ओह वॉव! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 17 सप्टेंबर 2017

स्टीव्ह जॉब्ज नावाचं मिथक आपल्यापैकी अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत जन्माला आलं. कर्तृत्वाची पताका फडकावून चिरविश्रांती घेतं झालं. हे सगळं आपल्यासमोर घडलं, यावर विश्‍वास बसत नाही; पण स्टीव्ह जॉब्ज नावाची दंतकथा मात्र आज आपल्यापैकी काही जणांच्या चक्‍क हातात खेळत असते. ‘आयफोन’ किंवा ‘आयपॅड‘वर दिमाखानं मिरवणारं ते अर्धवट खाल्लेलं सफरचंद दरवेळी सांगत असतं. : ‘दर्जाला शॉर्टकट नसतो. ॲटिट्यूड...ॲटिट्यूड हवा. आशयाचं भान हवं. भविष्याचा वेध हवा. मुख्य म्हणजे सौंदर्यदृष्टी हवी’.
‘ॲपल’नं परवाच दोन नवे फोन बाजारात आणले आहेत...

स्टीव्ह जॉब्ज नावाचं मिथक आपल्यापैकी अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत जन्माला आलं. कर्तृत्वाची पताका फडकावून चिरविश्रांती घेतं झालं. हे सगळं आपल्यासमोर घडलं, यावर विश्‍वास बसत नाही; पण स्टीव्ह जॉब्ज नावाची दंतकथा मात्र आज आपल्यापैकी काही जणांच्या चक्‍क हातात खेळत असते. ‘आयफोन’ किंवा ‘आयपॅड‘वर दिमाखानं मिरवणारं ते अर्धवट खाल्लेलं सफरचंद दरवेळी सांगत असतं. : ‘दर्जाला शॉर्टकट नसतो. ॲटिट्यूड...ॲटिट्यूड हवा. आशयाचं भान हवं. भविष्याचा वेध हवा. मुख्य म्हणजे सौंदर्यदृष्टी हवी’.
‘ॲपल’नं परवाच दोन नवे फोन बाजारात आणले आहेत...

He seemed to be climbing.
But with that will, that work ethic, that strength, there was also sweet Steve’s capacity for wonderment, the artist’s belief in the ideal, the still more beautiful later.
Steve’s final words, hours earlier, were monosyllables, repeated three times.
Before embarking, he’d looked at his sister Patty, then for a long time at his children, then at his life’s partner, Laurene, and then over their shoulders past them.
Steve’s final words were:
OH WOW. OH WOW. OH WOW.
 
‘ॲ  पल’कर्ता स्टीव्ह जॉब्ज याचं पाच ऑक्‍टोबर २०११ रोजी त्याच्या पॉलो आल्टो इथल्या निवासस्थानी निधन झालं. निधनानंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या बहिणीच्या- मोना सिम्प्सन हिच्या - शब्दातल्या श्रद्धासुमनांचा हा अंश. जॉब्जचे अखेरचे क्षण तिनं वर्णन केले आहेत.
* * *
ता. २४ फेब्रुवारी १९५५ रोजी स्टीव्ह जॉब्ज जन्मला. ता. पाच ऑक्‍टोबर २०११ रोजी तो गेला. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी तो दहाएक वर्षं झगडत होता. वाट्याला आलेल्या छोट्याशा आयुष्यात त्यानं जग बदलायचं ठरवलं होतं. आणि चमत्कार हा, की त्यानं ते खरंच बदललं. स्टीव्ह जॉब्ज नावाचं मिथक आपल्यापैकी अनेक लोकांच्या डोळ्यांदेखत जन्माला आलं. कर्तृत्वाची पताका फडकावून चिरविश्रांती घेतं झालं. हे सगळं आपल्यासमोर घडलं, यावर विश्‍वास बसत नाही; पण स्टीव्ह जॉब्ज नावाची दंतकथा मात्र आज आपल्यापैकी काही जणांच्या चक्‍क हातात खेळत असते.
‘आयफोन’ किंवा ‘आयपॅड‘वर दिमाखानं मिरवणारं ते अर्धवट खाल्लेलं सफरचंद दरवेळी सांगत असतं. : ‘‘दर्जाला शॉर्टकट नसतो. ॲटिट्यूड...ॲटिट्यूड हवा. आशयाचं भान हवं. भविष्याचा वेध हवा. मुख्य म्हणजे सौंदर्यदृष्टी हवी.’’

