभूती आहे, म्हणून तर इतका टिकला आहे. मराठी साहित्यात, नाटकात शेक्सपीअर डोकावतोच; पण तो आपल्या साध्यासुध्या जगण्यातही असतो. जोवर माणसाच्या मनातली विकारविलसितं भळभळून बाहेर येत वाहताहेत, तोवर शेक्सपीअरला मरण नाही. कपट, सूड, संशय, वासना, बाईलवेड, भयगंड, असले विकार-प्रकार आहेत, तोपर्यंत शेक्सपीअरही राहणार. १६१६ साली शेक्सपीअरनं रंगभूमी गाजवून वॉरिकशर परगण्यातल्या स्ट्रॅटफर्ड या गावात आपला साडेपाच फुटी देह ठेवलासुद्धा होता. त्या काळात संपलेला एक नाटककार अजूनही आपल्याला पुरून उरला आहे. शेक्सपीअर यांचा आज स्मृतीदिन, त्यानिमित्त...

बाजीचा-ए-अतफाल है, दुनिया मेरे आगे,

होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे

- मिर्झा गालिब (१७९७ -१८६९)

चारशे वर्षं होऊन गेली. विल्यम शेक्सपीअर नावाचं भूत मानेवरून उतरायला तयार नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करा, बाटलीत भरा, काहीही करा... अधूनमधून पुढ्यात उभं राहून ते दचकवतंच. चांदण्या रात्री भिंतीवर गूढ सावल्यांच्या हालचाली दिसाव्यात, तसं त्याचं अस्तित्व कायम सोबतीला असतं.

या भुतानं अवघ्या सांस्कृतिक आणि कलाजगताला घोळसलंय. ते हे झाड सोडायला तयार नाही आणि झाडालाही आता ते आपल्याच अस्तित्वाचा भाग वाटतं. शेक्सपिअर नेमका होता तरी कोण? कोण्या इंग्लंडातल्या कुग्रामात चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका नाटकवाल्यानं अवघ्या मानवीविश्वाचं रंगमंचात रूपांतर करून दाखवलं, ते कसं काय? ये क्या जगह है दोस्तों, ये कौनसा दयार है?

शेक्सपीअर हा देवचार आहे, देवचार. ‘तुज्यार देवचार घालून सोडतलंय, तुझो नायनपाट करतलंय’ अशी जबरी धमकी देऊन एखाद्यावर शेक्सपीअर सोडावा. तो कामातून गेलाच म्हणून समजा. हा शेक्सपीअर कलावंतांना आणि रसिकांनाही नादी लावणारा नाटककार आहे. हे ‘नादी लावणं’ फार दुर्मिळ असतं. ज्याला जमलं, त्याला जमलं.

कुणी म्हणेल, कोण कुठला नाटकवाला. अगम्य नि अवघड भाषेत काहीबाही लिहून ठेवलंन. नाही, असेल मोठा प्रतिभावंत नाटककार; पण त्याची नोंद आम्ही मराठी लोकांनी करायची कुठल्या खात्यात? त्याचा आणि आमचा संबंध काय? कसलं आलंय हॅम्लेटच्या बापाचं भूत? आमच्या कोकणात येऊन बघा, वाडी-पाखाडीत डझनांनी सापडतील; पण शेक्सपीअर जितका इंग्रज आहे, तितकाच तो ‘आपला’ आहे. शेक्सपीअर सर्वांभूती आहे, म्हणून तर इतका टिकला आहे. मराठी साहित्यात, नाटकात शेक्सपीअर डोकावतोच; पण तो आपल्या साध्यासुध्या जगण्यातही असतो. जोवर माणसाच्या मनातली विकारविलसितं भळभळून बाहेर येत वाहताहेत, तोवर शेक्सपीअरला मरण नाही. कपट, सूड, संशय, वासना, बाईलवेड, भयगंड, असले विकार-प्रकार आहेत, तोपर्यंत शेक्सपीअरही राहणार. १६१६ साली शेक्सपीअरनं रंगभूमी गाजवून वॉरिकशर परगण्यातल्या स्ट्रॅटफर्ड या गावात आपला साडेपाच फुटी देह ठेवलासुद्धा होता. त्या काळात संपलेला एक नाटककार अजूनही आपल्याला पुरून उरला आहे.

