दर्यादिल... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 12 ऑगस्ट 2018

"कॅप्टन फिलिप्स' ही समुद्रसाहसकथा शंभर टक्के खरीखुरी होती. एका अमेरिकी मालवाहू बोटीच्या कप्तानाच्या वास्तवातल्या अपहरणावर आधारित. अमेरिकेच्या नौदलानं अचूक मोहीम राबवत त्या कप्तानाला सहीसलामत सोडवून आणलं. जहाजकंपनीचं नुकसान वाचवलं. त्या खऱ्याखुऱ्या मालवाहू बोटीचा खराखुरा कॅप्टन रिचर्ड फिलिप्स अमेरिकेचा हीरो ठरला. त्याची ही चित्तरकथा.
किंचितही भंकसबाजी नसलेला हा सिनेमा एकदा तरी बघावाच.

"कॅप्टन फिलिप्स' ही समुद्रसाहसकथा शंभर टक्के खरीखुरी होती. एका अमेरिकी मालवाहू बोटीच्या कप्तानाच्या वास्तवातल्या अपहरणावर आधारित. अमेरिकेच्या नौदलानं अचूक मोहीम राबवत त्या कप्तानाला सहीसलामत सोडवून आणलं. जहाजकंपनीचं नुकसान वाचवलं. त्या खऱ्याखुऱ्या मालवाहू बोटीचा खराखुरा कॅप्टन रिचर्ड फिलिप्स अमेरिकेचा हीरो ठरला. त्याची ही चित्तरकथा.
किंचितही भंकसबाजी नसलेला हा सिनेमा एकदा तरी बघावाच.

"उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी...' अशा विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळी आहेत. विंदांच्या या ओळीतल्या पूर्वार्धाबरहुकूम, उसळलेल्या दर्याची आयाळ उसनी घेणाऱ्या एका दर्यावर्दी कॅप्टनची कहाणी मध्यंतरी पडद्यावर आली होती. मध्यंतरी म्हणजे पाचेक वर्षांपूर्वी. चित्रपटाचं नाव होतं ः कॅप्टन फिलिप्स.
हा चित्रपट लक्षात राहण्याजोगा. भरपूर गल्ला आणि कौतुकाचा कल्ला करणाऱ्या या चित्रपटात काय नव्हतं? उधाणलेला दर्या होता. कर्दनकाळ समुद्री चाचे होते. दर्यावर्दी खलाशी होते, सिंहाचं छाताड असलेला धीरोदात्त तांडेल होता. भलाई विरुद्ध खलत्व यांचा तुफान झगडा होता. गोळीबार, दहशतवाद सबकुछ... नव्हतं फक्‍त फिल्मी नाट्य. वास्तविक गल्लाभरू चित्रपटाचे सगळे घटक हाताशी असले की हॉलिवूडवाल्यांना चेव येतो. समुद्रावरच्या साहसपटांची तर या हॉलिवूडवाल्यांना चटकच आहे; पण अशा मोहात न पडता एक कोरं करकरीत सत्य मांडण्याचा "कॅप्टन फिलिप्स'च्या निर्मात्यामंडळींचा अट्टहास बुचकळ्यात टाकणारा होता. पॉल ग्रीनग्राससारखा नाणावलेला दिग्दर्शक इथं होता. एरवी "बोर्न त्रिधारे'सारखे अफाट मारधाडपट देणारा ग्रीनग्रास इथं जाणत्यासारखा वागला. त्याच्या सूचनेनुसार कॅमेरा चक्‍क डॉक्‍युमेंटरीसारखा हलला. संगीतसुद्धा माफक. व्यक्‍तिरेखा अगदी अस्सल. गरजेपुरते नाणावलेले नट सोडले तर बाकी सगळे हौशी किंवा नवखे. अर्थात मुख्य भूमिकेत नटसम्राट टॉम हॅंक्‍स उभा होता. तो असल्यावर आणखी काय हवं?
पॉल ग्रीनग्रासनं रसिकांसमोर मांडलं होतं ते अथांग वास्तव.
