आ बैल मुझे मार! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 1 एप्रिल 2018

"फर्डिनंड' हा ऍनिमेशनपट पाहिल्यावर अभिजात वाङ्‌मय "अभिजात' का असतं, याचं उत्तरच मिळून जातं. खदाखदा हसवत, क्‍वचित डोळ्यांतून पाणी काढत ही कहाणी अगदी आत्ताच्या जागतिक समस्येवरच बोट ठेवते. कहाणीचा वेग मस्त आहे. गाणी बहारदार आहेत. एकंदरीत एक प्रसन्न अनुभव "फर्डिनंड' देतो.

"फर्डिनंड' हा ऍनिमेशनपट पाहिल्यावर अभिजात वाङ्‌मय "अभिजात' का असतं, याचं उत्तरच मिळून जातं. खदाखदा हसवत, क्‍वचित डोळ्यांतून पाणी काढत ही कहाणी अगदी आत्ताच्या जागतिक समस्येवरच बोट ठेवते. कहाणीचा वेग मस्त आहे. गाणी बहारदार आहेत. एकंदरीत एक प्रसन्न अनुभव "फर्डिनंड' देतो.

"तो अमका ना...शुद्ध बैल आहे लेकाचा' किंवा "आमच्या पच्या म्हणजे एक नंबरचा बश्‍या बैल आहे...बसला की बसला' किंवा "ती? ती कसली...म्हैस मेली!'...असली शेरेबाजी आपल्याला परिचित असते. कुठं कुठं कानावर पडतेच. बैठ्या प्रकृतीची माणसं दिसली की त्याचं किंवा तिचं नातं गोठ्याशी जोडण्याकडंच आपला कल! बैलजातीचा कुणीही चतुष्पाद हा ताडनाचा किंवा वाक्‍ताडनाचा अधिकारी असावा, अशी आपली एक समजूत आहे. त्या बैलामध्येही एखादा शायर दडलेला असू शकतो, हे आपल्या गावीही नसतं.

-फर्डिनंडचंही असंच झालं. लेकरू स्वभावानं भारी गोड होतं; पण दैव कसं खेळ खेळतं बघा, मवाळ मनाच्या या लेकराला जन्म मिळाला तो वृषभाचा. ज्यानं फुलपाखरू म्हणून जन्माला यावं, त्याला खोंड म्हणून वावरावं लागलं.
-फर्डिनंड हा भोळा सांड, अभिजात इंग्लिश वाङ्‌मयातली एक लाडकी व्यक्‍तिरेखा ठरला आहे. इंग्लिश बालवाङ्‌मयात इतका लोभस बैल ना कधी झाला, ना कधी होईल. कितीतरी नाटुकली, नृत्यनाट्यं, चित्रप्रदर्शनं किंवा लघुपटात फर्डिनंड डोकावतो. आता तर फर्डिनंडचा व्हिडिओगेमसुद्धा उपलब्ध झालाय.

-फर्डिनंडची जन्मकथा बुचकळ्यात टाकणारी आहे. सन 1936 मध्ये मन्‍रो लीफनामक प्रतिभावान लेखकानं एका पावसाळी संध्याकाळी अक्षरश: तासाभरात फर्डिनंडची कहाणी लिहून काढली होती ः "द स्टोरी ऑफ फर्डिनंड, द बुल.' त्याच्या रॉबर्ट लॉसन नावाच्या चित्रकारमित्राला काही काम नव्हतं म्हणून त्यानं ही गोष्ट लिहिली. त्याची पुढं चित्रकथा झाली. पोराटोरांना आवडलीही; पण प्रत्यक्षात बालवाङ्‌मय म्हणून निपजलेलं हे पोर मोठ्या माणसांच्या दुनियेत मात्र स्फोटक ठरलं. कहाणीतला फर्डिनंड ज्या देशाचा, त्या स्पेनमध्येच क्रांतीचा एल्गार तेव्हा पेटत होता. फ्रान्सिस्को फ्रॅंको यानं आरंभलेली क्रांती ऐनभरात आली होती. इटलीचा "ड्यूस' बेनितो मुस्सोलिनी, जर्मनीचा "फ्यूरर' आडोल्फ हिटलर यांच्यासारखाच फ्रान्सिस्को फ्रॅंको स्पेनचा "एल्‌ क्‍वादिलो' म्हणजेच सर्वसत्ताधीश होण्याच्या मार्गावर होता. सारं जग दुसऱ्या महायुद्धाच्या वणव्यासाठी तयार होत होतं. अशा कमालीच्या विषारी राजकीय वातावरणात फर्डिनंडची कहाणी अवतरली.

