भूतबीत! (प्रवीण टोकेकर)

भूतबीत! (प्रवीण टोकेकर)

सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ‘द एग्झॉर्सिस्ट’ नावाच्या एका चित्रपटानं अवघं जग खुर्चीतल्या खुर्चीत टरकवलं होतं. त्यातले भयप्रसंग अंगावर यायचे. नंतर स्वच्छतागृहापर्यंतही जाणं जिवावर यायचं. ‘द एग्झॉर्सिस्ट’नंतर अगदी ‘काँज्युरिंग’ किंवा नुकत्याच आलेल्या ‘ॲनाबेल’पर्यंत अनेक भयपट आले. त्यापैकी कित्येक दर्जेदार होते; पण ‘द एग्झॉर्सिस्ट’चा अनुभव काहीच्या काहीच ग्रेट होता.

लोक उगीचच हॉरर पिक्‍चरला घाबरतात. त्यात काय घाबरायचंय? भूतबीत असं काही नसतं हो. उगाच नुसत्या बाता. पब्लिक उगीचच कंड्या पिकवत असतं. त्यानंच ज्यास्त गाळण उडते. रात्री घरात कुणी नसलं की मग ढणढणीत दिवा जळता ठेवून झोपावं लागतं. डोक्‍यावरून पांघरूण घेतलं की वेगवेगळे आवाज येतात. काही काही आठवायला लागतं आणि मनच एखादी भयकथा रचू लागतं. भीतीपोटीच या असल्या कहाण्या पैदा होतात.

...गेल्या वर्षी एका सवाष्णीनं विहिरीत जीव दिला, ती आता हायवेला कुणाकुणाला दिसते.
किंवा...एक्‍सप्रेस वेनं अपरात्री जाताय; पण बोगद्याशी थांबू नका...एक बाई तिथं लिफ्ट मागते.
किंवा...त्या होस्टेलमध्ये मागं एका पोरानं जीव दिला होता. रात्री कुणीही जिन्यात जात नाही तिथं.
किंवा...त्या अमक्‍या हॉटेलात रात्री नऊनंतर टॉप फ्लोअरला कुणीही जात नाही. तिथल्या रूम्स बंदच आहेत. मध्यरात्री बारानंतर तिथं घुंगरांचे आवाज सुरू होतात.
किंवा... एक ना दोन. भुतांच्या गोष्टींना खळ नसतो. हे सगळे कल्पनेचे खेळ, हे माहीत असूनही, टरकायची ती टरकतेच! हे काय गौडबंगाल आहे? भयकथांचं आकर्षण कशामुळं असतं आपल्याला? मुळात भयपट काढतातच कशाला? लोकांना घाऊक टरकवण्यासाठी कुणीतरी मेहनतीनं भयपट काढायचा...लोकांनीही स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून तिकिटं काढायची...आणि खुर्चीत जीव मुठीत धरून बसायचं. ‘कधी एकदा पिक्‍चर संपतोय’ असं मनातल्या मनात घोकत. याला काय अर्थंय?
सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वी ‘द एग्झॉर्सिस्ट’ नावाच्या एका चित्रपटानं असंच अवघं जग खुर्चीतल्या खुर्चीत टरकवलं होतं. काही मध्यमवयीन जाणत्यांना नक्‍की आठवत असेल. ते सत्तरीचं मावळतं दशक होतं किंवा ऐंशीची उगवती म्हणा हवं तर. व्हीसीआर नावाचं एक यंत्र तेव्हा नवलाईचं झालेलं होतं. व्हिडिओ कॅसेटी आत सरकवून टीव्हीवर रात्र रात्र चित्रपट बघायचे ते दिवस होते. कोजागिरीचा हा हमखास आयटेम असायचा. व्हीसीआर तेव्हा भाड्यानं मिळे. वर्गणी काढून तो सायकलवर लादून आणायचा. गच्चीवर टीव्ही आणि व्हीसीआरची जोडणी करून समारंभपूर्वक रात्रभर तीन-चार इंग्लिश चित्रपट बघायचे, असला मामला होता. नंतर हिंदी सिनेमांच्या कॅसेटही मिळू लागल्या; पण सुरवातीला भाव खाल्ला हॉलिवूडच्या चित्रपटांनी. त्या काळात ‘द एग्झॉर्सिस्ट’ चिक्‍कार बघितला गेला. रात्री दोन-अडीचच्या सुमाराला त्यातले भयप्रसंग अंगावर यायचे. नंतर स्वच्छतागृहापर्यंतही जाणं जिवावर यायचं.