जॉब्ज ठणकावून सांगायचा : ‘रचना म्हटलं की फक्‍त सौंदर्यच हवं असं नाही. त्या वस्तूचं मूल्य आणि क्षमता हासुद्धा रचनेचाच भाग असतो. उदाहरणार्थ ः समजा, तुम्ही सुतारकाम करताहात. एक छानदार ड्रॉवरांचं नक्षीदार कपाट बनवताहात. सगळं छान केलंत तर पाठीमागच्या बाजूला प्लायवूड लावायला तुमचं मन धजणार नाही. धजेल? नाहीतरी भिंतीशी टेकवून ठेवायचंय, कुणाला दिसणार आहे? हा विचार चूक! म्हणून मी म्हणतो, मूल्य आणि क्षमता हा रचनेचाच भाग असतो...’
स्टीव्ह जॉब्जचा एकंदर आयुष्याबद्दलच हा दृष्टिकोन होता. इथं ‘आयुष्य’चा अर्थ करिअर घ्यायचा. जॉब्जला विद्यार्थ्यांशी, किंबहुना तरुणाईशी, संवाद साधायला आवडायचं. आजही त्याची वचनं अनेक वक्‍ते वापरतात. गेल्या आठवड्यात ‘ॲपल’चा मुख्याधिकारी टिम कूक यानं कंपनीतर्फे दोन नवे फोन बाजारात आणले. ही नवी उत्पादनं चांगली आहेत की निव्वळ धूळफेक हे यथावकाश कळेलच; पण ‘ॲपल’चा दबदबा कायम राहिला आहे, हे मान्य करावं लागेल. यापाठीमागं आहे स्टीव्ह जॉब्जच्या पश्‍चात उरलेला त्याचा सुप्रसिद्ध दृष्टिकोन. एका रिकाम्या गॅरेजमध्ये त्यानं आपल्या ‘कॉम्प्युटर उद्योगा’ची मुहूर्तमेढ रोवली. प्रतिभा, मेहनत आणि मुख्य म्हणजे पराकोटीचं वेड या शक्‍तींच्या जोरावर कॉम्प्युटर्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विश्‍वामित्री जगताला कलाक्षेत्राची झिलई दिली. त्याचे मित्र त्याला सांगायचे ः ‘‘कमॉन स्टीव्ह, कॉम्प्युटर म्हणजे पेंटिंग नाहीए. लोकांना त्यात बदल हवे असतात, प्रयोग हवे असतात.’’ तो त्यांना शिव्या घालायचा. त्याच्या मते हे आर्टवर्कच होतं. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी तो गेलासुद्धा; पण त्यातली बहुतेक वर्षं त्यानं जग बदलण्याच्या ऊर्मीत खर्ची घालवली होती. अर्थात हेकट, तिरसट, चढेल, अहंमन्य, जळकू अशा अनेक विशेषणांनी त्याचं वर्णन झालेलं आहे. उदाहरणार्थ : त्याच्या ‘ॲपल’ कंपनीत तो एखाद्याला कॉरिडॉरमध्ये गप्पा मारतानाही सहज काढून टाकत असे. त्याला काळीज नव्हतं. सहवेदनेचं अंग नव्हतं. इतकंच नव्हे तर, खासगी आयुष्यातही त्यानं फार दिवे लावले नाहीत. तरुण वयात लक्षाधीश झालेल्या या प्रतिभावानाची पत्नी आणि मुलगी मात्र अनेक वर्षं सरकारी भत्त्यावर दिवस काढत होती वगैरे. स्टीव्ह जॉब्जच्या व्यक्‍तिमत्त्वाची ही काळी बाजू. तिचं भरपूर चर्वितचर्वण झालं आहे. पाठीमागच्या बाजूला प्लायवूड न लावलेल्या मोठ्या लोकांच्या नक्षीदार कपाटात, तळातल्या खणात असं काही काही काळबेरं असतंच. चालायचंच. जॉब्जच्या यशस्वी; पण अल्प आयुष्यावर दोन चांगले चित्रपट बनले. एक उत्तम लघुपट बनला. त्याची चरित्रं लिहिली गेली. चरित्रं कसली, गाथाच त्या. त्यातलं वॉल्टर आयझॅकसन यांचं ‘जॉब्ज-चरित्र’ अधिकृत मानलं जातं. कारण, आयझॅकसन यांनी चिक्‍कार परिश्रम घेऊन ही गाथा लिहिली.