विशेष म्हणजे ही समुद्रसाहसकथा शंभर हिश्‍शांनी खरीखुरी होती. सन 2008 मध्ये एका अमेरिकी मालवाहू बोटीच्या कप्तानाचं अपहरण काही सोमाली चाच्यांनी केलं होतं. त्याला पाच दिवस वेठीला धरून काही लाख डॉलर्सची मागणी त्यांनी केली. त्यांना कदाचित मिळूनही गेले असते ते पैसे; पण अमेरिकेच्या नौदलानं अचूक मोहीम राबवत त्या कप्तानाला सहीसलामत सोडवून आणलं. जहाजकंपनीचं नुकसान वाचवलं. किरकोळ जखमांव्यतिरिक्‍त कुणाला काही झालं नाही. बोटीच्या कप्तानानं दाखवलेलं अतुलनीय धाडस आणि प्रसंगावधान याच्यामुळेच ही सरशी साधता आली, असं अमेरिकी नौदलानंही नंतर मान्य करून टाकलं. त्या खऱ्याखुऱ्या मालवाहू बोटीचा हा खराखुरा कॅप्टन रिचर्ड फिलिप्स अमेरिकेचा हीरो ठरला. त्याची ही चित्तरकथा आहे.
किंचितही भंकसबाजी नसलेला हा सिनेमा एकदा तरी बघावाच.
* * *
खलाश्‍याचं जिणं "बारा बंदरी' असतं. महिना-दोन महिने घरी कुटुंबासमवेत काढले की पुन्हा बॅग भरून समुद्राकडं पळायचं. आळसटलेला रिचर्ड फिलिप्स त्या दिवशी अशीच सवयीनं बॅग भरू लागला. विमानतळ गाठायचा. मग थेट ओमानचं विमान पकडून सलाला बंदराकडं. तिथं त्याची मालवाहू बोट उभी आहे. त्याच्या "मर्स्क' या अवाढव्य जहाजकंपनीनं त्याची ड्यूटी तिथं लावली होती. ओमानचा माल केनियातल्या मोम्बासामध्ये नेऊन टाकायची जबाबदारी होती. पल्ला ग्रेट नव्हता; पण धोकादायक नक्‍कीच होता. मात्र, रिचर्ड फिलिप्सला या दर्यावर्दी आयुष्याची सवय आहे. नाही म्हटलं तरी गेली वीसेक वर्षं हेच करतोय तो. काही महिने बोटीवर घालवले की व्हर्मोंटमधल्या अंडरहिलच्या घरी यायचं. त्याची लाडकी बायको अँड्रिया त्याची वाट पाहत असायची. त्यांना दोन गोड मुलं होती. मुलांचं भविष्य तर आपल्यापेक्षाही असुरक्षित आणि अधिक स्पर्धात्मक असणार आहे, त्यांच्यासाठी बेगमी करायची म्हणून तर कॅप्टन रिचर्ड असा राबतोय. बंदराबंदरातून फिरतोय.
बायकोनं त्याला विमानतळावर सोडलं. नेमकं सांगायचं तर हा दिवस होता 23 मार्च 2009.
कॅप्टन रिचर्ड फिलिप्स आपल्या जहाजाकडं निघालेला असताना दूर तिथं सोमालियाच्या किनारपट्‌टीवर, अैल नावाच्या मच्छिमार गावात निराळंच काही घडत होतं. ते कॅप्टन रिचर्ड फिलिप्सच्या मुळावर उठणार होतं.
* * *
आपल्या कळकट झोपड्यात जमिनीवरच झोपलेल्या अब्दुवली मुसे नावाच्या अट्टल दर्यावर्दी बदमाशाला कुणीतरी येऊन उठवलं. निरोप दिला की, "ते येताहेत...' कोण हे "ते'? तर गराड नावाच्या एका गुंडाची माणसं. हा एक प्रकारचा इथला माफियाच आहे. इथल्या मच्छिमारांना गराडच्या माणसांना दरवेळी काही मलिदा द्यावा लागतो. वेळप्रसंगी मोहिमेसाठी आपली होडी, गलबतं द्यावी लागतात. हुफान नावाचा इसम त्या गावाचा म्होरक्‍या होता. त्यानं घाईघाईनं बोटी समुद्रात लोटायचं ठरवलं. गराडची माणसं येण्याच्या आत काहीतरी सोय करायला हवी. अब्दुवली मुसे आणि असद या दोघांना त्यानं बोलावून तीन तीन माणसं निवडून होड्या तयार ठेवायला फर्मावलं. हुफानकडं एक मध्यम आकाराचा मच्छिमार ट्रॉलर होता. तैवानी खलाशांना "उडवून' गेल्या वर्षीच त्यानं तो ढापला होता. एक ट्रॉलर आणि तिची दोन बाळं, म्हणजे त्या होड्या, अशा समुद्री "गॅंग'निशी खोल पाण्यात जाऊन एकांड्या बोटी अडवायच्या, बंदुकीची नळी टेकवून ताब्यात घ्यायच्या आणि जहाजकंपनीकडं खंडणी मागायची... हा किफायतशीर धंदा होता! बहुतेक कंपन्या कटकट न करता पैसा देत. कारण, त्यांचा कार्गो आणि वेळ खूपच किमती.
