पंचसंवेदनांचा साक्षात्कार!

पावसाचं नि कवीपणाचं एक चिरंतन नातं आहे, हे पावसानेच मनातल्या कवितांना साद घालायला आरंभ केला तेव्हा जाणवलं.
rain
rainsakal
Summary

पावसाचं नि कवीपणाचं एक चिरंतन नातं आहे, हे पावसानेच मनातल्या कवितांना साद घालायला आरंभ केला तेव्हा जाणवलं.

आपल्या घननीळ सहस्रकरांनी सृष्टीला नवसृजनाचं लेणं देत तो बरसतो. ‘असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा’ असं कवी अनिलांच्या सुरात सूर मिसळून आपण त्याला अधिक-उणे बोलत, वाट पहायला लावतो म्हणून थोडं चिडचिडत स्वीकारतो. इतका की तो पूर्ण आपलाच होतो. ‘नेमेचि येतो’ म्हणून त्याचं वेळेवर येणं, बरसणं गृहित धरतो; पण दरवर्षी नेमाने त्याचं येणं हेच किती कौतुकाचं, हे मानून चैतन्याच्या ह्या अद्‌भुत साक्षात्कारापुढे नतमस्तक होतो.

हा पाऊस इतक्‍या विविध रूप-रंगाने मला भेटला आहे की... खरंच, यातलं याचं खरं रूप कोणतं, हा पेच पडावा. अगदी बालपणी नाशिकच्या रहिवासात याच पावसानं गंगेचं पात्र इतकं दुथडी भरलं, की त्याचं महापूर हे उग्ररूप पाहताना, या पावसाची दहशत बसली, नि कोरलीच गेली. पण रागावलेले उग्र वाटणारे आजोबा चांदण्यातल्या आरामखुर्चीत गोष्ट सांगताना प्रेमळ वाटावेत तसाच तो पुढे लाघवी, जिवलग वाटत गेला.

पावसाचं नि कवीपणाचं एक चिरंतन नातं आहे, हे पावसानेच मनातल्या कवितांना साद घालायला आरंभ केला तेव्हा जाणवलं. मेघाळलेल्या निष्ठाईत जेव्हा कृष्णमेघांचे भोवरे फिरू लागतात; बरसायचं तर आहे; पण ते पहिलं पाऊल टाकण्याचा तो ‘क्षण’! अगदी अश्‍वाने लाल मातीत धुरळा उडवीत धावण्यापूर्वी, निमिषभराचा विराम घ्यावा, तशी ती मन निःस्तब्ध करणारी स्तब्धता! निर्मितीपूर्व मनाची ती उसळकाहिली मला पाऊसपूर्व आभाळात जाणवते. स्फुरलेली कविता अजून आपल्या अवयवांना घाट देतेय, व्यक्त व्हायला आतुर झालेय; पण संवेदनांचं मंथन अजून अपूर्ण आहे, अशी विलक्षण तगमग सृष्टीच्या पर्जन्यपूर्ण विभ्रमात जाणवते.

कधी मुसळधार, कधी धुवाधार, कोसळधार, रिमझिम, सरसर, टपटप... हे काही फक्त पावसाचे आवेगरंग नाहीत, तर हे आयुष्यातील कढ व्यक्त करणारे उतार-चढ आहेत. कातरवेळेला जिवाची तीच स्थिती करणारा हा आपला असूनही दूरचा भासणारा सखा, न व्यक्त होणारा तगमगीचा पाऊस काळजात कोंडून ठेवतो. परंतु, स्पंदनांच्या पायघड्यांवरून मनमीत आल्यानंतर मात्र त्याला अनावर होतं नि मग सृष्टीच्या कुठल्याच शेळ्यांची पर्वा न करता वसुंधरेचं सारं ‘आर्त’ शांत करतो. पृथ्वीतलावरील प्रत्येकाशी अगणित संदर्भांनी भेटण्याची त्याची लीला पाहिली की तो खरंच युगंधर श्रीकृष्ण आहे, याची प्रचिती देतो.

