वनराणीचे हृदय चोरता... (प्रवीण टोकेकर)

- प्रवीण टोकेकर
रविवार, 12 मार्च 2017

...आगीनराक्षस शांत झाला आणि हिरव्या रंगाची, हिरव्या वाणाची, हरितकन्या वनराणी प्रकटली. तिची काळी सावली नष्ट होऊन वरदायिनी माय ओल्या हातानं पोटच्या पोराला जवळ घेते, तश्‍शीच ती भासली. माओवीला नवा जादूचा गळ तिनं देऊन टाकला आणि मोआनाला सुखरूप घरी पाठवलं.

...आगीनराक्षस शांत झाला आणि हिरव्या रंगाची, हिरव्या वाणाची, हरितकन्या वनराणी प्रकटली. तिची काळी सावली नष्ट होऊन वरदायिनी माय ओल्या हातानं पोटच्या पोराला जवळ घेते, तश्‍शीच ती भासली. माओवीला नवा जादूचा गळ तिनं देऊन टाकला आणि मोआनाला सुखरूप घरी पाठवलं.

काटेसावरीच्या म्हातारीसारख्या लोककथा वाऱ्यावरती हिंडत असतात. तरंगत तरंगत कुठंही जायचं. वारा पडेल तिथं जमिनीवर पडायचं. एखादी पावसाची सर आली की एका बीजापोटी तिथंच रुजायचं. मग पुन्हा विशाल वृक्ष. पुन्हा पालवी. पुन्हा पानगळ. पुन्हा फुलोरा. पुन्हा म्हाताऱ्या निघतात पुढच्या वाऱ्यावरच्या वरातीला. लोककथा अशाच असतात.

‘डिस्नी ॲनिमेशन’ला अशीच एक वाऱ्यावरची मस्त लोककथा सापडली. पॉलिनेशियात. त्यांनी तिचं सोनंच करून टाकलं. पडद्यावरची ही लोककथा बघताना बच्चेकंपनी अचंबित होतेच; पण तथाकथित ‘मोठ्ठ्या’ लोकांनाही ती हतबुद्ध करते. पर्यावरण वाचवण्याचा धडा इतक्‍या गोड पद्धतीनं दिला जाऊ शकतो, यावर चटकन विश्‍वासही बसत नाही. 

डिस्नीच्या या नव्याकोऱ्या चित्रपटाचं नाव - मोआना.
एका लोककथेचं ॲनिमेशनपटात रूपांतर करण्यासाठी डिस्नीसारखी मंडळी किती मेहनत घेतात. त्यापाठीमागचा हेतू किती शुद्ध ठेवतात, याचं अनुपम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. धंद्याचा हिशेब करतानाही बच्चेकंपनीच्या मनात किती सुंदरसं बीज पेरण्याचा विचार डिस्नी मंडळी करतात, हे कौतुकास्पदच आहे. शक्‍य होईल तिथं हा ‘मोआना’ बघितलाच पाहिजे. आधुनिक काळातलं ते एक क्‍लासिकच आहे. त्यातली चित्रकला, रंगांचा वापर, व्यक्‍तिरेखांचं फुलणं...आणि मुख्य म्हणजे अफलातून संगीत! सगळंच नजरबंदी करणारं. नुसतीच नजरबंदी नव्हे, तर आतून-बाहेरून समृद्ध करणारंही.

...तर बरं का, एक होता माओवी. म्हटलं तर देव, म्हटलं तर माणूस. माणूस म्हणावा, तर त्यांची देवळं असतात. देव म्हणावा तर त्यांच्या वाट्याला भरपूर मानवी संघर्ष आलेला. माओवी असाच होता. बलदंड. हुश्‍शार. कल्पक. चतुर. इच्छाधारी...घटकेत मासा, घटकेत पक्षी. घटकेत हवेत, घटकेत पाण्यात. माओवी हा अनेक पॉलिनेशियन लोककथांचा लाडका नायक आहे. 
पॉलिनेशिया म्हणून ओळखली जाणारी दक्षिणी पॅसिफिक सागरातली असंख्य चिमुकली बेटं आहेत. ऑस्ट्रेलिया खंडाच्या जवळच्या न्यूझीलंड-पापुआ न्यू गिनीपासून ते थेट हवाई किंवा फिजी, सामोआ, ताहिती वगैरे बेटांपर्यंत. ही हजारभर बेटं माणसानं केव्हाच्या काळी आपल्या चिमुकल्या होड्यांनिशी गाठली, वसवली होती. 