शेक्सपीअरच्या पश्चात आपल्या महाराष्ट्रात बरंच काही घडलं. खरं तर शेक्सपीअरकडे लक्ष द्यायला फुर्सत नव्हती, इतकं काय काय घडलं. इथंच स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं. अनेक पातशाह्या उभ्या राहिल्या, बुडाल्यादेखील. इथंच संत-पंत-तंतांच्या परंपरा चालू झाल्या, त्यांचे प्रवाह कधी धो-धो वाहिले, कधी अति क्षीण झाले. इथंच भारतीय रंगभूमीची पहिली नांदी घुमली. इथंच भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढही रोवली गेली. इथंच स्वातंत्र्याचा नारा घुमला... इंग्रज साहेबाला ‘चले जाव’ असं सुनावण्यात अग्रणी असलेल्या महाराष्ट्रानं शेक्सपीअर नावाच्या दिवंगत साहेबाला मात्र आपल्याकडंच ठेवून घेतलं. पण ते खूप नंतर...

त्याआधीच विष्णुदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’च्या खेळानिशी १८४३ मध्ये मराठी रंगभूमीचा पडदा उघडला होता. त्या काळी बव्हंशी जनलोकांच्या मनोरंजनाचा भार लळितं, भारुडं, गोंधळ आणि तमाशेच उचलत होते. नाही म्हणायला फार्सिकल अंगानं जाणारी ‘तागडथोम’ नाटकं रंगत होती; पण तोवर इंग्रज साहेबाने आपले पाय भक्कम रोवून भारत देश आपल्या बापाची पेंड असल्यासारखं वर्तन सुरू केलं होतं. साहजिकच त्या फिरंगी गोऱ्यांस मनरंजनासाठी इंग्रजीतले खेळ गरजेचे भासू लागले होते. त्या काळी काही युरोपिअन नाटक कंपन्या मुंबईत येऊन खेळ करून जहाजानंच परत जात असत. तेव्हाच कुठंतरी विल्यम शेक्सपीअर हे नाव पहिल्यांदा मराठी कानावर पडलं असावं.

इथल्या काही आंग्लविभूषित वैचारिकांना आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी नाटकांचं ‘रहस्य’ जाणून घेण्याची ऊर्मी येऊ लागली. पुण्यात १८७०-७२ च्या काळात डेक्कन महाविद्यालयामध्ये दोघा ब्रिटिश नटांना खास पाचारण करून त्यांच्याकरवी शेक्सपीअरची नाटकं वाचून घेतल्याची भारतीय रंगभूमीच्या इतिहासात नोंद आहे. विश्रामबाग शाळेच्या चौकात काही नेटिवांनी ‘ज्युलियस सीझर’चं (तोंडास रंग न लावितां गाऊन -एक प्रकारचा झगा- परिधान करून) अभिवाचन केलं होतं. अभिवाचन हा शब्द खूप अलिकडचा. तेव्हा त्याला ‘रेसिटेशन’ असंच म्हणत. त्याच सुमारास आनंदोद्भव थेटरात सार्जंट केम्स्टर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पुण्यातील काही सुशिक्षितां’नी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’चा खेळ केला होता, तो फार चांगला वठल्याची परीक्षणे छापून आली होती.