...जॉब्जवरचा ‘जॉब्ज’ या शीर्षकाचा पहिला चित्रपट आला तो सन २०१३ मध्ये. जॉब्ज गेल्यानंतर लगेचच. त्यात ॲश्‍टन कुचर नावाच्या अभिनेत्यानं जॉब्जची व्यक्‍तिरेखा साकारली होती. जॉब्जचं ते चवड्यांवर डुलत डुलत चालणं कुचरनं तंतोतंत उचललं होतं. ते खरंखुरं ’बायोपिक’ होतं; पण दुर्दैवानं तो चित्रपट पुरेसा अधिकृत ठरला नाही. वाईट नव्हता; पण त्यातल्या जवळपास सगळ्याच व्यक्‍तिरेखा हयात असल्यानं वास्तव आणि चित्र यांतला फरक ढळढळीतपणे दिसला. जॉब्जच्या निकटवर्तीयांनी चित्रपटाला जोड्यानं हाणलं.  ‘स्टीव्ह जॉब्ज’ या शीर्षकाचा दुसरा चित्रपट मात्र कमालीच्या हुशारीनं निर्माण केला गेला. हुशारी अशी की त्यातल्या व्यक्‍तिरेखांना किंचित शेक्‍सपीरिअन गडद रंगात बुडवून काढलं गेलं होतं. त्यामुळं हयात असलेली पात्रं आणि पडद्यावरची पात्रं यांच्यात फरक राहूनही कुणी जास्त टीका केली नाही. आयझॅकसननं लिहिलेल्या चरित्राशी प्रामाणिक राहूनच याची संहिता ॲरन सोर्किन या पटकथाकारानं लिहिली होती. शिवाय, हा दुसरा चित्रपट खऱ्या अर्थानं ‘बायोपिक’ नव्हतं. सन १९८४, १९८८ आणि १९९८ ही स्टीव्ह जॉब्जच्या करिअरमधली नाट्यमय वर्षं. या तीन वर्षांतल्या तीन बॅकस्टेज प्रसंगांचं चित्रण म्हणजे २०१५ मध्ये आलेला स्टीव्ह जॉब्ज हा संपूर्ण चित्रपट. अर्ध्या अर्ध्या तासाचे हे तीन प्रसंग आहेत; पण त्यातून बराचसा स्टीव्ह जॉब्ज उलगडत जातो. यात मध्यवर्ती भूमिका मायकेल फासबिंडर या नाणावलेल्या अभिनेत्यानं केली होती. दिग्दर्शनही ‘स्लमडॉग मिलियनर’वाल्या डॅनी बॉयलचं. जॉब्जची अभिन्न सहकारी असलेल्या जोआना हॉफमनचा रोल केट विन्स्लेट या अफलातून अभिनेत्रीनं केला होता. ‘टायटॅनिक’, ‘द रीडर’ आठवा! तीच ती. साहजिकच दुसऱ्या चित्रपटानं टाळ्या आणि मानवंदना वसूल केल्या.
* * *

‘उपग्रहांमुळं माहितीची देवाणघेवाण वेगात होऊन जगाचा चेहरा, वेग आणि एकंदर अवयवच बदलतील...माहितीचा महापूर येईल आणि हातातल्या एका चिमुकल्या यंत्राद्वारे माणूस जगाशी कायमस्वरूपी जोडला जाईल, हे यंत्रच माणसाचं भविष्य बदलेल...’ असं भाकीत विख्यात विज्ञानलेखक आर्थर सी. क्‍लार्क यांनी १९७६ मध्ये केलं होतं.
बीबीसीनं त्यांची ही मुलाखत घेतली होती. क्‍लार्कसाहेब मोबाइल फोनबद्दल बोलत होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. क्‍लार्क यांच्या या चित्रफितीनिशी जॉब्जची कहाणी सुरू होते.