अब्दुवली मुसेनं बिलाल, एल्मी आणि नजी नावाचा एक हरकाम्या निवडला. होडीत इंधन, पाणी, अन्न वगैरे सामग्री भरली. हातात मशिनगन्स पेलल्या आणि होडी समुद्रात लोटली. मुसेची टीम लाटांवर उडत खोल समुद्राकडं निघालेली असतानाच सलालाच्या बंदरात कॅप्टन रिचर्ड फिलिप्स आपल्या "एमव्ही मर्स्क अलाबामा' या नौकेची बारकाईनं पाहणी करत होता. नौका अवाढव्य होती. गोदीतल्या शांत पाण्यात हलकेच डुचमळत होती. खलाश्‍यांची लगबग सुरू होती. कार्गो धडाधड भरला जात होता. प्रचंड मोठ्या क्रेन्स शेकडो टनी कंटेनर उचलून बोटीवर आणून ठेवत होत्या.
कॅप्टनच्या लक्षात आलं की बोटीच्या खिडक्‍या, दारं, जिने सगळं खुलं आहे. त्यानं ताबडतोब आपल्या दुय्यम सहकाऱ्याला कडेकोट बंदोबस्त करायला सांगितलं.
""हलो!'' ब्रिजवर आल्या आल्या कॅप्टननं विश केलं. कंट्रोल्स चेक केले.
""हलो कॅप...ऑर्डर कॉल सांगू?'' फर्स्ट मेट शेन मर्फीनं ताबडतोब माहिती सांगायला सुरवात केली. त्याच्या यादीनुसार एमव्ही मर्स्क अलाबामावर अडीच हजार टन व्यापारी माल होता. दोनशे टन अन्न, 166 टन गोडं पाणी आणि 250 टन इंधन होतं. कागद उलगडून शेन मर्फीनं कॅप्टनला प्रवासाचा मार्गही दाखवला. एडनच्या आखातातून हॉर्न ऑफ आफ्रिकेला वळसा घालत मोम्बासाला पोचायचं, असं चार्टमध्ये दिसत होतं. एडनचं आखात ठीक आहे; पण आफ्रिकेचं शिंग ओलांडून जाणं जिकिरीचं होतं. हल्लीच्या काळात हा अगदी बेकार मार्ग झाला आहे. सोमालियानजीकच्या पाण्यातून जावं लागतं.
"हॉर्न ऑफ आफ्रिका' म्हणून ओळखला जाणारा हा विशाल भूभाग प्राचीन काळी बर्बरभूमी म्हणूनच बदनाम होता. इरिट्रिया, जिबुती, इथिओपिया आणि सोमालिया हे चार भूप्रदेश या पूर्व आफ्रिकेत सामावलेले आहेत. याच्या दक्षिणेला एडनचं आखात येतं.
"एमव्ही मर्स्क अलाबामा'नं भोंगा वाजवत सालेह बंदर सोडलं.
* **
खोल समुद्रात अवाढव्य जहाजांची वर्दळ होती. हुफानच्या ट्रॉलरवर एक रडार होतं. त्यावरचे असंख्य ठिपके बघून तो चडफडला. गर्दीत जहाज लुटणं अवघड असतं. तेवढ्यात त्याला दूरवर एक एकांडा ठिपका दिसला. तो ठिपका "एमव्ही मर्स्क अलाबामा'चा होता. त्यानं आपला ट्रॉलर आणि दोन्ही होड्या त्या दिशेनं हाकारल्या. सावज टप्प्यात आलं होतं.