इथून पुढे बुकिश नाटकांची सुरुवात मराठी रंगभूमीवर झाली, असं मानलं जातं. संगीत नाटकांनी मराठी रंगभूमीवर इंद्रधनुष्य उभारलं, त्याआधीचा हा काळ. पुढे बालगंधर्व नावाचं लखलखतं झुंबर मराठी रंगदालनात सजूधजू लागलं. त्याच काळात शेक्सपीरिअन इंग्रजी आणि नाटकविद्या याबद्दल वैचारिक मंडळींमध्ये कुतुहल वाढीस लागलं होतं. इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे आणि ही सकस दुग्धनिर्मिती शेक्सपीअर नावाच्या गवळ्याच्या गोठ्यात झाली आहे, याचे साक्षात्कार घडू लागले होते. पारशी समाजाच्या लोकांनी तर शेक्सपीअर मुंबईत आणून त्याला कंप्लीट पारशी पेहरावात उभा केला होता.

शेक्सपीअरचं नाटक हे येरगबाळाचं काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे, या भावनेनं सुशिक्षितांमध्ये शेक्सपीरिअन साहित्याची उठाठेव होऊ लागली. तो झपाट्यानं क्रमिक पुस्तकात शिरला! तिथं मात्र थोडा घोळ झाला. प्रतिभावंताच्या कलाकृतींचं मार्कांमध्ये रूपांतर झालं, की त्याच्याबद्दलची आत्मीयता नष्ट होऊ लागते. तसंच घडलं. शेक्सपीअर हा इंग्रजी भाषेबद्दल तिडीक किंवा दहशत निर्माण करण्याचा हमखास मार्ग मात्र ठरू लागला. शेक्सपीअरसारखं आपणही काहीतरी जोरकस, मन्वंतर घडवणारं लिहावं, अशा ऊर्मीनं पिढ्याच्या पिढ्या पेटून उठल्या. त्यात अनेकांनी या जाळात हात घातले. मराठी रंगभूमीवर बालगंधर्व नावाचं एक लखलखीत झुंबर आपलं स्वरसौंदर्य नुकतंच कुठं दाखवू लागलं होतं, त्याचवेळी काही नाटक मंडळ्या शेक्सपीअरशी झट्या घेत होत्या. गोविंद बल्लाळ देवलांनी ‘झुंझारराव’ हे ‘ऑथेल्लो’वर बेतलेलं नाटक त्यातलंच. ते तेव्हाही खूप गाजलं होतं.

शेक्सपीअरचं ‘टेमिंग ऑफ द श्रू’, ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’, ‘मिडसमर नाइट्स ड्रीम’, ‘द टेम्पेस्ट’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ अशी कितीतरी नाटकं मराठीनं आपल्या बाजात आणली. त्यांची मराठी रूपांतरंही लोकांना आवडली. पुढे अनेकांनी शेक्सपीअरचे अनेक प्रयोग केले. कविवर्य विंदा करंदीकर किंवा मंगेश पाडगावकर यांनीही शेक्सपीअरचे अनुवाद करून पाहिले. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी ‘किंग लिअर’चं मराठी प्रतिरूप ‘नटसम्राट’मध्ये साकारलं. वसंतराव कानेटकरांनीही शेक्सपीअरच्या शोकांतिकांवर आधारित ‘बेईमान’ आणि ‘गगनभेदी’ ही नाटकं लिहिली. शेक्सपीअरचं बोट पकडूनच बहुतेक लेखकांचा साहित्य प्रवास सुरू होता.

मध्यम वयातल्या काही रसिकांना आठवत असेल, १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत एकदम दाणकन शुद्ध मराठी ‘ऑथेल्लो’ आला होता. मराठीशी शेक्सपीअरचं नातं काय आहे, याचं उदाहरण द्यायचं असेल, तर या प्रयोगाकडे बोट दाखवावं लागेल. अगदी काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलेल्या ‘हॅम्लेट’मधली सुमीत राघवनची प्रमुख भूमिका अशीच स्मरणात राहणारी आहे.