ही बालकथा नसून अराजकतेचा आणि नकारात्मकतेचा संस्कार करणारं क्रांतिविरोधी छुपं साहित्य आहे, असं फ्रॅंकोचं मत झालं. स्पेनमध्ये त्या चिमुकल्या पुस्तकावर बंदी आली. पाठोपाठ हिटलरनं हे पुस्तक नाझीविरोधी "प्रोपागंडा' म्हणून फेकून देण्याच्या लायकीचं ठरवलं. मुसोलिनीनंही तेच केलं. मेक्‍सिकोतही पुस्तकाच्या होळ्या झाल्या. आणखीही काही देशांनी पुस्तकावर बंदी लादली.
सुंदर चित्रांनी विनटलेलं, गमतीदार विनोदांची पखरण असलेलं, मजेमजेदार कवितांची लयलूट असलेलं हे पुस्तक देशोदेशीच्या राज्यकर्त्यांना अचानक "घातक वाङ्‌मय' का वाटलं असावं?
...एका महात्म्यानं मात्र फर्डिनंडसाठी निर्भयपणानं टाळी वाजवली.
होय, मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका भारतीय बालिष्टरानं "फर्डिनंड' वाचली आणि सुंदर पत्र लेखक मन्‍रो लीफ यांना रवाना केलं. एक मानवतावादी दाद लेखकाला मिळाली. त्या चित्रकथेचं वजनच बदलून गेलं. मग अर्थात जगातल्या आणखी काही पुढाऱ्यांनीही पुढं येऊन फर्डिनंडचं कोडकौतुक केलं. "फर्डिनंड'ची ही रंगतदार कहाणी गेल्या वर्षी रुपेरी पडद्यावर आली. सुंदर रंग, नेत्रसुखद ऍनिमेशन, चटकदार संवाद, भावभरं संगीत आणि गाणी यांनी नटलेली ही गोष्ट ऑस्करसोहळ्यातही भाव खाऊन गेली; पण तिला पुरस्कार नाही मिळाला. 1938 मध्ये याच फर्डिनंडवर डिस्नी कंपनीनं एक लघुपट काढला होता, त्याला मात्र ऑस्कर मिळालं होतं.
हा ऍनिमेशन चित्रपट बच्चेकंपनीनं बघावा आणि मोठ्‌ठं व्हावं. मोठ्या लोकांनी छोटं होऊन बघावा, आणि आणखी मोठ्‌ठं व्हावं. अभिजाताचं हे रूप मनात ठाण मांडून बसतं ः गोंडस बैलासारखं. मग कितीही ढोसकलं तरी जाणं मुश्‍कील. बघाच.
* * *