थोड्याच वेळात कॅप्टन फिलिप्सनं दोन ठिपके नको तितक्‍या जवळ आलेले पाहिले. त्यानं दुर्बिण रोखली. दोन होड्या अस्पष्ट दिसत होत्या. धोका पत्करायचा नाही म्हणून त्यानं अग्निशमनाची तालीम लगोलग घेऊन टाकली. त्याच्या सावध मनात विचित्र भावना निर्माण झाली होती. हे मच्छिमार नसणार! त्यानं दोन-तीनदा जहाजाची दिशा बदलून पाहिली. त्या होड्या आपला पाठलाग करताहेत, याची खात्री पटली. यूएस मेरीटाइमला त्यानं तातडीनं फोन लावला. प्रतिसाद शून्य. आपल्या वीस जणांच्या क्रूला त्यानं सावध केलं. फर्स्ट मेट मर्फीला त्यानं यूके मरीन ट्रेड ऑर्गनायझेशनला (यूकेएमटीओ) फोन लावायला फर्मावलं. तिथल्या बाईनं चाचेगिरीच्या शक्‍यतेची तक्रार नोंदवून घेतली आणि खबरदारीचा उपाय म्हणून जहाजावरच्या होज पाइप यंत्रणा सज्ज ठेवायची सूचना केली. ही यंत्रणा म्हणजे मोठमोठ्या पाइपांचं जाळं असतं. जहाजाच्या चहूदिशांना समुद्राचं पाणी पंपाद्वारे ओढून प्रचंड जोरानं बाहेर फेकणारी ही यंत्रणा असते. या जोरकस फवाऱ्यांमुळं जहाजाच्या जवळ कुणी येऊ शकत नाही.
चाच्यांच्या होड्यांवर मेरीटाइम रेडिओ असणार, हे ओळखून कॅप्टन फिलिपनं एका काल्पनिक युद्धनौकेला फोन लावला. ""हॅलो, कोऍलिशन मिलिटरी शिप 237...डू यू कॉपी?...एक ट्रॉलर आणि मासेमारीच्या दोन होड्या आमचा पाठलाग करताहेत. चाचेगिरीची शक्‍यता वाटते. लवकरात लवकर मदत पाठवा!'' नंतर आवाज बदलून "कॉपी दॅट...मदत पाच मिनिटांत येतेय' असं कॅप्टन फिलिप्सनं स्वत:च पुटपुटून "संभाषण' पुरं केलं.
कॅप्टन फिलिप्सच्या अंदाजानुसार, हुफाननं हा "संवाद' त्याच्या रेडिओवर ऐकला. तो जाम
टरकला आणि सरळ मागं वळून निघूनच जाऊ लागला. दुसरी होडीही त्याच्यापाठोपाठ निघाली. उरता उरला हट्टी अबुवली मुसे आणि त्याची चौघा लुटारूंची गॅंग. ते मात्र लाटा झेलत एमव्ही मर्स्क अलाबामाकडं झेपावलंच. कॅप्टननं इंजिनरूममधल्या बोटीच्या मुख्य इंजिनिअरला - माइक पेरीला- सांगून जहाजाचा वेग प्रचंड वाढवला.
संकट टळलं; पण एका रात्रीपुरतंच.
* * *
दुसऱ्या दिवशी मुसेनं हट्टाला पेटून हुफानची दुसरी होडी पळवली आणि पुन्हा "एमव्ही मर्स्क अलाबामा' गाठली. आपण सोमाली कोस्टगार्ड आहोत, असं सांगून बोटीवर चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण कॅप्टन फिलिप्सनं त्यांना दाद दिली नाही. शेवटी, अथक्‌ प्रयत्नांनंतर मुसे आणि त्याचे साथीदार बोटीत घुसलेच. दरवाजांची कुलपं बंदुकीच्या गोळ्यांनी उडवत मुसेची टोळी थेट ब्रिजवर आली. कॅप्टन फिलिप्सच्या कपाळाला बंदूक टेकवत मुसे मोडक्‍यातोडक्‍या इंग्लिशमध्ये म्हणाला : ""या जहाजाचा कप्तान आता तू नाहीस...मी आहे!''