...तर अशाच एका मोतुनुई नावाच्या पॉलिनेशियन बेटावरची ही कहाणी. तिथला राजा तुई आणि राणी सिना यांची लाडकी मुलगी म्हंजे आपली नायिका मोआना. मोआनाची आज्जी ताला ही महाखट म्हातारी होती. बोलघेवडी. तिनं मोआनाला पहिल्यांदा माओवीची गोष्ट सांगितली.
तालाआज्जी म्हणाली - ‘‘बरं का, एकदा माओवीला वाटलं की आपल्या माणूसजातीला अमर करून टाकावं. त्याला भरपूर नारळ, भरपूर मासे मिळोत, असं काहीतरी करावं. माओवीकडं एक जादूई माशाचा गळ होता. छोटुकला नाही हं, चांगला कुऱ्हाडीएवढा. त्या गळाच्या जोरावर तो भलभलते चमत्कार करत असे. त्यानं एकदा काय केलं, ‘ते फिती’ ही वनराणी होती नं, तिचं हृदयच चोरून आणायचं ठरवलं. ‘ते फिती’च्या त्या सुंदर हृदयामुळं तर आपल्याला इतकी झाडंझुडं, नारळ वगैरे मिळतात. हिरवाई मिळते. समुद्रात चिक्‍कार मासे असतात...‘ते फिती’ आहे म्हणून आपण आहोत...तर माओवी आभाळात उडाला आणि थेट ‘ते फिती’चं हिरवं, पाचूसारखं हृदय घेऊन पळालासुद्धा. समुद्रात त्याला भेटला ‘ते का’!!- हा आगीनराक्षस होता. त्यालाही ‘ते फिती’चं हृदय हवंच होतं; पण माओवीनं आपला गळ परजत त्याच्यावर उडी घेतली.

तेव्हापासून माओवी, त्याचा गळ आणि ‘ते फिती’चं हृदय गायब आहे. ‘ते फिती’ हृदयशून्य झाल्यामुळं तिच्यातली काळी शक्‍ती जागी झाली. झाडं सुकत गेली. समुद्रातले मासे संपत चालले. अशानं एक दिवस माणूसही मरणार की! एखादा शूर माणूस बघून त्यानं माओवीला शोधायला हवं. त्याला म्हणावं ः ‘ते फिती’चं हृदय तिला देऊन टाक. माणसाला वाचव.’ ’’
...गोष्ट ऐकून छोटी मोआना खुळी झाली.

पण राजा तुईचा फतवा असा, की कुणीही खोल समुद्रात कधीही जायचं नाही. 

एक दिवस चिंगू मोआना समुद्राशी गेलीच. तिथं तिला एक कासवाचं पिलू दिसलं. त्याला पक्षी टोचत होते. मोआनानं पिलाला उचलून समुद्रात सोडलं. समुद्र तिचा मित्र झाला. त्यानं तिला ‘ते फिती’चं हृदय देऊ केलं; पण हा हिरवा दगड घेऊन करायचं काय? तिला काही कळेना. तेवढ्यात तिचे बाबा आले आणि तिला उचलून घेऊन गेले.

इकडं हळूहळू मोतुनुई बेटावरची हिरवाई सुकू लागली. मासे संपू लागले. जीवन आक्रसू लागलं. अखेर तालाआज्जीचं ऐकून, तिच्याकडून ते फितीचं पाचूचं हृदय घेऊन, १३-१४ वर्षांच्या मोआनानं जिद्दीनं होडी पाण्यात लोटली आणि ती खोल समुद्रात गेलीच. तिनं ठरवलं होतं, की माओवीला गाठून सांगायचं, ‘माझ्या होडीत बस आणि बऱ्या बोलानं ‘ते फिती’ला तिचं हृदय परत देऊन टाक.’