स्पेनमधल्या एका मस्त सकाळी फर्डिनंड टुणकन उठून बसला. गोठ्यातून बाहेर आला. झक्‍क ऊन्ह पडलं होतं. वॉव! काय मस्त दिवस आहे...टणाटणा उड्या मारत तो बाहेर आला. गोठ्याच्या आवारात त्यानं कालच एक फूल उगवलेलं पाहिलं होतं. फर्डिनंड हुरळून गेला होता. तो त्या फुलाशी गप्पा मारायचा. त्याला पाणी घालायचा. गोठ्यात इतरही गोऱ्हे होते; पण त्यांना फुलाबिलांची तमा नव्हती. भलते वाभरट. दिवसभर हुंदडायचं. एकमेकांशी ढुश्‍या घ्यायच्या. गमजा मारायच्या. बास!
...हा गोठा म्हणजे कासा देल तोरो नावाचं स्पेनमधलं एक प्रसिद्ध ठाणं होतं. मोरेनो नावाचा एक कडक शिस्तीचा मनुष्य ते चालवायचा. चांगल्या वाणाचं बीज तयार करायचं. गोऱ्हे वाढवायचे. त्याचा भलाभक्‍कम खूँखार सांड झाला की माद्रिदच्या भरगच्च बुलफायटिंगच्या रिंगणात त्याला उभं करायचं, हा मोरेनोचा उद्योग. बुलफायटिंग हा स्पॅनिश संस्कृतीचा एक मानबिंदूच आहे, असं म्हणा.
...सभोवार चेकाळलेले प्रेक्षक. मधोमध रिंगण...रिंगणाचं लाकडी दार उघडतं. पिसाळलेला खूँखार सांड डुरकत धावत येतो. त्याच्या समोर कसलेला, चपळ मातादोर. त्याच्या हातात लाल रुमाल फडकतो आहे. ती लाल रंगाची पताका बघून सांडाचं माथं भडकतंच. तो बेधडक अंगावर धावून जातो. त्याची रानवट धडक लीलया चुकवत मातादोर पुन्हा त्याला डिवचत उभाच आहे. मातादोर त्याच्या पाठीवर स्वार होण्याचाही प्रयत्न करतो. सांड त्याला भिरकावण्यासाठी बेभान उड्या मारतो. या खेळात रिंगणातून कुणीतरी एक जण जिवंत परत जातो. मातादोरच्या सुऱ्यांनी घायाळ होऊन सांड धरणीवर कोसळतो किंवा शिंग जिव्हारी लागून मातादोर तरी संपतो...

कासा देल तोरोमध्ये तयार होऊन आलेला पुष्ट सांड माणसांच्या जगात हीरो ठरत असे. कमअस्सल जातीच्या सांडाची रवानगी शेजारच्याच खाटीकखान्यात होत असे. बैल मस्तवाल असो वा नसो, चवदार तर असतोच!
...अशा या कासा देल तोरोच्या आवारात एक फूल उगवलं होतं.
* * *

ग्वापो, व्हालियेंते, बोन्स हे फर्डिनंडचे मित्र. त्याच्यासारखेच गोऱ्हे. फायटर बुल होण्याचं त्यांचं स्वप्न होतंच. व्हालियेंतेचा फर्डिनंडवर स्पेशल खुन्नस होता. का? तर त्याच्या वडिलांना हरवून फर्डिनंडचे वडील म्हणजे राफ, माद्रिदला खेळायला जाणार होते.
""बाबा, तुम्ही खरंच जाणार माद्रिदला?"'
""अफकोर्स...का रे?
""मला...मला...भीती वाटते...''
""हॅ: लेका घाबरायचं नसतं असं...हीरो आहोत आपण, हीरो! डोंट वरी, त्या मातादोरला लोळवूनच परत येतो बघ!''
""मारामारी न करता एखाद्याला हीरो होताच येत नाही का?''
""अंऽऽ...होता येत असेलही, बेटा. पण जग तसं चालत नाही, हे तर खरंय?''
...बाप आणि मुलामधला हा शेवटचा संवाद होता. फर्डिनंडला त्याचे बाबा नंतर कधीही दिसले नाहीत. संध्याकाळी माद्रिदहून आलेला ट्रक रिकामा होता.
...व्हालियेंतेनं सूडाच्या भावनेनं फर्डिनंडचं आवडतं एकुलतं एक फुलझाड खुरांनी "तसनस' करून टाकलं. म्हणाला ः ""मर लेका...बैलासारखा बैल आणि फुलं जपतोय...लाज आहे लाज!''
-फर्डिनंड रात्रभर विचार करत राहिला : मला नाही आवडत या मारामाऱ्या. नाही आवडत ते शिंग खुपसणं. रक्‍त, पब्लिकचा आरडाओरडा...शी:! घाण वाटते मला...मला स्वतंत्र, छान जगायचंय. फुलांशी गप्पा मारायच्यायत. गाणी म्हणायची आहेत...जग किती सुंदर आहे. एकमेकांचं रक्‍त काढणारा हा कुठला खेळ?
-फर्डिनंड गोठ्यातून सटकला. उडी मारून चक्‍क पळाला. गुल! पहारेकऱ्यांचा डोळा चुकवत, डोंगरदऱ्या ओलांडत, रस्ते चुकवत अखेर तो एका रम्य गावातल्या घराशी येऊन ठेपला. तिथं मात्र थकून त्याचा डोळा लागला.