""कमॉन...तुम्ही हे असं काही करायची गरज नाही. साधा कार्गो आहे माझ्याकडं. हे जहाजही जुनं आणि बिघडलेलं आहे. कशाला मारपीट करता?'' कॅप्टन फिलिप्सनं बोलणी सुरू केली. त्याआधी त्यानं आपल्या क्रूला इंजिनरूममध्ये आणि ठिकठिकाणी दडवलं होतं. जहाजावरच्या छोट्या तिजोरीत 30 हजार डॉलर्सची रोख रक्‍कम होती. ती त्यानं मुसेला देऊ केली.
""भिकारी वाटलो का रे तुला? तुझा क्रू कुठाय? मला तुझ्या जहाजाची तपासणी करायची आहे...'' मुसेनं फर्मावलं.
""क्रू कशाला हवाय? मी कॅप्टन आहे इथं तुझ्यासमोर...मला गोळी घाल हवं तर, क्रूचा काही संबंध नाही...,'' कॅप्टन फिलिप्स ओरडला. काहीही न बोलता मुसेनं बंदूक कॅप्टनच्या डोक्‍याला टेकवली. बिलाल नावाच्या साथीदाराला सोबत घेऊन तो जहाजाच्या तपासणीला निघाला.
कॅप्टन फिलिप्सनं आपल्या क्रूला सूचना देऊन ठेवली होती की चाचे जहाजावर आले तर कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या हातात सापडू नका. होस्टेज सिच्युएशन निर्माण होऊ देऊ नका. मी पटवीन त्यांना...पण तसं घडलं नाही.
इंजिनरूमच्या नजीक क्रूच्या लोकांनी काचेच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या. अनवाणी बिलालच्या पायात काच घुसली. कॅप्टनला त्याच्याबरोबर ब्रिजवर पाठवून इंजिनरूमची तपासणी करू पाहणाऱ्या मुसेला क्रूनं अचानक हल्ला करून घेरलं. इकडं चाच्यांच्या उरलेल्या टोळीनं कॅप्टनची गचांडी धरून त्याला लाइफबोटीकडं नेलं होतं.
आधुनिक लाइफबोट छतवाली असते. लाटांचा मारा सहन करणाऱ्या मटेरिअलनं बनलेली असते. अन्न, इंधनाचा बऱ्यापैकी साठा असतो. चाच्यांची होडी खलास झालीच होती. त्यांना आयती भारी होडी मिळाली...
""तुमचा मुसे आमच्या ताब्यात आहे. कॅप्टनला सोडा, आम्ही याला सोडू. जहाजावरून निघून जा...'' क्रूनं फर्मावलं. चाच्यांची गोची झाली होती. तोवर त्यांनी कॅप्टनला लाइफबोटीत घुसवलं होतं. "आधी मुसेला सोडा' असं त्यांनी सांगितलं. मुसे सुटल्यावर तत्काळ लाइफबोट सुरू झाली.
कॅप्टन रिचर्ड फिलिप्स त्यांच्या जाळ्यात सहज अडकला.
* * *
पुढची कहाणी सांगण्यापेक्षाही ती पाहणं थरारक आहे. कारण, कॅप्टन फिलिप्सची अमेरिकी नौदलानं केलेली सोडवणूक ही एक अफलातून मोहीम होती. टायमिंग, चातुर्य आणि युद्धकलेचं ते एक उदाहरण ठरलं. त्यात मोलाचा वाटा होता तो खुद्द कॅप्टन रिचर्ड फिलिप्स याचाच. त्याचं प्रसंगावधान हा या मोहिमेचा कणा ठरला. तीच या चित्रपटाची खरी कहाणी आहे...