मराठीनं तर शेक्सपीअरला केव्हाच आपलं मानलं आहे; पण हिंदी चित्रपटसृष्टीनंही शेक्सपीअरला ‘आपल्या’त समाविष्ट करून घेतलं खूप वर्षांपूर्वी, म्हणजे १९५२ साली मेहबूब खान यांनी वाजतगाजत ‘आन’ हा चित्रपट पेश केला. देशात, परदेशात तो तुफान चालला होता. ते शेक्सपीअरच्याच ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकाचं हिंदी पडदारूप होतं. तिथं दिलीपकुमार होता. राज कपूरचा ‘बॉबी’ हादेखील रोमिओ अँड ज्युलिएट’चंच रूप होतं. ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ची गोष्ट तर हिंदीवाल्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे सांगून पाहिली की त्याचं फॉर्म्युल्यात रूपांतर झालं. ‘एक दुजे के लिए’, ‘कयामत से कयामत’पासून संजय लीला भन्साळीच्या ‘राम-लीला’पर्यंत चिक्कार मोठी यादी देता येईल. ‘गुलझार साहेबांनी शेक्सपीअरच्याच ‘कॉमेडी ऑफ एरर्स’वर आधारलेला ‘अंगूर’ तर असा काही पेश केला की हे शेक्सपीअरचं देणं आहे, याखातर रसिकांच्या मनात कृतज्ञतेची भावना बळावावी. अनेक चित्रपटांनी शेक्सपीअरच्या कथानकांना फाटा दिला; पण त्याच्या व्यक्तिरेखा मात्र सामावून घेतल्या. विशेषत: खलनायकांच्या भूमिका.

पुढे अनेक वर्षांनी विशाल भारद्वाज या जाणकार, तरुण दिग्दर्शकानं शेक्सपीअर एकेक करून हिंदी रुपेरी पडद्यावर आणण्याचा चंग बांधला. ओमकारा (ऑथेल्लो), मकबूल (मॅकबेथ) आणि हैदर (हॅम्लेट) ही त्याची त्रिधारा हिंदी कथानकं घेऊन पडद्यावर आली, तरी ती होती शेक्सपीअरचीच.

घोटा घोटानं असं शेक्सपीअरचं प्राशन आपल्याकडे नित्यनेमे चालू असतं. उन्हाळा आला की थंडगार पन्हं प्यावंसं वाटतं, तसा अधूनमधून शेक्सपीअरचा घोट घ्यायची हंगामी सुरसुरी येतेच. जागतिक पुस्तक दिन मुक्रर करताना जगाला शेक्सपीअरचीच आठवण आली. कुणी कादंबरीवाला किंवा कवी आठवला नाही. नाटकवालाच आठवला. यातच शेक्सपीअरची महती कळते.

जग ही रंगभूमी आहे असं म्हणणाऱ्या शेक्सपीअरनं अवघ्या विश्वाकाराचा रंगमंच केला. एखाद्या विज्ञानाच्या मास्तरानं हौसेनं शाळकरी मुलांना रात्रीचं रत्नखचित तारांगण दाखवावं, तसा नक्षत्रलोक त्यानं हिंडवून आणला. नाटक हा सरतेशेवटी ‘मेकबिलीफ’चा खेळ. ‘नटनाट्य तुम्ही केले याजसाठी। कौतुकें दृष्टी निववावी। नाही तरी काय कळलेचि आहे। वाघ आणि गाय लाकडाची।।’ हे नाट्यकलेचं गुह्य तुकोबामाऊलीनंही सांगून टाकलेलं होतंच. या ‘मेकबिलीफ’च्या खेळात शेक्सपीअरनं मानवी विकारविलसितांचे गडद रंग भरले. विशाल पिंपळ वृक्षाप्रमाणे त्यानं भवतालातलं नाट्य कर्बवायूसारखं शोषलं आणि रंगमंचावरून प्राणवायूचा पुरवठा केला. हे सगळं गेली चारशे वर्षं सुरू आहे...

बहुधा शेक्सपीअरला जो सवाल छळत होता, तोच मिर्झा गालिबलाही त्रास देत होता- ‘हा जो भोवताली अहोरात्र पोरखेळ सुरू आहे, ते खरंखरं नाटक की खोटं खोटं वास्तव?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com