अखेर तिला माओवी भेटला.
दणकट, तरणाबांड गडी. गमतीशीर. अंगभर भरपूर टॅटू. ते टॅटूसुद्धा जिवंत होते बरं का! पण खूप मनधरण्या करून तो पठ्ठ्या मोआनाला बधेना. त्याचा जादूई गळ हरवल्यामुळं गेली हजार वर्षं तो सामान्य माणूस म्हणून जगत होता म्हणे. आकार बदलणं, प्रवास करणं, उडणं सगळं बंद होतं; पण मोआनानं त्याचा पिच्छा पुरवला. गळ तामातोआ नावाच्या कर्कराजाकडं होता. हा किंगक्रॅब भयंकर होता. (निळ्या पाठीचा अजस्र कोकोनट क्रॅब ताहिती वगैरे पॉलिनेशियन बेटांवर आढळतो). सोन्या-रुप्यानं मढलेला. खोल पाण्यात, पार पाताळात त्याचं राज्य होतं; पण तो पक्‍का स्तुतिप्रिय होता. त्याला गंडवून माओवी आणि मोआनानं गळ पळवलाच. 

गळ मिळाल्यावर माओवी खूश झाला; पण म्हणाला - ‘बाय बाय. ते पाचूचं हृदय म्हंजे पनौती आहे. ते चोरल्यावर माझ्या नशिबी हजार वर्षांचा वनवास आला. आपण नाय आता येत.’  बिचारी एकटी पडली; पण डरली नाही. तिनं होडी ‘ते फिती’च्या बेटाकडं नेली. मात्र, ‘ते फिती’ला तिचं हृदय परत देणं इतकं सोपं नव्हतंच. मध्ये तो आगीनराक्षस होता ना!! पण त्याच्याशी शर्थीनं झुंजून मोआनानं ‘ते फिती’चं बेट गाठलं. बिचारी ‘ते फिती’! हृदय गमावल्यामुळं निर्जीव होऊन पडली होती. 

इतक्‍यात कुठून तरी झेपा टाकत माओवी आला आणि आगीनराक्षसाशी झुंजू लागला. आगीनराक्षसाला बघताना मोआनाला जाणवलं, की ‘ते फिती’ची काळी सावली म्हणजेच ‘ते का’ ऊर्फ आगीनराक्षस. त्याला हळुवार हाक घालून मोआनानं पाचूचं हृदय आगीनराक्षसाला देऊन टाकलं.

आगीनराक्षस भराभरा शांत झाला आणि हिरव्या रंगाची, हिरव्या वाणाची, हरितकन्या वनराणी प्रकटली. तिची काळी सावली नष्ट होऊन वरदायिनी माय ओल्या हातानं पोटच्या पोराला जवळ घेते, तश्‍शी भासली. 
 

माओवीला नवा जादूचा गळ तिनं देऊन टाकला आणि मोआनाला सुखरूप घरी पाठवलं. तेव्हापासून बरं का, अजून हिरवाई टिकून आहे आपल्या जगात. नारळ मिळताहेत. मासे मिळताहेत. कळलं?

या चित्रकथेची जन्मकथा विलक्षण आहे. त्याचं झालं असं, की काही कारणांनी ॲरन आणि जॉर्डन कॅंडेल या डिस्नीच्या लेखकांनी तीन वर्षं पॉलिनेशियात मुक्‍काम ठोकला होता. ही भावंडं हवाईतल्या होनोलुलूची. त्यांनी लहानपणापासून माओवीच्या कहाण्या ऐकल्या होत्याच. त्यांना हॉलिवूडहून लेखिका पॅमेला रिब्बन जाऊन मिळाली. न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, सामोआ, हवाई इथल्या बेटांवर जाऊन माओवी या लोकनायकाच्या शेकडो कथा त्यांनी गोळा केल्या. तिथला अभ्यास करता करता त्यांच्या लक्षात आलं, की पॉलिनेशियात गेली साडेतीन हजार वर्षं मानवी संस्कृती नांदतेय. छोट्या होड्यांमधून (कॅनू) समुद्र ओलांडायचं कसब त्यांच्याठायी होतं; पण नंतर दोन-अडीच हजार वर्षं त्यांनी नवी बेटं शोधलीच नाहीत. दीडेक हजार वर्षापूर्वी पुन्हा जमीन शोधणं सुरू झालं. मधल्या दोन-अडीच वर्षांत असं काय घडलं? ते कुठं बाहेर गेलेच नाहीत? समुद्रात होड्या त्यांनी घातल्याच नाहीत? असं का? 