क्‍युपर्टिनो, कॅलिफोर्निया, १९८४ : मॅकिनटॉश कॉम्प्युटरच्या अनावरणसोहळ्याला काही मिनिटंच बाकी आहेत. स्टीव्ह जॉब्ज भराभरा सूचना देत सुटला आहे. त्याची सहकारी जोआना हॉफमन त्याच्या दुप्पट धावपळ करते आहे. नव्या कॉम्प्युटरमध्ये एक गंभीर लोच्या झाला आहे. ठरल्याप्रमाणे तो यूझरला ‘हल्लो’ असं म्हणत नाहीए. त्यानं म्हटलं पाहिजे. तंत्रज्ञ अँडी हर्टझफेल्ड्‌ हा खरंतर स्टीव्हचा मित्र. जोडीदार. पार्टनरच. पण स्टीव्हनं त्यालाही फैलावर घेतलं. ‘नुसत्या स्क्रू-ड्रायव्हरनं हा कॉम्प्युटर उघडता येणार नाही, त्याला वेगळं हत्यार लागतं’, असं अँडी कुरकुरला; पण स्टीव्ह अजिबात ऐकायला तयार नाही. ‘‘कार्यक्रम वेळेतच सुरू होईल आणि तुझा व्हॉइस डेमो ‘हल्लो’ म्हणेल. मला माहीत नाही!’’ स्टीव्हनं त्याला दम दिला.

‘‘नही होगा, बॉस! इतक्‍या कमी वेळात नाही शक्‍य होणार...’’ हर्टझफेल्ड्‌ म्हणाला.
‘‘कमी वेळात? तुला तीन आठवडे दिले होते. याच्या एक तृतीयांश वेळात विश्वाची निर्मिती झाली होती!’’ स्टीव्हनं टोमणा मारला.
‘‘ते तू कसं केलंस एक दिवस सांग आम्हाला!’’ अँडीनं दुप्पट जोराचा टोमणा हाणला.
‘‘...नाही होणार? ठीक आहे. मी प्रेझेंटेशनच्या वेळेला सगळ्या टीमला क्रेडिट देणार आहे. स्टेजवर बोलावून. हा व्हॉइस डेमो, जो चालला नाही, तो केला आहे अँडी हर्टझफेल्ड्‌ यांनी...चालेल?’’ स्टीव्हनं त्याला घामच फोडला. त्यानं खरंच तसं केलं असतं. जोआना त्याला समजावत होती; पण उपयोग होत नव्हता. स्टीव्ह जॉब्जची समजूत घालणं परमेश्वरालाही शक्‍य नाही. इतक्‍यात स्टीव्हचं लक्ष रंगमंचाच्या मागं पडलेल्या ‘टाइम’ मासिकाच्या गठ्ठ्यांकडं गेलं. ‘‘हे काय आहे?’’
‘‘पर्सनल कॉम्प्युटर्स हे येणाऱ्या पिढीचं भविष्य आहे, असं सांगणारी कव्हर स्टोरी आहे ती. अनावरणसोहळ्यात प्रत्येक खुर्चीवर एक प्रत ठेवायची कल्पना होती; पण...’’ जोआना म्हणाली.
‘‘पण काय?’’
‘‘त्यात तुझ्यावर एक लेख आहे. लिसा नावाची तुला एक अनौरस मुलगी असल्याचा उल्लेख आहे त्यात...मी ठरवलं, नाही वाटायचा हा अंक!’’ जोआना चाचरत म्हणाली. पुढं संतापाचा स्फोट अटळ होता.
‘‘व्हॉट? लिसा ही माझी मुलगी नाही. मी तिचा बाप नाही. तिची आई म्हणते म्हणून मी बाप होतो का तिचा? नॉन्सेन्स! मी माझ्या मुलाखतीत तसं स्पष्ट सांगितलेलं होतं...’’ स्टीव्ह खवळून म्हणाला. ‘‘तेही आहे त्यात...’’ जोआनानं नोकरदाराचा संयम पाळत पुढं सांगितलं ः ‘‘ शिवाय आत्ता दाराबाहेर तुला भेटायला लिसा आणि तिची आई क्रिसान आलेल्या आहेत. सकाळी सात वाजल्यापासून बसल्या आहेत...’’