कधीकाळी प्रश्‍न पडायचा, आताही नीट उत्तर गवसत नाही, आपल्या वयाचं बोट धरून तो आपल्याबरोबर मोठा होतो की, त्याचं बोट धरून आपण...? ‘मी तुझ्यापेक्षा खूप पावसाळे पाहिलेत!’ असं म्हणताना हा पावसाळा फक्त ‘पावसा’चा असतो का? याचा अर्थ अनुभवाचा, घटनांचा, मानवी स्वभावाचा, सुख-दुःखांचा पाऊसही काही शिकवत असावा. वयानेच नाही, जाणिवेने तो आपल्याला मोठा करीत असावा.

बालपणाच्या अंगणात कागदाच्या होडीने कुठल्या तरी स्वप्ननगरात जाण्याचं स्वप्न पहाणारे आपण पावसाळ्यातील उन्हाळे सोसत रुपेरी वळणावर येतो, तेव्हा काळजाच्या होडीने... नात्यांचे किनारे आपण गाठू शकू का, या आवर्तात भिरभिरतो. पाऊस तोच; पण आता वेगळा झाला, की आपण वेगळे झालो? सहा ऋतूंत ‘पाऊस’च असा की, जो पंखही देतो नि डंखही! आकाशही देतो नि वाळवंटही! खरंच, या ऋतूंत चैतन्याचा तो चक्रधारी गिरिधारी दडला आहे, याचा पुनःपुन्हा प्रत्यय येतो. आपल्या वास्तूप्रमाणे हा पाऊसही ‘घर’ बदलतो; एक तर जिवलग होतो किंवा दूरस्थ, असा माझा अनुभव आहे. अगदी बालपणी वडिलांच्या नोकरीमुळे वाडा-मोरवाडा असा त्याकाळी अगदी नगण्य ग्राम असलेल्या खेड्यापाड्यांत रहावं लागे. त्या वेळी कोसळणाऱ्या सरी मातीलाच नव्हे तर घराच्या भिंतींनाही सुवास द्यायच्या. उंबरा ओलांडून घरात यायला उत्सुक असलेल्या पावसाला ‘आता पुरे,’ असं गाऱ्हाणं घालावं लागे! पावसाचं हे शिवरौद्र रूप तांडव करीत, घराला तडे पाडीत, आता पाऊस काय घरच कोसळतोय की काय, असं भयसीमेवर उभं करत असे. भीतीची जाणीवच नसलेलं नि आईच्या कुशीतल्या उबाऱ्यात, जगातलं सर्वांत सुरक्षित घरटं सापडलेलं ते बालपण...! पण कालपर्यंत साचलेल्या पाण्यातून पायाने भुईचक्र पाडणारा हा पाऊस नाही; डोळे वटारणारा, पाठीमागे धाकाचा दंडुका लपवलेला हा कुणी वेगळाच पाऊस आहे हे जाणवायचं. अशा वेळी घरात येता येता थबकलेला पाऊस, भिंतीतून कुठल्याशा रोपाची फांदी काढून हिरव्यागार पानांतून म्हणायचा, ‘‘दारातून नाही, मी आलोय भिंत ओलांडून ! ’’

मातीची घरं ओलांडून चाळीतील घरात आल्यावर हा पाऊस एकदम मदतीला धावून येणाऱ्या, हाडापेरानं पीळदार असलेल्या खिलाडू दोस्ताप्रमाणे होतो. शेजाऱ्यांच्या घराची कौलं अधिकच तडकून ‘आणू तपेली, पातेली, सतेली’ अशी चिंता वाढवणारा ठरला, तर आधीच अपुऱ्या असलेल्या आपल्या घराला, मनाच्या मोठेपणाचं घर देऊन, ‘निदान आजी-आजोबांना तरी आमच्या घरात ठेवा!’ हे औचित्य चाळकऱ्यांना देत पाऊस खरोखर नाती जोडतो. अशी नाती जोडणाऱ्या पावसाच्या घरात आयुष्यातील घडती वर्षं गेली; त्यामुळे जगण्यात, बोलण्यात, लेखनातही तो पाऊस आला; नि तो ओलावा हीच आयुष्याची गर्भश्रीमंती झाली.