ते घर होतं निनाचं. मोठी गोड छोकरी होती. ती आणि तिचे बाबा फ्लोरिस्ट होते. फुलांची लागवड करायची. शहरात नेऊन विकायची हा धंदा. निनाचं आणि फर्डिनंडचं छान जमलं. फर्डिनंड तर फुलवेडा होताच. त्याची अवस्था तर बासुंदीत पडलेल्या माशीसारखी झाली. सगळीकडं फुलंच फुलं...धम्माल!
निनाबरोबर माळरानांवर हुंदडतच फर्डिनंड भराभर मोठा झाला. मोठा कसला? अगडबंबच झाला. काळ्याकभिन्न ढगासारखं त्याचं रूप. बाकदार शिंगं. जबरदस्त वशिंड. त्याला बघून लोक घाबरायचे; पण निनानं ओळखलं होतं की याच्या दैत्यसमान शरीरात एक देवदूत राहतोय. मधासारखा गोड आहे फर्डिनंड. निनाचा एक लाडका कुत्राही होता ः पाको. पण हल्ली फर्डिनंडमुळं त्याचे लाड कमी होत. एवढुशी निना आणि एवढाला फर्डिनंड ही एक अभेद्य जोडी झाली होती.
आणि फुलपाखरांशी खेळताना फर्डिनंड आपलं बैलपण पार विसरून गेला होता.
* * *

शेजारच्या गावात फुलांचा महोत्सव आहे असं कळलं. निना आणि तिच्या बाबांसाठी ही पर्वणीच. महोत्सवासाठी त्यांनी तयारी केली. सगळे गाडीत बसले; पण फर्डिनंडला कसं नेणार? त्याचा आकार केवढा...शेवटी त्याला घरीच ठेवून निना जायला निघाली. फर्डिनंडला राहवेना. शेवटी तो निघालाच. घाट, पूल, रस्ते ओलांडत तोसुद्धा पोचला शहरात.
-महोत्सवात रंगलेल्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये मात्र फर्डिनंडचं प्रचंड रूप बघून पळापळ झाली. फर्डिनंड शांत होता, तेवढ्यात माशी शिंकली! सॉरी, शिंकली नाही, चावली! फर्डिनंडच्या पार्श्‍वभागाला नेमक्‍या जागी..अय्याईग्गं! गगनभेदी डरकाळी मारत फर्डिनंडनं ठाव सोडला. क्षण-दोन क्षणांत महोत्सव उलटापालटा झाला होता. दुकानं कोसळली, माणसं पळाली...बैल उधळला, बैल उधळला!
...पोलिस आले. त्यांनी महत्प्रयासानं फर्डिनंडला जेरबंद करून ट्रकमध्ये घालून नेलं. रडत रडत निना ते सारं बघत राहिली. फर्डिनंड तसा नाहीए...तो चांगला मुलगा आहे, हे सांगायचं कुणाला?
-फर्डिनंडनं डोळे उघडले, तेव्हा तो बंदिस्त ट्रकमध्ये होता. त्यानं बाहेर पाहिलं. तो हादरलाच.
...त्याला पुन्हा कासा देल तोरोमध्ये आणलं गेलं होतं.
* * *