‘द एग्झॉर्सिस्ट’नंतर अगदी ‘काँज्युरिंग’ किंवा नुकत्याच आलेल्या ‘ॲनाबेल’पर्यंत अनेक भयपट आले. त्यापैकी कित्येक दर्जेदार होते; पण ‘द एग्झॉर्सिस्ट’चा अनुभव काहीच्या काहीच ग्रेट होता. तसला दीड हात अनुभव नंतर कधी वाट्याला आला नाही. ‘द एग्झॉर्सिस्ट’ हा खराखुरा अभिजात भयपट. सर्वोत्कृष्ट भयपटाच्या नामांकनासह १० ऑस्कर नामांकनं मिळालेला एकमेव हॉरर सिनेमा.
एकबार देखोगे, तो बार बार जाओगे...किधर ? पिक्‍चर देखने, भाय!
* * *
साठीचं दशक होतं. फादर लॅंकेस्टर मेरिन यांनी उत्तर इराकमधल्या निर्जन भागात उत्खनन चालवलंय. विविध अपशकुनांच्या गर्दीतच त्यांच्या हाताला एक विचित्र आकाराची प्राचीन वस्तू लागली. त्यांना तीच वस्तू मिळणं अपेक्षित होतं का? ही समंधाकृती कमालीची ओंगळ आणि अपशकुनी आहे. हा ‘पाझुझु’ नावाचा जागृत समंध आहे. फादर मेरिन यांना पुढं काय वाढून ठेवलंय याची तत्काळ कल्पना आली. पुढलं सगळं भयनाट्य हजारो मैल दूर वॉशिंग्टनजवळ घडलं.

चित्रपट अभिनेत्री क्रिस्तिना मॅक्‍निलचा या भानगडीशी वास्तविक काहीही संबंध नव्हता. क्रिस स्वत: एक बिझी, यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री होती. रेगन ही तिची १२ वर्षांची गोड मुलगी आणि त्या दोघीही जॉर्जटाऊनमध्ये आल्या आहेत. वॉर्नर ब्रदर्सच्या ‘क्रॅश कोर्स’ नावाच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालंय. एक प्रशस्त घर भाड्यानं घेऊन क्रिस काही दिवस तिथंच राहणार आहे. तिची मुलगी रेगन, बटलर कार्ल, दोन हरकाम्या मोलकरणी असं कुटुंब. क्रिसनं नवरा सोडला आहे, हे उघड आहे. बापापासून वेगळी झालेली चिमुकली रेगन थोडी हिरमुसली आहे; पण परिस्थितीशी तिच्या पद्धतीनं जुळवून घेतेय. घर चिक्‍कार मोठ्‌ठं आणि आलिशान आहे; पण काहीतरी गडबड आहे या घरात. पोटमाळ्यावरून कसले कसले आवाज येतात...बहुतेक उंदीर असणार. वॉशिंग्टनमध्ये नाहीतरी उंदरांचा उच्छाद फार आहे. एक दिवस रेगन उश्‍या-पांघरुणं घेऊन क्रिसच्या बेडरूममध्ये आली. म्हणाली ः ‘मम्मा, माझा बेड गदागदा हलतोय.’ हळूहळू रेगनची तब्येत बिघडत गेली. एकटीच हसायची. माना डोलावत राहायची. कण्हल्यासारखी गुणगुणायची. एके रात्री खूप मोठा आवाज आला म्हणून क्रिस उठून रेगनच्या खोलीत गेली तर तिचा पलंग थडाथडा उडत होता. सुपात धान्य पाखडावं, तसं कुणीतरी रेगनला पाखडत होतं. क्रिस हादरून गेली. ‘हे पाहा, तूर्त तरी काळजी करण्याचं कारण नाही. हा नैराश्‍याचा झटकाच दिसतोय. मस्तिष्कभागात काही अडचण निर्माण झाली की असे भास होतात. औषध लिहून देतो,’ असं सांगून डॉक्‍टरांनी घरी पाठवलं; पण रेगन मलूलच असायची. डोळ्यांतले भाव हरवले होते. क्‍वचित कधी बोलायची. ‘मला काय झालंय?’ असं खोल आवाजात विचारायची. क्रिसच्या हृदयाला घरं पडत.