लिसाला जोआना खूप आवडते. तिचा आवाज आवडतो. जोआना पोलंडची आहे. ‘पोलंड कुठं आहे?’ असं विचारलं तर लिसा ‘पृथ्वीच्या टॉप’ला असं सांगते. पोलंड आणि नॉर्थ पोल (उत्तर ध्रुव) यात ती पाच वर्षांची चिमुरडी गल्लत करतेय, हे उघड आहे. ‘‘ॲपलच्या एका कॉम्प्युटरचं नाव बाबांनी ‘लिसा’ ठेवलंय...हो ना, डॅड?’’ लिसा निरागसपणे म्हणाली.
‘‘ योगायोग आहे तो लिसा...लिसाचा फुलफॉर्म आहे Locally Integrated System Architecture. ओके?’’ स्टीव्हनं हात झटकले. लिसा दुखावली. जोआना तिला घेऊन खोलीबाहेर गेली. ती बाहेर गेल्या गेल्या क्रिसाननं स्टीव्हला झापलं.
‘‘मी अमेरिकेतल्या २८ टक्‍के पुरुषांबरोबर झोपले, हा शोध तू कुठून लावलास? तुझ्या मुलाखतीत तू म्हटलं आहेस तसं...’’ टाइम मासिकाचा अंक नाचवत क्रिसान म्हणाली.
‘‘मी आल्गोरिदम वापरला. ‘मी जर लिसाचा बाप असू शकतो, तर त्या न्यायानं अमेरिकेतले २८ टक्‍के पुरुषसुद्धा असू शकतात,’ असं माझं वाक्‍य होतं. पॅटर्निटी टेस्टमध्ये मी तिचा बाप असण्याची शक्‍यता ९४.१ टक्‍के असल्याचं म्हटलं आहे. दॅट कम्स टू २८ टक्‍के पुरुष...सिम्पल. मी तुझ्याबद्दल काहीही बोललेलो नाही...’’ स्टीव्ह निर्विकारपणे म्हणाला.
‘‘तुला लाज नाही वाटत? आज तुझं नेट वर्थ ४४१ मिलियन डॉलर्स आहे आणि मी आणि तुझी मुलगी एका खोलीत कसेबसे राहतोय, वेलफेअरवर जगतोय. लिसा शाळेतही जाऊ शकत नाहीए...’’ क्रिसिनला रडू आलं.
‘‘लिसा माझी मुलगी नाही...’’
‘‘तुझीच मुलगी आहे ती. तुला माहीत आहे. तू का नाही म्हणतोयस? तुझं तुला माहीत...’’ क्रिसिन ओरडली.शेवटी लिसाच्या खर्चासाठी म्हणून स्टीव्हनं काही पैसे देण्याचं कबूल केलं. ॲपल-२ ची टीम नाराज होती. ते उत्पादन चांगलं असलं तरी स्टीव्ह नाराज होता. ‘ॲपल-२ च्या टीममेम्बरांचं थोडं कौतुक कर,’ असं स्टीव्हला त्याचा मित्र-पार्टनर स्टीव्ह वोझनियॅक यानं सांगून पाहिलं; पण जॉब्ज त्याच्याशीही कडाकडा भांडला. ॲपलचा सीईओ जॉन स्कली याला स्टीव्हच्या सृजनशीलतेबद्दल आदर होता; पण त्याच्या हेकेखोर आणि उद्धट स्वभावाचा त्याला रागही यायचा. संचालक मंडळ मात्र चांगलंच नाराज होतं. स्कली स्वत: पेप्सीचं यशस्वी मार्केटिंग करूनच ‘ॲपल’मध्ये आला होता. स्टीव्हचा मॅकिनटॉश बाजारात आपटला. पन्नास हजार पीसीसुद्धा विकले गेले नाहीत. ॲपलच्या संचालक मंडळानं स्टीव्ह जॉब्जची हकालपट्टी केली. स्कलीसुद्धा मनातून दुखावला. कारण, त्याच्या मनाविरुद्ध हे घडलं होतं.