-फर्डिनंड आवरेनासा झाला तेव्हा कासा देल तोरोच्या लोकांनी लुपे नावाची एक शेळी त्याच्यासोबत दिली. लुपे ही एक प्रकारची मानसोपचार तज्ज्ञ म्हणा ना. फर्डिनंडला शांत करून त्याला प्रशिक्षणाकडं वळवायचं काम तिला होतं. दातपडकी, चहाटळ, आगाऊ...पण स्वभावानं गरीब शेळीच.
-फर्डिनंडला जुने मित्र भेटले. ग्वापो उंच झाला होता. बोन्स तयार होत होता. व्हालियेंतेचा नखरा कायम होता. फर्डिनंड एवढा तगडा झालेला बघून त्याला पुन्हा असूया वाटली. त्याला खुमखुमी होतीच.
आंगुस हा स्कॉटिश खोंड होता. त्याच्या कपाळावर एवढे केस की बिचाऱ्याला आपण धडक कशावर मारतोय, हेच दिसायचं नाही! माकिना नावाचा एक शांत; पण रांगडा सांड होता. त्याला म्हणे प्रयोगशाळेत जन्माला घालण्यात आलं होतं...
-फर्डिनंडचा जणू लुपेनं ताबाच घेतला. ती त्याला सावलीसारखी सोबत करून फाइटसाठी तयार करू लागली. तिथंच त्याला उना, दॉस, क्‍वात्रो हे हेजहॉग्ज भेटले. हेजहॉग्ज म्हणजे काटेरी शरीराचे रानउंदीर. गमतीदार होते. फर्डिनंड दैत्यासारखा दिसत असला तरी स्वभावानं प्रेमळ आहे, हे त्या चिमुकल्या जीवांनी ओळखलं. शेजारीच जर्मन वाणाच्या घोड्यांचा स्टडफार्म होता. तिथली ग्रेटा, क्‍लॉस, हान्स हे घोडे मात्र महा-अहंकारी होते. "अंगाला वास येणारे बैल...शी:!' म्हणत ते शेपूट आणि नाक दोन्ही उडवत. स्टडफार्म आणि गोठ्याचं आवार यांच्यात कुंपण होतं. त्यात वीज खेळवलेली होती. प्राण्यांमध्येही अस्पृश्‍यता, वर्गविग्रह, वर्णद्वेष हे सगळं होतंच.
-फर्डिनंड म्हणाला ः ""इथं सडत राहून एक दिवस रिंगणात मरण्यात काहीही शौर्य नाही. आपण बाहेर जायला हवं. बाहेर जग सुंदर आहे...''
...सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं.
* * *