खऱ्याखुऱ्या कॅप्टन फिलिप्सनं सुटका झाल्यावर "अ कॅप्टन्स ड्यूटी : सोमाली पायरेट्‌स, नेव्ही सील्स अँड डेंजरस डेज्‌ ऍट सी' या नावाची आपली अनुभवगाथा लिहिली. तिचंच चित्ररूप म्हणजे हा चित्रपट होता. टॉम हॅंक्‍सच्या वाचनात हे पुस्तक आलं आणि हॉलिवूडमध्ये चक्रं फिरली. सोनी पिक्‍चर्सनं त्या पुस्तकाचे हक्‍क विकत घेतले. खुद्द टॉम हॅंक्‍स मुख्य भूमिका करणार, हे तर ठरलंच होतं. सोमाली चाच्यांची निवड हा अडचणीचा विषय होता. मिनेसोटाच्या मिनिआपोलिस शहरात बऱ्याच सोमाली किंवा पूर्व आफ्रिकी लोकांची वस्ती आहे. तिथं ऑडिशन्स घेतल्या गेल्या. बरखद अब्दी नावाच्या एका किडकिडीत, खपड्या तरुणाचं तिथं मोबाइल फोनदुरुस्तीचं टपरीवजा दुकान होतं. अब्दुवली मुसेची भन्नाट भूमिका त्याला मिळाली. या किडकिडीत, काळ्याभोर सोमाली नटाला चक्‍क ब्रिटिश अकादमीचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. मिनेसोटाच्या त्या गर्दीत बिलाल, हुफान, एल्मी, असद वगैरे मुसेचे साथीदारही पटापट मिळाले होते.
"नेव्ही सील्स'च्या कमांडरची भूमिका वगळता, बाकी "नेव्ही सील्स'च्या भूमिका अमेरिकी नौदलातल्या खऱ्याखुऱ्या नौसैनिकांनी केल्या. त्यातल्या बऱ्याचशा सैनिकांनी मूळ मोहिमेत भाग घेतलेला होता. भूमध्य समुद्रात माल्टानजीक अवघ्या नऊ आठवड्यांत शूटिंग पार पडलं.

पॉल ग्रीनग्रासनं कथानकात थोडे बदल केले; पण बव्हंशी तो मूळ साहसकथेशी प्रामाणिक राहिला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची शैली प्रेक्षकाला अक्षरश: गुंग करते. "बोर्न अल्टिमेटम', "बोर्न सुप्रीमसी' आणि "जेसन बोर्न' या तिन्ही गाजलेल्या चित्रपटांसह ग्रीनग्रासनं दिग्दर्शित केलेला "युनायटेड 93' हा चित्रपटही खूप गाजलेला आहे. पैकी "युनायटेड 93' तर "नाइन-इलेव्हन'च्या शोकान्तिकेवर आधारित होता. हॅंड हेल्ड कॅमेऱ्यानिशी चित्रीकरण करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याला साथ दिली ती कॅमेरामन बॅरी ऍक्राइड या निष्णात कलावंतानं. ऍक्राइडनं चित्रीकरण केलेला ऑस्करविजेता "द हर्ट लॉकर' हा युद्धपट अनेकांच्या लक्षात असेल. टॉम हॅंक्‍सबद्दल काय बोलावं? त्यानं साकारलेला कॅप्टन फिलिप्स विसरता येणंच अशक्‍य आहे.
चित्रपट चिक्‍कार गाजला. "ऑस्कर' आणि "गोल्डन ग्लोब' पुरस्कारांसाठी नामांकनं मिळाली. अर्थात पुरस्कार नाही मिळाला; पण चित्रपटाचं खूप कौतुक झालं. कौतुकाच्या या गदारोळातच "एमव्ही मर्स्क अलाबामा'चा मुख्य इंजिनिअर माइक पेरीनं सीएनएनला मुलाखत देऊन "कॅप्टन फिलिप्स हा एक टरक्‍या, नेभळट आणि कातडीबचाऊ माणूस आहे. चित्रपटात दाखवलंय तसा तो बिलकूल हीरो नाही' असा आरोप केला. माइक पेरीच्या मते, या सिच्युएशनमध्ये आख्खा क्रू ढकलण्याचं पातक निष्काळजी कॅप्टन फिलिप्सनं केलं. माइक पेरीनं आपल्या आरोपांच्या सिद्धतेसाठी अनेक पुरावे सादर केले; पण तोवर चित्रपट तुफान गाजू लागला होता.
प्रसिद्धीच्या लाटांच्या घनगर्जनेत माइक पेरीचा विसंगत आवाज कुठल्या कुठं विरून गेला.

Web Title: pravin tokekar write article in saptarang