इथं त्यांच्या हाताला मोआना लागली. मोआना म्हणजे मावरी भाषेत समुद्राचं खुलं पाणी. या कहाणीत पर्यावरण वाचवण्याचा जणू मंत्रच दडला होता. क्‍लायमेट चेंज, समुद्री प्रवाहांचं बदलणं, जैविक नुकसानाचे परिणाम...सगळे घटक होते. डिस्नीच्या टीमनं मग ही कथा अशी काही फुलवली की विचारू नका. जॉन मस्कर आणि रॉन क्‍लेमंट्‌स या दिग्दर्शकद्वयीनं मग सगळी कथा ताब्यात घेऊन ती ‘डिस्नीरसा’त बुडवून काढली. कुठलंही नैसर्गिक असत्य या कथेत असणार नाही, याची काटेकोर दक्षता त्यांनी घेतली. मुख्य म्हणजे ड्‌वेन जॉन्सन (द रॉक) या बच्चेकंपनीच्या लाडक्‍या आणि दांडग्या सिताऱ्याचा आवाज त्यांनी कथानायक माओवीसाठी उसना घेतला. 

सुंदर गाणी निर्माण करण्यासाठी लिन-मॅन्युएल मिरांडाला गळ घातली. द रॉकनं तर यात ‘यू आर वेलकम’ हे मस्त रॅप साँग म्हटलं आहे. ऑलिई क्राव्हालिओ आणि ॲलिशिया काराच्या आवाजातलं ‘हाऊ फार आय विल गो’ तर भावगर्भ आणि अभिजात आहे. ‘शायनी’ हे गाणं चित्रपटात तो खेकडोबा गातो. डेव्हिड बोवीच्या धाटणीचं हे बेष्टच गाणं आहे. गाणी आणि संगीत फारच सुंदर आहे. डिस्नीची रंगांची निवड कमालीची चोखंदळ असतेच. इथं तर अवघा निसर्ग सगळ्याच्या सगळ्या रंगांनिशी कॅनव्हाससारखा समोर आलेला. त्यातलं क्‍लायमॅक्‍सला वनराणीचं हिरव्या रंगांची उधळण करत उलगडत जाणं तर श्‍वास रोधून ठेवणारं दृश्‍य आहे. खरीखुरी वनराणी कुठं असलीच, तर ती अशीच दिसत असणार! 

अप्रतिम रंगसंगतीनं कुठं डोळे दुखत नाहीत. कानठळी संगीत नसल्यानं कान दुखत नाहीत. चटकदार संवादांनी आणि लोभस कार्टून व्यक्‍तिरेखांनी कधी खुसुखुसू ते खदाखदा हसू येत राहतं. तो गमत्या माओवी, ती लोभस तालाआज्जी, खेकडोबा तामातोआ, मोआनाचा लाडका; पण अत्यंत खुळचट कोंबडा ‘हेहे’...समुद्रही इथं एक व्यक्‍तिरेखा बनून भेटायला येतो. 

हे सगळं गारुड बघता बघता मन निवत जातं. पोरवयात ठीक आहे; पण आपल्या-तुपल्यासारख्या बनचुक्‍यांना मनातली थोडीफार (उरलेली) निरागसता पूर्ण एकवटून हा चित्रपट बघता आला तर बहारच. सिनेमा संपल्यावर जाणवतं...

एक काटेसावरीची म्हातारी वाऱ्यावर उडत आली. मनगटावर बसली. डोळे मिटून तिला मनातली इच्छा सांगून टाकली नि मारली फुंकर. पुन्हा वाऱ्यावर स्वार झालेली म्हातारी जाता जाता म्हणून गेली - तथास्तु. 

Web Title: pravin tokekar artical saptarang