* * *

सन १९८८. स्वत:च स्थापन केलेल्या ॲपलमधून स्वत:ची हकालपट्टी ओढवल्यानंतर स्टीव्ह जॉब्जनं ‘नेक्‍स्ट’ नावाची कंपनी सुरू केली. ‘द क्‍यूब’ नावाचा नवा, शिक्षणाला उपयुक्‍त असा कॉम्प्युटर त्याला बाजारात आणायचा होता. त्याच्या अनावरणाचा सोहळा ठरला. क्‍यूबचा आकार निराळा होता. मुख्य म्हणजे रंग ठार काळा होता. परिपूर्ण असा क्‍यूब मानवी डोळ्यांना दिसत नाही. दृष्टिभ्रमाचा प्रकार होतो म्हणून जॉब्जनं मुद्दाम क्‍यूबची एक बाजू काही मिलिमीटरनं जास्त ठेवली होती. लिसा एक फूटपट्टी घेऊन क्‍यूबशी खेळत होती.
‘‘डॅड...ऑल साइड्‌स आर सेम!’’ ती म्हणाली.
‘‘तुझी फूटपट्टी चुकीची आहे...’’ स्टीव्ह म्हणाला. मधल्या चार वर्षांच्या काळात लिसा आणि स्टीव्हमधलं नातं बरंच गहिरं झालं आहे. क्‍यूबच्या साइजमध्ये गडबडी करून ठेवल्या म्हणून स्टीव्ह त्याच्या सहकाऱ्यांना छळू लागला.
‘‘ॲपलमध्ये तुला सर्वाधिक यशस्वीपणे झेलणाऱ्या सहकाऱ्याला बक्षीस दिलं जायचं, हे माहीत आहे तुला? मी सलग तीन वर्षं मिळवलंय ते!’’ जोआना म्हणाली.
आधीची सगळी भांडणं विसरून त्याचा मित्र स्टीव्ह वोझनियॅक त्याला पुन्हा भेटायला आला. अनावरणासाठी स्टेज सज्ज होत होतं. पिटमध्ये वाद्यवृंद लागत होता. तिथं वोझनियॅकनं त्याला सांगितलं ः ‘‘ मॅकवर्ल्ड मासिकात क्‍यूबचं कौतुक आलं आहे. हा कॉम्प्युटर इतका छान आहे की लवकरच स्टीव्ह जॉब्जला ‘ॲपल’ परत बोलावून घेईल, असं त्यात म्हटलंय.’’
स्टीव्हनं त्याला प्रतिसाद दिला नाही. वोझनियॅक वैतागला.
‘‘स्टीव्ह, तू डिझायनरही नाहीस, इंजिनिअर तर बिलकूल नाहीस. सर्किट बोर्ड मी बनवलेत...आणखी काही पार्ट आणखी कुणी. मग स्टीव्ह जॉब्ज तेवढा जीनियस कसा?’’ वोझनियॅक म्हणाला.
‘‘मी एका वाद्यवृंदाच्या चालकाला विचारलं होतं, ‘तू नेमकं काय वाजवतोस?’ तेव्हा तो म्हणाला होता, की ‘बाकीचे वादक त्यांची त्यांची वाद्यं वाजवतात, मी वाद्यवृंदच वाजवतो.’ माझा मुद्दा कळला का?’’ जॉब्ज म्हणाला.
‘‘तुझा क्‍यूब हे एक भंकस प्रॉडक्‍ट आहे. चालणार नाही. लिहून घे माझ्याकडून. त्यात चिक्‍कार प्रॉब्लेम्स आहेत. हेच सांगायला मी आलो होतो,’’ वोझनियॅक म्हणाला.
‘‘मला माहीत नसलेलं काही असेल तर सांग!’’ स्टीव्ह करकरीत आवाजात म्हणाला. ‘जीक्‍यू’ मासिकाचा प्रतिनिधी जोएल फोर्झहायमरनं स्टीव्हला लिफ्टमध्ये गाठलं. ऑफ द रेकॉर्ड सांगताना स्टीव्हनं त्याच्यावर बॉम्बच टाकला, ‘आम्ही आत्ता नुसता डेमो देणार आहोत.’ वास्तविक क्‍यूबची ऑपरेटिंग सिस्टिमच अजून तयार नाही, ही प्रचंड मोठी बातमी होती. शेअर्सचे भाव धडाधडा कोसळले असते. जॉन स्कलीही त्याला येऊन रंगमंचाच्या मागं भेटला. ‘ॲपलमधून काढण्यात आपला सहभाग नव्हता, पण बिल आपल्याच नावावर फाटलं,’ असं स्कलीनं त्याला सांगितलं. जुन्या जखमा भळभळल्या. गैरसमजाचं धुकं हटायला त्यानं मदतच झाली. जे काही झालं, त्यात स्टीव्ह जॉब्जचाही वाटा होताच. स्कली निघून गेला.