पावसाला स्वतःची गती आहे, आवेग आहे, लय आहे, मनाच्या बदलत्या प्रकाशखेळांचे कवडसे आहेत; तसंच स्वतःचे रंगही आहेत. एकांतात गुलाबी होणारा पाऊस, एकाकीपणात करडा होतो. सहलीला हिरवा होणारा पाऊस गिरिशिखरांवर निळा होतो. त्याला स्थळाप्रमाणे नि भिजणाऱ्याच्या मनाप्रमाणे रंग परिधान करता येतो. धुवाधार दरीत हाच पाऊस नेमका आत कुठे पोहोचतोय ते न कळल्याने तो गूढरंगी होतो; तर काळ्या कातळावरून प्रपाताचं रूप घेऊन जाणारा पाऊस गोकुळीचे घट ओसंडावे तसा वत्सलधवल होतो. पाऊस रूपं बदलत जातो. तो नेमका ‘असा’ हे सांगता येत नाही; हेच त्याचं अनंतरूपधारी सर्वव्यापीपण आहे. छायाचित्रात तो टिपता येतो; पण तो केवळ त्या क्षणापुरताच, त्याचा तेवढाच आस्वाद घ्यावा; पण म्हणून पाऊस तो हाच, असा दावा करू नये; कारण बघणाऱ्याच्या हातावर तुरी नव्हे, पण तसेच थेंब देऊन तो पसार होतो.

पावसाला जसा रंग आहे, तसा स्पर्शही आहे; नि तो वेगवेगळा आहे. केवळ तळहातावरून पाणी सोडल्यागत पावसाचा स्पर्श सोडून देता येत नाही. विरहात हा पाऊस ‘पानी में जले’ होऊन आगीचा चटका देईल, तर मिलनात हाच पाऊस मोगऱ्याची बरसात करेल. आहे की नाही किमयागार! खूप वाट पाहिल्यानंतर येणाऱ्या पावसाच्या स्पर्शात कृषिवलाला भविष्याचा आश्‍वासक स्पर्श दिसेल. मी आता आलोय, पेरण्या सुरू कर; यंदाची सुगी तुझ्या घरी धन-धान्यानं लक्ष्मीची पावलं प्रगट करेल, हे सांगणारा हा पाऊस, दिलासा देणाऱ्या स्पर्शाचा! तर कधी रूद्र संचारून स्वप्न पाठीवरून नेणारा पाऊस रानदांडग्या राकट स्पर्शाचा! सृष्टीतील ब्रह्मा, विष्णू, महेश जणू त्यांच्या स्पर्शात अनाकलनीय गूढपणे केव्हाही जागे होतात. शाळेच्या खिडकीतून येणारी पावसाची झड मैत्रीच्या स्पर्शाची! ‘चल ये! फक्त पुस्तकाची खिडकी उघडू नकोस; खिडकीचं पुस्तकही उघड. ये, मी तुझी वाट पहातोय...!’ ही साद त्याच्या स्पर्शात!

...तर वृद्धाश्रमाच्या खिडकीतून दुरून दिसणारा... पण तरीही नातवंडांच्या आठवणींचे, त्यांच्या भेटीची ओढ घेऊन येणारे ते तुषार! हा पाऊस केव्हा हलकेच जाऊन डोळ्यांत घर करतो नि पापण्यांची कवाडं बंद करतो ते पावसालाही कळत नाही. ह्याच पावसाला मांगल्याचा स्पर्श येतो. गणेश आगमनाला अष्टगंधाचा सुवास झेलत येणारा पाऊस, दिवाळीला नुकत्याच सारवलेल्या अंगणात रेखलेली रांगोळी केवळ नावालाच भिजवायला येतो. कणारांगोळीला त्याचा दुरून रिमझिम स्पर्श झाला तरी सुबत्तेची चाहूल लागते, असा समज या आता जात्या पावलांच्या पावसानेच करून दिला आहे.