एल प्रिमेरो जेव्हा कासा देल तोरोवर आला, तेव्हा त्याचा तोरा पाहण्यासारखा होता. स्पेनमधला हा आघाडीचा मातादोर. सडसडीत बांध्याचा, त्याचा कुर्रा पाहण्याजोगा. याच्यासमोर रिंगणात कुठलाही सांड आजवर टिकलेला नाही. त्याला आता असा सांड हवा आहे की तो कुणालाही न जुमानणारा हवा. अवाढव्य, राक्षसी आणि रागीट हवा. एल प्रिमेरोला अशा सांडाशी पंगा घ्यायचा आहे.
कासा देल तोरोच्या मोरेनोनं आपले सगळे खोंड त्याच्यासमोर पेश केले. सज्जात उभं राहून एल प्रिमेरोनं नाक मुरडलं. ""तेजतर्रार सांड हवाय, ही कसली शेळपटं?'' तो बरळला. व्हालियेंतेला यानिमित्तानं संधीच मिळाली. त्यानं फर्डिनंडला आव्हान दिलं. ""चल, शेपूटघाल्या, मरायला तयार हो. मी इथंच गाडतो तुला!''
-फर्डिनंडनं नकार दिला. कुणाला तरी पैसे मिळतात, विकृत आनंद होतो म्हणून मी आपल्या भाईबंदांचं रक्‍त काढायला तयार नाही...तो म्हणाला. तरीही व्हालियेंते ऐकेना. त्यानं त्वेषानं फर्डिनंडला धडक मारली. फर्डिनंड शांत राहिला. त्यानं झुंज घ्यायला ठामपणे नकार दिला. व्हालियेंतेनं आपली बाकदार शिंगं फर्डिनंडच्या शिंगात अडकवली. फर्डिनंड चांगलाच मजबूत होता. तो ढिम्म हलला नाही. कडाड...खाट...!
व्हालियेंतेचं शिंग मोडून पडलं होतं. फर्डिनंडला कमालीचं वाईट वाटलं. तेवढ्यात एल प्रिमेरो चुटकी वाजवून म्हणाला : ""मिळाला, मला हवा तसा सांड मिळाला. हाच मी माद्रिदला झुंजीसाठी घेऊन जाणार!''
व्हालियेंतेची रवानगी खाटीकखान्याकडं झाली. फर्डिनंड माद्रिदकडं निघाला.
पुढं काय झालं? पुढं जे घडलं त्याला क्रांतीच म्हणायला हवं.
-फर्डिनंडनं माद्रिद गाजवलं? त्यानं एल प्रिमेरोला रिंगणाबाहेर भिरकावलं की स्वत:च घायाळ होऊन पडला? फर्डिनंडला निना पुन्हा भेटली? झुंज न घेता माणसाला हीरो बनता येतं? अशा सगळ्या प्रश्‍नांना उत्तरं देत फर्डिनंडची कहाणी अशी काही चित्तथरारक वळणं घेत जाते की बस. देखते रहो.
* * *

हा ऍनिमेशनपट पाहिल्यावर अभिजात वाङ्‌मय "अभिजात' का असतं, याचं उत्तरच मिळून जातं. खदाखदा हसवत, क्‍वचित डोळ्यांतून पाणी काढत ही कहाणी अगदी आत्ताच्या जागतिक समस्येवरच बोट ठेवते. मन्‍रो लीफ यांनी ही गोष्ट लिहिली, तिची आजमितीस साठ भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. "आइस एज', "रिओ'सारखे लाजबाब ऍनिमेशनपट बनवणाऱ्या कार्लोस सालडानासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकानं गेल्या वर्षी "फर्डिनंड'चा हा नवा थ्रीडी अवतार पेश केला, तेव्हा बालबच्चे खूश होणं साहजिकच होतं.
-फर्डिनंडला या चित्रपटात आवाज मिळाला होता जॉन सेनाचा. जॉन सेना म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूईच्या लुटुपुटूच्या मारामाऱ्यांमधला जबरदस्त फायटर! मागल्या खेपेला डिस्नीच्या "मोआना'मध्ये ड्‌वेन जॉन्सनचा आवाज वापरलेला होता, आठवतंय? ही ऍनिमेशनवाल्यांची नेहमीची ट्रिक असते. कार्टून व्यक्‍तिरेखांचे आवाज लाडक्‍या सिताऱ्यांचे वापरायचे.
ऍनिमेशनचे रंग अतिशय सुंदर आहेत. स्पेनची उन्हं, हिरवाई, बैलोबांच्या व्यक्‍तिरेखा अप्रतिम आहेत. कहाणीचा वेग मस्त आहे. गाणी तर बहारदार आहेत. एकंदरीत एक प्रसन्न अनुभव फर्डिनंड देतो.
आपण तर पिंडानंच भारतीय. बैलपोळा कौतुकानं साजरा करणाऱ्या किसानसंस्कृतीचे वारस. त्यात गांधीजींना आवडलेली गोष्ट, म्हणून तर आपण फर्डिनंडचे नातलगच होऊन जातो. लवकरात लवकर बघूनच टाका फर्डिनंड. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था व्हायची!

Web Title: pravin tokekar write article in saptarang