अशाच एका झटक्‍याच्या वेळी दोघा डॉक्‍टरांना रेगननं इतक्‍या जोरात उचलून फेकलं, की क्रिसचा विज्ञानावरचाच विश्वास किंचित डळमळला. फादर कारासबद्दल तिनं थोडंफार ऐकलं होतं. कारास यांना क्रिसनं एक-दोन वेळा पाहिलंही होतं. ‘रेगनचं प्रकरण काहीतरी ‘अबक’चा प्रकार दिसतोय, तर एकदा फादर कारास यांना दाखवून घे,’ असं कुणीतरी आडून सुचवलंही होतं; पण बुद्धिजीवी क्रिसनं ही सूचना झटकली होती. निव्वळ भंपकपणा. तंत्र-मंत्र मध्ययुगात राहिले. असल्या अंधश्रद्धांचा हा जमाना आहे का? जग कुठं चाललंय...वगैरे. दुसरीकडं रेगन खंगत चाललेली तिला दिसतही होती.
* * *

त्याच वेळी फादर डेमियन कारास हे जीवनातल्या वेगळ्याच संकटाला तोंड देत होते. चर्चच्या अखत्यारीतले कारास एरवी प्रवचनात ख्रिस्ताच्या शक्‍तीची उदाहरणं देत; पण त्यांचा स्वत:चाच विश्वास उडत चालला होता. आपण आपल्या आईलासुद्धा सांभाळू शकलो नाही, समाजाचं काय डोंबलं भलं करणार? आई वृद्धाश्रमात झगडतेय. मी इकडं प्रवचनं देतोय. आईला इथं आणण्याचा प्रयत्न करायला हवा; पण तेवढे पैसे कुठून आणायचे? शी: या देवाच्या राज्यात सगळाच चुथडा झाला. एक दिवस त्यांची आई एका वेड्यांच्या इस्पितळात शेवटी गेलीच. फादर कारास यांचा उरलासुरला विश्‍वासही दारूच्या बाटलीत बुडाला.
...त्याच दिवसांत क्रिसच्या घरी एक पार्टी होती. अंतराळवीरांपासून सिनेटर्सपर्यंत खूप नामवंत लोक आले होते. तिचा दिग्दर्शक बुर्क डेनिंग्ज तिच्या आकंठ प्रेमात बुडालेला. तो सगळ्यात खुशीत होता. पार्टी ऐन रंगात आलेली असताना वरच्या खोलीतून रेगन आली. तारवटलेल्या डोळ्यांनी तिनं त्या अंतराळवीराला सांगितलं ः ‘‘ तू वरच मरशील.’’ असं म्हणून तिथल्या तिथं तिनं शू केली.
* * *