‘‘तुझ्यात खूप दोष आहेत, स्टीव्ह. पण सूड हा तुझा प्रांत नाही. नसत्या गोष्टीत कशाला जीव जाळायचाय तुला?’’ जोआनानं त्याची नेहमीप्रमाणे समजूत घातली. जोआना ही खरंच त्याची विवेकी बाजू होती. ती माझी ‘वर्क-वाईफ’ आहे, असं तो म्हणे ते यामुळंच. तब्बल १९ वर्षं जोआना त्याच्यासोबत काम करत राहिली. क्रिसानचं या ना त्या कारणानं पैसे मागणं सुरूच होतं. लिसाच्या शाळेचा खर्च स्टीव्ह करत होता; पण क्रिसानला त्यानं जवळ केलं नाही.
* * *

सन १९९८. प्रचंड कुतूहल निर्माण झालेल्या आयमॅक कॉम्प्युटरचं अनावरण. स्थळ : अर्थात बॅकस्टेज.
पुलाखालून एव्हाना बरंच पाणी वाहून गेलं आहे. उद्योगजगताच्या अटकळींनुसार स्टीव्ह जॉब्ज नावाची दंतकथा पुन्हा एकवार ॲपलच्या गोटात समाविष्ट झाली आहे. त्यासाठी जॉब्जची ‘नेस्क्‍ट’ ही कंपनीच जॉब्जसकट ॲपलनं विकत घेऊन टाकली. दरम्यान, स्कली आणि कंपनीनं लाँच केलेलं ‘न्यूटन’ हे डबडंच ठरलं. लोकांनी हातही लावला नाही. एकेकाळी कॉम्प्युटरच्या बाजारात ३२ टक्‍के हिस्सा राखणारं ‘ॲपल’ जेमतेम ३.२ टक्‍के हिस्सा टिकवून आहे. हा अस्तित्वाचाच लढा आहे. जॉब्जनं आता ‘आयमॅक’ची घोषणा केली आहे. आज त्याचं अनावरण. जोआनानं स्टीव्हला खासगीत सांगून टाकलं. ‘‘स्टीव्ह, आयमॅकची क्रेझ शिगेला पोचली आहे. तुझ्या स्वप्नाप्रमाणे आपण तीन महिन्यांत दहा लाख कॉम्प्युटर्स विकू शकू. ३३ टक्‍के लोक पहिल्यांदाच कॉम्प्युटर घेणार आहेत हे विशेष. तू जिंकलास, स्टीव्ह...’’ जोआना त्याची मार्केटिंग हेडसुद्धा आहे. स्टीव्ह समाधानानं हसला. पण तेव्हाच वेळ बघून जोआनानं लिसाचा विषय काढला. लिसाची हार्वर्डची फी स्टीव्हनं न भरल्यानं शेवटी अँडी हर्टझफेल्ड्‌ला पैसे भरावे लागले. असं का वागतोस, स्टीव्ह? स्टीव्हचं म्हणणं, क्रिसान पैसे उडवते. तिला घर घेऊन दिलं, तेही तिनं विकायला काढलंय. मी का पैसे देऊ? अँडी हर्टझफेल्ड्‌लाही त्यानं फैलावर घेतलं. शेवटी स्टीव्ह लिसाला भेटायला तयार झाला. लिसा तिथंच कुठंतरी भटकत होती. लिसाची त्यानं जवळजवळ माफीच मागितली. उदाहरणार्थ ः ‘ॲपल’चा तो पहिला कॉम्प्युटर तिच्याच नावाचा होता. एरवी Locally Integrated System Architecture याला काहीही अर्थ नाही. सॉरी.’
‘‘मग सुरवातीला ‘मी तुमची मुलगी नाही’, असं का म्हणालात?’’ लिसानं भरलेल्या डोळ्यांनी विचारलं.
‘‘माहीत नाही गं!’’