हा पाऊस स्पर्श, रूप, रंग, गंधाने जसा ओथंबतो; मातीतून धान्यांकुर होत तो कणीस होतो नि प्रत्येक जिवाचं ‘पोट भरण्यासाठी’ खऱ्या अर्थाने तो पोटातही जातो. एका थेंबाचा प्रवास; विराटातून सुरू होतो... नि... स्थूलात रमून तो पुन्हा अनंतात विसावतो.

परंतु हा ब्रह्मांड व्यापून चराचराला नवसंजीवन देणारा पाऊस सर्वसामान्यांसाठी रुचीचा रसही घेऊन येतो; पावसाच्या सोबतीनं नेहमीच्याच पदार्थांना आगळी लज्जत येते, तेव्हा पाऊस एक खाद्यसोहळा होतो. एरव्ही जेवणात काय आपण कांद्याची भजी खात नाही का? साध्या आंबट वरण-भाताबरोबर चार काटेरी कांदाभजी मजा आणतातच; पण श्रावण सरताना नि भादवा उगवताना खंडाळ्याच्या घाटातल्या जरा आडवळणावर कढईतून आतून खमंगता घेऊन येणारी कांद्याची भजी तुम्हाला पोटातून साद घालतात. वाहन स्वतःचं असेल तर हा रुचकर ‘स्पीड ब्रेकर’ आपण आवडीने जवळ करतो. पावसानेही आता आपला खेळ जरासा आटोपता घ्यायला सुरुवात केलेली असते. छत्रीला न जुमानणारा ओला गार वारा पावसाच्या तिरक्‍या रेषा आपल्या सर्वांगावर ओढतो; नि मग नेहमीचीच भजी आपले सारे रसपाझर जिभेवर मोकळे करतात.

पावसाने भजी खमंग होतात, तशी मक्‍याची कणसंही खास लाल माती नि हलक्‍या पावसाच्या मांडवातलं पक्वान्न होतात. ‘भय्या, नमक लिंबू मारके’ असे सांगत कणीस एकेका दाण्याने खरपूस भाजलं जाताना सर आलीच तर आपण नुसत्या डोळ्यांनीच ती वरच्यावरच साजरी करतो. कणीस घरी गॅसच्या चुलीवर भाजणं ही अगदी खास शहरी मध्यमवर्गीय तडजोड आहे. पण कणसाची टचटचीत दुधाळ सुरवट चव पावसाच्या आहे-नाही वाटेवर जवळच्या बागेच्या, तळ्याच्या, समुद्राच्या साक्षीनेच! डोंगरमाथा नि पावसाचा वळण रस्ता असेल तर भाग्यच! पण पावसाला असं चवदार करणं ही ज्याची त्याची खवय्या कसोटी. पुढे हे पदार्थ आपण खाऊ; पण चवीचा आतला चवदार गाभा चाखायचा असेल तर पाऊसच हवा!

असा हा पाऊस! थेंबागणिक स्वतःचं वेगळेपण जपणारा; कधी हवासा तर कधी अगदी नकोसा होऊनही.. कालांतराने कधी येतोय याची ओढ लावणारा!

आता हे आषाढरंगी उसळते थेंब श्रावणपंखी फुलपाखरू झाले आहेत. थेंबात आभाळ धारण करणाऱ्या या सुखाला झेलण्याचा हा क्षण! नुसता क्षण नाही; सणच! प्रत्येक क्षण ‘चिंब जगून घ्या’ सांगत नश्‍वर आयुष्याला अक्षर करणारा! सत्‌ चित्‌ आनंदाचं मूर्तिमंत रूप होणारा! माउलींच्या शब्दात ‘अरूपाचं रूप होणारा!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com