रेगनच्या मेंदूची तपासणी करण्याचं ठरलं. मस्तिष्काच्या आसपास एखादा ट्यूमर किंवा गळू असण्याची शक्‍यता डॉक्‍टरांना वाटत होती; पण ब्रेन स्कॅनचे निष्कर्ष नॉर्मल होते. डॉक्‍टर बुचकळ्यात पडले. मानसोपचारतज्ज्ञाची भेट घेतलेली बरी, असं त्यांनी सुचवलं. रात्री क्रिसनं रेगनच्या खोलीत भयानक दृश्‍य पाहिलं. पलंगावर बसून रेगन गलिच्छ शिव्यांची बरसात करत होती. हातातल्या क्रॉसनं तिनं अचकट-विचकट प्रकार सुरू केले.
रस्त्यावरचा मवालीही वापरणार नाही, अशी भाषा तिच्या तोंडात होती. आवाज साफ बदललेला होता. क्रिसच्या भीतीनं ठाव सोडला.
एके दिवशी भयानक प्रकार घडला. बाहेर गेलेली क्रिस परत आली, तर घरात कुणीही नाही. सगळे नोकर गेले कुठं? मग रेगनच्या खोलीत कोण आहे? क्रिस धावत गेली. रेगन शांत झोपलेली होती. थोड्या वेळानं परत आलेल्या मोलकरणीला तिनं फैलावर घेतलं. ‘‘कुठं गेली होतीस?’’
‘‘म्हंजे, बुर्कसाहेबांनी सांगितलं नाही? ते आले तेव्हा त्यांना ‘दोन मिनिटं बसा, मी औषधं घेऊन आलेच,’ असं सांगून गेले होते मी,’’ मोलकरीण म्हणाली.
बुर्क डेनिंग्ज घराजवळच मान मोडलेल्या अवस्थेत रस्त्यावर मरून पडलेला आढळला.
* * *

किंडरमन नावाच्या एका पोलिसाला या घटनेचा किंचित सुगावा लागला. त्यानं सहज चौकशी म्हणून फादर डेमियन कारास यांना गाठलं. बुर्कचा खून झालाय आणि त्याचा संबंध जादूटोण्याशी आहे, असं त्याचा तपास सुचवत होता. कारास यांनी त्याला उडवून लावलं.
...तळमजल्यावरच्या किचनमध्ये मोलकरणीशी क्रिस काही बोलत होती, तेवढ्यात जिन्यातून दरादरादरा विंचवासारखी उलटी चालत रेगन आली. आणि लालेलाल रक्‍ताळलेली जीभ बाहेर काढून खदाखदा हसली. रेगनला औषधाच्या अमलाखाली ठेवणं भाग होतं. शिवाय, तिला पलंगाला जखडून बांधण्यात आलं.  
‘‘अमेरिकेतले सर्वोत्तम ८८ मानसोपचारतज्ज्ञ आणि मेंदूविकारतज्ज्ञ या क्षणाला एका मुलीला काय झालंय, हेसुद्धा सांगू शकत नाहीएत. आग लावा तुमच्या ज्ञानाला...’’ हमसाहमशी रडत क्रिस डॉक्‍टरांच्या पथकावर बरसली. तेव्हा एका मानसोपचारतज्ज्ञानं चाचरतच सुचवलं : परामानसशास्त्राबद्दल काही ऐकलंय का? हल्ली कुणी जादूटोणा किंवा एग्झॉर्सिझमचे प्रकार करत नाही. निदान उघड तरी! पण त्याचा झाला तर पेशंटला फायदाच होतो. हे एक प्रकारचं सजेशन असतं. ‘तुला झोंबलेलं भूत आता मी काढतोय, तू आता बरी होणार आहेस,’ अशा प्रकारचं. बघा, काही जमतंय का...’’
* * *