लिसा कार्यक्रमाला थांबणार नव्हती. तेव्हा कारजवळ जाऊन स्टीव्हनं तिला सांगितलं : ‘‘हजारभर गाणी तुझ्या खिशात मावतील, असं काहीतरी मी करतोय.’’ ती ‘आयपॉड’ची घोषणाच होती. तिथून सगळं चित्र पालटलं. विज्ञानलेखक आर्थर सी. क्‍लार्क यांच्या भाकितानं निर्णायक वळण घेतलं, तोच हा क्षण होता!
* * *

शेक्‍सपीअरच्या नाटकांत पात्रांचं जसं येणं-जाणं असतं, तसाच भास इथं संपूर्ण चित्रपटभर होत राहतो. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट कमालीच्या डोळसपणानं केलेला आहे. रंगसंगती, प्रकाशयोजना आपण काहीतरी असामान्य असं बघत आहोत, असं बिंबवत राहते. चित्रपटाचं संपादनही तसंच. काळानुरूप वेग बदलत जातो चित्रपटाचा. इतकंच काय, सुरवातीला आणि शेवटी टायटल्स येतात, त्यांचा फाँटसुद्धा ‘ॲपल’चाच आहे. त्याचा प्रभाव अफलातून आहे. पात्रसुद्धा खूप नाहीत. सगळं नाट्य घडतं बॅकस्टेजला. फ्लॅशबॅकमध्ये चित्रपट इथं तिथं फिरतो तितकाच.  पटकथाकार ॲरन सोर्किन यांनी हा आकृतिबंध निवडला, त्यात मखलाशी होतीच; पण प्रतिभेचा भन्नाट आविष्कारही होता. थोडक्‍यात, हेही स्टीव्ह जॉब्जसारखंच. आधुनिक आणि अभिजाताचा मिलाफ साधण्याची जॉब्जची जातकुळी इथं जपलेली आहे. अर्थात यातले संवाद तसे दमछाक करणारे आहेत. अवघड आहेत. टेक्‍निकल तर आहेतच; पण सवयीनं कळणं अवघड होत नाही. जॉब्ज साकारणाऱ्या मायकेल फासबिंडरनं संवादांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी १८० पानांची आख्खी संहिताच उलटीसुलटी मुखोद्गत करून टाकली. मगच तो कॅमेऱ्यासमोर उभा राहिला.  सॉर्किन यांनी पटकथा लिहिताना पुढ्यात आयझॅकसनचं पुस्तक उघडं करून ठेवलंच; पण जॉब्जचा मित्र, सहकारी आणि पार्टनर स्टीव्ह वोझनियॅकलाही सल्लागार म्हणून सोबत घेतलं. शेक्‍सपीरिअन आकृतिबंध घेतल्यानं वास्तववादी चित्रणाची अट निकालात निघाली होती. वोझनियॅक त्याच्या तंत्रावरच फिदा झाला.

फासबिंडरच्या आधी मॅट डेमन, क्रिस्तियान बेल, जॉर्ज क्‍लूनी अशा अनेकांनी हा रोल मिळवण्यासाठी गळ टाकून पाहिले होते. केट विन्सलेटनं मात्र झटक्‍यात तिचा रोल मिळवला. रोलबरोबरच तिनं आणखी एक गोष्ट मिळवली. ती म्हणजे मूळ जोआना हॉफमनची मैत्री.  स्टीव्ह जॉब्ज गेला, तेव्हा त्याचे अखेरचे शब्द म्हणून काही परिच्छेद व्हायरल झाले होते. ते अर्थात फेक होते. त्याचे अखेरचे शब्द होते : ओह, वॉव, ओह वॉव, ओह वॉव !

...मरणशय्येवर या प्रतिभावंताला काय दिसत होतं? स्टीव्ह जॉब्ज नावाच्या एका सुलेखनकाराचं रूपांतर अफाट प्रतिभेच्या तंत्रमांत्रिकात झालं. या प्रवासात त्याला दिसलेले रंग निराळे असतील. ते आपल्या आयफोनमधल्या रेटिना डिस्प्लेवरही पकडणं मुश्‍किलच. ते ‘वॉव’ शोधण्यासाठी स्टीव्ह जॉब्जलाच पुन्हा जन्म घेणं भाग आहे. आपण वाट पाहूया...

Web Title: pravin tokekar write article in muktapeeth