क्रिसनं फादर कारास यांना गाठलं. फादर कारास म्हणाले ः ‘‘तुम्ही चांगल्या इस्पितळात तिला ठेवा. नीट उपचार करा. एग्झॉर्सिझम एवढं सोपं नाही. शिवाय चर्चची परवानगी असेल तरच ते करता येतं. अन्यथा नाही. शिवाय मला त्यातली काही माहितीही नाही...’’
‘‘माझ्या घरात आत्ता मुलीच्या बेडरूममध्ये जे कुणी आहे, ती माझी मुलगी नाही, हे मी खात्रीनं सांगू शकते. तुम्ही काहीच मदत करू शकणार नाही का?’’ क्रिसनं त्यांना रडत रडत गळ घातली. ते घरी आले. पलंगावर रेगनच्या जागी ते कुणीतरी बसलं होतं. पांढराफटक चेहरा. डोळ्यांच्या उफराट्या बाहुल्या. घशातून गरळ आल्यासारखे अचकट-विचकट आवाज. मधूनच खदखदून हसणं. किडके दात.
‘‘मी रेगन नाही रे!’’ ते खेकसलं.
‘‘मग कोण आहेस?’’ कारास शांत राहिले.
‘‘मी सैतान आहे!’’ ते वसकन्‌ ओरडलं ः ‘‘ माझ्या हाता-पायांना बांधलेल्या दोऱ्या काढ.’’
‘‘सैतान आहेस, तर तूच काढ!’’ कारास म्हणाले.
‘‘तुझी आईसुद्धा आहे आमच्यात. कळलं?’’
‘‘अस्सं? तिचं नाव सांग!’’
ते कारास यांच्या अंगावर भडाभडा ओकलं. कारास तिथून निघून गेले. या मुलीला आपल्या आईबद्दल कुणी सांगितलं असेल?
* **

रेगनची तब्येत बिघडतच गेली. मान गरगरा गोलगोल फिरवायची. हिडीस हसायची. ओकायची. शिव्या द्यायची. कारास यांनी अखेर चर्चकडं एग्झॉर्सिझमसाठी विनंती केली. चर्चनं ऐकलं. एकच देवमाणूस हे प्रकरण हाताळू शकतो. फादर लॅंकेस्टर मेरिन. नुकतेच ते एका उत्खननाहून परतलेत. मेरिलॅंडमध्ये राहतात, असं कळलं. निरोप मिळताच फादर मेरिन यांनी ओळखलं ः युद्धाची वेळ आली. मेरिन आणि कारास या दोघांनी रेगनच्या खोलीत ते युद्ध आरंभलं.
‘‘विश्वातल्या सर्वश्रेष्ठ सुशक्‍तींना आव्हान देणाऱ्या या दुष्टात्म्याला नरकाचा मार्ग दाखवण्यासाठी हे प्रभो, आम्हांस शक्‍ती दे! संपूर्ण मानवजातीच्या विरोधातल्या, माणुसकीचा गळा घोटणाऱ्या या दुष्ट शक्‍तीचं निर्दालन करण्यासाठी हे परमेश्वरा, आमचं रक्षण कर! जीझस क्राइस्ट कम्पेल्स यू टू गो... जीझस क्राइस्ट कम्पेल्स यू टू गो....जीझस क्राइस्ट कम्पेल्स यू टू गो...’’
पलंग आख्खा हवेत गेला. आळोखेपिळोखे देत, किंचाळत ते काहीतरी बरळू लागलं. थोडं शांत झालं. काही कारणानं खोलीबाहेर गेलेले फादर कारास परतले, तेव्हा फादर मेरिन पलंगाशी मरून पडलेले होते आणि पलंगाच्या कोपऱ्यात विद्रूप अवस्थेतली रेगन खुदखुदत होती... संतापून फादर कारास यांनी रेगनवर झेप घेतली.‘‘मला घे...माझ्यात ये...असेल हिंमत तर ये...’’असं आवाहन त्यांनी करताच ते पिशाच्च रेगनच्या शरीरातून निघून फादर कारास यांच्या कुडीत शिरलं. क्षणाचाही विलंब न लावता फादर कारास यांनी खिडकीतून बाहेर उडी मारली. रस्त्याच्या फरसबंदीवर त्यांचं कलेवर पडून राहिलं...
‘‘मम्मा, मदर...मदर...आई गंऽऽ’’ क्षीण झालेल्या रेगननं आईला बोलावलं. ती हाक ऐकून क्रिस आवेगानं धावली. एक दुष्टपर्व संपलं होतं.
* * *

सन १९४९ च्या सुमारास अमेरिकेतच गाजलेल्या एका केसची चर्चमधली कागदपत्रं वाचून विल्यम पीटर ब्लॅटी यांनी ‘द एग्झॉर्सिस्ट’ याच नावाची कादंबरी लिहिली. ती तुफान गाजली. त्यावर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक विल्यम फ्राइडकिन यांनी केला. याची संहिता ब्लॅटी यांनीच लिहिली आणि सर्वोत्तम कथा-पटकथेचं ऑस्करही पटकावलं. या चित्रपटाला १० ऑस्कर नामांकनं होती. अनेक देशांमध्ये या चित्रपटावर अनेक वर्षं बंदी होती. भारतातही हा चित्रपट खूप उशिरा आला, तरीही अफाट धंदा चित्रपटानं केला. चित्रपटगृहांबाहेर रुग्णवाहिकांची रांग असे. अनेकजण थिएटरात बेशुद्ध पडत. काहींवर विचित्र परिणाम होई. त्यांच्यासाठी एक धर्मोपदेशक पवित्र पाणी शिंपडायला मौजूद ठेवलेला असे. चित्रपट बघून काहीजणींचे गर्भपात झाल्याचीही उदाहरणं आहेत. ज्या गावच्या थिएटरात सिनेमा लागलेला असेल, तिथं जायला स्पेशल बस सर्व्हिसेस होत्या. त्यांना ‘एग्झॉर्सिस्ट बस ट्रिप्स’ म्हणत.

या चित्रपटात भन्नाट रोल आहे तो रेगनची भूमिका करणाऱ्या लिंडा ब्लेअर या १२ वर्षाच्या पोरीचा. ‘एग्झॉर्सिस्ट’चा शिक्‍का ती आयुष्यभर पुसू शकली नाही. लोक तिला घाबरत. भेटायचं टाळत. या चित्रपटात तिच्या तोंडी खूप गलिच्छ शिव्या आहेत. त्या दिल्याबद्दलही तिला चर्चनं खडसावलं. तिच्या आईचा रोल करणारी एलेन बर्स्टिन या अभिनेत्रीलाही असेच अनुभव आले. अनेक धर्मोपदेशकांनी तिचं सांत्वन केलं. फादर कारास यांच्या अजरामर भूमिकेसाठी जॅक निकल्सनला घ्यायचं चाललं होतं; पण निकल्सनसारखा तमोगुणी गृहस्थ फादरच्या भूमिकेत नको, असं वॉर्नर ब्रदर्सनं ठरवलं. त्या काळी ‘ब्लू लॅगून’ या चित्रपटासाठी गाजलेली ब्रूक शील्ड्‌स रेगनच्या भूमिकेसाठी जवळपास निवडली गेली होती; पण तेही जमलं नाही. मध्ययुगात एग्झॉर्सिझमचं खूप प्रस्थ होतं. कालौघात ते कमी झालं; पण या चित्रपटानंतर पुन्हा एकदा त्यात वाढ झाल्यानं चर्चेसपुढं नवी डोकेदुखी निर्माण झाली. इतकं नुकसान करणारा चित्रपट काढायचा तरी कशाला आणि बघायचा तरी कशाला, या विचाराचे अनेक लोक हा चित्रपट बघायचं टाळतात; पण एकदा तरी बघावा की. आता जगात भूतबीत नाही, असं एकदा म्हटलं तर बघायला काय हरकत आहे?
सुरवातीलाच म्हटलं ना, लोक उगीचच हॉरर पिक्‍चरला घाबरतात. त्यात काय घाबरायचंय? भूतबीत असं काही नसतं हो. उगाच नुसत्या बाता. पब्लिक उगीचच काहीच्या काही कंड्या पिकवत असतं. त्यानंच ज्यास्त गाळण उडते. मजेत भूतपट बघायचा किंवा गोष्ट वाचायची. आत्ता वाचताय ना, तसंच...काय बरोबर ना?
अं...पण तुमच्या पाठीमागं ते कोण उभं आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com